मृदुला दाढे- जोशी – mrudulasjoshi@gmail.com

रसिक वाचकहो नमस्कार..

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
South Superstar Allu Arjun Pushpa 2 The Rule makers spent 60 crore on Gangamma Thalli jatara scene
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘या’ सीनसाठी खर्च केले ६० कोटी रुपये! एक-दोन नव्हे तर ‘इतके’ दिवस लागले शूटिंगसाठी
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

अखेर तो क्षण आलाच.. निरोप घेण्याचा! हे वर्ष बऱ्याच अर्थानी अविस्मरणीय होतं. पण अनेक नकारात्मक घटनांमधूनही सृजन आकाराला आलं, याचाच अर्थ अजूनही आशा आहे. ही आशा आहे आपल्या जिवंत असण्याची. निव्वळ शरीराने नाही, तर भावनेनेसुद्धा! हे सगळं सगळं शिकवलं, उजळून काढलं ते अनेक ‘मास्टरपीस’ चित्रपटांनी, त्यातल्या गाण्यांनी,अभिनयाने! श्रीमंत करणारा अनुभव होता हा. तो तुमच्याबरोबर वाटून घेता घेता वर्ष संपलंसुद्धा..

२०१८ च्या एप्रिल महिन्यात ‘अनुराधा आणि पं. रविशंकर’ हा लेख मी लिहिला आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्या लेखावरूनच ज्यात कथेशी संगीताची घट्ट वीण बांधलेली असेल, त्यात भूमिकांचा स्वभाव उतरला असेल, कथा पुढे नेण्याची ताकद त्या गाण्यांमध्ये असेल असे चित्रपट निवडून त्यावर लिहावं असं वाटलं.. आणि या सदराचा जन्म झाला.

‘अनुभव’, ‘सफर’, ‘घर’, ‘साथ साथ’, ‘चितचोर’, ‘रजनीगंधा’, ‘घरोंदा’, ‘अभिमान’, ‘बाजार’, ‘अनाडी’, ‘मौसम’, ‘बंदिनी’ आणि ‘इजाजत’ या चित्रपटांवर इथं लिहिलं. प्रत्येक लेखानंतर आलेले असंख्य मेल, मेसेजेस, दूरध्वनी हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. तरलतेच्या इतक्या हळव्या पातळीवर जाऊन रसिक वाचत होते, व्यक्त होत होते..

निरोप घेताना या सुंदर मैफलीची सांगता एका तिहाईनं करते. मला भावलेल्या या तीन गाण्यांचा आस्वाद घेत आपण ही मैफल पूर्णत्वाला नेऊ या. आज जी तीन गाणी निवडली आहेत ती अशा वेगळ्या गीतकारांची आहेत, ज्यांनी चित्रपटांसाठी संख्येनं कमी, पण अत्यंत दर्जेदार काव्य लिहिलं. योगेश, एम. जी. हशमत आणि हरिवंशराय बच्चन हे ते तीन कवी. तिन्ही गाणी तीन वेगळ्या गायकांनी (मुकेश, किशोरकुमार आणि येसूदास) गायलेली. वेगळ्या प्रकृतीची.

‘कहीं दूर जब दिन ढल जाए..’

(‘आनंद’, दिग्द.- हृषिकेश मुखर्जी, गीत- योगेश, संगीत- सलील चौधरी, गायक- मुकेश)

‘कहीं दूर जब दिन ढल जाए,

सांझ की दुल्हन, बदन चुराए, चुपके से आए

मेरे खम्यालों के आँगन में

कोई सपनों के दीप जलाए, दीप जलाए..’

‘आनंद’ हा एक सर्वागसुंदर चित्रपट होता. हृषिकेश मुखर्जीनी एका कॅन्सर रुग्णाची  विलक्षण कहाणी त्यात जिवंत केलीय. आयुष्य असंही जगता येतं.. मृत्यूकडे असंही बघता येतं! ‘जिंदगी लंबी नहीं, बडम्ी होनी चाहिये’ हा विचार फार वरच्या पातळीचा होता. आनंदनं स्वत:ची शल्यं जगापासून लपवून एक आनंदी, खेळकर मुखवटा कायम चढवलाय. पण कधीतरी मनातली अधुरी स्वप्नं, मनापासून केलेलं निष्फळ प्रेम आठवतंच. मग दूर क्षितिजावर रेंगाळणारा सूर्य डोळ्यापुढून जात नाही. तो पटकन् निरोपही घेत नाही. ती संध्याकाळ नववधूसारखी हलकेच दबक्या पावलांनी अलगद सगळ्या चराचराला व्यापून टाकते. दिवेलागणीची ही वेळ.. माझ्याही मनातले दीप उजळायला लागतात.. स्वप्नांचे दीप!

‘कभी यूँही जब हुई बोझल सांसें,

भर आई बैठे बैठे जब यूँहीं आँखें

तभी मचल के प्यार से चल के

छुए कोई मुझे पर नजम्र न आए’

श्वास जड होतात.. नकळत डोळे भरून येतात. पण अशा वेळी तो एक अनामिक प्रेमाचा, मायेचा स्पर्श मला दिलासा देऊन जातो. कोण असतं ते? म्हणजे तू आहेस अजून आसपास!

‘कहीं तो ये दिल कभी मिल नहीं पाते

कहीं से निकल आयें जन्मों के नाते

है मीठी उलझन बैरी अपना मन

अपनाही हो के सहे दर्द पराये!’

कुठल्या जन्मीचं आपलं नातं? पुस्तकाच्या पानात भाबडेपणानं जपलेलं.. आता शुष्क झालेलं आपल्या आठवणींचं हे फूल.. का नाहीस आत्ता तू इथं? जीव फक्त तुझ्यात गुंतलाय हा.. आयुष्याची ही रेशमी कोडी सुटता सुटत नाहीत. आपलंच मन आपलं वैरी होतं.. अगदी परकी दु:खंसुद्धा मग ओढवून घेतं ते.

‘दिल जाने मेरे सारे भेद ये गहरे

हो गए कैसे मेरे सपने सुनहरे

ये मेरे सपने यही तो हैं अपने

मुझसे जुदा न होंगे इनके ये साए’

या स्वप्नांना सोनेरी वर्ख कसा, कधी मिळाला? खरं तर ही सगळी रहस्यं माझ्या मनाला ठाऊक आहेत. आणि शेवटी ती स्वप्नंच शाश्वत ठरली. ती नाही सोडून गेली मला! त्यांच्यावरच माझा अधिकार आहे! माझ्यापासून या स्वप्नांच्या सावल्या कधीच दूर जाऊ शकणार नाहीत!

मुकेशजींचा आवाज कमालीचा सहज, नैसर्गिक, पण नेहमीपेक्षा जड. त्या ‘बोझल’ शब्दासारखा. उरातलं वादळ ओठात येताना त्रास होतोय हे जाणवून देणारा. याहून जास्त नैसर्गिक गायन असूच शकत नाही. साध्यासुध्या, अपरिष्कृत आवाजात मुकेशजी गायलेत. यासाठीच बहुधा पहिली तालाशिवाय असलेली ओळ गायल्यावर येणारा ‘कहीं’ हा शब्द किंचित ‘चढा’ असला तरी तो खटकत नाही. बोलताना नाही का आवाज किंचित चढत उमाळ्यानं? तसा वाटतो तो! ‘दूर’ शब्दाचाही उच्चार ती ‘दूरी’ दाखवणारा. सर्वात रडवतो तो त्यांचा एक उच्चार! ‘कहीं से निकल आये’ म्हणताना कहीं‘से’ला दिलेला तो किंचित भावनाविवश होणारा हेलकावा! कसं सुचलं असेल हे? ती कुठली जागा नाही, हरकत, मुरकी यापैकी काहीही नाही. ती ‘आतली’ कळ आहे. काळजातली. ‘ये मेरे सपने’नंतरची ‘यही तो है अपने’ ही ओळ किती आतल्या आवाजात आहे! कारण ती स्वप्नं म्हणजे ‘मर्मबंधातली ठेव’ आहेत!

सलीलदांनी ‘कहीं दूर जब दिन ढल जाये’ ही ओळ अशी खाली उतरवलीय, की अस्ताला जाणाऱ्या त्या सूर्याचंच ते प्रतीक वाटतं. त्या खालच्या स्वरांवरून पुन्हा ‘सांझ की दुल्हन’चे स्वर आरोही दिशा दर्शवणारे. क्षितिजावर पश्चिमेची लाली चढत जावी, तसे! आणि मग ‘मेरे खयालों के’ ही ओळ स्वप्नदीप उजळवणारी म्हणून अधिक उंचावर! किती सुंदर हा स्वरतर्क! गाण्याच्या इंट्रो-पीसमधला बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांचा आवाज त्या वातावरणात विरघळून टाकतो आपल्याला. ‘सांझ की दुल्हन’नंतर व्हायोलिन्स हळूच मंद्र पंचमावर गंभीरपणे, समजूतदारपणे पोचलेली असतात. मग ‘बदन चुराये’चा पंचम त्यातूनच उमलतो. ध्रुवपदात असलेला ठेका अंतऱ्याच्या म्युझिकमध्ये बदलतो. जलद होतो. मनातली वादळं, भावनांचे चढउतार तो ठेका दाखवतो. पडद्यावरच्या समुद्राच्या लाटाही सांगतात सगळं. सलीलदांची ती लाडकी बासरीसुद्धा आनंदच्या रसरशीत मनाचं प्रतीक वाटते. पुस्तकात जपून ठेवलेलं सुकलेलं फूल बघताना पाश्र्वभूमीवर किंचित गडद बेसची व्हायोलिन्स जखम गहिरी करतात..

राजेश खन्नाच्या डोळ्यातली वेदना अतिशय बोलकी. त्याचं ते फूल हाताळणं बघून गलबलून येतं. समोर मृत्यू दिसत असताना जपलेली रसरशीत जीवनेच्छा, प्रेम, दोस्ती या सगळ्या भावनांचा कल्लोळ त्या चेहऱ्यावर दिसतो.. तरारलेल्या आसवांत उमटतो. काव्य, संगीत, गायन, अभिनय आणि चित्रांकन.. सगळंच उच्च दर्जाचं!

‘मेरा जीवन कोरा कागज’

(‘कोरा कागज’, दिग्द.- विजय आनंद, गीत- एम. जी. हशमत, संगीत- कल्याणजी आनंदजी, गायक- किशोरकुमार)

पती-पत्नीच्या नात्यातले तणाव फार तरलपणे हाताळणाऱ्या या कथेला अतिशय समर्थ संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. एम. जी. हशमत या काहीशा अप्रसिद्ध गीतकाराचे शब्द फार नेमके आणि संयत.

‘मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया

जो लिखा था आसुओं के साथ बह गया!’

एक भलंमोठं शून्य! एक अशी पोकळी, की जी कुणाच्यातरी जित्याजागत्या अस्तित्वानंच भरून निघणार आहे. आयुष्य आधी एक कोरा कागदच असतं. त्यावर कधीतरी रंगीत अक्षरांत एखादं नाव लिहिलं जातं. त्या नावातूनच एक कहाणी बनते.. कहाणी संपते.. आयुष्याचा कागद उरतो.. किंवा मग आयुष्यच संपतं.. कहाणी अपुरी ठेवून! पण लिहिलेलं नाव आसवांनी पुसल्यावर काय उरतं मग? रिकामं कोरेपण! कारणं काहीही असोत.. अहंकाराच्या भिंती किंवा गैरसमजांची वादळं!

‘इक हवा का झोंका आया, टूटा डाली से फूल

ना पवन की, ना चमन की किसी की है ये भूल

खो गयी खुशबू हवा में कुछ न रह गया..’

नातं असतं कोमल फुलासारखं. देठही नाजूक त्याचा. एक झंझावात त्याला फांदीपासून वेगळं करू शकतो, ही चूक ना त्या वाऱ्याची, ना त्या निसर्गाची. हा फक्त एक अपघात. मग सुंदर आठवणींचा तो गंधसुद्धा हवेत विरून जातो. काहीच उरत नाही मागे.. एका  निष्पर्ण फांदीशिवाय!

‘उडम्ते पंछी का ठिकाना, मेरा न कोई जहॉं

ना डगर है, ना खबर है, जाना है मुझको कहाँ?

बन के सपना हमसफम्र का साथ रह गया..’

परतायला घरटंच नसेल तर..? पंखांना बळ येईल? हे आकाश किती भयाण वाटेल! या पक्ष्यांना निदान घरटं आहे परतायला. मी कुठे जाऊ? माझं जग कुठं शोधू? हा प्रवास एका सुंदर सोबतीने करायचा, हे स्वप्नच राहणार..

विजय आनंदच्या टेकिंगमध्ये या ओळींच्या मधला अर्थ बाहेर काढण्याचं सामथ्र्य आहे. अगदी वाऱ्यावर वाहत जाणारा कागदाचा छोटा दिशाहीन कपटासुद्धा खूप काही सांगून जातो..

अर्चना (जया भादुरी) चेहऱ्यावर अकाली प्रौढत्व असलेली, स्वाभिमानी नजरेची करारी स्त्री. नवऱ्यापासून फारकत घेऊन दूरवरच्या गावी शिक्षिकेची नोकरी करणारी. मध्यम वयाकडे झुकलेली. पूर्वीची ती धार, ती आग काहीशी ओसरलीय, पण पीळ जळला नाहीये अजून. एक कमी आयुष्यात राहिलीये, हे आता स्वत:शी कबूल केलंय तिनं. आयुष्य अशा विचित्र तिठय़ावर येऊन थांबलंय, की कुठे जावं समजत नाही! आपण आनंदी आणि परिपूर्ण आहोत असं अट्टहासाने जगाला ओरडून सांगता येईलही; पण स्वत:ला कसं फसवणार? ज्याला सोडून आलो त्याचंच पुस्तक हातात आहे. उरातलं वात्सल्य भुकेलं आहे. मनातली पत्नी साद घालतेय. मधल्या सुट्टीत झाडाखाली बसल्यावर दिसणारी, रोज ठरावीक वेळी जाणारी ट्रेन.. किती जणांना सुख-दु:खांच्या गाठोडय़ांसहित इथं आणून सोडते. जसे आपण आलो एके दिवशी.. मनाविरुद्ध! काय साध्य केलं आपण?

कल्याणजी आनंदजींच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक असलेलं हे गाणं किशोरकुमारनं इतकं समरसून गायलंय, की स्त्रीवेदना त्या पुरुषी आवाजात कुठेही खटकली तर नाहीच, उलट ती एका वेगळ्या उंचीवर पोचलीय. खोल, काळजाच्या तळातून आलेला आवाज.. त्याला अनेक ठिकाणी दिलेला कापरेपणा, हुरहुर आणि हुंदकेही. ‘कोरा कागज’ म्हणताना आवाज थरथरतो.. हळवा होतो. असं कोरं आयुष्य जगायचं नसताना लादलं गेल्याची ती हुरहुर आहे. ‘खो गयी खुशबू हवा में’ म्हणताना ‘खो’ अक्षरावर चक्क बारीकसा हुंदका आहे.

एकेका स्वरावरचा सुंदर ठहराव हे या चालीचं वैशिष्टय़. जे आहे ते कठोर वास्तव मांडायचंय. थेट स्वरांची ताकद अशा वेळी जाणवते. आधी ‘सा’, मग ‘रे’ आणि ‘ग’ या स्वरांवर मुखडा. नंतर ‘जो लिखा था’ म्हणताना पंचमावरचा ठहराव. व्यथा अधिक तीव्र करणारी ‘आंसुओं के’वरची धैवतावरची झेप. आणि तिथून हताशपणे पुन्हा  खाली येणं.. काय सुंदर ग्राफ आहे हा!

सुरुवातीच्या मेंडोलिनच्या पीसपासूनच गाणं पकड घेतं. रूपकचा ठेका वेगळं रूप घेऊन आलाय या गाण्यात. सगळ्यात कमाल करतात ती व्हायोलिन्स. दुसऱ्या कडव्याच्या म्युझिकमध्ये अक्षरश: अंगावर येतात ते सूर, ती रफ्तार आणि तो द्रुत लयीतला तबल्यावरचा रूपक! तुफान आवेग आहे त्यात. ते वादळ एकाएकी पुन्हा अवरोही स्वरांत मूळ लयीत परततं. भावनांचा उद्रेक आवरल्यावर येणारी शहाणी लय असते ती. समजूतदार! आणि तो उडत्या पक्ष्यांचा व्हायोलिन्समधून व्यक्त झालेला चीत्कार! अ‍ॅरेजिंगमधला चमत्कार आणखी काय असतो?

एक पूर्णानुभव आहे हे गाणं म्हणजे!

‘कोई गाता, मैं सो जाता!’

(‘आलाप’, दिग्द.- हृषिकेश मुखर्जी, गीत- हरिवंशराय बच्चन, संगीत- जयदेव, गायक- येसूदास)

जयदेवजी म्हणजे मुळातच अत्यंत वेगळ्या विचारांची बैठक असलेले संगीतकार. ‘आलाप’सारख्या संगीतप्रधान चित्रपटाला संगीत देताना त्यांनी रागांना या कथेच्या प्रांगणात सुंदर बागडू दिलंय. वजनदार काव्य व शास्त्रीय संगीत यांचा संयोग किती सुखद असतो याचा प्रत्यय दिलाय. हे गाणं म्हणजे एक सुंदर आलाप आहे. ही कथाच वेगळी आहे. स्वरांच्या घट्ट रज्जूंनी बांधलेलंही कुटुंब असू शकतं. रक्ताची नाती दुरावताना हे बंध जगण्याचं कारण देतात. ज्यांच्याबद्दल मनात अपार आदर आहे अशा गायिका मातृतुल्य गुरू माँ सरजूबाईंसाठी हे गाणं, त्यांची आवडती लोरी आलोक (अमिताभ बच्चन) गातोय. पण आता त्या या जगात नाहीत. अतिशय कातर क्षण आहे हा.

‘कोई गाता मैं सो जाता

संस्कृति के विस्तृत सागर पर

सपनों की नौका के अंदर

सुखदुख की लहरों में उठ गिर

बहता जाता, मैं सो जाता..’

किती श्रीमंत भाषा आहे ही!

‘आँखों में भरकर प्यार अमर

आशीष हथेली में भर कर

कोई मेरा सिर गोदी में रख

सहलाता, मैं सो जाता..’

डोळ्यांत अपार माया घेऊन, माझं मस्तक मांडीवर घेऊन, आशीर्वादाच्या वत्सल स्पर्शानं भारलेल्या तळहातानं ते कुणी कुरवाळलं असतं तर.. त्या सुखनिद्रेच्या केव्हाच अधीन झालो असतो!

‘मेरे जीवन का खारा जल

मेरे जीवन का हालाहल

कोई अपने स्वर में मधुमय कर

बरसाता, मैं सो जाता!’

हा तर चरमबिंदू आहे.. स्वरांमध्ये काय ताकद असते ते व्यक्त करणारा! संपूर्ण आयुष्यभराचा कडवटपणा, विखार आपल्या मधुर स्वरांमध्ये विरघळून टाकून अमृतवर्षां करणारं कुणी असतं तर..? किती सुकून लाभला असता!

या गाण्याला एक प्रवाही नाद आहे. येसूदासजींच्या गळ्यातून सूर येतात ते मखमालीत लपेटूनच. प्रेम ओथंबून वाहतं त्या आवाजातून! खर्ज आणि मुलायमपणा यांचा अद्भुत मिलाफ या आवाजात आहे. कडव्याच्या ओळी खर्जातून सुरू होतात तेव्हा हे जाणवतं. भारदस्त आवाज कोरडा होऊ न देणं हे एक कौशल्य असतं. ‘सहलाता.. मैं.. सो जाता..’ या शब्दांतली आवाजाची आस विलक्षण आहे. हे करणं अवघड आहे. कारण त्यात एक बारीकशी तानसुद्धा आहे. ‘संस्कृति’, ‘विस्तृत’ यांसारखे कोमल नसलेले शब्द उच्चारतानाही माधुर्य कमी होत नाही. एखादा दीर्घ आलाप असावा तशीच चाल आहे ही. अंतऱ्याच्या शेवटच्या ओळीतून सलग एका प्रवाहात ध्रुवपदावर येणं हे जयदेवजींचं वैशिष्टय़. ‘बहलाता’पासून सुरू होणारी ही ओळ थेट ‘कोई गाता’पर्यंत काय सुरेख प्रवाह घेऊन येते! शेवटचा अंतरा अधिक तीव्र, उत्कट स्वरांत बांधणं.. ‘कोई गाता’ या दोन शब्दांच्या ध्रुवपदासाठी बिहाग रागातला गंधार प्रभावीपणे वापरणं, त्याला मध्येच कोमल निषादाची डूब देणं हे जयदेवजीच करू जाणे.

आज आपल्याला हवाय तो हा ‘सुकून’.. लौकिकाच्या पलीकडे नेणारा. विचारांची वादळं शमवणारा. आणि हे संगीतच आपल्याला ते सौख्य देणार आहे!

रसिकहो, ‘तिहाई’ म्हणजे समेआधी तीन वेळा येणारा मुखडा. आता सम गाठू या! अर्थात सम हा तिहाईचा शेवट असला तरी नवीन आवर्तनाची पहिली मात्राही तीच ना! येत्या वर्षांत सगळी काजळी, नकारात्मकता नष्ट होऊन नवीन तृणपाती जन्म घेऊ देत.. मनावरचं मळभ दूर होऊ दे, हीच इच्छा! या सदराच्या निमित्तानं मी अनेक भूमिका जगले. एकेका चित्रपटाच्या धुंदीत आठ-आठ दिवस राहिले. या भव्यदिव्य कलाकृतींच्या दर्शनाने अनुभवलेला त्यावेळचा थरार माझ्याबरोबर कायम असेल. या सदराला भरभरून दाद देणाऱ्या रसिकांच्या प्रेमापुढे मी केवळ अवाक्झाले आहे. असं भाग्य क्वचित कुणाला लाभतं. अर्थात या महासागराला कवेत घेताना माझ्या मर्यादांची मला नम्र जाणीव आहे. मी तुमच्या ऋणातच आहे. हेच प्रेम कायम मिळो! आत्मसंतुष्ट न राहण्याचं माझं भानही कायम राहो! ‘अहंकाराचा वारा न लागो राजसा!’ एवढंच म्हणते आणि तुमचा निरोप घेते..

(समाप्त)