डॉ. प्रदीप आवटे

dr.pradip.awate@gmail.com

vladimir putin threatens nuclear war
युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यास जागतिक अण्वस्त्र संघर्षांचा पुतिन यांचा इशारा
Pune city leads the country in house sales Pune news
घरांच्या विक्रीत देशात पुण्याची आघाडी! जाणून घ्या शहरातील कोणत्या भागाला सर्वाधिक पसंती…
Single airline monopoly Nagpur
नागपूर-मुंबईदरम्यान एकाच विमान कंपनीची मक्तेदारी; प्रवासी त्रस्त, कंपनी…
quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?

चीनमधील वुहान व हुबई प्रांतांत सुरू झालेले नव्या करोना साथीचे थैमान आता जगभर पसरले आहे. त्यात केवळ माणसांचेच बळी जात आहेत असे नाही, तर जागतिक व्यापार-उद्योगांपासून ते देशोदेशीच्या अर्थव्यवस्थांपर्यंत सर्वानाच त्याची झळ बसते आहे.. बसणार आहे.

‘‘भविष्यात तू अशा बेकायदेशीर गोष्टी करणार नाहीस ना?’’ या लिखित प्रश्नावर त्यानं नाइलाजाने लिहिलं, ‘‘अजिबात नाही.’’

मग दुसरा प्रश्न- ‘‘असं करणं हे कायद्यानुसार शिक्षेस पात्र आहे, हे तुला समजतंय ना?’’

त्यानं लिहिलं, ‘‘अर्थात, मला समजतंय.’’

आणि खाली लाल शाईत आपल्या डाव्या हाताचा अंगठा उमटवला.

ली वेनलियांग.. डोळ्याचा डॉक्टर. चीनमधील वुहान शहरातील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये काम करणारा. ३० डिसेंबर २०१९ ला त्यानं सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट त्याला पोलीस स्टेशनपर्यंत घेऊन आली होती. त्यानं लिहिलं होतं.. ‘वुहान होलसेल सीफूड मार्केटशी संपर्क आलेले सार्ससारख्या आजाराचे सात रुग्ण भरती!’ पुढं त्यानं स्वत:ची आणि आपल्या प्रिय व्यक्तींची काळजी घ्या, असं काहीबाही लिहिलं होतं. आणि या पोस्टकरता ३ जानेवारीला वुहानमधील पोलीस त्याने समाजमाध्यमावर समाजातील शांतता भंग होईल अशा अफवा पसरवल्या म्हणून त्याला समज देत होते. त्याचं नशीब की त्याला तुरुंगवास झाला नाही की त्याचा डॉक्टरी करण्याचा परवाना काढून घेण्यात आला नाही!

..पण दुर्दैवानं ली वेनलियांगने जे पोस्ट केलं होतं ती अफवा नव्हती, ती फेक न्यूज नव्हती; तर ती वस्तुस्थिती होती, हे साऱ्या जगाला आता कळून चुकलंय. केवळ चीनमध्येच नव्या करोना विषाणू आजाराचे सुमारे पाऊण लाख रुग्ण आढळून आले आहेत, तर सतराशेहून अधिक रुग्णांचा त्यात मृत्यू झाला आहे. यातील नव्वद टक्क्यांहून अधिक मृत्यू हे वुहान आणि हुबेई प्रांतांतील आहेत. ज्या ली वेनलियांगने या नव्या विषाणूचा इशारा दिला, तोही या आजाराचा बळी ठरला आहे. चीनशिवाय भारतासह २५ देशांत या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. मात्र आजच्या घडीला चीनबाहेरील रुग्णांची संख्या सातशेच्या घरात- म्हणजे एकूण रुग्णांच्या एक टक्क्याहूनही कमी आहे. भारतात केरळमध्ये करोना विषाणूचे तीन रुग्ण आढळून आले असून, ते सर्व वुहान शहरात शिक्षण घेणारे वैद्यकीय विद्यार्थी आहेत.

नवीन करोना हे खरं म्हणजे विषाणूच्या एका समूहाचं नाव आहे. समान वैशिष्टय़ं असणारे आणि साधारणपणे एकसारखे गुणधर्म असणारे विविध विषाणू एका समूहामध्ये समाविष्ट केले जातात. करोना हा असाच एक विषाणूसमूह. साध्या सर्दी-खोकल्यापासून ते सार्स किंवा मर्स यांसारख्या गंभीर आजारासाठी करोना विषाणू कारणीभूत असतात. परंतु यावेळी वुहान शहरात जो करोना विषाणू आढळून आला, तो मात्र यापूर्वी आढळलेल्या करोना विषाणूपेक्षा वेगळा आहे. कारण त्याची जनुकीय रचना पूर्वीच्या इतर कोणत्याही करोना विषाणूंशी मिळतीजुळती नाही. त्यामुळेच या नव्या विषाणूला ‘नोवेल करोना वायरस- २०१९’ (nCov  2019) असे नामाभिधान प्राप्त झाले. या आजाराला जागतिक आरोग्य संघटनेने ‘COVID-19’ असे नाव दिले आहे.

हा नवा विषाणू माणसांमध्ये कसा आला, याबद्दल अनेक तर्कवितर्क सुरू आहेत. मात्र त्यासंबंधी अद्याप निश्चित, खात्रीलायक काहीच माहिती नाही. मुळात करोना विषाणू प्राणिजन्य आहे. म्हणजे करोना विषाणूचे मूळ स्थान प्राणीजगतात आहे. वटवाघळांमध्ये हा विषाणू मुख्यत्वे आढळतो. २०१२ ला पसरलेला मर्स हा आजार उंटाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना होताना आपण पाहिले आहे. तर २००३ च्या सार्समध्ये विशिष्ट जातीचे मांजर आपल्याला आडवे गेले होते. अनेकांनी ही सध्याची करोना साथ म्हणजे ‘बायो-टेररिझम’चा प्रकार असावा अशीही शंका व्यक्त केली आहे. पण या ‘कॉन्स्पिरसी थिअरी’ला आज तरी कोणताही भक्कम आधार नाही. वुहान शहरातील सुरुवातीच्या रुग्णांनी शहरातील लाइव्ह मार्केटला भेट दिल्याचा इतिहास आहे. पण नक्की कोणता प्राणी यास कारणीभूत आहे याबद्दल अजून माहिती हाती लागलेली नाही. सार्स असो की बर्ड फ्ल्यू.. चीन अनेक नव्या विषाणूंची जन्मभूमी राहिला आहे. अनेकदा चीनमध्येच अशा साथी का सुरू होतात, यालाही काही शास्त्रीय कारणे आहेत. जगाची सुमारे दीड अब्ज लोकसंख्या आणि एकूण जगाच्या निम्मे पशुधन चीनमध्ये आहे. चीनमधील खाद्यसंस्कृती वैशिष्टय़पूर्ण आहे. या प्रदेशातील मांसाहारातील वैविध्य लक्षणीय आहे. जवळपास १२० वेगवेगळे प्राणी ही मंडळी आपल्या आहारात घेतात. प्राण्यांचे रक्त, मांस पुरेशी काळजी न घेता हाताळल्याने असे विषाणू मानवी जगतात शिरकाव करण्याचे अपघात घडण्याची शक्यता वाढते. हे केवळ चीनमध्येच घडते असे नाही. चिंपाझीचे मांस खाण्याच्या सवयीमुळे आफ्रिकेत इबोला आला, हे आपण पाहिलेच आहे. वाढती जंगलतोड, पूर्वीच्या जंगल प्रदेशात मानवी वसाहती होणे या आपल्या मूर्खपणामुळे आपण जणू एक पर्यावरणीय खिडकी उघडतो आणि आपल्याभोवतीचे सूक्ष्मजीव ही संधी नेमकी हेरतात. वुहानसारख्या शहरातील मोठी अ‍ॅनिमल मार्केट्स ही जणू सूक्ष्मजीव देवाणघेवाणीची आणि जनुकीय बदलाची केंद्रे बनतात आणि जगाला हादरवणाऱ्या साथी इथे जन्माला येतात. आजमितीला नव्याने येणारे सुमारे ६५ टक्के आजार हे प्राणीजन्य आहेत. मानव, प्राणी आणि पर्यावरण या साऱ्यांचे आरोग्य वेगवेगळे नसून ते एकच आणि परस्परावलंबी आहे, ही ‘वन हेल्थ’ची संकल्पना आपण मांडतो. पण ही संकल्पना आपल्याला कळली, तरी अद्याप वळलेली नाही, हेच खरे.

करोना साथीने केवळ जीवितहानीच होते आहे अशातला भाग नाही. या साथीचे परिणाम सर्वव्यापी आहेत. २००३ मध्ये जेव्हा सार्सची साथ आली तेव्हा जागतिक जीडीपीमधील चीनचा वाटा होता अवघ्या चार टक्क्यांचा. पण आज चीनचा जागतिक जीडीपीमधील वाटा आहे तब्बल सोळा टक्क्यांचा! जगातील अनेक मोठय़ा कंपन्या कच्चा माल किंवा सुटे भाग यासाठी चीनवर अवलंबून आहेत. करोनाच्या या साथीमुळे चीनसोबतच्या दळणवळणावर विपरीत परिणाम झाल्याने ही पुरवठा साखळी (ग्लोबल सप्लाय चेन) विस्कळीत झाली आहे. याचा मोठा परिणाम भारतातील औषध उद्योगावर झाला आहे. औषधे तयार करण्याकरिता त्या- त्या औषधांचे क्रियाशील औषधी घटक (Active Pharmaceutical Ingredient – API) आवश्यक असतात. बरेचसे औषधी घटक आपण चीनवरून आयात करतो. पण करोना साथीमुळे या पुरवठय़ावर परिणाम झाल्याने या औषधी घटकांच्या किमतीत वाढ होताना दिसते आहे. अगदी साधे उदाहरण घ्यायचे तर तापासाठी आपण पॅरासिटामॉल हे औषध वापरतो. या औषधाच्या क्रियाशील घटकाची किंमत चीनमधील आरोग्य आणीबाणीमुळे २००-२५० रुपये किलोवरून ४०० ते ४५० रुपयांपर्यंत गेली आहे. जवळपास ५० महत्त्वाच्या औषधांचे ‘एपीआय’ आपण चीनवरून आयात करतो. या सगळ्याच घटकांच्या किमती ४० ते ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत. चीनमधील ही साथ लवकर निवळली नाही तर त्याचा परिणाम भारतीय बाजारात औषधांच्या किमती वाढण्यावर होणार आहे. पर्यटनावर तर परिणाम होतोच आहे, पण जागतिक बाजारात टेक्स्टाईलमध्ये चीनचा वाटा ४० टक्क्यांचा आहे. जगातील जवळपास २५ टक्के फर्निचर चीन तयार करतो. ज्या वुहान शहरात करोना धिंगाणा घालतो आहे, ते चीनमध्ये ‘ऑप्टिक व्हॅली’ म्हणून प्रसिद्ध आहे. ऑप्टिक केबल्स, स्मार्टफोन्स यांचे मोठे निर्मिती प्रकल्प तिथे आहेत. या सगळ्या व्यवसायांवर मोठेच संकट आले आहे. इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल इंडस्ट्री या संकटाने हादरली आहे. मोठय़ा प्रमाणावर आजारी मनुष्यबळामुळे चीनमधील निर्मितीवर विपरीत परिणाम झाला आहे. जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमतीवरही या साऱ्या घडामोडींचा परिणाम होणार आहे. एकूणात करोना साथीने आधीच मंदीत सापडलेल्या अर्थव्यवस्थेच्या कंबरडय़ातच लाथ घातली आहे.

सार्वजनिक आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हे यानिमित्ताने अनेक देशांच्या लक्षात आले आहे. आपल्याकडे १९९४ ची सुरतमधील प्लेगची साथ अनेकांना आठवत असेल. त्या साथीत जवळपास ६९३ रुग्ण आढळले, तर ५६ जणांचा मृत्यू झाला. त्या साथीची दहशत एवढी मोठी होती की अवघ्या पंधरा दिवसांत सुरतमधील सुमारे सहा लाख लोकांनी शहर सोडून पोबारा केला. हिऱ्याचा ९० टक्के जागतिक व्यवसाय एकटय़ा सुरतमधून होतो. दिवाळीला काही दिवस उरले असतानाच ही साथ उद्भवली होती. त्या साथीचा खूप मोठा आर्थिक फटका बसला होता. एका अंदाजानुसार, निव्वळ दोन-तीन आठवडय़ांत ६०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे नुकसान त्या साथीमुळे झाले होते. त्या साथीने देशात बळकट रोग सर्वेक्षण व्यवस्थेची आवश्यकता अधोरेखित केली. परिणामस्वरूप २००४-०५ मध्ये देशात एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाची (Integrated Disease Surveillance Programme- IDSP) सुरुवात झाली. रोग सर्वेक्षणात आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर, प्रयोगशाळांचे सक्षम जाळे अशा अनेक गोष्टी त्यामुळे साध्य झाल्या. वाईटातून काही चांगले निघते ते असे! करोनाची सध्याची साथही आपल्याला अनेक इशारे देते आहे. नव्या नव्या आजारांच्या निदानासाठी प्रयोगशाळा विकसित करण्याची गरज अजून संपलेली नाही. तथापि मागील काही दशकांमध्ये आपल्याकडे शहरीकरण प्रचंड वेगाने वाढते आहे, पण त्या वेगाने तेथील सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेमधील मूलभूत सुविधा मात्र वाढताना दिसत नाहीत. अगदी संसर्गजन्य आजारांच्या रुग्णालयांचेच उदाहरण घ्यायचे झाले तर ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या अशा रुग्णालयांमध्ये स्वातंत्र्योत्तर काळात आपण काहीच भर घातलेली नाही. वाढती लोकसंख्या लक्षात घेता आपण अशी रुग्णालये आणि तेथील मूलभूत सुविधा वाढवायला हव्यात. शहरी आरोग्यव्यवस्था आपल्या सार्वजनिक आरोग्य- व्यवस्थेसोबत जोडावी लागेल. भोर समितीच्या शिफारशीनुसार आपली ग्रामीण आरोग्यव्यवस्था उभी राहिली. शहरी आरोग्यासाठी आपल्याला शून्यातून सुरुवात करावी लागेल. पर्यावरणीय ऱ्हास टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करावी लागेल. त्यासाठी आपल्या ऑटोमोबाईल धोरणातही आवश्यक ते बदल करावे लागतील.

ज्याला पाहण्यासाठी इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शकाची गरज भासते, अशा अत्यंत इवल्याशा करोना विषाणूने चीनच्या कणखर हुकूमशाही भिंतीला धडक मारल्याची काही उदाहरणे आता दिसत आहेत. ज्या ली वेनलियांगने व्हिसलब्लोअरचे काम केले, त्याचे कौतुक करण्याऐवजी स्थानिक पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. चीनच्या सर्वोच्च न्यायालयाने मात्र ली वेनलियांगचे कौतुक करताना त्याने अफवा पसरवली असे कसे म्हणता येईल, त्याने लोकांना सावध केले, त्याच्या इशाऱ्यामुळे लोक काळजी घेऊ लागले, वुहान अ‍ॅनिमल मार्केटमध्ये जाणे टाळू लागले, त्याला समज देण्यापूर्वी पोलिसांनी वस्तुस्थिती समजून घ्यायला हवी होती, असे मत व्यक्त केले आहे. मरण्यापूर्वी ली वेनलियांगने उच्चारलेले वाक्य चिनी जनतेच्या भावनांचा उद्गार आहे.. ‘‘मला वाटते, निरोगी समाजात केवळ एकच एक आवाज असता कामा नये. सार्वजनिक सत्तेचा वापर लोकव्यवहारात अधिकाधिक ढवळाढवळ करण्यासाठी करणे गैर आहे.’’

‘करोना नियंत्रणात चीन सरकार अपयशी ठरले आहे अशी सार्वत्रिक भावना असून, त्यामुळे लोकांचा पारा चढला आहे, त्यांच्या रागाचा ज्वालामुखी भडकला आहे आणि चिडलेले लोक कुणालाच घाबरत नाहीत..’ कायद्याचा प्राध्यापक असणारा जानग्रुन हे ठासून सांगतो. सार्वजनिक चर्चेच्या अनेक शक्यता सरकारने मारून टाकल्या आहेत. त्यामुळे समाजातील अलार्म देणारी व्यवस्थाही काम करेनाशी झाली आहे. माहिती आणि अभिव्यक्तीवरील राक्षसी बंधनांमुळे करोना नियंत्रणात अडथळे निर्माण झाले याबद्दल अनेकांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने करोना साथीबाबतची माहिती दडवून ठेवली, त्याबद्दल लोकांमध्ये राग आहे. सामाजिक स्थर्य हवेच; पण त्याहीपेक्षा सरकारची विश्वसनीयता ही अधिक महत्त्वाची गोष्ट असते, हे या करोना साथीने शिकवले आहे असे अनेकांचे मत आहे. आणि म्हणूनच पोलिसांनी कारवाई केली तरी लोकांनी ली वेनलियांगला एखाद्या हिरोसारखे उचलून धरले. ७ फेब्रुवारीला ली वेनलियांग गेला तेव्हा वुहानच्या लोकांनी पाच मिनिटे आपल्या घरातील दिवे मालवले आणि आपल्या खिडकीतून शिट्टी वाजवत या व्हिसलब्लोअरला अनोखी श्रद्धांजली वाहिली. हुकूमशाहीची निर्थकता कळण्यासाठी करोनाच्या रूपाने चीन मोठी किंमत मोजतो आहे.

मायन कॅलेंडरनुसार, २०१२ मध्ये सारे जग नष्ट होणार आहे, अशी भविष्यवाणी करण्यात आली होती. तेव्हा ‘हे जग मी नष्ट होऊ देणार नाही,’ असं ठणकावत ली वेनलियांगने त्यावेळी सोशल मीडियावर लिहिले होते- ‘‘कदाचित उद्यापासून आपला संपर्क होऊ शकणार नाही, कारण मी हे जग वाचवायला निघालो आहे. उद्या जर नेहमीप्रमाणे सूर्योदय झाला तर समजा की, मी यशस्वी झालो आहे. पण मला धन्यवाद देऊ नका. मी केवळ माझे कर्तव्य केले.. आणि काय?’’

करोना, स्वाईन फ्ल्यू, इबोला असो की त्सुनामी असो; येणारे प्रत्येक संकट, प्रत्येक आपत्ती माणूस म्हणून आपले कर्तव्य आपल्या अवकाशावर कोरून ठेवत असते. ली वेनलियांग डोळ्यांचाच डॉक्टर होता म्हणून त्याला ते नीट वाचता आले. आपणही आपले डोळे तपासून घ्यायला काय हरकत आहे?