सिद्धार्थ खांडेकर

siddharth.khandekar@expressindia.com

‘जोगो बोनितो’ किंवा ‘सुंदर खेळ’ असं ब्राझिलियन-पोर्तुगीज बिरूद फुटबॉलला चिकटलं ते बहुधा पेले यांच्या सुवर्णयुगात. त्या काळात फुटबॉलशी एक प्रकारची निरागसता निगडित होती. निखळ आनंद देणारा खेळ. विश्वचषकासारख्या बहुराष्ट्रीय स्पर्धामध्ये पेले, दिदी, व्हावा, गॅरिंचा असे ब्राझिलियन शहरांतील झोपडपट्टय़ांमध्ये वाढलेले फुटबॉलपटू पश्चिम आणि दक्षिण युरोपातील सधन देशांशी टक्कर घेतात आणि जिंकतात याचं कौतुक फुटबॉल खेळणाऱ्या देशांच्या पलीकडे वैश्विक होतं. लॅटिन युरोपात फुटबॉल हा जणू स्वतंत्र धर्मच अजूनही मानला जातो.

परंतु प्रसिद्धीच्या मागे पैसा येतो. पैशाचं सोंग आणता येत नाही. गेली काही दशके जगातील सर्व अव्वल फुटबॉलपटू युरोपमध्येच व्यावसायिक फुटबॉल खेळतात. एकीकडे राष्ट्र संघटनात्मक किंवा असोसिएशन फुटबॉल आणि दुसरीकडे क्लब फुटबॉल या चढाओढीत क्लब फुटबॉल पैसा आणि प्रसिद्धी या दोन्ही आघाडय़ांवर कितीतरी अधिक पुढे सरकले आहे. क्लब फुटबॉलचं माहेरघर आहे युरोप. जगातले सर्वात लोकप्रिय क्लब म्हणजे बार्सिलोना, रेआल माद्रिद, मँचेस्टर युनायटेड, लिव्हरपूल, चेल्सी, मँचेस्टर सिटी, टॉटनहॅम हॉटस्पर, आर्सेनल, युव्हेंटस, एसी मिलान, इंटर मिलान, बायर्न म्युनिच, बोरुसिया डॉर्टमुंड, पॅरिस सेंट जर्मेन या क्लबांसाठी जगातील बहुतेक सर्व अव्वल खेळाडू खेळतात. या क्लबांचे उत्पन्न युरोपातील एकूण क्लब उत्पन्नाच्या ९५ टक्के इतके भरते. साहजिकच जवळपास ९० टक्के पुरस्कर्ते याच क्लबांसाठी थैल्या रिकाम्या करतात. युरोपियन क्लब फुटबॉलचे नियंत्रण असते युरोपिय फुटबॉल संघटना अर्थात् ‘युएफा’कडे. क्लब फुटबॉलमध्ये तुलनेने कमी उत्पन्न असलेल्या संघांनाही किमान संधी मिळावी यासाठी काही निकष आणि नियम ‘युएफा’नं आखून दिले आहेत.

गेल्या आठवडय़ाच्या अखेरीस या मोठय़ा क्लबांच्या मांदियाळीतील एक असलेल्या मँचेस्टर सिटीविरुद्ध युएफानं कारवाई केली. मँचेस्टर सिटी हा गतवेळचा इंग्लिश प्रीमियर लीग विजेता क्लब. या क्लबची मालकी आहे- संयुक्त अरब अमिरातींचे उपपंतप्रधान अमिर शेख मन्सूर बिन झायेद अल नाहयान यांच्याकडे. ही व्यक्ती अबूधाबीच्या राजघराण्यातली. मँचेस्टर सिटी क्लबने २०१२ ते २०१६ या काळात स्पॉन्सरशिपमधून मिळालेले उत्पन्न फुगवून सांगितले असा आरोप आहे. अशा प्रकारे उत्पन्न फुगवून सांगणे युएफाच्या ‘फायनॅन्शियल फेयर प्ले’ (एफएफपी) नियमावलीचे उल्लंघन करणारे ठरते. ही नियमावली बडय़ा क्लबांनी आपली आर्थिक ताकद वापरून लीगमधील समतोल बिघडवू नये यासाठी बनविण्यात आली. तिच्या परिणामकारकतेविषयी अनेक प्रवाद प्रचलित आहेत. युएफापर्यंत मँचेस्टर सिटीचे प्रकरण काहीशा अपघातानेच आले. जर्मनीतील ‘डेर श्पीगेल’ मासिकाने काही ई-मेल्सच्या आधारे असे दाखवून दिले की, एतिहाद एअरलाइन्सने (ही अबूधाबीची सरकारी विमान कंपनी) मँचेस्टर सिटीला कबूल केलेल्या वार्षिक पावणेसात कोटी युरो स्पॉन्सरशिपपैकी बहुतेक वाटा वर उल्लेख केलेले शेख मन्सूर यांच्या खिशातूनच येतो. ही ई-मेल्स ‘डेर श्पीगेल’पर्यंत पोहोचवली एका पोर्तुगीज हॅकरनं. ज्याचं नाव- रुई पिंटो. एतिहाद एअरलाइन्सने केवळ ८० लाख युरोच या व्यवहारात अदा केले होते. म्हणजे अधिकृत स्पॉन्सर किंवा पुरस्कर्त्यांऐवजी भलत्याच स्रोताकडून मँचेस्टर सिटीला निधीपुरवठा झाला. मँचेस्टर सिटी हा साधासुधा क्लब नव्हे. गेल्या काही वर्षांमध्ये त्याचे मँचेस्टरमधील अधिक रसिकप्रिय भावंड मँचेस्टर युनायटेड क्लबपेक्षा त्याची कामगिरी उजवी होत आहे. २००८ मध्ये अबूधाबीच्या शाही कुटुंबाने हा क्लब खरीदल्यानंतर या क्लबसाठी अव्वलातले अव्वल फुटबॉलपटू खेचून आणणे धनाढय़ अरबांसाठी अजिबातच आव्हानात्मक नव्हते. गेल्या वर्षी एकाच हंगामात १०० पेक्षा अधिक गुणांची कमाई करणारा तो पहिला क्लब ठरला. त्याने चार अजिंक्यपदे पटकावली. त्यातील तीन इंग्लंडमधील होती. हाही एक विक्रमच. फोर्ब्स मासिकाच्या अंदाजानुसार, गेल्या वर्षी निव्वळ उत्पन्नाच्या निकषांवर हा क्लब जगात पाचवा होता. परंतु आता त्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या क्लबला पुढील दोन हंगामांमध्ये युरोपियन चॅम्पियन्स लीगमध्ये (जगातली सर्वाधिक मोठी क्लब स्पर्धा!) भाग घेता येणार नाही. विद्यमान हंगामातही हा क्लब चॅम्पियन्स लीगमध्ये खेळतो आहे. त्यांनी समजा ही स्पर्धा यंदा जिंकली तरी पुढील दोन वर्षे बंदी लागू राहीलच. बंदीव्यतिरिक्त तीन कोटी युरोंचा दंडही युएफाने त्यांना ठोठावला आहे. खरं तर मँचेस्टर सिटीच्या धनाढय़ मालकांसाठी ही रक्कम किरकोळीतलीच ठरते. त्यातही मँचेस्टर सिटी या शिक्षेविरोधात दाद मागणारच आहे. त्यांची आर्थिक ताकद पाहता चांगले वकील आणून केस जिंकणं त्यांच्यासाठी बिलकूल अशक्य नाही.

यानिमित्ताने एका व्यापक चर्चेला तोंड फुटले आहे. ‘दि इंडिपेंडंट’ या ब्रिटनमधील दैनिकाने तर या विषयावर शोधमालिकाच प्रसिद्ध केली आहे. युरोपिय फुटबॉलमध्ये स्पॉन्सरशिप, टीव्ही प्रक्षेपण हक्क, जाहिरातदार हे सारे मोजक्याच क्लबांभोवती एकवटलेले आहेत. त्यातून अनेक लीगमध्ये एकतर्फी सामने आणि वर्षांनुवर्षे एक किंवा दोनच क्लब विजेते ठरत आहेत. एफएफएपीसारख्या नियमावल्या राबवूनही या परिस्थितीमध्ये फरक पडू शकलेला नाही. अनेक फुटबॉल विश्लेषकांच्या मते, एफएफपी नियमावली लागू करण्यातच खूप उशीर झालेला आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत होतात, गरीब अधिक गरीब होतात, हा समतोलाविषयीच्या नियमांचा आणि इच्छाशक्तीचा एकत्रित परिणाम असतो. फुटबॉलही याला अपवाद नाही असे ‘दि इंडिपेंडंट’ने दाखवून दिलेय. अनियंत्रित अतिभांडवलवाद हे या परिस्थितीमागील प्रमुख कारण आहे. बडय़ा क्लबांच्या मागे तेलदांडगे अरब किंवा रशियन, काही वेळा (थायलंडचे माजी पंतप्रधान) थाकसिन शिनवात्रांसारखे राष्ट्रप्रमुख अशांचे आर्थिक पाठबळ निव्वळ कॉर्पोरेट पाठबळ असणाऱ्या क्लबांच्या तुलनेत अधिक निर्णायक ठरते. ते पाठबळ मिळाल्यावर कॉर्पोरेट आणि फुटबॉलरसिकांचे पाठबळ किरकोळ ठरते. या क्लबांना चांगले फुटबॉलपटू वाट्टेल ती किंमत मोजून खरीदता येतात. त्यामुळे सर्व फळ्यांमध्ये अव्वल दर्जाचेच फुटबॉलपटू खेळताना दिसतात. एखादा वलयांकित खेळाडू जरा उतरणीला लागला की निव्वळ ‘बेंच उबवत न बसता’ तो अशा फुटबॉलपटूंचे प्रमुख आश्रयस्थान असलेल्या अमेरिकेची वाट पकडतो. किंवा मग चीन, जपान किंवा गेलाबाजार भारत आहेतच. ‘दि इंडिपेंडंट’मध्ये याचा उल्लेख नाही, पण आश्रयस्थाने वाढत गेल्यामुळे कारकीर्द सरू लागलेले फुटबॉलपटू युरोपात राहतच नाहीत. पूर्वी अशा फुटबॉलपटूंना कमी श्रीमंत क्लब हमखास उचलायचे. तो प्रकारच आता उरलेला नाही. त्यामुळेही प्रमुख खेळाडू युरोपातील महत्त्वाचे क्लब सोडून युरोपातच इतरत्र खेळण्याचे प्रमाण कमालीचे घटले आहे. काही वर्षांपूर्वी लिस्टर सिटी या निराळ्याच क्लबने इंग्लिश प्रीमियर लीगचे अजिंक्यपद पटकावले. त्यानंतर इंग्लंडमधील सहा बडय़ा क्लबांच्या बैठकीत एक अधिकारी उद्गारला, ‘पुन्हा लिस्टर सिटी नको हं. अहो, फुटबॉलवेडय़ांना बडे क्लबच आवडतात ना!’ युरोपातील सध्याच्या ५४ लहान-मोठय़ा लीगपैकी १३ लीगमध्ये एकच विजेता प्रदीर्घ काळ विजेता ठरतोय. सरत्या दशकात स्पेनमध्ये दोन वेळा तिहेरी अजिंक्यपद, पहिले जर्मन तिहेरी अजिंक्यपद, पहिले इटालियन तिहेरी अजिंक्यपद, पहिले इंग्लिश तिहेरी अजिंक्यपद, चार वर्षांत तीन फ्रेंच तिहेरी अजिंक्यपदे, स्पेन-इंग्लंड-इटली या तिन्ही लीगमध्ये पहिल्यांदा १०० पेक्षा अधिक गुणांची कमाई, ४२ वर्षांत प्रथमच एका क्लबने सलग तीन वेळा अजिंक्यपद पटकावणे असे अलौकिक विक्रम दिसून आले. या एकतर्फीपणातून फुटबॉलमधली गंमत आता सरत चालली आहे. पैसा एक दिवस सगळा झिरपून जाईल; पण खेळातील चुरशीचे, स्पर्धेचे काय, असा प्रश्न तेथील विश्लेषक आणि चाहते एका आवाजात विचारू लागले आहेत. मँचेस्टर सिटी प्रकरण हे याच घडामोडींचा एक परिणाम आहे.