बाळकृष्ण कवठेकर

lokrang@expressindia.com

piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
In redevelopment of flat holders Redevelopment Senior
पुनर्विकासातील ज्येष्ठ!
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

‘अस्तित्वाची शुभ्र शिडे’ हा डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचा नवा कथासंग्रह. विशेषत: दीर्घ कथा लेखक म्हणून सर्वज्ञात असणारे डॉ. कोत्तापल्ले यांचा हा संग्रहदेखील त्यांच्या कथा लेखक म्हणून असणाऱ्या लौकिकास साजेसाच झालेला आहे. ‘जैत्रपाळाचा धर्म’ या कथेसह कोत्तापल्ले यांच्या एकूण सात दीर्घ म्हणता येतील अशा कथा या संग्रहात एकत्रित करण्यात आलेल्या आहेत. एखादाच अपवाद सोडल्यास या सर्वच कथांना सामाजिकतेचा संदर्भ असून, त्याच्या ठळक दर्शनासह या सातही कथा उल्लेखनीय व यशस्वी ठरलेल्या आहेत. दीर्घ कथा असूनही त्यांची वाचनीयता कुठेही कमी होत नाही, हाही या सर्वच कथांचा आणखी एक विशेषही येथे नोंदवणे योग्य ठरेल. या सर्वच कथांत येणारे तपशील अर्थपूर्ण असल्यामुळे ते स्वाभाविकपणेच या कथांची गुणवत्ता वाढवणारे ठरले आहेत. प्रसिद्ध समीक्षक डॉ. विलास खोले यांची या संग्रहाला लाभलेली विस्तृत आणि विश्लेषक प्रस्तावना या संग्रहाची आणखी एक जमेची बाजू म्हणावी लागेल. ही प्रस्तावना या सर्व कथांचे यथायोग्य विश्लेषण तर करतेच पण, वाचकांना या कथांच्या आकलनाच्या दृष्टीनेही मोलाचे सहाय करते, याची ही नोंद करणे योग्य होईल.

मानवी मनातील अपप्रवृत्तीचे समर्थ असे चित्रण करणे आणि त्या द्वारा या अपप्रवृत्तीवर अप्रत्यक्षपणे प्रहार करणे हे या सर्वच कथांचे समान वैशिष्टय़ आहे. त्यामुळे या कथा वाचकांच्या सदसद्विवेकबुद्धीला जागवणाऱ्या आणि मानवी जीवनाकडे मूल्यविवेकाने पाहिले पाहिजे असे सुचित करतात. कोत्तापल्ले कथा विषय झालेल्यांपैकी कोणा एकाचा पक्ष घेत नाही हे खरे; पण वाचकांनी या संदर्भात कोणाचा पक्ष घेतला पाहिजे, याचे सूचन करण्याचे टाळत नाहीत हेही स्पष्टपणे सांगितले पाहिजे. असे केल्यामुळे कथालेखन बोध करणारे ठरण्याची शक्यता असते, ती मात्र कोत्तापल्ले यांनी कौशल्याने टाळली आहे.

‘अस्तित्वाची शुभ्र शिडे’ आणि ‘जैत्रपाळाचा धर्म’ यांसारख्या कथांना अद्भुतता आणि गूढता यांचा किंचितसा स्पर्श झालेला दिसतो. पण अशा कथांचे प्रमाण कोत्तापल्ले यांच्या कथा लेखनात अत्यल्पच आहे, असे म्हणावे लागेल.

‘अस्तित्वाची शुभ्र शिडे’ या कथेचे बीजच अद्भुततेकडे झुकणारे आहे. तीर्थयात्रेला गेलेली मंडाबाई ही वृद्ध स्त्री. उज्जनमध्ये प्रवासी कंपनीच्या बसमध्ये तिला ठरलेल्या वेळेत येऊन बसणे शक्य होत नाही. बस तिला न घेताच निघून जाते आणि मंडाबाई उज्जनमध्येच राहते. यात्रा कंपनीबरोबर यात्रेसाठी गेलेली मंडाबाई परत आली नाही, तिची बराच काळ वाट पाहूनही ती परत येत नाही, असे पाहून तिचा पुतण्या पोपटशेट तिची मालमत्ता बळकावण्याच्या स्वार्थापोटी ती मृत्यू पावली आहे असे सर्वाना सांगतो. तिचे क्रियाकर्मही करतो आणि सर्व लोकांना तिच्या चौदाव्याचे गोड जेवण घालतो. त्याच्या पंगती उठत असतानाच नेमकी मंडाबाई पंगती चालू असणाऱ्या ठिकाणी येते. तिला पाहताच स्तिमित झालेले लोक ‘भूत भूत’ असे ओरडत उठतात. पंगतीची पांगापांग होते. सगळीकडे एकच गोंधळ उडतो. तेव्हा पोपटशेट मंडाबाईला तिचे अस्तित्व -म्हणजे ‘ती म्हणजेच मंडाबाई आहे’ हे सत्य सिद्ध करण्यास सांगतो. मंडाबाई निर्धाराने अनेक शंका कुशंकांना तोंड देऊन आपणच मंडाबाई, आहोत हे लोकांना पटवून देते. हताश झालेला पोपटशेट तिची क्षमा मागून तिला घरी घेऊन जातो. कोत्तापल्ले यांनी ही कथा परोपरींनी फुलवून रोचक तर बनवली आहेच, पण माणसाचा स्वार्थ त्याला कोणत्या टोकापर्यंत घेऊन जातो हेही प्रत्ययकारीपणे दाखवले आहे. पोपटशेट या व्यक्तीचे मन आणि सर्वसामान्यपणे समाजाची मानसिकता या दोन्हींचे उत्तम दर्शन या कथेमध्ये होते. कोत्तापल्ले यांच्या ‘जमलेल्या’ कथांमध्ये या कथेची गणना अवश्य करावी लागेल.

‘जैत्रपाळाचा धर्म’ ही अशीच आणखी एक उल्लेखनीय कथा. राजा जैत्रपाळ हा गैरवर्तन करून आपल्या समाजातील साधुसंत म्हणून ओळखले जाणारे लोक सर्वसामान्य लोकांना फसवतात हे लक्षात आल्यावर अशा दांभिक साधूंना तुरुंगात टाकतो. ही बाब अनेकांकडून समजल्यावर पर्वतरांगांतील एका गहन गुहेमध्ये वर्षांनुवर्षे तप:साधना करणाऱ्या मुकुंदमुनींच्या कानावर पडते. हे सर्व लोक मुकुंदमुनींना बंदिस्त असणाऱ्या साधुसंतांना सोडवण्याची विनंती करतात. ती मान्य करून मुकुंदमुनी राजा जैत्रपाळाकडे जातात. तेव्हा त्यांना समजते की, राजाने या सर्व साधुसंतांना ‘ब्रह्म दाखवा’ अशी विनंती केली होती आणि ती त्यांना शक्य न झाल्यामुळे त्या सर्वाना राजाने तुरुंगात टाकले आहे. येथे डॉ. कोत्तापल्ले (आणि या संग्रहाला प्रस्तावना लिहिणारे डॉ. विलास खोले) यांचीही एक चूक झालेली आहे. ती म्हणजे ‘आपल्या तत्त्वज्ञानाप्रमाणे ब्रह्म हे निर्गुण निराकार असून ते कोणालाही न दिसणारे असे आहे. हे त्यांनी लक्षात घेतलेले नाही. त्यामुळे राजा जैत्रपाळ याची मागणीच अवास्तव व अशक्यकोटीतील ठरते आणि त्यामुळे राजाने त्यासाठी साधुसंतांना तुरुंगात टाकणे समर्थनीय ठरू शकत नाही. एवढी एक बाब सोडली तर ही कथा जीवनातील ‘जे उदात्त, उन्नत आणि पवित्र’ असे आहे त्याचा पुरस्कार करणारी व पाप आणि पापी माणूस या दोघांचाही विरोध करणारीच झालेली आहे. मुकुंदमुनी राजाला ब्रह्म दाखवण्याचे मान्य करतात आणि राजाला घेऊन त्यांची गुहा असणाऱ्या पर्वतरांगांकडे जातात. वाटेत एका अत्यंत निसरडय़ा उतारावरून जाताना राजाच्या घोडय़ाचा पाय घसरतो आणि तो आणि त्याचा घोडा एका खोल खोल दरीत कोसळतात. त्यांचे पुढे काय होते हे कोणालाच कळत नाही. ते एक गूढच बनून राहते.

इथेच कोत्तापल्ले यांच्या या कथांचा एक विशेष नोंदवणे योग्य होईल, तो म्हणजे कोत्तापल्ले यांच्या या संग्रहातील बहुतेक कथा ‘बहुमुखी’ (open ended) आहेत. वाचकांनी आपापल्या क्षमतेप्रमाणे त्यांचा अर्थ लावावा अशी कदाचित लेखकाची अपेक्षा असावी. ती रास्तही आहे आणि तिच्यामुळे कोत्तापल्ले या संग्रहातील कथांना आणखी एक महत्त्वाचे परिमाण प्राप्त झालेले आहे.

या दोन कथांप्रमाणेच त्यांच्या या संग्रहातील अन्य कथांनाही सामाजिक संदर्भ आहेतच. प्रामुख्याने व्यक्ती आणि समाज यांच्यातील सत्प्रवृत्ती आणि असत्प्रवृत्ती यांच्यातील संघर्ष असा हा संदर्भ आहे आणि या संघर्षांत बहुतेक वेळा सत्प्रवृत्तींचा पक्ष घेत असल्याचे सूचित करतात तर काही वेळा हा निर्णय ते वाचकांवरही सोपवतात हे लक्षात घेण्यासारखे आहे.

सत्याला आणि ते सांगू पाहणाऱ्या व्यक्तीलाही झुंडशक्तीपुढे नमावे लागणे, वाढत्या आणि गैरमार्गानी होणाऱ्या शहरीकरणामुळे एका गावाचे अस्तित्वच पुसले जाणे, आपल्या तरुण मुलाला राजकारणात पक्केपणाने उभे करण्यासाठी त्याच्या वडिलांनी लाखो रुपये खर्चून एक मेळावा घेण्याचा घातलेला घाट नेमके त्याच दिवशी शहरातील एका वयोवृद्ध पण समाजात आदराचे स्थान असणाऱ्या एका लोकाग्रनीचा मृत्यू झाल्यामुळे उधळला जाणे आणि त्यामुळे त्या तरुणाच्या वडिलांचा तडफडाट होणे अशा प्रकारच्या घटना, प्रसंग आणि मानसिकता यांनी युक्त अशा या संग्रहांतील अन्य कथाही उत्कंठावर्धक आणि सामाजिक अपप्रवृत्तीचे भेदक चित्रण करणाऱ्या व म्हणूनच वाचनीयही झालेल्या आहेत.

काही वेळा तपशील देण्याच्या अतिरेकामुळे कथेची बांधणी सलसर होणे, कथेच्या पुढील वाटचालीचा अंदाज ती वाचण्यास सुरुवात करतानाच येणे म्हणजेच कथारचनेत कृत्रिमता म्हणजे योजनापूर्वकता येणे असे काही दोष या कथांमध्ये आढळतात तरीपण एकूणपणे पाहता या कथा समाजजीवनाचे वास्तव चित्रण करणाऱ्या, मूल्ययुक्त, वाचनीय आणि वाचकांचे सुसंस्कृतपणाचे भान जागवणाऱ्या झाल्या आहेत, असे म्हणणेच योग्य होईल.

‘अस्तित्वाची शुभ्र शिडे’

– नागनाथ कोत्तापल्ले,

लोकवाङ्मय गृह

पृष्ठे- २४०, मूल्य ३०० रुपये