28 February 2021

News Flash

सामाजिक समरसतेचे प्रवक्ते

विभिन्न जातींमध्ये हिंदुत्वाची जाणीव आणि अनुभूती निर्माण करणे हेच संघाचे काम आहे.

प्रा. अनिरुद्ध देशपांडे

‘सामाजिक समरसता मंच’चे प्रणेते रमेश पतंगे यांच्या अमृतमहोत्सवानिमिताने ‘नंदादीप’ या गौरवग्रंथाचे प्रकाशन उद्या (१५ फेब्रुवारी) सरसंघचालक मोहन भागवत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होत आहे. त्यानिमित्ताने पतंगे यांच्या कार्याचा धांडोळा घेणारा लेख..

रमेश पतंगे यांच्या पंच्याहत्तरीनिमित प्रकाशित होणाऱ्या ‘नंदादीप’ या गौरवग्रंथात पतंगे यांचे विविध विषयांतील वैचारिक योगदान तसेच ‘हिंदुत्व आणि सामाजिक समरसता’ यावरील लिखाण वाचावयास मिळते. सामाजिक समरसता मंचाच्या कार्यक्रमांमधूनही पतंगे यांनी तर्कशुद्ध आणि विस्तृत विवेचन केले आहे. ‘मी, मनु आणि संघ’ या त्यांच्या प्रारंभिक पुस्तकापासून ते महामानव डॉ. आंबेडकरांवरील ‘संघर्ष महामानवाचा’ या पुस्तकापर्यंत त्यांनी प्रवास केला आहे. त्यांच्या पुस्तकांमधून हिंदुत्व आणि सामाजिक समरसता या दोन तत्त्वांची उकल आणि परस्परसंबंधांचा आलेख त्यांनी रेखाटला आहे. ‘हिंदुत्व आणि सामाजिकता’, ‘डॉ. हेडगेवार आणि समरसतेची विचारसूत्रे’, ‘दोन डॉक्टर- एक उपाय’ अशा विषयांवरील भाषणांमधून त्यांनी जागरण घडवून आणले आहे.

वास्तविक पाहता ‘हिंदुत्व आणि सामाजिक समरसता’ हे एक अद्वैत आहे. परंतु हिंदुत्वाबद्दलच्या गैरसमजुती आणि हेतुत: निर्माण केलेले आक्षेप यांची बरीच चर्चा होत असलेली आपण पाहतो. या आक्षेपांचा समाचार घेत असताना पतंगे आपली भूमिका नि:संदिग्धपणे मांडतात. हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या संघाच्या विशाल चिंतनाचे अर्थातच यात अनेक संदर्भ येतात. भारतीय समाजाची एक जीवनसृष्टी आहे, नीतिमूल्यांचा समुच्चय आहे आणि एकाच जीवनाची अभिलाषा आहे. या जीवनदृष्टीतूनच ‘हिंदुत्व’ या संकल्पनेचा उद्भव झालेला आहे. याला कुणी मान्यता देण्या- न देण्यावर त्याचे अस्तित्व अवलंबून नाही. हे एक असे जीवनदर्शन आहे, जे चैतन्याच्या सर्वव्यापकतेला मान्यता देते. समग्रता आणि विराटरूपी समाजाच्या एकात्म सहअस्तित्वाचा प्रवाह या तत्त्वज्ञानाचा आधार आहे. हे जीवनदर्शन हिंदुस्थानच्या संस्कृतीचे निदर्शक आहे. त्यालाच ‘हिंदुत्व’ हे नामाभिधान प्राप्त झाले आहे.

समरसतेच्या मुळाशी समतेचे तत्त्व आहे. परंतु समता ही बऱ्याच वेळा एक भौतिक संकल्पना मानली जाते. आपल्या समाजातील सर्व प्रकारचे वैविध्य मान्य करूनही या वैविध्यामध्ये एक समान सूत्र आपल्याला दिसते. त्याचे अस्तित्व समाजाच्या परस्परसंबंध, परस्परपूरकता, परस्परावलंबित्व आणि परस्परसाहचर्य या अनुभूतीवर अवलंबून असते, हे निर्विवाद. आपल्या समाजातील विषमतेचे संदर्भ यामागे आहेत. या समस्येची मांडणी करताना पतंगे ‘हिंदुत्व आणि सामाजिकता’ या पुस्तिकेत म्हणतात, ‘हिंदू समाज म्हणजे जातींचा समूह होय. ही जातिसमूहाची संकल्पना तत्त्वदृष्टय़ा संघ स्वीकारीत नाही. जाती निर्मूलनाचा लढा फार प्राचीन आहे व हिंदू व्यक्तीच्या मनातून जातीची भावना काढून टाकणे, ही गोष्ट आजपर्यंत कुणालाही फारशी साधलेली नाही. संघ संघटनेचा आधार जातीभावना नाही. विभिन्न जातींमध्ये हिंदुत्वाची जाणीव आणि अनुभूती निर्माण करणे हेच संघाचे काम आहे.’

हिंदुत्व तत्त्वावर राष्ट्र संकल्पनेचा संदर्भ मानणारे विचार म्हणजेच हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व या अजोड संबंधांना दृढ करण्याचा विचार होय. जातिगत विषमतेचा आणि तत्जन्मअस्पृश्यतेचा संदर्भ संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरसांच्या १९७४ साली पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेतील विवेचनात आला आहे. त्यांनी अब्राहम लिंकनने गुलामगिरीबद्दल उल्लेख करताना जे म्हटले होते ते उद्धृत केले- ‘जर गुलामगिरी वाईट नसेल तर जगात काहीच वाईट नाही.’ बाळासाहेब म्हणतात, ‘जर अस्पृश्यता वाईट नसेल तर जगात काहीच वाईट नाही.’ आणखी एक असाच संदर्भ देणे उचित ठरेल. द्वितीय सरसंघचालक श्रीगुरुजी गोळवलकरांनी अस्पृश्यतेबद्दल म्हटले की, ‘अस्पृश्यता म्हणजे आपल्याला श्रेष्ठ समजणाऱ्यांच्या मनातील विकृत संकुचित भाव आहे.’ तो नष्ट करण्याचे दायित्व त्यांचेच आहे, ज्यांनी अस्पृश्यतेचे समर्थन केले आहे. ही विषमता नष्ट करण्याचे काम आंदोलने, संघर्ष, संकीर्णता यातून साध्य होण्याचे मुळीच नसून, समन्वय आणि सन्मानाच्या परस्पर अनुभूतीतूनच साध्य होऊ शकेल. समरसता परस्परांच्या मानसिकतेचा एक घटक आहे. समाजातील सर्व घटकांचे परस्पर भावनिक नाते समरसतेचा आधार आहे. जातीयता व त्यावर आधारित भेदपूर्ण जीवन हिंदुत्वाच्या विशालतेमध्ये बाधक ठरते. मनाची एकत्वाची भावना यातील सर्व समस्यांना समर्पक उत्तर आहे. समग्र समाजाचा विचार हा समरसतेच्या विचाराचा पाया आहे. समरसतेशिवाय समता अस्तित्वात येऊ शकत नाही. हिंदू तत्त्वज्ञानाने याची मांडणी सखोलतेने केली आहे. राष्ट्रकल्पनेचाही संदर्भ यामध्ये महत्त्वाचा आहे. राष्ट्र एक विराट पुरुषासारखे आहे. त्याचा आत्मभाव हिंदुत्व आहे. सामर्थ्यसंपन्न राष्ट्राची कल्पना समरसतेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असे प्रतिपादन पतंगे यांच्या अनेक भाषणांमधून व्यक्त झाले आहे. हिंदुत्वाच्या प्राणतत्त्वाची खरी ओळख समरस समाजाद्वारेच व्यक्त होऊ शकते. राष्ट्र भौतिकदृष्टय़ा प्रगत, उन्नत आणि वैभवसंपन्न व्हावयास हवेच; परंतु विज्ञान, तंत्रज्ञान, अवकाशज्ञान आदी क्षेत्रांत प्रचंड प्रगती करणारे राष्ट्र तेव्हाच एकात्म राष्ट्र होईल, ज्यावेळी या भौतिक उन्नतीबरोबरच समाजाची एकात्म उन्नती होईल. अन्यथा भौतिक प्रगतीत अग्रेसर असणारे राष्ट्र प्रजेच्या आंतरिक नात्यामध्ये विभक्ततेने भरलेले असल्यास यास सर्वागीण उन्नती समजता येणार नाही. भारतीय सनातन चिंतनामध्ये कोठेही जन्माधिष्ठित उच्च-नीचतेच्या आधारावर समाजाची विभाजित गणना नाही. वैश्विक बंधुत्वाचा विचार ही भारतीय समानत्वाची ओळख आहे. एक समाज, एकजन, एक राष्ट्र, एक संस्कृती अशा भावनेने समाजाची रचना सनातन जीवनात दिसते. आपण सर्व जण एका मातृभूमीचे सुपुत्र आहोत, या व्यापक विचाराने राष्ट्रजीवन समृद्ध व्हावे अशी आपली धारणा आहे. विविधतेतील एकात्मतेचा प्रवाह सुप्तपणे, परंतु फार प्रभावीपणे आपल्या समाजात जिवंत आहे याची अनुभूती आपण अनेक प्रसंगांमध्ये, घटनांमध्ये, परिवर्तनामध्ये घेत असतो. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ ही भावना समाजात रुजली असल्याचे अनेक घटनांवरून दिसते. भूमीचे पुत्र म्हणवून घेण्यात आपण धन्यता मानतो. ते एकात्म राष्ट्रजीवनाचे प्रतीक आहे. ‘माता भूमि: पुत्रोऽहम् पृश्विण्याम’ ही वेदांमधील उद्घोषणा वैश्विक बंधुत्वाचे नाते सांगते. या विशाल तत्त्वज्ञानाने व्यक्त केलेली बंधुभावाची कल्पना हीच खरी धर्मकल्पना असल्याने ‘बंधुभाव हाच धर्म’ हे समरसता मंचाचे बोधवाक्य समर्पकता दर्शविते. भगवद्गीतेच्या काळातील महत्त्वाच्या तत्त्वज्ञानाने या समरसतेचा उच्चार विविध रूपांनी केला आहे. ‘अद्वेष्टा सर्व भूतानाम् मैत्र: करुणाएवच’ ही भगवद्गीतेची धारणा उदात्तमतेची धारणा आहे. हिंदुत्वाच्या तत्त्वज्ञानाचे सर्व आधार या सनातन, परंतु कालोचित परिवर्तन करण्यास संकोच न करणारे आपले जीवन आहे. यालाच हिंदू जीवनदर्शन म्हटले आहे. दुर्दैवाने ‘शास्त्रात रूढी बलियसी’ असे काहीसे  झाले आणि हिंदू तत्त्वज्ञान टीकेचे लक्ष्य बनले. धर्म या रूढींना स्थान देत नाही, ही मूळ भूमिका अधिक सबल होण्याची आवश्यकता यातून व्यक्त होते. ‘विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद मग अमंगळ’ हे संतविचार हिंदू जीवनदर्शनाच्या मुळाशी आहेत. ‘ सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे सन्तु निरामया।’ हे श्रेष्ठ तत्त्वज्ञान वैश्विक समृद्धतेची ओळख  आहे. मैत्र कल्पना पसायदानात संत ज्ञानेश्वरांनी मांडली.  समरसतेचा सिद्धान्त यासाठी उपयुक्त आहे की, आज जगात चाललेल्या अनेक मानवनिर्मित समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता यात अंतर्भूत आहे. मनुष्यजीवनाचे अंतिम सर्वश्रेष्ठ मूल्य आहे मानवता. स्वामी विवेकानंदांनी व्यक्त केलेल्या मानवतेच्या आध्यात्मिक चिंतनाचे प्रकट रूप समाजात प्रत्यक्षात यावे, ही समरसतेची अनुभूती सर्वास मिळावयास हवी.

आधुनिक कालखंडामध्ये समरसतेचे तत्त्वज्ञान सामाजिक सुधारणांच्या प्रयत्नांमध्येही दिसून येते. न्यायमूर्ती रानडे प्रभृतींपासून डॉ. आंबेडकरांपर्यंत या विचारांचा प्रवाह दिसतो. संविधानाच्या संदर्भात मनोगत व्यक्त करताना डॉ. आंबेडकरांनी तथागत भगवान गौतम बुद्धाच्या आध्यात्मिक विचाराशी आपले नाते जोडले. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये ‘बंधुता’ या सूत्राचा विरोध करणारे महाभाग आजही आहेत, परंतु डॉ. आंबेडकरांनी हे सनातन बंधुत्वाचे तत्त्वज्ञान  संविधानाच्या मूळ सूत्रात गोवले, ही मानसिकतेशी निगडित राष्ट्रउत्थानाची कल्पना आहे. रमेश पतंगे यांनी आपल्या लिखाणामध्ये जागोजागी या उत्थानाच्या कल्पनेचा संदर्भ घेतला आहे. याबरोबरच वर्तमानातील समस्यांचाही वेध त्यांनी अनेक माध्यमांतून घेतला आहे. ‘रिडल्स ऑफ राम अँड कृष्ण’ या डॉ. आंबेडकरांच्या लिखाणाबद्दल वाद उत्पन्न झाले तेव्हा सामाजिक समरसता मंचाने जी भूमिका घेतली, त्यावर सर्व स्तरांत मोठी हालचाल उत्पन्न झाली; परंतु समाजाच्या एक राहण्याच्या प्रेरणेने त्या समस्येची उकल समरसता मंचाच्या व्यासपीठावर पतंगे यांनी फार तर्कशुद्धतेने केली.

सामाजिक समतेचा विचार रुजणे आणि तद्नुसार व्यवहार असणे हे एक प्रचंड आव्हान आहे. जातिगत विषमतेने राष्ट्र पोखरले आहे. राजकारणाने या विषमतेची जोपासना केली आहे. आरक्षणासारख्या धोरणाचा साकल्याने विचार करण्याऐवजी समाजातील दुहीसाठी केला जातो, हे चिंताजनक आहे. खूप काही समस्या समाजास भेडसावत आहेत. अशा वेळी जनप्रबोधन, जनजागरण आणि जनसंघटन या तिन्ही गोष्टींची आवश्यकता आहे. अशा वेळी आपल्या भूमिकेशी यथायोग्य प्रतिबद्धता ठेवून संघटन, संस्था, सामाजिक उपक्रम इत्यादींच्या माध्यमाने समरसता आधारित तत्त्व- धारणांची स्पष्टता ज्या साहित्यातून मिळेल त्यात रमेश पतंगे यांचे साहित्य बहुमोल आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2021 1:02 am

Web Title: articles on activist ramesh patange social work zws 70
Next Stories
1 हवामानाचे उपाख्यान
2 ‘लव्ह जिहाद’ आणि व्यक्तिस्वातंत्र्य
3 मोकळे आकाश.. : मोती आणि धागा
Just Now!
X