कविता भालेराव

भौतिकशास्त्रातील सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ मिचिओ काकू यांच्या ‘फिजिक्स ऑफ दि इम्पॉसिबल’ या गाजलेल्या इंग्रजी पुस्तकाचा उत्तम अनुवाद खगोल अभ्यासक लीना दामले यांनी केला असून ‘अशक्य भौतिकी’ या शीर्षकाखाली हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात विज्ञानकथांमधील काल्पनिक उच्च तंत्रज्ञान आणि यंत्रे- जी आजच्या काळात अशक्य वाटत आहेत, ती कुठल्या मर्यादेपर्यंत भविष्यात नेहमीच्या रोजच्या वापरातल्या गोष्टी होऊ शकतात, याबाबतचे विवेचन केलेले आहे.

सुरुवातीच्या उपोद्घातामध्ये लेखकाने विज्ञानकथा वाचून त्यासंबंधी भौतिकशास्त्राविषयी आपण कसा विचार करू लागलो, याबद्दल लिहिले आहे. प्रो. काकू यांच्या मते, अशक्यता ही सापेक्ष आहे. हे पटवून देण्यासाठी त्यांनी पृथ्वीतलावरून एकाएकी नाहीशा झालेल्या डायनॉसोरचे उदाहरण दिले आहे. एकेकाळी या घटनेचे कारण समजणे अशक्य होते. परंतु कालांतराने पृथ्वीवर पडलेल्या महाकाय उल्केमुळे डायनासोर व इतर बरीच जीवसृष्टी नष्ट झाली, हे वैज्ञानिक सत्य उलगडले. त्याचप्रमाणे आपली गाठ काही दशलक्ष वर्षे जास्त प्रगत असणाऱ्या एखाद्या संस्कृतीशी झाली, तर त्याचे रोजच्या वापरातले तंत्रज्ञान आपल्याला जादूसमान वाटेल का? या प्रश्नाभोवती या पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना गुंफलेली आहे. आज एखादी अशक्य वाटणारी गोष्ट भविष्यात काही शतकानंतर किंवा, काही लाखो वर्षांंनंतरही अशक्यच राहील का? भविष्यातील तंत्रज्ञानाची रूपरेषा काय असेल? कशी असेल? असंभवनीय आणि अशक्य यातील निश्चित फरक काय? अशा विविध प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी लेखकाने अशक्य गोष्टी तीन भागात विभागल्या आहेत.

यातील पहिला भाग म्हणजेच क्लास – १ – अशक्यता. यामध्ये भौतिकीतील माहीत असलेल्या नियमांचे उल्लंघन होत नाही आणि हे तंत्रज्ञान या किंवा पुढल्या शतकात शक्य होईल. या भागात ऊर्जा क्षेत्रे, दूरप्रेषण, रोबो, परग्रहवासी, अवकाशयाने, अँटिमॅटर इ. दहा गोष्टींचा समावेश आहे. यातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने तयार होणाऱ्या प्रगत यंत्र मानवांची संख्या तर दिवसेंदिवस वाढतेच आहे. परग्रहवासीयांचा शोध घेण्याचा माणसाचा विलक्षण ध्यास लक्षात घेता लेखकाने विचारलेला ‘खरोखरच आपले भविष्य ताऱ्यांमध्ये दडले आहे का?’ हा प्रश्न भविष्यातील उत्सुकता वाढविण्यास, विचार करण्यास वाचकाला प्रवृत्त करतो.

दुसऱ्या भागात आहे क्लास – २ – अशक्यता. यामधील तंत्रज्ञान कधीकाळी शक्य झालेच तर ते काही लाखो वर्षांच्या कालावधीतच शक्य होईल. त्यात टाइम मशीन, कालप्रवास, कृमी विवर, कृष्णविवर यांचा समावेश आहे. अवकाशशास्त्रज्ञ सर मार्टिन रीस यांनी एक ना ‘एक दिवस जीवसृष्टी या आकाशगंगेला व्यापून त्याही पलीकडे पसरेल असं निश्चितपणे वाटते.’ असे म्हंटले आहे. त्यांच्या या आशावादाचा प्रवासच जणू या भागात वाचायला मिळतो. यातील कालप्रवासाची रहस्ये, काळासंबंधीचे तर्क येणाऱ्या भविष्यकाळाविषयीची आपली उत्सुकता वाढविणारे आहेत.

तिसरा भाग हा तिसऱ्या प्रतीची अशक्यता दाखवून देतो. यामधील तंत्रज्ञान, आजच्या भौतिकशास्त्राच्या ज्ञात नियमांचे उल्लंघन करणारे आहे. मात्र अशा अशक्यता फारच थोडय़ा आहेत. त्यात शाश्वत गतियंत्र, भविष्यकथन यांचा समावेश केलेला आहे.

भौतिकशास्त्रातील मूलभूत संकल्पना, समीकरणे, सिद्धांत, गृहीतके यांच्या आधाराने अशक्यतेचा विषय लेखकाने आपल्यासमोर मांडला आहे. हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विलक्षण प्रवास लिहिण्याची लेखकाची शैली मोहित करणारी आहे. अशा आगळ्यावेगळ्या पुस्तकाचा अनुवाद करण्याचे काम लीना दामले यांनी चांगल्या प्रकारे केले आहे.

मात्र अनुवादाबाबत दोन मुख्य मुद्दे आहेत. एक म्हणजे ज्या संकल्पनांना सोपे मराठी शब्द आहेत, ते त्या त्या ठिकाणी कटाक्षाने वारंवार वापरायला हवे होते. उदा.  टेलिपोर्टेशनला असलेला दूरप्रेषण हा शब्द! असे कितीतरी शब्द पुस्तकभर सापडतील. दुसरे म्हणजे एकूणच विज्ञान पुस्तके सलग वाचणे अवघड असते. म्हणूनच आवश्यक तिथे चित्रांचा-फोटोंचा समावेश करायला हवा होता. त्यामुळे पुस्तकाच्या रंजकतेत भर पडली असती.

या पुस्तकात मिचिओ काकू यांनी भौतिकीतील अशक्य वाटणाऱ्या गोष्टी भविष्यात नव्या प्रगत तंत्रज्ञानाच्या अस्तित्वाने घडू शकतात, हा आशावाद दाखवून दिला आहे. भौतिकशास्त्रातील नवनवी क्षितिजे कायम उलगडतच जाणार आहेत. म्हणूनच मराठी अनुवादाचे ‘अशक्य भौतिकी’ हे नाव दिशाभूल करणारे वाटते. ते सकारात्मकतेकडे झुकणारे असायला हवे होते. विश्व विज्ञानाच्या सरहद्दीपर्यंतचा आपल्या कल्पनाशक्तीच्या मर्यादेपलीकडचा हा प्रवास प्रत्येकाने वाचायला हवा, असाच आहे.

‘अशक्य भौतिकी’ – मिचिओ काकू

अनुवाद – लीना दामले

मेहता पब्लिशिंग हाऊस,

पृष्ठे – ३०८, मूल्य – ३५० रुपये.