News Flash

चिरंतन ‘फायनल फ्रंटियर’

२७ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या प्रदीर्घ क्रिकेट मालिकेला सुरुवात होत आहे. सुरुवातीला तीन एकदिवसीय सामने, तीन टी-२० सामने आणि नंतर चार कसोटी सामने असा कार्यक्रम.

गतवर्षी ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत पराभूत करणारा भारत हा पहिला आशियाई संघ ठरला.

सिद्धार्थ खांडेकर – siddharth.khandekar@expressindia.com

२७ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या प्रदीर्घ क्रिकेट मालिकेला सुरुवात होत आहे. सुरुवातीला तीन एकदिवसीय सामने, तीन टी-२० सामने आणि नंतर चार कसोटी सामने असा कार्यक्रम. कोणत्याही संघाच्या दृष्टीने ज्या मोजक्या मालिका-स्पर्धाबाबत नेहमीच उत्सुकता असते आणि मायदेशी परतताना भयंकर निराशा किंवा सर्वोच्च समाधान अशा दोनच भावना मनात असतात, त्यांतील एक म्हणजे ऑस्ट्रेलिया दौरा! प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमीच्या मनात उत्सुकता असलेल्या या दौऱ्याविषयी..

‘फायनल फ्रंटियर’ हे शब्द तसे परिचित. दूरदर्शनच्या जमान्यात मोजक्या दर्जेदार इंग्रजी टीव्ही मालिकांपैकी एक होती ‘स्टार ट्रेक’. त्या मालिकेच्या सुरुवातीलाच ‘स्पेस.. द फायनल फ्रंटियर’ असे धीरगंभीर शब्द कानावर पडायचे. काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉने हेच शब्द वापरले, भारताविरुद्ध मालिकेसंदर्भात. दिग्विजयी कसोटी संघ म्हणवून घ्यायचे असेल तर भारताला भारतात जाऊन हरवावे लागेल, असे वॉने जाहीर केले. म्हणून वॉच्या दृष्टीने भारत ही ‘फायनल फ्रंटियर’. परंतु क्रिकेटच्या दृष्टीने खरीखुरी फायनल फ्रंटियर खुद्द ऑस्ट्रेलियाच. क्रिकेटची जन्मभूमी इंग्लंड. त्यांनाही पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियातच यावे लागले आणि पहिल्याच सामन्यात ‘वसाहतीं’कडून पराभवही पत्करावा लागला. त्या दौऱ्यापासून ऑस्ट्रेलियाची सफर अंतिम युद्धभूमीपेक्षा वेगळी काही नसते. कधी इंग्लंडविरुद्ध, कधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, कधी कॅरेबियन्सविरुद्ध, अलीकडे भारताविरुद्ध सातत्याने टक्कर घेणारा संघ म्हणजे ऑस्ट्रेलियाच.

२७ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या प्रदीर्घ मालिकेला सुरुवात होत आहे. सुरुवातीला तीन एकदिवसीय सामने, तीन टी-२० सामने आणि नंतर चार कसोटी सामने असा कार्यक्रम. कोणत्याही संघाच्या दृष्टीने ज्या मोजक्या मालिका-स्पर्धाबाबत नेहमीच उत्सुकता असते आणि मायदेशी परतताना भयंकर निराशा किंवा सर्वोच्च समाधान अशा दोनच भावना मनात असतात, त्यांतील एक म्हणजे ऑस्ट्रेलिया दौरा. बाकीचे दोन म्हणजे अर्थातच पारंपरिक आणि टी-२० विश्वचषक. गतवर्षी ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत पराभूत करणारा भारत हा पहिला आशियाई संघ ठरला. आपण १९७१मध्ये वेस्ट इंडिजला वेस्ट इंडिजमध्ये आणि इंग्लंडला इंग्लंडमध्ये पराभूत केले होते. परंतु नवीन सहस्रक सुरू झाल्यानंतरच ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी करू शकलो. गेल्या दोन दशकांमध्ये ऑस्ट्रेलियन संघ दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध मायदेशात हरलेला आहे. त्यामुळे या संघाने मायदेशी मालिका गमावण्याची नवलाई राहिलेली नाही. तरीही प्रत्येक वेळी ऑस्ट्रेलियात कांगारूंना हरवण्याचे कौतुक, कारण ऑस्ट्रेलियन संघापेक्षाही ती भूमी ही क्रिकेटसाठी ‘गोल्ड स्टँडर्ड’ ठरत आली आहे. उत्तमोत्तम फलंदाज, एकाहून एक सरस गोलंदाज याबरोबरच कसोटी सामन्यांना आजही हजारोंनी गर्दी करणारे प्रेक्षक, मर्यादित षटकांच्या सामन्यांना नवीन रंगरूप देणारी भूमी, रंगीत पोशाखातील व रात्रीच्या क्रिकेटला मुख्य प्रवाहात आणणारा देश, फ्रँचायझी क्रिकेटलाही तितक्याच उत्कटतेने स्वीकारणारा देश अशी ऑस्ट्रेलियन क्रिकेटची बहुपेडी ओळख आहे. ‘ऑस्ट्रेलियन खेळपट्टय़ांवर खेळण्याइतके समाधान इतरत्र फार क्वचित लाभते. कारण बहुतेक खेळपट्टय़ा टणक असतात, त्यामुळे चेंडू व्यवस्थित बॅटवर येतो,’ हे उद्गार आहेत १९९२मधील त्या वेळच्या पोरसवदा सचिन तेंडुलकरचे. पहिल्याच ऑस्ट्रेलियन दौऱ्यात त्याने पर्थच्या खेळपट्टीवर शतक झळकवले होते. एरवी त्या दौऱ्यात भारताचे पानिपत झाले, तरी पर्थ आणि सिडनीमधील सचिनची शतके विशेष ठरली. त्या दौऱ्यापासून सचिन ऑस्ट्रेलियनांचे आदरस्थान ठरला. नंतरच्या जवळपास प्रत्येक ऑस्ट्रेलियन दौऱ्यात सचिन फलंदाजीसाठी उतरला की वीसेक हजार प्रेक्षक उठून उभे राहत. डॉन ब्रॅडमन हे ऑस्ट्रेलियनांचे आराध्य दैवत. त्यांना सचिनमध्ये स्वत:ची छबी दिसली, म्हणून सचिनही त्या देशात दैवतासमान ठरला.

क्रिकेटचा केंद्रबिंदू गत शतकाच्या अखेरच्या दोन दशकांमध्ये भारताकडे सरकला, ज्याचे पहिले कारण अर्थातच १९८३मधील आपले जगज्जेतेपद आणि नंतर सचिनचा उदय. या कालावधीत परदेशी मैदानांवर कसोटी मालिकांमध्ये भारताची कामगिरी यथातथाच होती. ती जेव्हा नवीन सहस्रकाच्या सुरुवातीस सुधारू लागली, तिथपासून ऑस्ट्रेलियाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागल्याचे दिसून येते. याचे प्रमुख कारण म्हणजे, क्रिकेट हा दोन्ही देशांमध्ये पहिल्या पसंतीचा खेळ आहे! इंग्लंडमध्ये अशी परिस्थिती नाही. आज ते ५०-षटकांच्या क्रिकेटमध्ये जगज्जेते असले, तरी फुटबॉल आणि रग्बीइतकी लोकप्रियता क्रिकेटला इंग्लंडमध्ये लाभत नाही. गत दशकामध्ये भारताइतकी जबरदस्त फलंदाजी फळी कोणत्याही संघाकडे नव्हती. त्या फलंदाजांना सौरव गांगुलीसारखा कल्पक आणि खमक्या कर्णधाराची जोड मिळाली. त्या काळात ज्या वेळी ऑस्ट्रेलियन संघ इतर संघांना लीलया लोळवत होता, त्या वेळी त्यांचा विजयरथ आपण भारतात रोखलाच. शिवाय कधी अ‍ॅडलेडमध्ये, कधी पर्थमध्ये कसोटी सामने जिंकत, आणि २००८मध्ये जगज्जेत्या ऑस्ट्रेलियन संघाला एकदिवसीय मालिकेमध्ये हरवून ऑस्ट्रेलियन मंडळींचा आदर आपण कमावला होताच. याच काळात उदयाला आलेल्या आयपीएलमुळे केवळ आघाडीच्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचाच नव्हे, तर तिथल्या दुसऱ्या फळीतील काही क्रिकेटपटूंच्या रोजगाराचा प्रश्नही आपण सोडवून टाकला! आदर आणि मत्सर एकाच वेळी द्विगुणित करणारी ती घडामोड.

गेल्या दोन दशकांमध्ये परदेशस्थ भारतीयांची संख्या आणि क्रयशक्ती प्रचंड प्रमाणात वाढलेली असल्यामुळे, क्रिकेट जगतात भारताचा सामना बक्कळ धंदा जमवूनच संपणार हे समीकरण रूढ झाले आहे. ऑस्ट्रेलियाही त्याला अपवाद नाही. पण आजही आपण त्या देशाकडून घेण्यासारखे बरेच काही आहे. तेथील क्रीडा संस्कृती, तंदुरुस्तीविषयीचा हट्टाग्रह, क्रीडा तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा असे बरेच काही. टेनिस आणि जलतरणात एके काळी हा देश अमेरिकेशी टक्कर घेत असे. हॉकीत वादातीत जगज्जेता होता. टेनिस व जलतरणात बऱ्याच प्रमाणात आणि हॉकीत काही प्रमाणात या देशाची पीछेहाट झालेली असली, तरी क्रिकेटमध्ये मोजके अपवाद वगळता हा देश उच्च स्थानावरच राहिलेला आहे. तेथील क्रीडा संस्कृती भारताने आत्मसात करण्याची गरज आहे. क्रिकेट संस्कृती म्हणजे क्रीडा संस्कृती नव्हे! आजही असंख्य फिटनेस प्रशिक्षक ऑस्ट्रेलियातून जगभर जातात, आपल्याकडेही येतात. नैसर्गिक गुणवत्तेची स्वत:ची एक आयुर्मर्यादा असते. तिला दीर्घत्व प्राप्त होते ते तंत्रशुद्ध प्रशिक्षण आणि तंदुरुस्तीतूनच. क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियाची पाच जगज्जेतेपदे आणि कसोटीमधील असंख्य मालिकाविजय याची साक्ष पटवतात. म्हणूनच निव्वळ क्रिकेटमधील यश नव्हे, तर क्रीडा संस्कृती ही आपल्यासाठी ‘फायनल फ्रंटियर’ ठरावी. ती आत्मसात केल्यास आज-उद्याचे क्रिकेट विजयही क्षुल्लक वाटू लागतील.

भारतीय संघ पूर्ण ताकदीने खेळावा अशी तेथे अपेक्षा असते. त्यामुळेच, रोहित शर्मा मर्यादित षटकांचे सामने आणि विराट कोहली चारपैकी तीन कसोटी सामने खेळणार नाही ही बातमी आपल्यापेक्षा तिथल्यांचा रसभंग करणारी ठरते. गेल्या वेळी आपण मालिका जिंकलो, त्या वेळी ऑस्ट्रेलियन संघातून स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर खेळले नव्हते. त्याचा विषाद ऑस्ट्रेलियनांपेक्षा आपल्याला अधिक वाटला. दोन्ही क्रिकेट संस्कृतींना परस्परांविषयी नितांत आदर आता वाटतो. भारताप्रमाणे आपल्याला टी-२० जगज्जेतेपद लाभलेले नाही, याविषयी ऑस्ट्रेलियन संवेदनशील आहेत. पण ते अजिंक्यपद आपल्याकडे असले, तरी अजूनही बरीच मजल अनेक क्षेत्रांमध्ये मारायची आहे ही जाणीव इथल्यांनी ठेवलेली बरी. त्या दृष्टीने प्रत्येक ऑस्ट्रेलियन दौरा आपल्यासाठी अजूनही नवीन काही शिकवणारा ठरतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2020 1:50 am

Web Title: australia cricket series india team final frontier dd70
Next Stories
1 हास्य आणि भाष्य : पर्यटन आणि मिस गाइड!
2 विश्वाचे अंगण : धुक्यातून रम्य पहाटेकडे..
3 अपूच्या पलीकडे…
Just Now!
X