News Flash

मुद्रणकला अन् कला-संस्कृतीचे उपासक

बापूराव नाईक यांचा जन्म २९ फेब्रुवारी १९२० ला वेंगुर्ला येथे झाला. हे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष.

(संग्रहित छायाचित्र)

गेल्या पिढीतील प्रसिद्ध मुद्रणतज्ज्ञ आणि साहित्य-नाटय़कलेचे अभ्यासक, तसेच मुंबई मराठी साहित्य संघाच्या डॉ. अ. ना. भालेराव नाटय़गृहाचे एक कर्तेकरविते बापूराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्ताने त्यांचे पुत्र अरुण नाईक यांनी कथन केलेली वडिलांची कीर्ती..

बापूराव नाईक यांचा जन्म २९ फेब्रुवारी १९२० ला वेंगुर्ला येथे झाला. हे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष. त्यांचे आई-वडील सुखवस्तू होते. त्यांना तीन बहिणी आणि एक भाऊ होता. त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षीच त्यांची आई गेली. त्यामुळे त्यांचं पुढचं आयुष्य तसं खडतर गेलं. बहिणींची लग्नं झाली आणि त्या मुंबई-पुण्यात स्थायिक झाल्या. बापूरावांनी मुंबईला येऊन मॅट्रिकची परीक्षा दिली. कॉलेजमध्ये जाण्याची ऐपत नसल्याने त्यांनी मुंबईत मध्यवर्ती शासकीय मुद्रणालयात नोकरी पत्करली. इथेच त्यांनी मुद्रणाची अ‍ॅप्रेंटिसशिप केली.

याच दरम्यान बापूरावांची डॉ. अमृत नारायण भालेराव यांच्याशी ओळख झाली. तेव्हा डॉक्टरांनी मुंबई मराठी साहित्य संघाची स्थापना केली होती. त्यांना साहित्य संघात तरुण कार्यकर्त्यांची गरज होती. बापूराव जात्याच हुशार होते. त्यामुळे उत्तम प्रगती करत ते उच्च पदांवर पोहोचले. १९४१ ला त्यांची बदली पुण्याच्या येरवडा प्रिझन प्रेसमध्ये झाली. १९४८ पर्यंत ते पुण्यात होते. पुण्यातील वास्तव्यात ते महाराष्ट्र साहित्य परिषदेत जाऊ लागले. दर आठवडय़ाला ते मुंबईला येत आणि साहित्य संघाचे अध्वर्यु डॉ. भालेराव यांच्या घरी राहत आणि साहित्य संघाचे काम करीत.

डॉ. भालेरावांनी मुंबई मराठी साहित्य संघाची स्थापना प्रामुख्याने साहित्यविषयक कार्यासाठी केली असली तरी संघाची नाटय़शाखाही होती. त्याकाळी मराठी रंगभूमी डबघाईला आली होती. भालेरावांनी ती पुनरुज्जीवित केली. जुने-नवे नट एकत्र आणले. १९३९ ते १९४५ हा दुसऱ्या महायुद्धाचा तसेच स्वातंत्र्य संग्रामाचा ऐन भराचा काळ. मुंबईत बरंच काही घडत होतं. या काळात बापूरावांना बरेच गुरू मिळाले. नवे सहकारी मिळाले. पुण्यात ते बऱ्याचदा दत्तो वामन पोतदार यांच्याकडे राहत आणि शिकत. मुंबईत नाटककार आचार्य अत्रे, मामा वरेरकर, न. र. फाटक, तसंच त्या काळातील नामवंत नटमंडळी यांच्या सहवासात त्यांनी बरीच प्रगती केली.

बापूरावांनी प्रा. श्री. ना. बनहट्टी यांच्यासोबत ‘सीता स्वयंवर’ हे विष्णुदास भावे यांचं नाटक हे आधुनिक मराठी रंगभूमीवरचं पहिलं नाटक अशी भूमिका हिरीरीने मांडली. त्याला बराच विरोध झाला. पण अखेरीस ही कल्पना लोकांना मान्य झाली. तेव्हा बापूराव फक्त २१ वर्षांचे होते.

युद्धाच्या काळात बापूराव एअर रेड वॉर्डन होते आणि बॉम्बहल्ल्यावर त्यांनी पुस्तिकाही लिहिली. १९४२ मध्ये त्यांनी ‘कागद’ या विषयावर तांत्रिक पुस्तक लिहिले. कुठल्याही विषयाचा संपूर्ण अभ्यास करायचा, ही त्यांची सवय. मुद्रणाच्या कामात त्यांनी रस घेतला आणि त्यात त्यांनी उन्नती केली.

१९४८ मध्ये त्यांचे लग्न झाले. लग्न होऊन माझी आई घरी आली ती डॉ. भालेरावांच्या.. इतके उभयतांचे निकटचे संबंध होते. तो काळ नाटय़-चळवळीचा होता. गिरगावात केळेवाडीमध्ये भालेरावांनी एक जागा मिळवली. इथे त्यांनी एक खुले नाटय़गृह बांधले. वास्तविक जागा फार मोठी नव्हती. केळेवाडी ही चिंचोळी गल्ली होती. वाहनं धड आत येत नसत. समोर मशीद आणि कब्रस्तान. मागे चर्च आणि शाळा. परंतु या खुल्या नाटय़गृहात मराठी रंगभूमीचं पुनरुज्जीवन झालं. दरवर्षी नाटय़महोत्सव होत ते मात्र केनडी सी फेसवर, हिंदू जिमखान्याच्या क्रिकेट मैदानावर. तिथे ३००० प्रेक्षक बसत.

या काळात बापूरावांचा मुद्रणशास्त्राचा आणि नाटकांचा सखोल अभ्यास सुरू होता. १९५१ मध्ये सरकारने त्यांना मुद्रणातील उच्च शिक्षणासाठी लंडन स्कूल ऑफ प्रिंटिंग या जगप्रसिद्ध संस्थेत पाठवलं. १९५१ ते १९५३ या काळात बापूरावांनी मुद्रणाबरोबरच नाटय़गृह स्थापत्यशास्त्राचाही सखोल अभ्यास केला. केळेवाडीतल्या जागेत एक अत्याधुनिक नाटय़गृह बांधावं अशी डॉ. भालेरावांची इच्छा होती. त्यांनी बापूरावांना लंडनमधील नाटय़गृह बघून आराखडा तयार करायला सांगितला. लंडन स्कूल ऑफ प्रिंटिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करतानाच बापूरावांनी नाटकाचाही अभ्यास केला. या काळात भालेरावांनी बापूरावांबरोबर जो पत्रव्यवहार केला तो प्रकाशित झालेला आहे. ही सर्व पत्रे एनसीपीएच्या पुरातत्त्व विभागात संग्रहित आहेत. भालेरावांची आणि बापूरावांची नाटकाबद्दलची आस्था त्यातून दिसून येते.

१९५६ मध्ये डॉ. भालेराव हृदयविकाराने गेले. ते फक्त ५६ वर्षांचे होते. बापूराव तेव्हा पुण्याच्या येरवडा प्रिझन प्रेसमध्ये मॅनेजर होते. झाले असे की, तिथे जे मॅनेजर होते त्यांना एका कैद्याने भोसकले. त्यामुळे दुसरे कोणीही तिथे जायला राजी होईनात. तेव्हा बापूरावांना तिथे पाठवण्यात आले. तो कैदी तिथल्या कारागृहात होता. बापूरावांनी त्याला बोलावून घेतलं. तो आला आणि बापूरावांच्या पाया पडला. ‘तुम्हाला काही करणार नाही,’ असं म्हणाला. इतका बापूरावांचा दरारा होता. तितकेच ते प्रेमळही होते. मी तेव्हा लहान होतो आणि वडिलांबरोबर मुद्रणालयात जात असे. तोच कैदी मला तेव्हा कडेवर घेऊन मुद्रणालयात फिरवीत असे!

डॉ. भालेराव गेले आणि साहित्य संघ पोरका झाला. बापूरावांची बदली त्याचवेळी बडोद्याला झाली होती. मुंबई राज्य तेव्हा कच्छ-सौराष्ट्रापासून थेट कर्नाटकापर्यंत होतं. बडोदा संस्थानाचं मुद्रणालय जुनाट होतं. ते आधुनिक करण्यासाठी बापूरावांना तिथे पाठवण्यात आलं. १९५६ मध्ये विदर्भ आणि मराठवाडा मुंबई राज्यात सामील झाले तेव्हा बापूरावांची बदली नागपूरला झाली. आधी नागपूर ही मध्य प्रदेशची राजधानी होती. तिथलं शासकीय मुद्रणालय सुधारण्याची आवश्यकता होती. ते काम पूर्ण झाल्यावर सरकारने बापूरावांना मुंबईला उप-संचालक म्हणून बोलावून घेतलं. साल होतं १९५८.

मुंबईला परत आल्यावर बापूरावांनी साहित्य संघाकडे अधिक लक्ष द्यायला सुरुवात केली. त्यांनी नव्या नाटय़गृहाचा आराखडा तयार केला. त्यानुसार स्थापत्यविशारदांकडून अंतिम आराखडा बनवून घेतला. त्यांनी संघातील सहकाऱ्यांना सोबत घेऊन नव्या वास्तूची निर्मिती सुरू केली. १९६४ मध्ये नाटय़गृह तयार झाले. हे त्या काळातले महाराष्ट्रातले अत्याधुनिक नाटय़गृह ठरले. या नाटय़गृहाच्या धर्तीवरच पुढे  रवींद्र नाटय़मंदिर आणि बालगंधर्व नाटय़गृह यांची निर्मिती करण्यात आली. लहान जागेवर कमीत कमी खर्चात डॉ. भालेराव नाटय़गृह बांधण्यात आले. त्याचं मोठं श्रेय बापूरावांना जातं.

बापूराव १९५८ ते १९६७ पर्यंत महाराष्ट्राच्या मुद्रण विभागाचे उप-संचालक होते. या काळात त्यांनी बरेच सरकारी उपक्रम हाती घेतले आणि पूर्णत्वाला नेले. महाराष्ट्रातल्या सर्व सरकारी मुद्रणालयांचे आधुनिकीकरण आणि खासगी मुद्रणालयांच्या समस्या सोडवणे हे त्यांचे प्रमुख काम होते.

१९६० च्या सुमारास तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य आणि संस्कृती मंडळ स्थापन झाले. या मंडळावर बापूरावांची मुद्रणतज्ज्ञ म्हणून नेमणूक झाली. मराठी विश्वकोशाची निर्मिती हे या संस्थेचे एक प्रमुख कार्य होतं. विश्वकोशाचा पहिला खंड मुंबईच्या मौज मुद्रणालयात छापण्यात आला. त्याच्या सर्व तांत्रिक बाबी बापूरावांनी पाहिल्या होत्या. तर्कतीर्थ वाईत राहत. विश्वकोशाचे प्रमुख कार्यालय तिथेच स्थापन झाले. वाईमध्ये विश्वकोश मुद्रणालयाची स्थापना करण्यात आली आणि तिथे पुढचे खंड छापण्यात आले. हे सर्व काम बापूरावांमुळेच शक्य झाले.

याच काळात मराठी साहित्य महामंडळाची दत्तो वामन पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना करण्यात आली. वार्षिक साहित्य संमेलनं भरवणं हे या संस्थेचे प्रमुख कार्य. त्याशिवाय मराठी भाषा आणि नवीन शुद्धलेखनाचे नियम बनवण्याचे कार्य साहित्य महामंडळाने केले. बापूरावांच्या पुढाकाराने ही कामे झाली. ते साहित्य महामंडळाचे पहिले कार्यवाह होते.

१९६४  मध्ये डॉ. अ. ना. भालेराव नाटय़गृह स्थापन झाले तेव्हा अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे कार्यालयही तिथेच होते. बापूराव नाटय़ परिषदेचे प्रमुख उपाध्यक्ष होते. त्या काळात नाटय़ संमेलनाचा वेगळा आणि नाटय़ परिषदेचा वेगळा असे दोन- दोन अध्यक्ष नसत. पुढे प्रभाकर पणशीकरांपासून ती प्रथा सुरू झाली. त्याआधी उपाध्यक्ष नाटय़ परिषद चालवत असे. आजच्या नाटय़ परिषदेच्या कार्यकर्त्यांना याची कल्पना नाही. याच सुमारास बापूरावांनी बरंच नाटय़विषयक लेखन केलं. शं. ना. अंधृटकर संपादित ‘नाटक’ नावाचे मासिक त्याकाळी निघत असे. केशवराव दाते, के. नारायण काळे आणि बापूराव संपादक मंडळावर होते. ग्रीक रंगभूमी, शेक्सपिअरची रंगभूमी, नाटय़गृहांचे स्थापत्यशास्त्र या विषयांवर बापूरावांनी लेखमाला लिहिल्या. याच काळात विजया मेहता सरकारी नाटय़शिबिरं घेत असत. तिथे बापूराव संस्कृत रंगभूमी आणि पाश्चात्त्य रंगभूमीवर व्याख्यानं देत.

मुंबईच्या गव्हर्नमेंट इन्स्टिटय़ूट ऑफ प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये बापूराव अक्षर-जुळणी, अक्षर-मुद्रण, मुद्रण-व्यवस्थापन, कॉस्टिंग अ‍ॅण्ड एस्टिमेटिंग हे विषय शिकवीत. हे विषय पुढच्या काळात बरेच नावाजलेले आणि प्रथितयश मुद्रक इथे शिकले आणि मुंबईत मुद्रण व्यवसाय फोफावला.

१९६० मध्ये सरकारने एक समिती स्थापन केली. ‘देवनागरी लिपी’ हा विषय या समितीकडे दिला गेला होता. अक्षर-जुळणीचे यांत्रिकीकरण झाले होते. लायनोटाईप आणि मोनोटाईप यंत्रावर देवनागरी लिपी उपलब्ध झाली. टंकलेखन यंत्र- म्हणजे टाईपरायटरशिवाय टेलिप्रिंटर या यंत्रावर देवनागरी उपलब्ध होती. परंतु या सर्व यंत्रांवर लिपीची वळणं वेगळी होती. इतकेच नव्हे तर कीबोर्डच्या रचनाही वेगवेगळ्या होत्या. याचा सखोल अभ्यास करण्याकरता सरकारने (या समितीने) बापूरावांची नियुक्ती केली. बापूरावांनी संशोधन करून तीन खंडांचा ग्रंथ या विषयावर सिद्ध केला. टायपोग्राफी ऑफ देवनागरी, प्राचीन लेखन पसंती, ब्राह्मी आणि देवनागरी लिपीचा उगम व प्रगती, शिलालेख, ताम्रपट, भारतात मुद्रणाची प्रगती इत्यादी इतिहासापासून ते यांत्रिकीकरण, कीबोर्ड स्टँडर्डायझेशन आणि शिफारस अशा विषयांवर त्यात विचार केलेला आहे. या ग्रंथाचा उपयोग आजही संगणकीकरणात होत आहे. पुढे या ग्रंथाचे मराठी भाषांतर बापूरावांनी केले.. ‘देवनागरी मुद्राक्षरलेखन कला’!

१९६७ मध्ये पाठय़पुस्तक मंडळाची स्थापना झाली. सरकारी पाठय़पुस्तकांची सर्वच बाबतीत बोंब झाली होती. चुकीचा मजकूर, वाईट निर्मिती, वेळेवर पुस्तकं न मिळणं.. आचार्य अत्रे यांनी ‘मराठा’मध्ये यावरून सरकारची चांगलीच खिल्ली उडवली होती. त्यामुळे पाठय़पुस्तक मंडळाची स्थापना झाली आणि बापूरावांची निमंत्रक म्हणून त्यावर नेमणूक झाली. हा ‘प्रयोग’ यशस्वी झाला आणि बालभारतीची पाठय़पुस्तकं भारतातच नव्हे, तर आशिया खंडात श्रेष्ठ ठरली. त्यांना युनेस्कोचं पारितोषिक मिळालं. पुस्तकांची निर्मितीमूल्यं तर सुधारलीच, पण त्यांची किंमतही कमी ठेवता आली. आणि मुख्य म्हणजे पुस्तकं वेळेवर उपलब्ध होऊ लागली. या पुस्तकांना ‘बालभारती’ हे नाव ठेवण्यात आलं. १९६७ ते १९७५ या काळात बापूराव या मंडळाचे निमंत्रक होते. या प्रकल्पात सर्व प्रमुख लेखकांचा  सहभाग होताच, शिवाय आघाडीच्या चित्रकारांचाही त्यात समावेश होता. दीनानाथ दलाल, प्रभाकर गोरे, पद्मा सहस्रबुद्धे, एम. आर. आचरेकर, गोपाळराव देऊस्कर , मारिओ मिरांडा यांच्यासारखे मातब्बर चित्रकार बालभारतीसाठी काम करत. १९६७ मध्ये महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीनिमित्त पु. ल. देशपांडे यांनी बापूरावांच्या सांगण्यावरून खास मुलांसाठी गांधीजी हे पुस्तक लिहिलं. चित्र एम. आर. आचरेकरांची. त्याशिवाय ‘गांधी’ या विषयावर एन. एस. बेंद्रे, के. के. हेब्बर अशा चित्रकारांनी खास त्यांच्या शैलीत गांधीजींवर तैलचित्रं तयार केली आणि पुस्तकांबरोबर ती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

१९७१ मध्ये बापूरावांनी ‘भारतीय आणि ग्रंथमुद्रण’ या विषयावर तीन व्याख्यानं दिली. त्याचं पुस्तक प्रकाशित झालं. त्यात भारतातील मुद्रणकला आणि ग्रंथनिर्मितीचा इतिहास सचित्र दिला आहे. या पुस्तकाचं जगभरात कौतुक झालं.

१९८० च्या सुमारात फोटोटाईप सेटिंग हे तंत्रज्ञान विकसित झालं. ही मुद्रणातली दुसरी क्रांती! या विषयावर बापूरावांनी ‘द सेकंड रिव्होल्यूशन इन् प्रिंटिंग’ ही पुस्तिका लिहिली. क्वाड्रिटेक या यंत्रावर बापूरावांनी ‘शारीवा देवनागरी’ हा अक्षर-संच (फाँट) बसवला. ही एक मोठी तांत्रिक कामगिरी मानली गेली.

गेल्या वर्षी इंटरनॅशनल टायपोग्राफी असोसिएशनने बापूरावांच्या कामाचा गौरव केला. त्यातून त्यांच्या मुद्रणातील कामाचं योग्य ते कौतुक झालं. बापूरावांचे नाटय़विषयक कार्य आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिक कार्यात त्यांनी केलेलं योगदान याचं मात्र फार कौतुक झालं नाही असंच म्हणावं लागेल.

बापूरावांचा लोकसंग्रह फार मोठा होता. भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे आमच्या घरी उतरत आणि खास गाण्याचे कार्यक्रम करत. अ. का. प्रियोळकर, न. र. फाटक अशा अनेक नामांकित साहित्यिक, कवी, नट, नाटककार यांचा कायम घरात राबता असे. वि. वा. शिरवाडकर, विंदा करंदीकर, पु. ल. देशपांडे, माडगूळकर, अनंत काणेकर असे अनेक मान्यवर बापूरावांशी गप्पा आणि चर्चा करायला येत. आज बापूरावांची जन्मशताब्दी संपन्न होत आहे. त्यांना विनम्र अभिवादन.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2020 3:08 am

Web Title: article on worshipers of printing and art culture bapurao naik abn 97
Next Stories
1 सांगतो ऐका : भारतीय सांगीतिक सर्वसमावेशकता
2 अफसाना लिख रही हूँ.. : ‘घर’
3 व्हर्निसाज.. एक अनोखा बाजार
Just Now!
X