दिल्लीतील निवडणुकांत कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांचे पार पानिपत झाले. ज्या मोदींवर नऊ महिन्यांपूर्वी दिल्लीच्या जनतेने प्रगाढ विश्वास प्रकट केला होता, त्याच मोदींना यावेळी चारी मुंडय़ा चीत करून दिल्लीकरांनी आपच्या केजरीवाल आणि मंडळींवर भरभरून विश्वास व्यक्त केला आहे. हे का घडलं, याची मीमांसा करणारा लेख..
ए खादी व्यक्ती स्वत:विषयी आदरार्थी संबोधने वापरायला लागली की ती खूण असते त्या व्यक्तीला झालेली ‘ग’ची बाधा हाताबाहेर जायला लागल्याची. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अलीकडे असे बोलायला लागले आहेत. त्याचे तीन अगदी ढळढळीत दाखले देता येतील. त्यातले दोन दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारांतले आहेत अािण एक त्याआधीच्या जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीतला. हे प्रचाराचे दाखले अशासाठी द्यायचे, की तोपर्यंत महाराष्ट्र, हरयाणा आणि झारखंड या राज्यांतल्या निवडणुकांत भाजपने दणदणीत विजय मिळवलेला होता. म्हणजे ‘ब्रँड मोदी’ चांगल्या प्रकारे सिद्ध झाला होता.
काश्मिरातील सभेत मोदी म्हणाले, ‘‘देशात मोदी सरकारच असे आहे, की त्याने लष्करालाही माफी मागायला लावली.’’ याचा संदर्भ होता तो लष्कराकडून नागरी भागात झालेल्या गोळीबाराचा. नंतर दिल्लीत प्रचारातल्या एका भाषणात पंतप्रधान श्रोत्यांना उद्देशून म्हणाले, ‘मोदी तुमच्यासाठी भाग्यवान असतील तर इतरांना तुम्ही सत्तेची संधी देताच कशाला?’ याच प्रचारात दुसऱ्या एका सभेत मोदी यांनी जनतेला ग्वाही दिली की, दिल्लीत भाजप सरकार निवडून आले तर त्याला मोदींची भीती असल्यामुळे ते विकासाची कास सोडणार नाही.
दिल्ली निवडणुकांसाठी प्रचार सुरू होण्याआधी- म्हणजे मोदी यांनी ही अशी भाषा करण्याआधी एक घटना घडली होती. ती म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचा भारतदौरा पार पडला होता. त्या दौऱ्यात मोदी यांचे यजमान या नात्याने झालेले वर्तन हे काही त्यांच्या आवडीनिवडी दर्जेदार म्हणवून घेण्यास पात्र ठरतील असे नव्हते. त्याचे दोन ढळढळीत दाखले..
एक म्हणजे मोदी यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांचा जाहीर भाषणात तीन वेळा आणि त्यांच्यासमवेतच्या आकाशवाणीवरील कार्यक्रमात तब्बल २३ वेळा उल्लेख केला तो फक्त ‘बराक’ या नावाने. ही घटना म्हटली तर हास्यास्पद अािण म्हटली तर मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वाची चुणूक दाखविणारी होती. गरिबीशी लढण्यात खूप संघर्ष कराव्या लागलेल्या एखाद्या व्यक्तीच्या घरी कधीतरी त्याचा श्रीमंत सुहृद आल्यावर त्या गरीबाने त्याची आणि आपली किती सलगी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते जसे आणि जितके केविलवाणे दिसेल, ते तसे आणि तितकेच मोदी यांचे वर्तनही केविलवाणे होते. बरे, परिस्थिती अशी नाही, की मोदी आणि ओबामा हे अगदी लंगोटी-मित्र आहेत आणि शाळा-महाविद्यालयात एकाच बाकावर बसत होते. आणि दुसरे असे की, आपल्यात असा दोस्ताना आहे असे दाखवण्याचा प्रयत्न ओबामा यांच्याकडून होत होता असेही नाही. आपलेच पंतप्रधान सतत ‘बराक.. बराक’ म्हणताना दिसत आणि ऐकायला येत होते. आणखी एक बाब म्हणजे ओबामा यांच्यासमोर घातलेला मोदी यांनी स्वनामाची जपमाला विणून तयार केलेला दहा लाख रुपयांचा पेहेराव! म्हणजे पुन्हा कपडय़ांमधले आदरार्थी संबोधनच! एका बाजूला आपण चहावाल्याचे पोर म्हणून कसे वाढलो याचे वर्णन करायचे अािण दुसरीकडे हे असले दहा-दहा लाख रुपयांचे कपडे घालायचे, हे मोदी यांच्या कोणत्या नीतितत्त्वात बसते?
हा प्रश्न अर्थातच मोदी यांना ना भाजपचे नैतिक नियंत्रक असल्याचा दावा करणाऱ्या रा. स्व. संघाने विचारला, ना अन्य कोणी. शेवटी दिल्लीकरांनीच तो विचारला अािण मतपेटीद्वारे त्याचे उत्तर दिले. मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला मतदारांनी सपाटून मार दिला. अगदी भाजप काळानिळा पडेल, इतका. नऊ महिन्यांपूर्वी जनतेच्या गळ्यातला ताईत वगैरे असलेल्या मोदी यांच्यावर अशी वेळ का आली?
त्याचे अत्यंत महत्त्वाचे कारण म्हणजे मोदी यांनी आपल्या विजयाचा अर्थच मुळी चुकीचा लावला. एक म्हणजे मोदी हे त्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले ते काही प्रसार माध्यमे, उद्योगपती आदी वर्ग ‘मोदी किती थोर!’ हे सांगत होते म्हणून नाही, तर त्यांच्या आधीचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना त्या पदावर ठेवून काही उपयोग नाही असे मतदारांना घाऊकपणे वाटू लागले होते म्हणून, आणि त्यावेळी मोदी यांच्याखेरीज अन्य कोणता पर्याय लोकांसमोर नव्हता म्हणून! लोकसभा निवडणुकीतील ते मत होते ते मोदी यांनी दाखवलेल्या विकासाच्या स्वप्नांना! परंतु त्याचा अर्थ लावताना मोदी यांनी दोन गंभीर चुका केल्या. एक म्हणजे हे मत आपल्या हिंदुत्ववादी भूमिकेला आहे असे त्यांनी मानले. आणि दुसरे म्हणजे काँग्रेस सरकारने त्यांची जी इतकी वर्षे अवहेलना केली, त्याचा सूड म्हणून मतदारांनी आपणास भरघोस पाठिंबा दिला असे मोदी मानू लागले.
या दोन्ही चुका अत्यंत गंभीर होत्या. याचे कारण देशात बहुसंख्येने वाढलेल्या तरुण मतदारांना हिंदुत्व, निधर्मीवाद या थोतांडी वादांमध्ये काडीचाही रस नाही. त्यातही प्रचंड संख्येने शहरात साचलेला हा नवा मतदार वृत्तीने मनापासून धर्मनिरपेक्ष आहे. ती धर्मनिरपेक्षता तो जगतो आहे. आपला सहकारी, जेवणाचा डबा पुरवणारा वगैरे कोणत्या धर्माचा आहे, जातीचा आहे हे पाहण्याची गरजही त्याला वाटत नाही. त्याचप्रमाणे राजकारण्यांच्या वैयक्तिक मानापमान- नाटय़ांतही त्याला पैचाही रस नाही. ज्याप्रमाणे त्याला गांधी घराण्याच्या कथित त्यागाची मातब्बरी नाही, त्याचप्रमाणे काँग्रेसने मोदी यांना किती छळले याबद्दल त्याला सहानुभूतीही नाही. जीवनसंघर्षांला सामोरे जाण्यातच त्याची दमछाक होते आहे. त्यामुळे ही असली इतरांची खरकटी काढण्यात वेळ घालवणे या नवमतदाराला मंजूर नाही. या मतदाराला त्याच्या प्रश्नांना उत्तरे देणारा कोणी हवा होता. हे प्रश्न पैसे दिल्याशिवाय काम न होणाऱ्या सरकारी मस्तवालपणाचे होते, बारा महिने चौदा काळ आपले रस्ते खणलेलेच कसे राहतात, याचे होते.. आपण टोल तरी किती अािण किती काळ द्यायचा, हे होते.. मुलांच्या शाळाप्रवेशाच्या साध्या गोष्टीसाठीही किती रक्त आटवायचे, हे होते.. आपण भरतो त्या करांचे काय होते, हे होते.. आणि आपल्या आसपासचा आपल्याइतकाच गरीब माणूस राजकारणात गेल्यावर काही काळातच इतका गब्बर कसा होतो, हे आणि असे होते. आपण हे प्रश्न सोडवू असा मोदी यांचा दावा होता. लोक त्यांच्यामागे गेले ते यामुळे. पण सत्ता मिळाल्यावर हे प्रश्न सोडवण्याच्या कामी लागायच्या ऐवजी मोदी स्वप्रतिमानिर्मितीतच अडकले. त्यात त्यांना स्वत:ला आंतरराष्ट्रीय मुत्सद्दी व्हायचीही घाई लागली. त्यामुळे स्वत:ची प्रतिमा विकणे हा त्यांचा एककलमी कार्यक्रम बनला. एव्हाना त्यांची स्वत:च्या जाहिरातकलेवरील हुकुमतीची खात्री पटली होती. एक गोष्ट आपल्याला जमते असे लक्षात आले की व्यक्ती तीच ती गोष्ट वारंवार करू लागते. जाहिरातबाजीच्या बाबतीत मोदी यांचे हे असे झाले.
विक्रयकलेचे तंत्र सांगते की, दोन पद्धतीने आपले उत्पादन गाजवता येते. एक म्हणजे दर्जाबिर्जाचा विचार न करता आपल्या उत्पादनाचा असा काही जाहिरातमारा करायचा, की ग्राहकाला विचार करण्याची सवडच मिळू नये. या मार्गाने उत्पादनाचा बोलबाला चटकन होतो. दुसरा मार्ग म्हणजे प्रथम त्याच्या दर्जाकडे लक्ष द्यायचे अािण हळूहळू प्रसिद्धी करत आपली प्रतिमानिर्मिती करायची. या अशा पद्धतीत उत्पादन लोकांपर्यंत जायला, त्यांना ते आवडायला काहीसा वेळ लागतो. पण एकदा का या पद्धतीने उत्पादनाला मागणी यायला लागली की ती शाश्वत असते. उच्च अभियांत्रिकी दर्जा असलेली जर्मन उत्पादने या पद्धतीने वाढतात. परंतु मोदी यांनी पहिला मार्ग निवडला. उत्पादनाच्या दर्जाकडे लक्ष न देता पहिले उद्दिष्ट त्यांनी ठेवले बाजारपेठ काबीज करायचे! ती केलीदेखील त्यांनी. परंतु मधेच त्यांच्यासारखीच विक्रयकला अंगी असलेले, एकदा बाजारपेठेतून माघारी घेण्याची वेळ आल्यामुळे शहाणपण आलेले आणखी एक उत्पादन बाजारात आले होते. त्याचे नाव ‘आम आदमी पक्ष’! या उत्पादनाची बाजारपेठ फारच छोटी होती. तूर्त तरी त्याच बाजारपेठेकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले होते.  लोकांनीही तोच विचार केला. बाजारपेठ अगदीच छोटी आहे, तेव्हा काय हरकत आहे उत्पादन बदलून पाहायला? अखेर तेच झाले. लोकांनी ‘आप’च्या बाजूने भरभरून कौल दिला.
अन्य प्रांतांच्या तुलनेत दिल्लीत ‘आप’ हा जास्त आकर्षक ठरला. याचे कारण असे की, अतिमहनीय व्यक्तींच्या सुळसुळाटामुळे दिल्लीकरांचे जगणे अत्यंत कटकटीचे झालेले आहे. या महनीय व्यक्तींसाठी रस्ते बंद, वाहतुकीचे नियंत्रण, हालचालींवर र्निबध वगैरेंमुळे सामान्य दिल्लीकराच्या मनात या अतिमहनीय संस्कृतीविषयी घृणा आहे. आपले निवडणूकपूर्व साधेपणाचे आश्वासन आठवत भाजपने या संस्कृतीत काही दृश्य बदल करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक होते. परंतु स्वत:च्या प्रतिमा संवर्धनात मग्न असलेल्या भाजपच्या हे ध्यानात आले नाही. परिणामी भाजपविषयी लोकांची धारणा झाली ती अशी, की हेही आधीच्यांपेक्षा काही वेगळे नाहीत. पंत गेले आणि राव चढले, इतकेच. या पाश्र्वभूमीवर तरुण मतदारांच्या मनात ‘आप’चे वेगळेपण चांगलेच ठसत होते. आधीच्या कालखंडातला या मंडळींचा चक्रमपणा आता मागे पडला आहे आणि ते खरोखरच गांभीर्यपूर्वक राजकारण करीत आहेत, हे सामान्य माणसास दिसत होते. त्याउलट, विकासाची भाषा करणाऱ्या भाजपमध्ये मात्र दृश्य बदल दिसू लागले होते आणि त्याचा प्रचार अधिकाधिक वैयक्तिक अािण अभिरूचीहीन होऊ लागला. तेव्हा भाजपच्या विरोधात जनमत जायला सुरुवात होणे अपरिहार्यच होते. हे जनमताचे वारे झपाटय़ाने बदलण्याचे कारण म्हणजे प्रचंड संख्येने वाढलेले तरुण मतदार. मनमोहन सिंगांच्या तुलनेत ताजे वाटणारे, तरुणाईची भाषा बोलणारे नरेंद्र मोदी नवमतदारांना आकर्षक वाटले. पण हे आकर्षण लांबावे यासाठी मोदी यांनी काही ठोस पावले उचलली नाहीत. उलट, बेफाम साधू अािण साध्वींचा मंत्रचळेपणा मात्र वाढतच गेला. या आचरटांना आवरण्याचा कोणताही प्रयत्न मोदी यांनी केला नाही. या साधू-साध्वींमध्ये नवमतदारांना कपर्दिकही रस नाही. त्यामुळे या असल्या बेजबाबदारांना जवळ करणाऱ्या भाजप अािण मोदी यांना मतदारांनी दूर केले नसते तरच नवल. मनमोहन सिंग यांच्यापेक्षा मोदी हे तरुण आणि आश्वासक वाटले म्हणून ते निवडले गेले होते. अािण ‘आप’च्या केजरीवाल अािण पोरांच्या तुलनेत मोदी मागास वाटले म्हणून ते नाकारले गेले.
तेव्हा ‘आप’ विजयी झाला. पुढे काय? खरी गंमत पुढेच असणार आहे. आपच्या वहाणेने भाजपचा विंचू मारला गेला म्हणून उद्धव ठाकरे यांच्यापासून ते नीतिशकुमार, ममता बॅनर्जी यांच्याप्रमाणेच अनेकजणांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या. पण त्या त्यांच्या राजकीय अज्ञानाच्या निदर्शक होत्या. याचे कारण ‘आप’ची दिशा!
लोकप्रिय राजकारण करणारा, धर्मनिरपेक्ष पद्धतीने पुढे जाणारा आणि मुख्य म्हणजे शहरी मध्यमवर्गाला भावणारा हा पक्ष असून देशातील वाढते नागरीकरण लक्षात घेता शहरकेंद्रित पक्षांच्या तो नाकी नऊ आणणार हे स्पष्ट आहे. याचाच अर्थ मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि कोलकात्यात शारदा घोटाळ्यामुळे संकटात सापडलेला तृणमूल काँग्रेस ही ‘आप’ची पुढील लक्ष्ये असतील. दरम्यान, बंगलोर महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. आपने आपण या निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले आहेच. पुढील काही काळ आपण कोणत्याही राज्य विधानसभेच्या निवडणुका लढवणार नाही, असे आपने जाहीर केले आहे. पण हा पक्ष महानगरपालिकांच्या निवडणुका लढवणार आहे. म्हणजे आधी शहरे काबीज करायची, वातावरणनिर्मिती करायची, आपला पाया रूंद करायचा अािण मग विधानसभांना हात घालायचा, असे हे दीर्घ पल्लय़ाचे राजकारण आप करू इच्छितो. या दीर्घकालीन लढाईसाठी त्यांची रणनीती स्पष्ट आहे. आपण भाजप किंवा काँग्रेसविरोधी आघाडीचे राजकारण करणार नाही, आपले राजकारण प्रचलित राजकारणाच्या विरोधातच आहे, इतक्या स्वच्छपणे आपने आपली भूमिका मांडली आहे. याचाच दुसरा अर्थ असा की, प्रचलित राजकारण करणारे सर्वच पक्ष आपचे विरोधक असणार आहेत. भाजपचे नाक कापले गेले म्हणून बाकीचे आज हसत असले तरी उद्या किंवा फार फार तर परवा या मंडळींनाही आपले नाक झाकून हिंडावे लागणार आहे.
याचा अर्थ आप हा राष्ट्रीय पक्ष म्हणून उदयाला येणार का?
तर तसे अजिबातच नाही. याचे कारण त्या पक्षात अंगभूत अशा काही मर्यादा आहेत. परंतु एक होऊ शकते. ते असे की, वैचारिक मध्यबिंदूच्या डावीकडे आज लक्षणीय असा एकही पक्ष नाही. डावे वाढू शकत नाहीत. अशावेळी डावीकडे झुकणारा आप हा लोकप्रिय होऊ शकतो. तेच त्याचे बलस्थान आहे अािण तीच त्याची मर्यादादेखील. डावा, समाजवादी विचार, अनुदानांची भाषा ही अर्थविचारांच्या पहिल्या पायरीवर असलेल्या अनेकांना आकर्षक वाटत असते. पण हा भाबडेपणा फार काळ टिकत नाही. वास्तवाची जाणीव झाल्यावर त्यातील अनेक मुद्दे हे स्वप्नाळू, अवास्तव आहेत याचे भान येते. आणि मग राजकीय पक्ष जमिनीवर येऊ लागतात.
याचे उत्तम उदाहरण म्हणजे काँग्रेस! पं. नेहरू यांच्यापासून काँग्रेसने समाजवादी अर्थविचाराची कास धरली होती. त्याकाळची परिस्थिती पाहता ते एक वेळ क्षम्य ठरू शकेल. परंतु पुढच्या काळात हा पक्ष आर्थिक मुद्दय़ांवर अधिकाधिक भंपक अािण म्हणून कालबाह्य़ होत गेला. आर्थिक उदारीकरण, सुधारणा हेही याच पक्षाने केले. तरीही त्या पक्षाचे नेतृत्व हे अनुदान संस्कृतीचेच गुणगान गात राहिले. त्यामुळे झाले असे, की पक्षनेतृत्वाचे तोंड डावीकडे अािण त्या पक्षाच्या सरकारची धोरणे उजवीकडे अशी परिस्थिती निर्माण झाली. परिणामी काँग्रेस पक्ष ना डावीकडे गेला, ना त्याला उजवी अर्थधोरणे राबविता आली. यामुळे हा पक्ष अािण जनमत यांत मोठे अंतर पडत गेले. या खंदकातच अखेर तो पक्ष गाडला गेला. दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्या पक्षाचे अस्तित्व पार पुसले गेले, हा त्या पक्षाच्या राजकीय कामगिरीचा नीचांक! त्या तुलनेत ‘आप’ हा मतदारांना अधिक प्रामाणिक वाटला. कारण त्या पक्षाची भाषा अािण तो जे काही करू पाहतो ते- यात काँग्रेससारखे अंतर नाही. त्यामुळे लहान प्रमाणात का असेना, आप हा काँग्रेसला पर्याय म्हणून उभा राहू शकतो. दिल्ली निवडणुकीत अल्पसंख्य, आर्थिकदृष्टय़ा विपन्नावस्थेत असलेले आदींनी ‘आप’ला भरभरून मते दिली. त्यावरून हेच दिसते. म्हणजे एकाच वेळी मध्यमवर्गीय आणि गरीब या दोन्ही वर्गाना आप आकर्षक वाटू लागलेला आहे. मोदी हे उजवेपणामुळे आकर्षक वाटले, तर केजरीवाल आणि आप डावेपणामुळे आकर्षक वाटत आहेत. या आकर्षणास न्याय मिळेल असे काही मोदी यांनी केले नाही. आता ती चूक केजरीवाल कशी टाळतात ते पाहायचे. आपल्या आश्वासनांच्या अशक्यतेत तेही अडकले तर मतदार त्यांनाही झिडकारणार, हे उघड आहे.
कारण हा मतदार आता अधीर झालेला आहे. त्याला राज्यकर्त्यांच्या वैचारिक धोरणांशी घेणेदेणे नाही. ही अशी वैचारिक बांधिलकी त्याला आता राजकीय पक्षांशी बांधून ठेवत नाही. त्याची एकच मागणी आहे : आमच्यासाठी काहीतरी करून दाखवा, किंवा ते जमत नसेल तर सरळ घरी जा. आणि हे करून दाखवलेले पाहण्यासाठी मतदार फार वेळ द्यायला तयार आहेत असेही नाही. राज्यकर्त्यांचे बोलघेवडेपण किंवा वक्तृत्व दीर्घकाळ आता मतदारांना बांधून ठेवू शकणार नाही.
लोकशाहीसाठी फारच छान अवस्था आहे ही! राजकीय पक्ष मतदारांना आता गृहीत धरू शकणार नाहीत. भाजपला दिल्लीत बसलेल्या फटक्याचा हा धडा आहे. सत्ता मिळाल्या मिळाल्या या मंडळींना आता कामाला लागावे लागेल. अन्यथा प्रत्येकाची अवस्था..
व्यापेवीण आटोप केला
तो अवघा घसरतचि गेला
अशीच होणार.  

गिरीश कुबेर