माधव वझे

स्वातंत्र्यपूर्व मराठी रंगभूमीपासून आजच्या आपल्या रंगभूमीचा विचार करता डॉक्टर लागूंनी जितक्या विविध रंगरूपाच्या भूमिका केल्या, तितक्या आणि तशा अन्य कोणत्याही नटाने केलेल्या दिसत नाहीत.. त्यांच्या नाटय़-कारकीर्दीचा मागोवा.

डॉ. श्रीराम लागू यांनी वि. वा. शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’ या नाटकात गणपतराव बेलवलकरांची भूमिका केली आणि ती इतकी आवडली प्रेक्षकांना आणि समीक्षकांनाही, की ‘नटसम्राट’ हीच डॉक्टरांची कायमची ओळख ठरली. या नाटकाच्या संहितेबद्दल अनेक प्रवाद होते आणि आहेतही; पण डॉक्टरांच्या अभिनयाबद्दल सगळेच कसे भरभरून बोलत होते. ‘डॉ. लागू खरे तर फक्त उच्च कोटीचे वास्तववादी शैलीचे अभिनेता आहेत, त्यांना पौराणिक-ऐतिहासिक भूमिका जमणार नाहीत, कारण त्यांना शैलीदार अभिनय मुळी माहीतच नाही’ असे ज्यांनी पसरवले होते त्यांना ‘नटसम्राट’ हे चोख उत्तर होते. बालगंधर्वाची नाटके पाहिली असल्याचे जसे पूर्वी गृहीतच धरून चालायचे लोक, तसेच डॉक्टर लागूंचा ‘नटसम्राट’ प्रत्येक मराठी प्रेक्षकाने पाहिला असणारच याबद्दल कोणी शंकाही घेणार नाही. त्या भूमिकेची तयारी करायला नट म्हणून तुम्हाला किती वेळ लागला, असे डॉक्टरांना विचारले असता ते सांगायचे, ‘४२ वर्षे. अरे, आता म्हणतात लोक मी नटसम्राट वगैरे आहे म्हणून; पण मी ‘नटसम्राट’ केला तेव्हा ४२ वर्षांचा होतो. आणि तोपर्यंत अभिनयाबद्दल मी जे काय शिकलो होतो ते सगळे कामाला आले करताना.’

१९५६-५७ मधली गोष्ट. रात्रीचे साडेआठ-नऊ वाजले की लक्ष्मी रस्त्यावरच्या घरातून बाहेर पडून डॉक्टर लकडी पूल ओलांडून पायी पायी शिशुविहारच्या दिशेने निघायचे. एका हातात नाटकाची संहिता गुंडाळी केलेली आणि दुसऱ्या हातात सिगारेटचे पाकीट. गप्पागोष्टी, थट्टेमध्ये रममाण झालेले ‘प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन’चे सभासद कलाकार डॉक्टर आले म्हटल्यावर एकदम शांत व्हायचे; आणि मग एखाद्या नाटकाचे वाचन, पाहिलेल्या नाटकावर चर्चा, वाचलेल्या पुस्तकाविषयीची मते असे एखाद्या अभ्यास वर्गाचे वातावरण तिथे निर्माण होत असे. त्यावेळीच डॉक्टरांचे निराळेपण जाणवले. मध्यम उंची, तेजस्वी कांती, मोठे कपाळ, कुरळे केस, बिलोरी डोळे, भेदक नजर आणि धारदार, घुमारा असलेला आवाज आणि एकूणच गंभीर प्रकृती. एक बुद्धिवादी अशी त्यांची प्रतिमा होती. प्रत्यक्ष भालबा केळकरांना अडचणीत आणणारे प्रश्न फक्त डॉक्टरच विचारताना दिसायचे.

निरनिराळ्या नाटय़संस्थांचे सभासद असलेले आम्ही तरुण आपापल्या संस्थेशी अगदी एकनिष्ठ असायचो. संस्था-संस्थांमध्ये जसा काही पोलादी पडदा असायचा. त्यामुळेच डॉक्टरांनी एकदा भालबांबरोबर सर्वासमक्ष वाद घातला. नगरला मधुकर तोरडमल ‘वेडय़ाचं घर उन्हात’ बसवत होते. प्रयोगाच्या आधी त्यांचा एक नट आजारी पडला, म्हणून पीडीएच्या राम खरे यांना आपल्या नाटकात काम करू द्यावे अशी गळ तोरडमल यांनी भालबा केळकरांना घातली. आमच्या संस्थेचा नट बाहेर काम करणार नाही असे सांगून भालबांनी त्यास साफ नकार दिला. हे समजल्यावर डॉक्टर संतापले. मुळात रंगभूमीचे जग किती लहान- त्यातही हौशी रंगभूमी म्हणजे एक डबकेच.. असे असताना आपण एकमेकांना मदत करायची नाही, हा काय प्रकार आहे असा रोकडा प्रश्न त्यांनी विचारला. आणि एखाद्या नटाने दुसऱ्या संस्थेच्या नाटकात काम केले तर तो नट अधिक समृद्ध होईल असा व्यापक दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे असे त्यांनी स्पष्ट सांगितले. डॉक्टर संस्थेचे होते; त्याहीपेक्षा ते अधिककरून एकूण रंगभूमीचा विचार करीत होते.

आणखी काही वर्षे गेली. राज्य नाटय़स्पर्धेमध्ये पीडीएचे नाटक जसे होते, तसेच बी. जे. मेडिकल कॉलेजतर्फे जब्बार पटेल ‘लोभ नसावा, ही विनंती’ हे तेंडुलकरांचे नाटक करत होता. संस्था-संस्थांमध्ये विलक्षण चुरस होती आणि अदृश्य ताणही होते. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेमुळे पुण्यामध्ये जब्बारच्या नावाचा दबदबा होता. त्याच्या प्रयोगाला भरत नाटय़मंदिर तुडुंब भरले होते. प्रयोग सुरू झाला आणि ध्वनियंत्रणा बिघडली. ‘खर्र्रखर्र’ असा आवाज एकसारखा येत राहिला. आता काय होणार? स्पर्धेचा प्रयोग! तेवढय़ात डॉ. लागू त्यांच्या आसनावरून उठले, थेट परीक्षकांच्या आसनापाशी गेले, काही बोलले आणि तिथून रंगमंचावर जाऊन जब्बारशी बोलून त्यांनी पडदा पाडायला लावला. ध्वनियंत्रणा सुरळीतपणे सुरू होईपर्यंत ते रंगमंचावर थांबले आणि प्रयोग पुन्हा सुरू झाला तेव्हाच ते आपल्या आसनावर जाऊन बसले. त्या क्षणी डॉक्टर कुणीएक स्पर्धक राहिले नव्हते; उभारी घेत असलेल्या एका तरुण रंगकर्मीबद्दल त्यांना आस्था वाटत होती आणि एकूणच रंगभूमीच्या स्वरूपाचा विचार त्यांनी केला होता.

मुंबईच्या ‘रंगायन’ संस्थेमध्ये नाटय़प्रयोगात भूमिका करण्याचे त्यांनी ठरवले ते अशाच व्यापक दृष्टिकोनातून. आणि पुढे व्यावसायिक रंगभूमीवर जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला, त्यामागेही मराठी रंगभूमीचा दूरगामी विचार होता. तसे तर वडिलोपार्जति घरामध्ये सुबत्ता होती. व्यवसायाने ते स्वत: डॉक्टर होते. व्यवसायामध्ये उत्तम जम बसला होता आणि हौस म्हणून नाटक करायचे तर पुण्यातच एका संस्थेमध्ये ते होते. तिथे त्यांना एक विशिष्ट स्थानही होते. कलावंताला आणखी काय हवे असणार?

व्यवसायाचा भाग म्हणून डॉक्टर आफ्रिकेमध्ये गेले आणि ते नाटकापासून तुटले. तुटले इतकेच नाही, तर नाटकाशिवाय आपण जगू शकणार नाही याची त्यांना तीव्र जाणीव झाली. तेव्हा आपल्याला वेड लागेल की काय असे वाटल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळेच आफ्रिकेमधून ते परतले ते व्यावसायिक रंगभूमीवर नट म्हणून कारकीर्द करण्यासाठीच!

अभिनेता म्हणून डॉक्टर लागू यांची कारकीर्द एकमेवाद्वितीय ठरली असे नि:संदिग्धपणे म्हणता येते. कोणत्याही अभिनेत्याची आकांक्षा असते, विविध प्रकारच्या भूमिका रंगमंचावर साकारण्याची. स्वातंत्र्यपूर्व मराठी रंगभूमीपासून आजच्या आपल्या रंगभूमीचा विचार करता डॉक्टर लागूंनी जितक्या विविध रंगरूपाच्या भूमिका केल्या, तितक्या आणि तशा अन्य कोणत्याही नटाने केलेल्या दिसत नाहीत. ‘वेडय़ाचं घर उन्हात’, ‘देवांचे मनोराज्य’, ‘किरवंत’, ‘गिधाडे’, ‘सूर्य पाहिलेला माणूस’, ‘हिमालयाची सावली’, ‘चाणक्य विष्णुगुप्त’, ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’, ‘सुंदर मी होणार’, ‘आत्मकथा’, ‘गोष्ट प्रेमाची?’, ‘आधे अधुरे’.. नाटकांची ही यादी पुढे नेत गेलो तर स्वच्छ दिसते की या नाटकांत त्यांनी केलेल्या भूमिकांचा एकमेकींशी दूरान्वयानेही संबंध नाही. डॉक्टरांनी ‘सूर्य पाहिलेला माणूस’मध्ये सॉक्रेटिसची भूमिका केली तेव्हा ते ७२ वर्षांचे होते आणि आता थांबले पाहिजे, इतक्या भूमिका केल्या, खूप झाले अशा मन:स्थितीत होते. त्यावेळी एकदा त्यांची भेट झाली आणि बोलता बोलता एकदम जागच्या जागी उडी मारून आणि जोरदार टाळी वाजवून ते म्हणाले, ‘‘अरे, मी आणखी एक नाटक करतो आहे. बघू या कसे होते ते.’’ ते नाटक होते- ‘मित्र’!

नट भूमिकेशी एकरूप होतो, भूमिका त्याच्या अंगात शिरते, हे मिथ्य नट-नटी आणि प्रेक्षकांच्याही आवडीचे आहे. आणि त्यानेच कलाकारांभोवती एक वलय निर्माण केलेले असते. परंतु फारच थोडय़ा नट-नटींनी त्यांच्या अभिनयाची प्रक्रिया सांगितली आहे. एक डॉक्टर लागू तेवढे दिसतात, ज्यांनी हे लोकप्रिय मिथ्य उघडउघड धुडकावले. आपण करणार असलेल्या भूमिकेचा भावानुभव पहिल्या काही तालमींतच आपण घेतलेला असतो, त्या भूमिकेचे रंगरूपही पहिल्या काही तालमींमध्येच आपण शोधलेले असते आणि तेच पुढच्या तालमींमध्ये आपण गिरवत पक्के करत जातो असे सांगून डॉक्टर म्हणतात की, अशा रीतीने ते कोणतीही भूमिका तंत्रामध्ये बांधून घेतात. प्रयोग सुरू असताना मन कोरे करायचे, फक्त भूमिकेवर मन एकाग्र करायचे- हे त्यांचे शब्द. प्रयोगावेळी नटाची योगसमाधीच असते असा त्यांचा एकूण अनुभव.

त्यामुळे एकूण प्रयोगाची तीव्रता कमी-जास्त झाली तरी तशी आंदोलने डॉक्टरांच्या अभिनयामध्ये कधी निर्माण झाली नाहीत. ‘सूर्य पाहिलेला माणूस’च्या प्रयोगामध्ये सॉक्रेटिसला विषप्राशन करावे लागले आहे. त्यानंतर काही वेळ फेऱ्या मारत राहण्याचा सल्ला त्याला मिळालेला आहे. त्याप्रमाणे तो फेऱ्या मारत असताना काही वेळाने विष अंगामध्ये भिनायला लागल्याचे चिन्ह म्हणून सॉक्रेटिसला धक्का बसल्यासारखे होते. विषप्राशन केल्यानंतर किती वेळाने धक्का बसल्याचे दाखवायचे त्याचे गणित डॉक्टरांनी ठरवलेले होते. प्रत्येक प्रयोगामध्ये तेवढाच वेळ लागणार हे निक्षून सांगताना डॉक्टर म्हणायचे, ‘‘एक लक्षांश सेकंदाचा फरक पडला तर पडेल.’’ तालमीमध्येच त्यांनी असे सगळे रोमारोमांत इतके मुरवून घेतलेले असायचे की प्रेक्षकांना ते उत्स्फूर्त वाटावे.

डॉक्टरांनी भूमिका केलेली ‘नटसम्राट’, ‘गिधाडे’, ‘काचेचा चंद्र’ आणि ‘गुरू महाराज गुरू’ ही चार नाटके १९७० या एकाच वर्षांमध्ये रंगमंचावर आली याची इथे यासंदर्भात नोंद करू या. या थोर अभिनेत्याचा आवाका त्यामधून लक्षात यावा.

डॉक्टरांना कवितावाचनाचा नाद होता. साहजिकच रंगमंचावर ज्यांनी कोणत्याही भूमिकेमध्ये त्यांना पाहिले आहे, त्यांना आठवत राहील त्यांचे स्वच्छ, स्पष्ट आणि ताल-लयीचे सुंदर भान असलेले असे रंगमंचीय बोलणे. आणि तेही धारदार व घुमारा लाभलेल्या त्यांच्या आवाजात.

डॉक्टरांची बांधिलकी फक्त रंगभूमीसंबंधीच्या त्यांच्या धारणांशी होती. म्हणूनच ते कोणाला आवडेल- न आवडेल याचा विचार न करता परखड बोलत. ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचे निमित्त होऊन जब्बार पटेल आणि त्याचे सहकारी एकटे पडताहेत असे पाहिल्यावर डॉक्टरांनी वृत्तपत्रामध्ये भालबा केळकर यांना अनावृत पत्र लिहिले होते. ‘सुंदर मी होणार’ हे पुलंचे, ‘इथे ओशाळला मृत्यू’ हे कानेटकरांचे आणि मतकरी यांचे ‘दुभंग’ ही नाटके त्यांना आवडली नव्हती, हे त्यांनी वेळोवेळी मुलाखतींमध्ये सांगितले आहे. सेन्सॉर बोर्डात बसलेली दहा-बारा डोकी प्रेक्षकांनी काय पाहावे आणि काय पाहू नये हे कसे काय ठरवू शकतात असा प्रश्न करून डॉक्टरांनी ‘गिधाडे’ नाटकाच्या निमित्ताने सत्यदेव दुबेंच्या साहाय्याने सेन्सॉर बोर्डाशी जो लढा दिला, तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या त्यावेळच्या मोहिमेमध्ये अभूतपूर्व असा होता. आणि व्यावसायिक नीतिमत्तेचे आयुष्यभर पालन करीत आल्यामुळे आपल्या काही सहकारी नट-नटींबद्दल टिप्पणी करतानाही ते कचरले नाहीत.

भेदक नजर, जरब वाटावी असा आवाज आणि तसे बोलणेही, आणि आपण बरे की आपले काम बरे अशी वृत्ती- त्यामुळे अनेक कलाकार, निर्माते, समीक्षक डॉक्टरांशी जवळीक करायला राजी नसत. पण हा एक अतिशय संवेदनशील माणूस होता. समाजाप्रति आपण काही देणे लागतो या भावनेने त्यांनी सामाजिक कृतज्ञता निधीची स्थापना केली. तो निधी उभारला तोही नाटकाचे प्रयोग करून. आणि जगाने नटसम्राट असे म्हटले तरी सॉक्रेटिस करून आपण काही फार मोठा पराक्रम केला आहे असे नाही; दुसरा कोणी नट माझ्यापेक्षा चांगले आणि वेगळे करून जाईल असे बोलून दाखविण्याचा विलक्षण उमदेपणा या रंगधर्मीपाशी होता.

होय, श्रीराम लागू हा माणूस नटसम्राट होता, त्यापेक्षाही तो एक मूर्तिमंत रंगधर्मी होता!

vazemadhav@hotmail.com