सदा डुम्बरे

भारतीय स्वातंत्र्यलढय़ातील पाच महानायकांचा सत्यान्वेषी शोध घेणारे साधार व समकालीन लेखन म्हणून नरेन्द्र चपळगावकर यांच्या ‘त्यांना समजून घेताना’ या पुस्तकाचे स्थान निश्चित करता येईल. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि चक्रवर्ती राजगोपालाचारी (राजाजी) हे ते पाच नायक! या महान व्यक्तींसंबंधी स्वतंत्रपणे लिहिलेली विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध असतानाही या पुस्तकाचे महत्त्व आहे. याचे कारण त्यांच्यातील परस्पर संबंधांचा फार विलोभनीय गोफ यात विणला आहे. माहितीचे सर्व अद्ययावत स्रोत आणि तथ्ये यांचा उपयोग करून लेखक स्वातंत्र्यलढय़ातील अर्धशतकाचा कालपटआपल्यासमोर उभा करतोच; परंतु हे लेखन केवळ वर्णनात्मक न राहता भारताच्या आधुनिकतावादी संरचनेत या व्यक्तींचे कळीचे योगदान आणि सत्यशोधकीय दृष्टीने त्यांचे केलेले मूल्यमापन यामुळे या पुस्तकाचे मूल्यवर्धन होते.

sanjay ruat and shrikant shinde
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”
Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन
prakash ambedkar
“चळवळीला लाचार करून…”, प्रकाश आंबेडकरांचा मविआला टोला; म्हणाले, “माझ्या आजोबांनी…”

विशिष्ट राजकीय मतप्रणालीच्या वर्चस्ववादी प्रस्थापनेसाठी असत्यालाच सत्याचा मुखवटा चढवून फॅशनेबल करण्याच्या सत्तातुरांच्या विद्यमान खेळात या महानायकांना वारंवार पणाला लावले जाते. अशा काळात न्यायबुद्धीने केलेल्या या लेखनाचे महत्त्व अधोरेखित होते. तात्कालिक राजकीय फायद्यासाठी राष्ट्रीय प्रतीकांचे अपहरण करून त्यांचे राष्ट्रप्रेम, त्यांची देशभक्ती, त्यांचा त्याग, त्यांचे कर्तृत्व याबद्दल लोकांच्या मनात संशय निर्माण करणारे प्रचारी कारखाने अहर्निश सुरू असताना सत्यकथनाची एक ज्योतही समाजाला प्रकाशाची वाट दाखवू शकते. लेखकाचे मूळ लेखन हे उद्दिष्ट स्पष्टपणे समोर न ठेवता झाले असल्याने त्याला प्रचाराचा पुसटसाही वास नाही. त्यात वकिली अभिनिवेश नाही. अनेक निमित्ताने ते लिहिले आहे. केवळ स्वत:च्या सदसद्विवेक बुद्धीला प्रमाण मानून, अभ्यासकाच्या तटस्थतेने हे लेख लिहिले आहेत. त्यामुळेच त्याची वाचनीयता आणि विश्वासार्हता वाढली आहे.

अनुक्रमाने पुस्तकातील पहिलाच लेख ‘लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी’ असा आहे. कालानुक्रमानेही तो तसाच असायला हवा. कारण भारतीय राजकारणाच्या अवकाशात महात्मा गांधींचा उदय होण्याआधी राजकारणाची सर्व सूत्रे महाराष्ट्राच्या हाती होती. भारतीय पातळीवर मान्यता पावलेले टिळक आणि गोखले हे पहिले नेते. इंग्रजांनी देशाची सत्ता जशी मराठय़ांकडून हस्तगत केली, तसेच स्वातंत्र्य चळवळीचे हस्तांतर टिळक ते गांधी असे झाले.

टिळक आणि गांधी यांच्या तत्त्ववैचारिक धारणेत टोकाचे अंतर होते.‘अहिंसा’ हा गांधींच्या तत्त्वज्ञानाचा व राजकीय व्यवहाराचा पाया होता, तर टिळकांना राजकीय हिंसा अमान्य नव्हती असे याबाबत दोन पक्ष घेतले जातात. गांधी हा ‘आपला’ माणूस नाही, इतकेच नव्हे तर तो टिळकांचा राजकीय प्रतिस्पर्धी आहे, ही टिळक अनुयायांची घट्ट धारणा होती. प्रत्यक्षात हे दोन नेते समांतर भूमिका घेऊन पुढे जाणारे नव्हते; त्यांच्यात वैचारिक एकात्मता होती आणि भविष्यात ते सिद्धही झाले, असे साधार विवेचन लेखकाने केले आहे.

गांधी आणि टिळकांच्या आयुष्यातील मोजक्या घटना, प्रसंग आणि लेखनाचा आधार घेऊन चपळगावकर या महानायकांमधील मतभेदांना पार करून त्यांच्या भूमिकांतील ऐक्य किंवा एकत्व अधोरेखित करतात. टिळकांचेच राजकारण गांधींनी विकसित केले. लोकलढे उभे करून, सत्याग्रहासारखी अभिनव शस्त्रे वापरून स्वातंत्र्यलढय़ाची पुढची पायरी गाठली. या मार्गाची योग्यता टिळकांनीच प्रथम जाणली. गांधींना त्यांचा विरोध नव्हताच, सहकार्यच होते आणि गांधींनाही टिळकांबद्दल अपार आदर व स्नेह होता हे अनेक प्रसंगात दिसले आहे. टिळक आणि गांधी यांच्यातील हे अद्वैत लेखकाने ठळक करून दाखविले आहे.

गांधी, नेहरू आणि सुभाषचंद्र या त्रयीतील मतभेदांना वितुष्टाचे रूप देऊन भारतात पुष्कळ राजकारण करण्यात आले. त्यात गांधी-नेहरूंना खलनायक ठरविण्यापर्यंत हितसंबंधीयांची मजल गेली. मात्र, या पुस्तकातील ‘गांधी, नेहरू आणि सुभाषचंद्र’ या लेखात लेखकाने वस्तुनिष्ठतेने ते लोकप्रिय ‘गूढ’ उकलून दाखविले आहे. नेताजींचा ऑगस्ट, १९४५ मध्ये विमान अपघातातच मृत्यू झाला, हे अनेक चौकशी अहवालांनंतर निर्विवादपणे स्पष्ट झाले आहे. नेताजींच्या कुटुंबीयांनीही ते सत्य आता स्वीकारले आहे. स्वातंत्र्यलढय़ात फॅसिस्ट मुसोलिनी व हिटलरचीही मदत घेण्याच्या नेताजींच्या कल्पनेला केवळ नेहरू व गांधीच नव्हे, तर काँग्रेस कार्यकारिणीचाच ठाम विरोध होता आणि ती त्यांची कठोर तत्त्ववैचारिक भूमिकाच होती. नेताजींचा हा मार्ग मान्य नसणाऱ्या नेत्यांच्या मनात सुभाषचंद्रांच्या नेतृत्वाबद्दल असूया होती, हे धादांत असत्य होय. नेताजी आणि नेहरू- दोघांनाही गांधीजी आपला मुलगा मानत. सुभाषचंद्रांचा सशस्त्र लढय़ाचा मार्ग गांधींना मान्य नव्हता आणि हे माहीत असूनही नेताजींनी त्यासाठी गांधींचे आशीर्वाद मागितले आहेत. गांधींना ‘राष्ट्रपिता’ हे संबोधन प्रथम नेताजींनी वापरले आहे. क्षयाने आजारी असलेल्या कमला नेहरू युरोपात उपचार घेत असताना पंडितजी भारतात तुरुंगात होते, तेव्हा युरोपात असलेले नेताजी त्यांची सुश्रूषा करीत होते. नेताजींच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी एमिली शेंकल यांना नेहरू व पटेल मदतीचा हात देत होते. सुभाषचंद्रांची कन्या अनिता भारतात आली तेव्हा पाहुणी म्हणून तिचे वास्तव्य पंतप्रधान असलेल्या नेहरूंच्या सरकारी निवासस्थानी होते.

नेताजींनी ‘आझाद हिंद सेने’च्या तुकडय़ांना गांधी आणि नेहरूंची नावे दिली होती. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर युद्धकैदी झालेल्या आझाद हिंद सेनेच्या सैनिकांवर व अधिकाऱ्यांवर युद्ध गुन्हेगार म्हणून कारवाई करण्याचे इंग्रज सरकारने ठरविले, तेव्हा २० ऑगस्ट १९४५ रोजी नेहरूंनी जाहीर पत्रक काढून ‘आझाद हिंद सैनिकांना सामान्य बंडखोर मानू नये. या सैनिकांना दिलेली शिक्षा भारताला दिलेली शिक्षा आहे, असे समजण्यात येईल’ असा खणखणीत इशारा दिला. नेताजींच्या तीन प्रमुख सहकाऱ्यांवर इंग्रज सरकारने खटला दाखल केला, तेव्हा त्यांच्या बाजूने न्यायालयात इतर वकिलांबरोबर अनेक वर्षांनंतर ‘बॅरिस्टर’ नेहरू काळा कोट घालून तडफेने उभे होते. या अधिकाऱ्यांचे व सैनिकांचे स्वातंत्र्यानंतर सन्मानाने नागरी सेवांत पुनर्वसन करण्यात आले. नेताजींचा सशस्त्र लढय़ाचा मार्ग गांधी- नेहरूंना मान्य नव्हता, याचा अर्थ ते त्यांना शत्रुस्थानी होते असा बाळबोध समज करून घेण्याचे कारण नाही. या तिन्ही महान नेत्यांचे थोरपण समजावून सांगण्याचे महत्त्वाचे काम या लेखात झाले आहे.

म. गांधी आणि स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे बिनीचे सहकारी यांच्यातील परस्पर नातेबंध हा पुस्तकाचा केंद्रबिंदू असला, तरी नेहरू आणि पटेल यांच्यासंबंधीचा स्वतंत्र लेखही यात आहे. त्याचे कारण उघड आहे. लेखकाने स्पष्टपणे ते नोंदविले आहे. राजकीय कार्यक्रमपत्रिकेचा भाग म्हणून ‘नेहरू विरुद्ध पटेल’ असे द्वंद्व उभे करणे आणि पटेलांवर कसा अन्याय झाला, खरे तर ज्येष्ठत्वाच्या नात्याने पंतप्रधानपदावर त्यांचाच कसा हक्क होता आणि गांधी व नेहरू यांनी (जणू कट करून) तो कसा डावलला, याबद्दल अलीकडच्या काळात वारंवार उच्चरवात आणि प्रचारकी थाटात बोलले जाते. राष्ट्रीय प्रतीकांचे असत्याच्या आधाराने अपहरण करून राजकीय फड जिंकण्याच्या या प्रवृत्तीला उत्तर देता येईल ते पूर्वग्रह टाळून सबळ पुराव्यांच्या आधारे! इतिहासाचे पुनर्मूल्यांकन करण्याची प्रक्रिया अखंड चालूच असते. त्यात राजकारण्यांच्या सोयीपेक्षा विद्वानांच्या अभ्यासाला त्यामुळेच महत्त्व व प्रतिष्ठा प्राप्त होते. पुस्तकातील ‘जवाहरलाल आणि वल्लभभाई : सत्तेतली भागीदारी’ या लेखाचे परिशीलन त्या अंगाने केले तर वाचकाला सत्याच्या पुष्कळ जवळ जाता येते.

पहिली गोष्ट म्हणजे सरदारांना गांधींच्या जीवनात धाकटय़ा भावाचे स्थान होते. असे असतानाही गांधींनी आपला राजकीय वारसदार व देशाचा भावी नेता म्हणून नेहरूंची निवड जुलै, १९२९ मध्ये जाहीर केली. १९४२ मध्ये काँग्रेस महासमितीच्या वर्धा येथे झालेल्या बैठकीत त्यांनी याचा स्पष्टपणे पुनरुच्चार केला. ते म्हणाले, ‘मी अनेक वर्षे सांगतो आहे आणि आताही सांगतो की, राजाजी नव्हे, तर जवाहरलाल हेच माझे वारस असतील.’ गांधींची ही निवड काँग्रेसने एकमुखाने स्वीकारली होती आणि सरदार पटेल यांचाही त्याला अपवाद नव्हता. नेहरूंचे खुद्द गांधींबरोबर मूलभूत मतभेद होते आणि सरदार पटेल यांच्याबरोबरही होते. परंतु ते वैचारिक मतभेद होते, व्यक्तिगत नव्हते. हे मतभेद बाजूला सारून गांधीहत्येनंतर दोघांनी एकत्रितपणे बिकट परिस्थितीत नव्याने स्वतंत्र झालेल्या देशाचे नेतृत्व केले, याला इतिहास साक्षी आहे.

‘अगेन्स्ट द टाइड’ या मिनू मसानींच्या आठवणीपर पुस्तकातील एक प्रसंग लेखकाने उद्धृत केला आहे. नेहरू व पटेल यांचे मतभेद वाढले असताना मसानी पटेल यांना भेटायला गेले. त्या भेटीत- ‘तुम्ही भारताचे पंतप्रधानपद का स्वीकारले नाही?’ असा प्रश्न मसानींनी त्यांना विचारला. ते म्हणाले, ‘मला अगोदरच हृदयविकाराचा एक झटका येऊन गेला आहे. माझी प्रकृतीही चांगली नाही. अशा वेळी मी जर पंतप्रधानपद स्वीकारले असते, तर कामाच्या ओझ्यामुळे यापूर्वीच माझा मृत्यू झाला असता. त्यानंतर जवाहरलाल सत्तेत येताना कम्युनिस्ट आणि इतर अनिष्ट शक्तींनी अधिक घेरले गेले असते. असा धोका पत्करणे इष्ट नव्हते.’ यावरून नेहरू व पटेल हे राजकीय स्पर्धक नव्हते हे स्पष्ट होईल. त्यामुळे आजच्या काळातील नीतिहीन सत्तास्पर्धेच्या परिप्रेक्ष्यातून देशहिताला प्राधान्य देणाऱ्या या दोन थोर नेत्यांचे मूल्यांकन करणे दोघांवरही अन्यायकारक आहे.

‘वल्लभभाईंची धर्मनिरपेक्षता’ या शीर्षकाचा आणखी एक स्वतंत्र लेख पुस्तकात आहे. धर्मनिरपेक्षता हे स्वातंत्र्य चळवळीत विकसित झालेले आधुनिक लोकशाही मूल्य आहे आणि सरदार पटेल यांचा या संकल्पनेवर दृढ विश्वास होता. स्वतंत्र भारत धर्मनिरपेक्षच असेल आणि राज्यकारभारात तेच तत्त्व योग्य आहे, अशी सरदारांची निष्ठा होती. उपपंतप्रधान व गृहमंत्री म्हणून राष्ट्रगाडा हाकताना त्यांनी या तत्त्वाचीच निरपेक्षपणे अंमलबजावणी केली. मुस्लिमांनी पटेलांवर जातीयतेचा आरोप केला काय व हिंदुत्ववाद्यांनी त्यांना आपल्या कळपात ओढण्याचा प्रयत्न केला काय, सरदारांनी दोन्ही बाजूच्या जातीयवाद्यांना स्पष्टपणे विरोध केला आहे. कम्युनिस्टांनाही त्यांनी कधी जवळ केले नाही. धार्मिक किंवा वैचारिक, कोणताच अतिरेक त्यांना मान्य नव्हता. अर्थाच्या समकालीन परिप्रेक्ष्यात त्यांना ‘हिंदुत्ववादी’ म्हणणे त्यांच्यावर अन्यायकारकच आहे. ‘हिंदू राष्ट्रवादा’चे ते प्रतीक होऊच शकत नाहीत. ते मुस्लिमविरोधी आहेत असे म्हणणे हा सत्याचा विपर्यास आहे. सत्तांतराच्या कठीण काळात सरदारांनी बजावलेल्या कर्तव्यनिष्ठ भूमिकेचे या लेखात साधार विवेचन केले आहे.

‘काळ आणि काळाला कलाटणी देणारी माणसे समजून घेण्याचा प्रयत्न करणे ही एक बौद्धिक आनंद देणारी प्रक्रिया आहे’ असे लेखकाने प्रास्ताविकात म्हटले आहे, त्याचा प्रत्यय या पुस्तकातील राजाजींवरील लेखात प्रकर्षांने येतो. अलीकडच्या काळात तर चक्रवर्ती राजगोपालाचारी अर्थात राजाजी विस्मृतीतच गेले आहेत. राजाजींचा सार्वजनिक जीवनात प्रवेश झाला तो नामदार गोखलेंनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून! महात्मा गांधींच्या आमंत्रणावरून दक्षिण आफ्रिकेचा दौरा करून भारतात परतल्यावर गोखलेंनी १९१३ च्या ऑक्टोबरपासून गांधींच्या आफ्रिकेतील कामासाठी मदत म्हणून देशव्यापी निधी संकलनाची मोहीम आखली. त्याला प्रतिसाद म्हणून राजाजींनी, ते वकिली करत असलेल्या सेलम शहरातून १५०० रुपये गोळा करून गोखले यांच्याकडे पाठविले. गांधींच्या कार्याशी ते अशा रितीने जोडले गेले आणि शेवटपर्यंत गांधींचे सहकारी व स्नेही म्हणून कार्यरत राहिले.

माऊंटबॅटन यांच्यानंतर भारताचे पहिले देशी गव्‍‌र्हनर जनरल, सरदार पटेल यांच्या निधनानंतर त्यांच्याकडील कळीचे गृहखाते सांभाळणारे केंद्रीय मंत्री, पुढे मद्रास प्रांताचे मुख्यमंत्री आणि नंतर ‘स्वतंत्र पक्षा’चे संस्थापक, तमिळमध्ये लिहिलेल्या ‘रामायण’ व ‘महाभारत’चे कर्ते व या दोन्ही पुस्तकांना मिळालेले अभिजात ग्रंथांचे स्थान, ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय.. राजाजींच्या अशा विविधांगी कर्तबगारीमुळे स्वातंत्र्य चळवळीतील अग्रक्रमांकाच्या नेत्यांमध्ये त्यांची गणना होते.

नेहरू आणि पटेल या दोघांनाही राजाजींचा सल्ला महत्त्वाचा वाटे. विशेषत: गांधींच्या अस्तानंतर. माऊंटबॅटन यांच्यानंतर राजाजी गव्‍‌र्हनर जनरल होते. त्यांनाच राष्ट्रपती करावे असा नेहरूंचा प्रस्ताव होता. तो मान्य झाला नाही. देशाची फाळणी व पाकिस्तानची निर्मिती अपरिहार्य आहे हे राजाजींनी ओळखले होते. पाकिस्तान अपरिहार्य आहे, म्हणून ते आताच देऊन टाकू आणि शांतपणे आपल्या देशाची उभारणी करण्याच्या कामाला लागू, ही १९४२ मध्ये त्यांनी घेतलेली भूमिका काँग्रेसने मान्य केली नाही व ते अलग पडले. काँग्रेसचा राजीनामा त्यांना द्यावा लागला. नेहरूंबद्दल मनात कितीही प्रेम असले तरी त्यांच्या प्रत्येक मताला उचलून धरण्याइतके आंधळेपण त्यांच्याजवळ नव्हते. आपल्या मतस्वातंत्र्याला त्यांनी सर्वोच्च महत्त्व दिलेले होते. नेहरूंचे समाजवादी आर्थिक धोरण त्यांना मान्य नव्हते. त्याची परिणती म्हणून त्यांनी ‘स्वतंत्र पक्ष’ स्थापन केला. त्यास सुरुवातीला यशही मिळाले. पण राजाजींबरोबर त्याचाही अस्त झाला.

‘स्वातंत्र्याच्या चळवळीचे नेतृत्व करणारी आणि स्वतंत्र भारताचा पाया घालणारी ही माणसे कर्तृत्वाने जशी मोठी होती, तशी ती मनानेही मोठी होती. त्यांच्यात मतभेद असणे स्वाभाविक होते. पण आपले मतभेद बाजूला सारून देशहितासाठी एकमनाने काम करावे लागेल याचेही त्यांना भान होते’ ही या पुस्तकाची पाठराखण हेच या सर्व लेखनाचे सार आहे आणि समकालीन नेतृत्वाला संदेशही!

‘त्यांना समजून घेताना’ – नरेन्द्र चपळगावकर, राजहंस प्रकाशन,

पृष्ठे – १८४, मूल्य – २५० रुपये.

sadadumbre@gmail.com