पूर्वी दसरा झाला की दिवाळीचे वेध लागत. सोबत गोडगुलाबी थंडीचेही संकेत मिळू लागत. दिवाळीला अभ्यंगस्नानाकरता पहाटे कडाक्याच्या थंडीत उठायचे म्हणजे कोण जीवावर येई. परंतु हल्ली थंडीच पळाली आहे. बळीराजा ज्या आतुरतेने पावसाची वाट बघतो तसे शहरवासी उकाडय़ाने हैराण होऊन थंडीची वाट पाहू लागले आहेत. आता हळूहळू थंडी गायबच होणार की काय अशी भीतीही त्यांना वाटू लागली आहे. या भीतीला हवामानाच्या शास्त्रीय अभ्यासात दुजोराही मिळतो आहे..

थंडीच्या दिवसांविषयी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आठवणी असतात. साधारण कोजागिरी पौर्णिमा झाली की हळूहळू थंडीचे वेध लागतात. नोव्हेंबरपासून थंडी वाढते. परंतु थंडीचा खरा परिणाम डिसेंबर महिन्यात जाणवू लागतो. तेव्हा हेमंत ऋतू सुरू झालेला असतो. चांगली काळजी घेतली तर थंडीच्या दिवसांत शरीर कमावता येते असे म्हणतात. त्यामुळे अनेकांचा व्यायामाचा संकल्प दर थंडीत सुरू होतो आणि अवघ्या काही दिवसांतच दुलईत गुंडाळला जातो. मग पुन्हा पुढच्या थंडीची वाट पाहणे सुरू होते. काहीजण डिसेंबरच्या सुट्टीत थंडीच्या दिवसात सहलीला जाण्याचे बेत आखतात. पूर्वीच्या काळी थंडी कडाक्याची असायची. स्वेटर, मफलर, कानटोपी असा जामानिमा करूनच बाहेर पडावे लागायचे. दिवाळीत भल्या पहाटे गारठवणाऱ्या थंडीत उठून अभ्यंगस्नान करायचे म्हणजे दिव्यच वाटत असे. अनेकांना थंडीचे ते गुलाबी दिवस अजूनही आठवतात. थंडीच्या धुक्यात हरवलेली वाट.. त्या धुसरतेत जॉिगग करणारी माणसे. शेतात शेकोटय़ा पेटलेल्या.. अशा कडाक्याच्या थंडीत हुरडापार्टीची मौज काही न्यारीच. अशात झाडांच्या हिरव्यागार पानांवरचे दंविबदू जणू अमृतसिंचनच वाटे. हे चित्र आता विरत चालले असले तरी अजूनही त्याचा जनमनावरचा पगडा कायम आहे. मात्र, हल्ली थंडीने जणू गाशाच गुंडाळला आहे. थंडीबद्दलच्या सामान्यजनांच्या या तक्रारीला आता हवामानशास्त्रज्ञांचाही दुजोरा मिळू लागला आहे.

पुण्यातील उष्णकटीबंधीय हवामान प्रयोगशाळेत अलीकडेच एका चर्चासत्रात गेल्या शंभर वर्षांतील तापमानाचा आढावा घेणारे संशोधन सादर करण्यात आले. त्यात थंडीच्या दिवसांतील किमान तापमान २०१० च्या हिवाळ्यात सर्वात पहिल्यांदा जास्त वाढले होते. १९७० पासून वार्षकि तापमान प्रत्यही वाढतच चालले आहे. पुण्यातील शंभर वर्षांच्या तापमानाचा अभ्यास करणारे उष्णकटीबंधीय वेधशाळेतील वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. दिलीप कोठावळे यांनी या चर्चासत्रातील हिवाळ्यातील बदलत्या हवामानासंबंधीचा मुद्दा विस्तृतपणे विशद करताना सांगितले की, ‘आपण म्हणतो तशी थंडी गायब वगरे झालेली नाही. अर्थात थंडीच्या दिवसांतील कमाल आणि किमान तापमानात नक्कीच थोडी वाढ झालेली आहे. लोकांना जे जाणवते ते वैज्ञानिकांनाही आकडेवारीतून दिसले आहे. थंडीची तीव्रता काहीशी कमी होण्याचे कारण म्हणजे रात्रीच्या तापमानात गेल्या चार दशकांत झालेली वाढ हे आहे. यावर उष्णकटीबंधीय वेधशाळेच्या चर्चासत्रात जो शोधनिबंघ डॉ. कोठावळे यांनी सादर केला त्यावरून असे दिसते की, पुण्यात १९७१ ते २०१३ यादरम्यान वार्षकि सरासरी किमान तापमान किंवा रात्रीच्या वेळचे तापमान ०.१५ अंश सेल्सियसने दर दहा वर्षांत वाढले आहे. पूर्वीच्या काळी अगदी उन्हाळ्यातही रात्री पातळसे का होईना पांघरूण लागायचे. पण आता वातानुकूलक (एसी) सुरू केल्याशिवाय माणसाला झोप लागत नाही. थंडीच्या दिवसांत पूर्वी ब्लँकेट किंवा दुलया लागत असत. त्या उबेत झोपही छान यायची. पण आता ते दिवस.. त्या रात्री मागे पडल्या आहेत. गेल्या काही काळातले तापमानाचे नकाशे पाहिले तर चढता क्रम सर्वच महिन्यांत आढळून येतो. थंडीचे दिवसही याला अपवाद नाहीत. थंडीच्या लाटांच्या तुलनेत उष्म्याच्या लाटांचे प्रमाण आणि टक्केवारीही जास्त आहे.

येत्या डिसेंबरमध्ये पॅरिसमध्ये जागतिक हवामानबदलविषयक परिषद भरते आहे. त्यात या सगळ्या मुद्दय़ांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाईलच. आणि त्यावर खलबते होतील, कार्बनचे

प्रमाण कुणी कमी करायचे, हरितगृह वायूंचे उत्सर्जन आधी विकसनशील देशांनी कमी करायचे की विकसित देशांनी, यावरून वाद होतील. पण स्थानिक पातळीवरही लोकांना या परिणामांची जाणीव होते आहे

आणि त्याला संशोधनातूनही दुजोरा मिळतो आहे.  दिवसाच्या- म्हणजे गेल्या ४० वर्षांत कमाल सरासरी तापमानात फारशी वाढ झालेली नसली तरी १९७१ पासून दर दहा वर्षांत तापमान ०.१ अंश सेल्सियसने वाढले आहे असे संशोधनांती आढळून आले आहे.

डॉ. कोठावळे यांच्या संशोधनाच्या आधारे असे म्हणता येते की, १९०१ ते २००७  या काळात भारतातील किमान सरासरी तापमान- दर शंभर वर्षांत ०.५१ अंश सेल्सियसने वाढला आहे. तर कमाल व किमान तापमान शंभर वर्षांत अनुक्रमे ०.७१ अंश व ०.२७ अंश सेल्सियस इतके वाढले आहे. १९७० पासून ते जास्त प्रमाणात वाढत गेले. १९७१ पासून कमाल सरासरी तापमानात हळूहळू वाढ होत गेलेली दिसते. त्याचबरोबर दर दहा वर्षांत पुण्याचे सरासरी कमाल व किमान तापमानही ०.१२ अंश सेल्सियसने वाढले आहे. कमाल सरासरी तापमानातील वाढ ही किमान सरासरी तापमानातील वाढीच्या तुलनेत कमी असली तरी तापमानवाढीचा कल हा ‘ग्लोबल वॉìमग’ म्हणजे जागतिक तापमानवाढीकडे निर्देश करणारा आहे. डॉ. कोठावळे यांनी सांगितले की, १९०१ ते २०१३ दरम्यान आम्ही जो अभ्यास केला त्यात सरासरी कमाल व सरासरी किमान तापमान व सरासरी तापमान यांत अनुक्रमे – ०.२ अंश सेल्सियस, – ०.१  अंश सेल्सियस आणि – ०.१ अंश इतकी घटही झालेली दिसते आहे. मात्र, १९७१ पासूनची माहिती विश्लेषणासाठी घेतली तर पुण्यात तापमानवाढ झाल्याचे अनुमान निघते.

या तापमानवाढीची कारणे काय आहेत, असे विचारले असता ते म्हणाले की, औद्योगिकीकरणाच्या काळात हरितगृह वायूंची (ग्रीनहाऊस गॅसेस) वाढ झाली. त्यात कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण वाढत गेले. त्याला वाहनांच्या प्रदूषणाचाही हातभार होता. त्यामुळे ‘ग्लोबल वॉìमग’ सगळीकडेच आढळते. आपली शहरेही त्यास अपवाद नाहीत. थंडीतच तापमानवाढ होते अशातला भाग नाही. पावसाळ्यातही सरासरी तापमान वाढलेले दिसते. रात्रीचे तापमान वाढण्याचे कारण म्हणजे जमिनीवरचे प्रारणे (टेरेस्ट्रियल रेडिएशन) वातावरणातच अडकून पडतात. याला उंच इमारती व हरितगृह वायू हे कारणीभूत ठरते. ‘इंटर-गव्हर्नमेंटल पॅनेल ऑफ क्लायमेट चेंज’ या संस्थेचा २००७ मधील अहवाल पाहिला तर आपल्याला त्यात गेल्या शतकामध्ये जागतिक पातळीवर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवेचे तापमान ०.७ अंश सेल्सियसने वाढलेले दिसते. ही तापमानवाढ जगात सगळीकडे सारख्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे त्याचे प्रादेशिक पातळीवरचे आविष्कार हे आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत, असे कोठावळे यांचे म्हणणे आहे. थंडीपेक्षाही मार्च ते मे या महिन्यांत आपल्याला रात्रीचे तापमान वाढलेले जाणवते. १९९१ नंतरच्या दशकात ही तापमानवाढ ०.८ अंश सेल्सियस इतकी झालेली दिसते. याच काळात कमाल तापमान दर दहा वर्षांत ०.२४ टक्के वाढले आहे. मार्च ते मे या काळात १९९१ नंतरच्या दशकात दिवसाच्या व रात्रीच्या- म्हणजे कमाल व किमान तापमानात फारसा फरक आढळलेला नाही.

विशेषकरून शहरांतील रात्रीच्या तापमानवाढीची कारणे जर बघितली तर त्यात आपल्याला उंच इमारती- म्हणजे सिमेंटचे फोफावलेले जंगल, नैसर्गिक जंगलांचा विनाश यांचा उल्लेख करावा लागेल. त्याच्या जोडीला काही शहरांत प्रदूषणकारी कारखानेही असतात. त्यामुळेही तापमान वाढण्यास मदत होते. गेल्या दशकात एप्रिलमध्ये रात्रीचे तापमान १.०१ अंश सेल्सियसने, तर दिवसाचे तापमान ०.८ अंश सेल्सियसने वाढलेले दिसते. उन्हाळ्यात तापमान वाढते हे खरे; पण गेल्या दोन दशकांत एप्रिल हा अधिक उष्णतेचा महिना असल्याचे आढळून आलेले आहे.

१९७१ ते २००७  या पहिल्या टप्प्यात अखिल भारतीय वार्षकि तापमान दशकामागे ०.२० अंश सेल्सियसने वाढलेले दिसते. ते जागतिक तापमानवाढीपेक्षा कमी आहे. १९०१ ते २००७ या काळात जगात ०.८२ अंश सेल्सियसने तापमान वाढले. पण भारतात ही वाढ ०.५  अंश सेल्सियस इतकी होती. हे काळजीचे कारण आहे. आपल्याकडे जागतिक तापमानवाढीपेक्षा कमी वाढ असण्याचे श्रेय कोठावळे मान्सूनला देतात. मार्च ते मे हा मान्सूनपूर्व काळ व जून ते सप्टेंबर हा मान्सून काळ यामुळे तापमानवाढ कमी असते. ऑक्टोबर-नोव्हेंबर हे थंडीचे महिने मानले जात असले तरी ऑक्टोबर-नोव्हेंबर या काळात जगातील तापमानवाढ ही गेल्या शंभर वर्षांत ०.७६ अंश सेल्सियस होती, तर भारतात त्याच काळात ती ०.८२  अंश सेल्सियस इतकी होती.

राष्ट्रीय हवामान केंद्राचे ए. के. श्रीवास्तव यांच्या मते, गेल्या १२ वर्षांत तापमानवाढ झाली आहे खरी; परंतु त्याचे निश्चित कारण सांगता येत नाही. या कारणांचा केवळ अंदाज करता येतो. हिमयुगात हरितगृहवायू नव्हते तरीही पृथ्वीची तापमानवाढ सुरूच होती. भारतीय हवामान खात्याची माहिती पाहिली तर १९७१ ते २००० या काळात देशातील ३५ उपविभागांत उष्णतेच्या लाटा, त्यांचा काळ आणि संख्या यांची तुलनात्मक माहिती घेतली तर १९९१ ते २००० या काळात २३ उपविभागांत उष्णतेच्या लाटा आल्या आहेत. १९९१-२००० हा काळ गेल्या १४० वर्षांतील सर्वाधिक उष्ण काळ होता. अजूनही हा कल कायमच आहे. भारतात थंडीच्या काळात तापमानवाढ दशकामागे ०.३० अंश सेल्सियस होती, तर मान्सूनपूर्व काळात ती ०.२० अंश सेल्सियस होती.

देशात रात्रीचे तापमान वाढते तेव्हा त्याचे इतरही परिणाम होत असतात. १९७० पासून ही वाढ ०.२ अंश सेल्सियस इतकी आहे. त्यामुळे तांदळासारख्या पिकांवर परिणाम होतो. पुण्यातील उष्णक टीबंधीय हवामान वेधशाळेचे वैज्ञानिक डॉ. आर. कृष्णन् यांनी याबाबत केलेल्या संशोधनानुसार, १९८० पर्यंत रात्रीच्या तापमानाचा कल फारसा लक्षात घेतला गेला नव्हता. पण जगात जो कल आहे तसाच भारतातही रात्रीचे तापमान वाढण्याकडे कल आहे. अर्थातच हरितगृहवायू म्हणजे ग्रीनहाऊस गॅसेस हे त्याचे कारण आहे. उत्तर भारतात १९५० ते १९६० दरम्यान शीतकरणाचा कल होता, तो आता बदलला आहे. कारण एरोसोल कणांसारखे कण हवेत मिसळल्याने हवा हरितगृहवायूंना सामावून घेऊ शकत नाही.

आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्राचे संशोधक जगदीश के. लढ्ढा यांच्या मते, रात्रीचे तापमान कमी असेल तर तांदळाचे उत्पादन चांगले येते. रात्रीचे तापमान वाढले तर तांदळाचे दाणे भरत नाहीत. त्यामुळे उत्पादनात घट येते. १९०१ ते २००७ या काळात कमाल व किमान वार्षकि तापमान दर १००  वर्षांत अनुक्रमे ०.५१ अंश सेल्सियस, ०.७१ अंश सेल्सियस इतके वाढले. १९७० नंतर सरासरी वार्षकि तापमान व किमान तापमान दोन्ही दशकामागे ०.२ अंश सेल्सियसने वाढले, तर किमान तापमान ०.१७ अंश सेल्सियसने वाढले. पश्चिम हिमालयात जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड या भागांचा समावेश होतो. तेथे गेल्या शतकात किमान सरासरी तापमान ०.८६ अंशाने वाढले आहे. अलीकडे ही तापमानवाढ दशकामागे ०.४६ अंश इतकी होती. त्यामुळे हिमनद्या वितळत आहेत. मान्सूनोत्तर व थंडीतील तापमान यांत इतर महिन्यांच्या तुलनेत जास्त तापमानवाढ आढळून येत आहे. थंडीच्या दिवसातच नव्हे, तर इतर काळातही किमान तापमानात झालेली वाढ ही चिंताजनक आहे यात शंका नाही. यातून जागतिक तापमानवाढीचा कल आपल्याकडे स्थानिक पातळीवरही आहे हेच दिसून येते. शिवाय हे संशोधन पुण्याच्या संदर्भातले असले तरी असाच कल नाशिक, मुंबई, औरंगाबाद यांसारख्या शहरांतही दिसतो. मुंबईत तापमानवाढीचे एक कारण म्हणजे ते समुद्राजवळ असल्याने येथील हवेत आद्र्रता जास्त असते, हेही आहे. या तापमानवाढीची कारणे अर्थातच जीवाश्म इंधनांचा वापर, वाढते शहरीकरण, जंगलतोड, उंच इमारती, वाहनांमुळे होणारे प्रदूषण ही आहेत. किती गरम होतंय म्हणून एसीचे बटन तुम्ही दाबालही; पण त्याने परिस्थिती बदलणार नाही. हे सगळे थांबवायचे असेल तर तापमानवाढ ज्यामुळे होते अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. आता तर शहरीकरण आणखीनच वाढणार आहे. त्यावर आपण स्मार्ट शहरांचा उपाय शोधला आहे. पण पाऊसच पडला नाही तर स्मार्ट शहरांतील चतुर लोक पाऊस पाडतील काय? पशांचा पाऊस एक वेळ पाडता येईल; पण आपली जीवनशैली बदलली नाही तर पाऊस रूसून पुन्हा आलाच नाही तर..? आताही तो रागावला आहेच. यंदा आपण कृत्रिम पाऊस पाडण्याचे केलेले प्रयत्न फसले आहेत. थंडीचाही कल त्याच दिशेने आहे. हवामानबदल हा विषय वरकरणी ‘किती गरम होतंय!’ एवढय़ापुरताच सध्या सीमित असला तरी त्याने एक दिवस आपल्या ताटातील भाकरीही जाऊ शकते, हे आपण ध्यानात घ्यायला हवे.

हवामानबदलाचे पहिले भारतीय प्रारूप

हवामानबदलाच्या पाश्र्वभूमीवर चालू शतकाच्या अखेपर्यंत भारतीय मान्सूनचे प्रमाण कसे राहील याचा अंदाज वर्तवणारे ‘अर्थ सिस्टीम मॉडेल’  तयार करण्यात आल्याचे सीसीसीआरचे संचालक डॉ. आर. कृष्णन् यांनी सांगितले. येत्या दोन वर्षांत त्याची प्रत्यक्ष तपासणी करून २०१७ पासून ते वापरात येणार आहे. आयआयटीएम आणि सीसीसीआरने बनवलेले हे पहिले भारतीय प्रारूप आहे, ज्यातून हवामानबदलाचे भारतावर नेमके काय परिणाम होतील याचा अंदाज वर्तविण्यात येणार आहे.

गेल्या काही दशकांतील वार्षकि किमान तापमान

१९७१-८० = १७.८ अंश सेल्सियस

१९८१-९० = १७.७ अंश सेल्सियस

१९९१-२००० = १७.७ अंश सेल्सियस

२००१-२०१३ = १८.२ अंश सेल्सियस

आकडे बोलतात..

* १९७१ ते २०१३ दरम्यान हिवाळ्यातील किमान तापमान दर दहा वर्षांत ०.२७ अंश सेल्सियसने वाढले.

* याच काळात हिवाळ्यातील किमान सरासरी तापमान ११.६ अंश सेल्सियस  इतके होते.

* २०१० मध्ये गेल्या ४० वर्षांतील हिवाळ्यातील सर्वाधिक किमान तापमान १३.७ अंश सेल्सियस होते.

* जगभरात गेल्या शंभर वर्षांत सरासरी तापमान ०.८२ अंश सेल्सियसने वाढले, तर भारतात ते सरासरी ०.५१ अंशाने वाढले.

* १९७० पासून किमान तापमान भारतात अलीकडच्या दशकात ०.२० अंश सेल्सियसने, तर कमाल तापमान ०.१७ अंश सेल्सियसने वाढले.

* गेल्या दशकात पश्चिम हिमालयाचे तापमान ०.१७ अंश सेल्सियसने वाढले.

– राजेंद्र येवलेकर
rajendra.yeolekar@expressindia.com