मृणाल तुळपुळे

mrinaltul@hotmail.com

अम्रेनियाची राजधानी येरेवानमधला व्हर्निसाज बाजार एखाद्या जादुई नगरीसारखा भासतो. याच नावाचा बाजार मॉस्कोमध्येदेखील बघितला होता; पण येरेवानचा बाजार त्यापेक्षा खूप मोठा आणि अतिशय वेगळ्या धर्तीचा आहे. प्रथमदर्शनीच तिथला वेगळेपणा प्रकर्षांने जाणवतो. व्हर्निसाज बाजारला ‘टुरिस्ट मॅग्नेट बाजार’ असेदेखील म्हटले जाते. पर्यटकांना एखाद्या लोहचुंबकासारखे आकर्षति करून घेणारा हा बाजार खरोखरच आपल्या नावाला साजेसा असा आहे.

१९८० मध्ये एका अम्रेनियन चित्रकाराने गावातील एका पुतळ्याच्या बाजूला आपली काही चित्रे मांडून ठेवली. तिथेच बसून तो नवीन चित्रेदेखील रंगवू लागला. आपली कला लोकांपर्यंत पोहोचवणे हा त्यामागचा उद्देश होता. असे उघडय़ावर चित्राचे प्रदर्शन भरवणे हा त्या काळात नवीन उपक्रम होता. एखाद्या चित्रकाराशी संवाद साधणे व त्याला आपल्या समोर चित्र रंगवताना बघणे ही कल्पना अम्रेनियन लोकांना फारच आवडली. हळूहळू तिथे इतर चित्रकारही आपली चित्रे घेऊन येऊ लागले.

चित्रांच्या या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाला ‘व्हर्निसाज’ हे नाव पडले. ‘व्हर्निसाज’ या शब्दाचा अर्थ ‘कलाप्रदर्शनाचा मागोवा किंवा झलक’ असा होतो. हा-हा म्हणता व्हर्निसाजची कीर्ती सर्वत्र पसरली आणि चित्रकारांच्या जोडीने इतर अम्रेनियन कारागीरही स्वत: तयार केलेल्या वस्तू तिथे घेऊन येऊ लागले. अल्पावधीतच त्याला स्थानिक लोकांचा व पर्यटकांचा भरघोस प्रतिसाद मिळू लागला आणि त्यातूनच आज दिसतो तो बाजार नावारूपास आला. इतका, की आज येरेवानचा व्हर्निसाज बाजार जगातील काही प्रमुख बाजारांपैकी एक मानला जातो.

सुरुवातीला हा बाजार फक्त शनिवार व रविवार या दोन दिवशीच भरत असे. पण आता वर्षांतील बारा महिने- उन्हाळा असो वा थंडी-  रोज भरवला जातो. या बाजाराची खासियत म्हणजे तुम्ही मनात आणाल ती वस्तू इथे मिळू शकते. साध्या पेन, ग्लास अशा वस्तूंपासून ते आधुनिक इलेक्ट्रॉनिक खेळण्यांपर्यंत सर्व काही व्हर्निसाजच्या छताखाली उपलब्ध आहे. एका भागात सोव्हिनियर्स, हस्तकलेच्या वस्तू, वेगवेगळ्या प्रकारचे दागिने, दुसऱ्या भागात पस्रेस, कपडे, कापडी बाहुल्या, चादरी, गालिचे, तर त्यानंतरच्या भागात काचसामान, पुस्तके व घरगुती सामान बघायला मिळते. या वस्तूंबरोबरच विविध प्रकारच्या पुरातन वस्तूंसाठी एक वेगळा विभाग आहे. त्यात जुनी नाणी, मेडल्स, जुनी वाद्य्ो, घरगुती उपकरणे अशा वस्तू मिळू शकतात. अशा विविध प्रकारच्या वस्तूंनी नटलेल्या व्हर्निसाज बाजारात अम्रेनियाच्या परंपरा, कला आणि आधुनिकता यांचे सुरेख मिश्रण बघायला मिळते.

व्हर्निसाजमध्ये फिरताना जाणवले की, हा फक्त बाजार नसून, ते स्थानिक लोकांचा परिचय करून घेण्याचे व त्यांच्या हस्तकलेविषयी माहिती मिळवण्याचे एक ठिकाण आहे. या बाजारातील बहुतेक विक्रेत्यांना इंग्लिश आणि रशियन भाषा बोलता येते, त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारता येतात. आपण विचारलेल्या प्रश्नांची ते अगदी मनापासून उत्तरे देतात. तिथे आणखी एक गोष्ट अनुभवायला मिळाली. ती म्हणजे आपल्याला एखादी वस्तू आवडली व आपण ती बघू लागलो की दुकानदार त्या वस्तूचे रसभरीत वर्णन करून त्यामागचा इतिहास, ती कशी तयार करतात, कोठे करतात अशी सगळी माहिती आपल्याला सांगतो. ती ऐकून आपलीदेखील त्या वस्तूबद्दलची उत्सुकता वाढते व आपण ती विकत घेतो. आणि हेच व्हर्निसाजचे वैशिष्टय़ आहे.

या बाजारात पारंपरिक अम्रेनियन कपडे घातलेल्या रंगीबेरंगी कापडी बाहुल्यांचे बरेच स्टॉल्स दिसले. त्यापैकी एका स्टॉलवाल्याने आम्हाला बाहुल्यांची माहिती सांगण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, ‘‘अशा प्रकारच्या कापडी बाहुल्या हातांनी बनवल्या जातात व त्या बनवणे हा अम्रेनियातील मोठा हस्तकला व्यवसाय आहे. अम्रेनियाच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रकारचे कपडे वापरले जात असत व तसे कपडे घातलेल्या बाहुलीला त्या भागावरून नाव दिले जाते. हे पारंपरिक कपडे आता मागे पडले आहेत, पण आमच्या पुढच्या पिढीला या कपडय़ांची ओळख राहावी यासाठी आम्ही अशा बाहुल्या बनवतो. आता तर येरेवानमध्ये ‘डॉल स्टोरीज’ म्हणजे ‘बाहुल्यांची कहाणी’ या नावाचे कायमस्वरूपी प्रदर्शन सुरू केले गेले आहे. पण त्या प्रदर्शनापेक्षा माझ्याकडे तुम्हाला तीच बाहुली अर्ध्या किमतीत मिळेल, असेदेखील त्याने हसत हसत सांगितले. इतकी सुंदर माहिती सांगितल्यावर आमची अम्रेनियन बाहुल्यांची खरेदी झाली, हे वेगळे सांगायला नकोच.

अम्रेनियन संस्कृती ही विविध प्रकारच्या कलांनी परिपूर्ण अशी आहे. व्हर्निसाजमधील वस्तू बघताना याचा प्रत्यय येतो. हाताने विणलेल्या विविध प्रकारच्या लेस ही अम्रेनियाची खासियत आहे. आपल्याला क्रोशाच्या सुईवर विणलेल्या लेस माहीत आहेत. पण अम्रेनियामध्ये दाभणीसारखी जाड सुई घेऊन अगदी नाजूक व सुंदर लेसेस बनवल्या जातात. दोरा, सुई व कात्री या तीन वस्तू वापरून विणलेल्या लेसची डिझाइन्स व त्या लेस वापरून बनवलेल्या वस्तू बघून थक्क व्हायला होते. अतिशय वेगळ्या प्रकारच्या त्या लेसेस विणताना बघायला व लेस विणण्याच्या पारंपरिक कलेविषयी माहिती ऐकायला खूप मजा आली.

हीच गोष्ट गालिच्यांबद्दल. अम्रेनियन गालिचांची डिझाइन्स खूपच वेगळी असतात. व्हर्निसाजमध्ये गालिचा विणताना बघायला मिळालाच, पण त्यावरील पारंपरिक चित्रे व त्यांचा अर्थदेखील समजला.

या बाजारात आता चित्रकार पूर्वीसारखे आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरवत नाहीत, तर त्यांची चित्रे फक्त विक्रीसाठी ठेवलेली असतात. तिथे एक खास अम्रेनियन पेंटिंग बघत होते, तर त्या विक्रेत्याने ते चित्र कसले आहे, कोणी काढले आहे, त्या चित्रकाराचा परिचय अशी सगळी माहिती दिली. तीच गोष्ट अम्रेनियन हस्तकलेच्या वस्तूंची. प्रत्येक वस्तूबद्दल इतकी तपशीलवार माहिती ऐकायला मिळाली, की मनात येऊन गेले- हे सारे आपल्याला गूगलवरसुद्धा वाचायला मिळणार नाही.

अम्रेनिया सुकामेव्यासाठी प्रसिद्ध असल्यामुळे व्हर्निसाज बाजारात सुक्यामेव्याचे असंख्य स्टॉल्स आहेत. तिथला वेगळेपणा म्हणजे सुकामेव्याच्या माळा करून त्या स्टॉलमध्ये टांगलेल्या होत्या. दुसरा वेगळा प्रकार म्हणजे गोल बशांमध्ये विविध प्रकारचा सुकामेवा अतिशय आकर्षकरीत्या मांडून ठेवलेला होता. त्या बशा इतक्या छान दिसत होत्या की बघताक्षणीच घ्याव्याशा वाटल्या. डाळिंब हे अम्रेनियामधील प्रतीकात्मक फळ असून, तिथे त्याला खूप महत्त्व आहे. डाळिंबाच्या आकाराची पेंडन्टस्, मॅग्नेटस्, डाळिंबाची चित्रे असलेले गालिचे अशी अम्रेनियन सोव्हिनियर्स या बाजारात बघायला मिळाली. रंगीबेरंगी मण्यांच्या माळा व मणी लावलेले चांदीचे दगिने म्हणजे खास अम्रेनियन सोव्हिनियर मानले जाते. अतिशय वेगळ्या धाटणीचे ते दागिने फारच छान दिसतात.

२०१७ मध्ये व्हर्निसाज बाजाराचे नूतनीकरण करण्यात आले. आता तो जास्तच मोठा झाला असून त्याची व्यवस्थित रचना केली गेली आहे. बाजाराच्या बऱ्याच भागावर कायमस्वरूपी आच्छादन घातल्यामुळे ग्राहकांच्या दृष्टीने ते खूप सोयीचे झाले आहे.

परदेशात गेल्यावर तेथील स्थानिक बाजाराला भेट दिली तर त्या देशाच्या संस्कृतीशी ओळख होते असे ऐकले होते, ते व्हर्निसाजला भेट दिल्यावर मनोमन पटले. असा हा अनोखा व्हर्निसाज बाजार म्हणजे अर्मेनियातील पारंपरिक कला आणि खास अर्मेनियन वस्तूंचे संग्रहालय असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.