News Flash

अक्षर जादूगार

शब्दांना सौंदर्यपूर्ण रूप व कलात्मक सौष्ठव असतं हे जनसामान्यांच्या मनावर ठसवणारे अक्षरांचे जादूगार म्हणजे कमल शेडगे!

अक्षर जादूगार
कमल शेडगे

अच्युत पालव  – palavachyut@.gmail.com

शब्दांना सौंदर्यपूर्ण रूप व कलात्मक सौष्ठव असतं हे जनसामान्यांच्या मनावर ठसवणारे अक्षरांचे जादूगार म्हणजे कमल शेडगे! कोणत्याही शाळेत कलाशिक्षण न घेतलेल्या, निव्वळ निसर्गदत्त प्रतिभेच्या जोरावर समृद्ध कलाविष्कार घडविणाऱ्या शेडगे यांनी केवळ आपल्या अक्षरसौंदर्यातून अनेक एकलव्य घडवले..

मी लालबागला गणेश टॉकीजच्या समोर राहत होतो. त्या बिल्डिंगच्या खाली ‘वसंत स्टोअर्स’ नावाचं स्टेशनरीचं दुकान होतं. त्या दुकानात शाई, पेपर, इतर ड्रॉइंग मटेरिअल घेताना मी असंख्य वेळा त्यांना पाहिलं होतं. कमी उंचीचा, बारीक, सडपातळ माणूस.. कोणीतरी मला सांगितलं की, ‘हे कमल शेडगे.’

त्याकाळी सकाळी वृत्तपत्र हाती आलं की पहिल्या पानावरच्या बातम्यांकडे फारसं लक्ष न देता मी पटकन् दुसऱ्या पानावर जायचो आणि नाटकांच्या जाहिराती पाहत बसायचो. खरं म्हणजे नाटकांच्या जाहिरातींचं कमल शेडगे यांनी केलेलं लेटरिंग वारंवार पाहून नाटक कसं असेल याची कल्पना करायचो. पुढे त्यांचं लेटरिंग पाहून मी नाटकं पाहायला लागलो आणि त्यातून नाटकाचा व त्यांचं लेटरिंग किंवा त्यांनी केलेलं डिझाइन यांचा काय संबंध असू शकतो याची कल्पना येऊ लागली. कुठल्याही कलाशाळेत न जातादेखील केवळ अनुभवाने शिकलेल्या या माणसाने माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांना दिलेला हा धडा होता. पुढे ते चिंचपोकळीला सोमण नगरमध्ये राहतात हे कळलं आणि खूप आनंद झाला.

सर ज. जी. उपयोजित कला महाविद्यालयात मी शिकत असताना त्यांच्या नाटक-सिनेमांत वापरलेल्या अक्षरांचं एक प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. आमच्यासाठी तो अक्षरश: दुग्धशर्करा योग होता.

मी दुसऱ्या वर्षांला शिकत असताना ‘expressive words’ ही असाइनमेंट होती. वेगवेगळे शब्द त्यांच्या अर्थानुसार मांडायचे, टाईप निवडून त्याला वेगळी ट्रीटमेंट द्यायची.. मराठीतून फारसं कोणी करायचे नाहीत. कारण त्यावेळी इंग्रजीतून टाईपचा अभ्यास करण्याकरिता typolog व नंतर letterset उपलब्ध होतं. मराठीत तसं काहीच उपलब्ध नसल्यामुळे कमल शेडगे यांच्या नाटक-सिनेमांच्या जाहिराती अभ्यासण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.. आणि आजही तोच पर्याय आहे. त्यामुळे ते प्रदर्शन म्हणजे माझ्यासाठी पर्वणी होती.

प्रदर्शन पाहिलं आणि त्यांनी मराठी अक्षरांची वळणं, गोडवा, त्यातलं गूढ, आनंद, थरार, भीती, क्लेश, वेगवेगळ्या भाषांचा वापर करून त्याला दिलेली वळणं पाहून मन थक्क झालं. त्यांच्या हाताला काय वळण आणि परफेक्शन असेल याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. नवरसांचं कमळ म्हणजे कमल शेडगे असं मी त्यांना मनात म्हणायचो. त्यांच्या एका हातात किती वळणं आहेत! हा माणूस परदेशात जन्माला आला असता तर एखाद्या इंग्लिश टाईप डिझायनरप्रमाणे मोठय़ा सन्मानाने जगला असता.

१९६२ साली ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचं डिझाइन त्यांनी पहिल्यांदा केलं. त्यानंतर कमलच्या डिझाइनशिवाय नाटकांच्या जाहिरातींना पर्यायच नसायचा. तेव्हापासून कालपर्यंत- म्हणजे जाण्याच्या आदल्या दिवसापर्यंत ते कार्यरत होते. नाटक-सिनेमांची शीर्षकं, पुस्तकांची मुखपृष्ठं, दिवाळी अंकांचे लोगो आणि मुखपृष्ठं.. जिथे मराठी अक्षर.. तिथे कमलाक्षरं हमखास असणारच.

प्रत्येक शब्दाला त्यांनी दिलेल्या आकारांनी इतकं वेगळेपण दिलंय, की तो शब्द माणूस आयुष्यात कधीच विसरणार नाही. ‘पुरुष’ नाटकाची जाहिरात पाहताना त्यामधील प्रमुख नायकाचा बेरकीपणा, ‘टूरटूर’ नाटकाच्या नावातील प्रवासाला निघालेली बस, ‘दुभंग’, ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘वस्त्रहरण’, ‘सखाराम बाइंडर’, ‘रणांगण’ अशी असंख्य नाटकं, तसंच सिनेमांची शीर्षकं किंवा डिझाइन्स त्यांनी कलात्मकतेनं साकारली होती.

‘टाइम्स’च्या कला विभागात काम करत असल्याने त्यांना स्पेसचा वापर कसा करायचा हे खूप चांगलं ठाऊक होतं. कमीत कमी जागेत अक्षरांचा ठसठशीतपणा दाखवून लक्ष वेधून घ्यायचं ही त्यांची हातोटी होती.

ते आमच्या जवळच राहत असल्यानं एकदा त्यांच्याकडे जाण्याचा योग आला. ही संधी न दवडता हा माणूस कसं काम करतो याची खूप उत्सुकता होती. मी त्यांना अगदी सहजपणे.. खरं तर बालिशपणे विचारलं, की हे सारं करताना तुम्ही नक्की कामाला कशी सुरुवात करता? तुमची अक्षरं एवढी शार्प कशी होतात? प्रत्येक वेळी रिव्हर्ससाठी पॉझिटिव्ह/ निगेटिव्ह करता का?

त्यांनी माझं सगळं ऐकून घेतलं आणि आपली नाटकांच्या जाहिरातींची काही लेटरिंग मला दाखवली. मी ती डोळे फाडून बघतच राहिलो. अक्षरांना बोलकं करायची प्रचंड जादू त्यांच्या हातात होतीच; त्याचबरोबर कमालीचं पर्फेक्शन.. स्ट्रोकवरील कमांड.. गोडवा.. खरं तर कमल हे एक अक्षरांचं गाणंच होते.. शब्दांचे संगीतकार होते ते..

लताबाईंच्या पूर्वीच्या रेकॉर्ड कव्हर्सवर मोहन वाघ यांची फोटोग्राफी आणि कमल शेडगे यांची डिझाइन्स पाहायला मिळायची. गाणं ऐकण्याआधी अक्षरांचे सूर कमल वळणांतून आणि डिझाइन्समधून दाखवीत असत. एकदा काळ्या कागदावर त्यांनी ब्रशने केलेलं लेटरिंग पाहून त्याबद्दल सहजच विचारलं. तेव्हा ते म्हणाले की, याचे खूप पैसे मिळत नसल्याने पॉझिटिव्ह/ निगेटिव्हचा खर्च कमी करण्यासाठी डायरेक्ट काळ्या पेपरवर लिहिलं की वेळ आणि पैसेही वाचतात.

आर्थर रोड नाक्यावर केरमाणी बिल्डिंगमध्ये प्रोसेस कॅमेरा स्टुडिओ होता. वसंत पाटील नावाचा आमचा मित्र त्या स्टुडिओत काम करत असे. कमलजींचं लेटरिंग कॉपिंगला आलं की तो आम्हाला फोन करायचा. मग असू तिथून आम्ही पळत पळत जाऊन ते आर्टवर्क पाहत असू. त्यांचं आर्टवर्क पाहणं हा एक वेगळाच आनंद असायचा.

१९८२ साली उपयोजित कला शाखेतून पास झालो तेव्हा  ‘expressive words’  नावाचं पहिलं प्रदर्शन भरवलं. अर्थात त्यावेळी कमल सर हेच त्यामागील प्रेरणा होते. मी आणि सुनील धोपावकर यांनी मिळून सुनील चव्हाणच्या मदतीने ते प्रदर्शन पाल्र्यात भरवलं होतं.

पुढे डिप्लोमाची परीक्षा संपल्यानंतर पुढे काय करायचं, हा प्रश्न होताच. मराठीची आवड असली तरी लेटरिंग करून आपला उदरनिर्वाह होईल का, हा प्रश्न मनात घोळत असतानाच मित्राच्या ओळखीनं ‘टाइम्स’च्या कला विभागात काम दाखवायला गेलो आणि मराठी लेटरिंग करण्याकरिता फ्रीलान्सर म्हणून त्यावेळचे टाइम्स कला विभागाचे प्रमुख रमेश संझगिरी यांनी मला यायला सांगितलं. या गोष्टीचा आनंद तर झाला होताच; पण त्याहीपेक्षा जास्त कमल शेडगे यांचे काम आता जवळून पाहता येईल, त्यांच्याशी संवाद साधता येईल आणि काही शिकता येईल हाही विचार मनात होताच. मी तीन महिनेच तिथं काम केलं; पण तो अनुभव खूप छान होता.

१ ऑगस्टसाठी ‘टिळक’ नावाचं लेटरिंग करून हवंय असं मला सांगण्यात आलं. एका बाजूला कमलजी, तर दुसऱ्या बाजूला सत्यनारायण वाडीशेरला, प्रदीप शेळके, नाना शिवलकर, माळी, अरविंद महातेकर अशी मातब्बर मंडळी.. कामाचा दबाव नसला तरी मानसिक ताण होता. ‘टिळक’ हा शब्द लिहून मी स्केचिंगच्या ट्रेमध्ये ठेवला.. दोन तासांनी स्टुडिओमधून विचारलं गेलं की, ‘‘टिळक’ हे लेटरिंग कोणी केलं?’ थोडय़ा वेळाने स्टुडिओ मॅनेजर स्वत: आले. त्यांनी कमलजींना विचारलं की, ‘‘तू छान केलंयस लेटरिंग..’’ कमल सर पटकन् म्हणाले, ‘‘मी नाही, तो नवीन मुलगा आलाय अच्युत पालव त्याने केलंय..’’ नकळतपणे माझ्या पाठीवर पडलेली ती कमलजींची थाप होती.. धन्य झालो.

पुढे तीन महिन्यांनी मी दुसरीकडे गेलो; पण ‘टाइम्स’मधला नवीन माणसाला सांभाळून घेण्याचा अनुभव खूपच छान होता.

या माणसाने अविरतपणे असंख्य नाटकांची लेटरिंग केली, त्यांची प्रदर्शनं झाली.. दोन-तीन पुस्तकंही निघाली.. एकदा जहांगीरच्या माझ्या प्रदर्शनाला ते आले तेव्हा कौतुकाने म्हणाले, ‘‘तुझं बरं रे.. मोठा कॅनव्हास- ४ बाय ८ फुटांचा, नाहीतर  ५ बाय ५० फुटांचा कागद.. मजा करतोस. आमचं काम म्हणजे एक कॉलम बाय ८ सेंटीमीटर किंवा २ कॉलम बाय १२ सेंटिमीटरच्या पुढे जाता येत नाही.’’

एकदा तर मला गमतीनं म्हणाले, ‘‘हे तुझ्यासारखं मला कधी जमणार?’’ आणि चक्क त्यांनी तसं रिमार्क पुस्तकात लिहिलंही. खरं तर एवढय़ा मोठय़ा कलाकाराचा हा नम्रपणा खूप काही सांगून जातो.त्यांच्याकडे औपचारिक कलाशिक्षण वगैरे काहीही नसताना अनुभवांतून शिकत शिकत त्यांनी स्वत:ची एक वेगळी शैली निर्माण केली. त्यावेळी त्यांनी काही टाईप्स तयार केले होते. त्यांची प्रिंटआऊट्स घेऊन हेडलाइन तयार करायच्या.. कुठल्याही कॉलेजचं शिक्षण नसताना मराठी अक्षरांना वेगळं वळण देणारा हा माणूस आज आपल्यात नाही..

तीन वर्षांपूर्वी नवी मुंबईत भरवलेल्या ‘कॅलिफेस्ट’मध्ये त्यांचा आम्ही सत्कार केला होता.. माझ्या मनात त्यांच्या कामाप्रती असलेली आदरभावना व्यक्त करणं आणि माझ्या विद्यार्थ्यांना ‘कमल शेडगे कोण आहेत, त्यांचं काय अफाट काम आहे’ हे कळावं, हा त्यामागचा हेतू होता. ‘अर्बन हाट’च्या पायऱ्या चढून ते दमले आणि गमतीने म्हणाले, ‘‘पालवा, आणखी किती उंचावर नेणार आहेस? पण मी दमणार नाही..’’

मी म्हटलं, ‘‘कमल सर, तुमचं काम पाहून आम्हीच दमलो आहोत. हे सगळं आम्हाला कधी जमणार?’’

आता संगणक आम्हा कलाकारांच्या मदतीला आला असला तरी मुळात तुमच्याकडे उपजत प्रतिभा आणि हातात कला असायलाच हवी ना!

आज कमल शेडगे सर आपल्यात नाहीत; पण त्यांची अक्षरं कायम कमळासारखी आपणा सर्वाच्या स्मरणात घर करून राहतील, हे नक्की..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 2:08 am

Web Title: artist kamal shedge typography dd70
Next Stories
1 हास्य आणि भाष्य : ग्रह आणि उपग्रह
2 इतिहासाचे चष्मे : अस्मितांचे जंजाळ
3 सांगतो ऐका : एक मुलाकात जेएनयु छात्र नेता के साथ!
Just Now!
X