डॉ. मीना वैशंपायन meenaulhas@gmail.com

१९२७ साली प्रसिद्ध झालेल्या ‘प्रार्थना समाजाचा इतिहास’ या दुर्मीळ ग्रंथाची विस्तारित द्वितीयावृत्ती मुंबईतील ‘एशियाटिक सोसायटी’तर्फे १ फेब्रुवारीला प्रसिद्ध होत आहे. द्वारकानाथ गोविंद वैद्य यांच्या या ग्रंथाचे संपादन डॉ. राजा दीक्षित यांनी केले आहे.

caste politics in uttarakhand
ब्राह्मण ते ठाकूर, दलित ते मुस्लिम; उत्तराखंडमध्ये जातीय समीकरणावरच निकालाचे गणित
sanjay ruat and shrikant shinde
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”
Muslim League, Hindu Mahasabha, coalition government, pre independence alliance
मुस्लीम लीग आणि हिंदू महासभेने मिळून स्थापली होती प्रांतिक सरकारे… स्वातंत्र्यपूर्व काळातील आघाडीबद्दल इतिहास काय सांगतो?
solapur lok sabha marathi news, ram satpute latest news in marathi
सोलापूरमध्ये धर्मगुरू, मठाधीशांच्या आशीर्वादासाठी उमेदवारांचा आटापिटा

कोणत्याही समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणारे अनेक नेते, पुढारी असतात. त्यांचे योगदान महत्त्वाचे असते आणि त्याचे मूल्य जाणून इतिहासात त्यांचा तसा निर्देश केला जातो. हे जरी खरे असले तरी काळ पुढे जातो तसे विचारही बदलत जातात, संकल्पना बदलतात, दृष्टिकोन बदलत जातो. गतकाळातील घटनांकडे पाहताना वर्तमान परिस्थिती बदललेली असते आणि त्याच घटनांकडे वेगळ्या परिप्रेक्ष्यातून पाहिले जाते, हा आपला नेहमीचा अनुभव असतो. त्यामुळेच इतिहासाचा पुनर्विचार करावा असे नवीन पिढीला वाटत असते. म्हणूनच म्हटले जाते की, प्रत्येक पिढीचा स्वत:चा असा इतिहास असतो. हे व्यक्तींच्या बाबतीत जसे खरे आहे तसेच संस्थांच्या बाबतीतही आहे. त्यामुळे संस्थांच्या इतिहासाचे पुनर्लेखन करणे किंवा त्यातील ऐतिहासिक तथ्ये सांभाळून ठेवत त्या संस्थांच्या कार्याची नवीन दृष्टिकोनातून दखल घेणे आवश्यक असते. कधी नवीन साधने उपलब्ध होत असतात, कधी पूर्वीच्या इतिहास लेखनात कोणत्याही कारणाने राहून गेलेल्या त्रुटी भरून काढायची गरज असते, तर कधी पूर्वीच्या घटनांचा वेगळा अर्थही लक्षात येतो.

अशा विचारानेच मुंबईच्या ‘एशियाटिक सोसायटी’ने एक प्रकाशन-प्रकल्प हाती घेतला होता. तो म्हणजे- ‘प्रार्थना समाजाचा इतिहास’ या ग्रंथाची विस्तारित द्वितीयावृत्ती प्रसिद्ध करण्याचा! १ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ प्रा. ज. वि. नाईक यांच्या हस्ते या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन होत आहे.

आज हे वाचताना वाटेल.. ‘प्रार्थना समाज’? आज हा आहे कुठे? गिरगावातल्या गजबजलेल्या व त्यामुळे अधिकच अरुंद वाटणाऱ्या रस्त्यावरून जाताना लागणारा बसचा एक थांबा वा खुणेची एक इमारत म्हणूनच अस्तित्वात आहे का तो? वरवर पाहता असे वाटले तरी प्रत्यक्षात तसे नाही. ‘प्रार्थना समाजा’चे कार्य आजही सुरू आहे.

दीडशे वर्षांपूर्वी- नेमके बोलायचे तर १५२ वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या काही तरुण विद्वानांनी परतंत्र, अविकसित भारतासारख्या राष्ट्राचा उद्धार करण्याचा मार्ग समाजसुधारणेच्या आधारेच आखला पाहिजे, या विश्वासाने एका संस्थेची स्थापना केली. तिच्या संस्थापकांपैकी एक होते- वा. गो. भांडारकर! त्यांनी आपल्या संस्थेबद्दल म्हटले होते : ‘या तरुणांचा मुख्य हेतू हा की, ज्या प्रचंड भेदभावावर हिंदू समाजाची घटना आहे तो घातक आहे. त्याचप्रमाणे मूर्तिपूजेचा प्रकार जो प्रचलित आहे तो उन्नतीकारक न होता अवनतीप्रत लोकांना नेतो. यापासून सुटका होणे असेल तर फक्त परात्पर परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती केल्याने होणार आहे. आणि याच दृढ भावनेने त्यांनी या समाजाची स्थापना केली.’ तो समाज, ती संस्था म्हणजेच- ‘प्रार्थना समाज’!

१९ वे शतक (विशेषत: त्याचा उत्तरार्ध) आपल्या देशाच्या इतिहासात ‘प्रबोधनपर्व’ म्हणून ओळखले जाते. त्यावेळी भारत राजकीय पारतंत्र्यात होता. परंतु नव्या राजवटीच्या संपर्कामुळे नव्या विचारांचा, नव्या मूल्यांचा परिचय आपल्याला होत होता. तो अनेकांना आपल्या जुन्या सामाजिक धारणांचा पुनर्विचार करायला लावत होता. जुने – नवे, सनातन -आधुनिक या साऱ्यांची एकच घुसळण त्या काळात चालू होती. इंग्रजी शिक्षणाने एका व्यापक जगाचे नवेच दर्शन घडल्याने अनेकांची मने व बुद्धी नव्या विचारक्षितिजांकडे झेपावत होती. न्या. रानडे, डॉ. भांडारकर, न्या. तेलंग यांसारख्या अनेक बुद्धिमान आणि उच्चशिक्षित भारतीयांना आपल्या सामाजिक जीवनातील धार्मिक कर्मकांडे, जातीपातींचे वर्चस्व, अंधश्रद्धा, अज्ञान, अशिक्षितपणा यांच्यात मूलभूत परिवर्तन घडवून आणण्याची, स्त्रियांना शिक्षण देण्याची आस लागली होती. या काळात अशा इच्छेने प्रेरित झालेल्या काही समविचारी उच्चशिक्षितांमुळे भारतभर संस्थात्मक जीवनाची सुरुवात झालेली दिसते.

भारतीय प्रबोधनपर्वाचे जनक राजा राममोहन रॉय यांनी १८२८ मध्ये ‘ब्राह्मसभे’ची (पुढे तिचे ‘ब्राह्मसमाज’ असे नाव झाले.) स्थापना केली. आपल्याकडे अशी विचारजागृती झाल्यावर ‘ब्राह्मसभे’च्या धर्तीवर प्रथम एक गुप्त सभा, नंतर ‘परमहंस सभा’ व त्यानंतर काही वर्षांनी- ३१ मार्च १८६७ रोजी पापमोचनी एकादशीच्या दिवशी या संस्थेत समविचारी तरुणांची पहिली प्रार्थना उपासना झाली. तोच या संस्थेचा स्थापनादिन!

डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खडकर, वा. बा. नवरंगे, डॉ. रा. गो. भांडारकर, सर नारायण चंदावरकर यांसारख्या सुधारणावादी लोकांनी ‘प्रार्थना समाजा’च्या माध्यमातून नवा धर्मविचार लोकांना दिला. ख्रिश्चन धर्माचे आकर्षण वाटून धर्मातर करणाऱ्या अनेकांचे मतपरिवर्तन करण्याचे काम या समाजातील मंडळी नेटाने करू लागली. सनातन हिंदू धर्मातील निर्थक कर्मकांडे मोडून काढण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला. ‘प्रार्थना समाजा’ने एकेश्वरवादाचा पुरस्कार करत मूर्तिपूजेला व जातिभेदाला विरोध केला. न्या. रानडे व डॉ. रा. गो. भांडारकर यांनी प्रार्थना समाजाला सद्धांतिक बैठक देण्याचे महत्त्वाचे काम केले. या समाजाच्या ध्येयाची चिकित्सा करणारा लेख न्या. रानडेंनी लिहिला. सार्वजनिक उपासना व प्रार्थना यांना व्यक्तिगत उपासना व प्रार्थना यांची जोड मिळाली तर ते समाजास लाभदायक आहे, असे त्यांचे मत होते. प्रार्थना मंदिरात बसून सार्वजनिक प्रार्थना करण्याच्या पद्धतीमुळे अनेकांना तेथे ख्रिश्चनांचे अनुकरण होते आहे असे वाटे. परंतु रानडे, भांडारकर, वामन आबाजी मोडक यांसारख्या विद्वानांनी हिंदू धर्माची कास न सोडता समाजाची तत्त्वे उदार, स्पष्ट आणि व्यापक करण्यावर भर दिला.

पुढील काळात ‘प्रार्थना समाजा’ची सभासद संख्या हजारोंच्या घरात गेली नाही, तरी मिशनरी वृत्तीने काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांमुळे समाजाच्या कार्याचा व्याप वाढला. केवळ धर्मसुधारणांच्या पलीकडे जाऊन सामाजिक सुधारणांचा मार्ग त्यांनी स्वीकारला. ‘प्रार्थना समाजा’ने त्या काळात रात्रशाळा, पंढरपूर येथे बालहत्या प्रतिबंधक गृह व अनाथ बालकाश्रम, मुंबईत ‘राममोहन इंग्लिश स्कूल’, ‘राममोहन आश्रम’, ‘आर्य महिला समाज’ यांसारख्या अनेक संस्थांची उभारणी करत आपले कार्य वाढवत नेले. १८७३ साली ‘सुबोधपत्रिका’ नावाचे समाजाचे साप्ताहिकही सुरू झाले.

‘प्रार्थना समाजा’च्या स्थापनेला ६० वर्षे झाली तेव्हा त्या हीरकमहोत्सवाच्या निमित्ताने संस्थेची तोवरची वाटचाल सांगणारा इतिहास समाजाचे निष्ठावान कार्यकत्रे द्वारकानाथ गोविंद वैद्य यांनी लिहिला. १९२७ साली प्रसिद्ध झालेल्या या इतिहासास आज ९२ वर्षे होऊन गेली आहेत. ‘प्रार्थना समाजा’ची गिरगावातील मूळ वास्तूही इतिहासजमा झाली आहे. समाजाच्या स्थापनेपासूनच्या सर्व बारीकसारीक घटनांची, समाजाच्या धर्मपर मूलतत्त्वांच्या मांडणीची, त्यातील चढउतारांची समग्र माहिती देणारे हे एकमेव पुस्तक! लेखक द्वा. गो. वैद्य यांनी आपल्या आयुष्याची ४४ वर्षे ‘प्रार्थना समाजा’ची विविध प्रकारची कामे करत समाजाच्या उद्दिष्टांचा प्रसार करण्यात खर्च केली. परिश्रमपूर्वक साधने गोळा करून त्यांनी हा इतिहास लिहिला. त्यामुळे आज हा इतिहासच ‘प्रार्थना समाजा’चा अधिकृत इतिहास मानला जातो. यात त्यांनी समाजाच्या वाटचालीबरोबरच समाजाशी संबंधित अशा भांडारकर, रानडे, माडगांवकर, वागळे, डॉ. आ. पां. तर्खडकर अशांसंबंधी चरित्रलेखही लिहिले.

हे पुस्तक गेली कित्येक वर्षे अनुपलब्ध होते. जातीय अस्मितांच्या वर्तमान कल्लोळात दीडशे वर्षांपूर्वी सुरू केलेल्या जातिभेदविरहित समाजाचा ध्यास घेणाऱ्या प्रार्थना समाजिस्टांचे विचार पुढे येणे आणि गेल्या दोन शतकांतील महाराष्ट्राचा इतिहास लिहिताना ‘प्रार्थना समाजा’सारख्या महत्त्वाच्या संस्थेचे कार्य नोंदवणे आवश्यक ठरते.

प्रार्थना समाजाच्या स्थापनेला १५० वर्षे झाली तेव्हा ‘एशियाटिक सोसायटी’ने हे पुस्तक पुनर्मुद्रित करण्याचे ठरवले. त्यामागे ‘एशियाटिक सोसायटी’चे माजी अध्यक्ष, संशोधक व इतिहास लेखक डॉ. अरूण टिकेकर यांची प्रेरणा होती. त्यांच्यानंतर अध्यक्षपदी आलेल्या शरद काळे यांनी या प्रकल्पाला चालना दिली. सोसायटीच्या माजी उपाध्यक्ष व सचिव विमल शहा यांच्या स्मृत्यर्थ दिल्या गेलेल्या देणगीमुळे हे शक्य होत आहे. या पुस्तकाच्या संपादनाची मोठी जबाबदारी उचलली ती प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ डॉ. राजा दीक्षित यांनी! मूळ संहिता त्यातील जुन्या लेखनशैलीसह कायम ठेवली आहे. मात्र, जवळजवळ १०० वर्षांनंतर त्याचे पुनर्मुद्रण करताना त्यातील काही गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक होते. मूळ संहितेतील तळटिपा आज गोंधळात टाकणाऱ्या वा अपुऱ्या वाटतात. तत्कालीन घटना, व्यक्ती यांचा संदर्भ लागणे कधी कधी कठीण होते. यासाठी डॉ. दीक्षित यांनी अधिक परिश्रम घेत त्या सर्व तळटिपांना आवश्यक तेथे खुलासे केले आहेत आणि अनेक ठिकाणी नव्या पूरक टिपा दिल्या आहेत. याशिवाय मूळ लेखक द्वा. गो. वैद्य यांच्यासंबंधीचा चरित्रलेख नव्याने लिहिला आहे. १९२७ साली ‘इतिहास’ प्रसिद्ध झाला असला तरीही ‘प्रार्थना समाजा’चे काम आजही चालू आहेच. ते कोणत्या क्षेत्रांमध्ये आणि कसे चालले आहे, यासंबंधीचे ‘पुढचा अध्याय’ हे एक संपूर्ण नवीन प्रकरण डॉ. दीक्षित यांनी लिहिले आहे. या सर्व नव्या माहितीची डॉ. दीक्षित यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून मांडणी केली आहे. आधीच्या आवृत्तीला उल्लेखसूची नव्हती; या नव्या आवृत्तीसाठी सूचीकार कविता भालेराव यांनी केलेल्या सविस्तर सूचीची जोड देता आली. ज्ञानभांडाराचे जतन व संवर्धन करण्यासाठी कटिबद्ध असणाऱ्या ‘एशियाटिक सोसायटी’ने हा संदर्भग्रंथ प्रकाशित करणे हे योग्यच आहे. याचा लाभ नव्या पिढीच्या संशोधकांना होणार आहे.