तालिबानी राजवटीच्या रूपात पुन्हा एकदा अफगाणिस्तानमध्ये काळोखं पर्व सुरू झालं आहे. अफगाणी नागरिकांसाठी तर मध्ययुगाकडचाच हा पुनश्च प्रवास आहे. एकीकडे जग आधुनिकतेची नवनवी शिखरं पादाक्रांत करीत असताना जगाच्या नकाशावरील एक देश असा अभावग्रस्ततेच्या गर्तेत जाताना पाहणं कुणाही संवेदनशील मनाला क्लेशकारकच वाटणार.

डॉ. आशुतोष जावडेकर

विमान अफगाणिस्तानवरून जायला लागलं हे सांगायला सीटसमोरच्या जीपीएस नकाशाची गरज पडली नाही. आत्ता तर हिरवा पंजाब खाली होता. भारत संपून पाकिस्तान कधी सुरू झाला हे कळलंही नव्हतं, इतका दोहोंचा भूगोल सारखा होता. पण बघता बघता डोंगर आले, खिंडी आल्या. उंच उंच होत चाललेले पर्वत आणि शेतं एकाएकी नाहीशी झाली. गावांचे हवेतून दिसणारे ठसे दिसेनासे झाले.

मी ओळखलंच की हा अफगाणिस्तान! प्रतिभा रानडे यांच्या ‘अफगाण डायरी’ या पुस्तकातून पहिल्यांदा फार जिवंत होत भेटलेला. प्रतिभाताईंनी तेव्हा तिथे त्यांच्या मुक्कामात अनुभवलेली रशियन क्रांती, तिथल्या सर्वसामान्य अफगाणी माणसांचे जीवन, तिथे असलेल्या अनेक भारतीय अधिकाऱ्यांची कैकदा होणारी अवघड स्थिती याचा प्रत्यय तर मराठी माणसांना दिलाच; पण मुळात अनेकांना अफगाणिस्तानची खऱ्या अर्थाने ओळख करून दिली. नाहीतर आपल्याला अफगाणी पठाण माहीत होते. फार पूर्वी आपल्या भारतीय राजांचं- उदाहरणार्थ मौर्य साम्राज्य तिथवर पसरलेलं होतं हे काहींना माहीत होतं. आणि अटकेपार झेंडा फडकवणारे हिकमती मराठे इतिहासाच्या कालपटावर आत्ता आत्ताच अफगाणिस्तानच्या भूमीवर पराक्रम गाजवून आले नव्हते का? पण प्रतिभाताईंनी दाखवल्या तिथल्या टोळ्या. त्यांची एकमेकांशी असलेली खुन्नस. भूराजकीय खेळात वापरली गेलेली अफगाणी भूमी. जीव घेणारे नाही, तर देणारे ते पश्तुन पठाण. पुढील दशकात जे काही दहशतवादी घातचक्र जगभर फिरलं, ते तेव्हा कुठेतरी बाल्यावस्थेत असणार.

विमानातून खाली बघताना उंच उंच पर्वत आणि खोल खोल जाणाऱ्या घळी आणि कपारी दिसायला लागल्या. नकाशात बघितलं आणि लक्षात आलं की आम्ही कंदाहारच्या उत्तरेला आणि काबूलच्या दक्षिणेला होतो. बघताना लगेच मनात म्हटलं, इथे अशा खोल डोंगरांत लपलेल्या अतिरेक्यांना मारण्यासाठी अमेरिकेने वापरलेले ड्रोन अनेकदा निकामी ठरले यात आश्चर्य ते काय! भूगोल अनेकदा वर्तमान ठरवतो.. आणि बघता बघता त्याचा इतिहास होतो. रुद्र-सुंदर असं ते निसर्गाचं रूप तेव्हा बघताना इथे लवकरच पुन्हा एकदा तालिबान ताबा घेतील असं वाटलं नव्हतं.

म्हणजे अमेरिका कधीच यशस्वी झाली नव्हती अफगाणिस्तानमध्ये याची कल्पना होती, तरीही..

न्यूयॉर्कच्या गगनचुंबी इमारतींवरील ९/११ च्या हल्ल्यात तीन हजार लोक मृत्युमुखी पावले तेव्हापासून बदला घेण्यासाठी अफगाणिस्तानमध्ये येऊन तब्बल दोन दशके मांड ठोकलेल्या अमेरिकेने सैनिक आणि अतिरेकी तर मारलेच; पण निदान अधिकृत आकडा सांगतो तसे साधारण पन्नास हजार सर्वसामान्य नागरिकदेखील हल्ल्यांत मरण पावले. न्यूयॉर्कमध्ये हल्ला झाला तेव्हा जी निष्पाप माणसं मृत्युमुखी पडली, त्याच्या साधारण सोळापट तशीच निष्पाप माणसं अफगाणिस्तानमध्येसुद्धा मृत्युमुखी पडली. यातील सगळेच साव असतील असे नाही, पण तो आकडाही ‘अधिकृत’ असल्याने कमी असण्याची शक्यता अधिक! ज्याच्या घरांतली निष्पाप माणसं गेली, ते प्रत्येक घर भविष्यातील संभाव्य तालिबानी सदस्याचं घर बनलं का? काही प्रमाणात तरी असावं. सूडचक्र हे फार प्रबळ असतं. आणि अखेर आज तालिबान अफगाणिस्तानमध्ये पुन्हा विराजमान झाले आहेत. तालिबानी राजवट येणार हे कळल्यावर अनेक अफगाणी लोक काबूल विमानतळावर गर्दी करून पळून जायचा प्रयत्न करत होते. अमेरिकन सैनिक भिंतीवरून काही बाळांना वर ओढून घेत आहेत, बुरखा घातलेल्या  बायका विमानतळावर भांबावून पळत आहेत, मध्येच अश्रुधूर सोडला जात आहे, विमानावर माणसं बसत आहेत आणि विमान वर उडाल्यावर खाली पडून मृत्यू पावत आहेत.. अशी सगळी भीषण दृश्यं जगाने पाहिली. पण तरीही अफगाणिस्तानमधील जनतेचा एक मोठा हिस्सा हा तालिबान समर्थक असलाच पाहिजे. चीन, पाकिस्तान यांसारख्या परक्या शक्तींनी तालिबानसाठी हातभार लावला असेल अशी शक्यता अनेक अभ्यासक वर्तवत आहेतच. पण तरीही कुठेतरी देशांतर्गत पाठिंबाही असणारच तालिबानांना. नुसत्या बळावर त्या देशावर हुकूमत गाजवणं कुठल्याच अतिरेकी कंपूला साधणारे नाही. जे पूर्वी बलाढय़ रशियाला आणि आता अमेरिकेलाही साध्य झालं नाही ते तालिबानला जर साध्य झालं असेल तर अफगाणी समाजाचा, तेथील काही टोळ्यांचा त्या राजवटीला (आणि ती राजवट जे कट्टर समाजनियम लागू करू पाहते आहे त्यालाही!) छुपा अथवा उघड पाठिंबा असलाच पाहिजे.

काही जण केवळ इस्लाम धर्माच्या परिप्रेक्ष्यातून अफगाणिस्तानकडे बघतात. हंटिग्टनसारख्या विचारवंताने ‘clash of civilizations’ ही संकल्पना मूलत: ख्रिश्चन आणि मुस्लीम समाजाच्या संदर्भात वापरल्यानंतर तर तसं बघणं स्वाभाविकच ठरून गेलं आहे. पण आजही आसपास बघितलं की लक्षात येतं की, मक्का-मदिना- सौदी अरेबियाहून धर्म न मानणाऱ्या कम्युनिस्ट चीनला तालिबानचा कळवळा अधिक आहे! ही साधी गोष्टदेखील पुष्कळ बोलते. परत सुन्नी आणि शिया यांच्यातील वाद हेदेखील महत्त्वाचे आहेत. शेजारी असलेला शियाबहुल इराण हा सुन्नीबहुल तालिबानी अफगाणिस्तानपासून अंतरावर उभा आहे तो यामुळेच. बामियानमधील बुद्धाच्या मूर्ती तालिबानने जेव्हा उद्ध्वस्त केल्या तेव्हा फक्त मूर्तीचीच नव्हे, तर त्या पारंपरिक टोळ्यांच्या नीतिमूल्यांचीही काहीशी मोडतोड झाली असली पाहिजे. कारण जी काही पारंपरिक टोळ्यांची नीतिमूल्यं असतील ती कायम असतानाही त्या मूर्ती तिथे अनेक शतकं न तुटता होत्या. आणि आता तिथे फक्त मोठाले कोनाडे तेवढे उरले आहेत.. आत्ताच्या अफगाणिस्तानचं प्रतीक जणू! तालिबानांकडे शस्त्रं आहेत, पण अमेरिकेने खाते गोठवल्यामुळे पैसे नाहीत. पाकिस्तान आणि तालिबान्यांमध्ये एव्हाना कुरबुरी सुरू झाल्या आहेतच. आणि जे अफगाणी साम्यवादी रशियाला पुरून उरले ते चीनच्याी expansionist मनोवृत्तीला ओळखून नसतील हे म्हणणं धाडसाचं ठरेल.

आणि या सगळ्या चित्रात आपण कुठे आहोत? मला जसा विमानातून तो अफगाणिस्तान खोल कपारींचा, कोडय़ासारखा वाटला तसाच भारताला वाटतो आहे का? इतकी वर्ष अफगाणिस्तान हे एक प्रगत राष्ट्र बनावं आणि त्याचा भारताला भूराजकीय फायदा व्हावा म्हणून आपण तीन बिलियन डॉलर खर्च केले. त्याचा नक्की परतावा काय आला? एखादा शेअर बुडतो तसा आपला अफगाणी शेअर बुडाला का? दुर्दैवानं तालिबानी अफगाणिस्तान हे भारतासाठी कायमचं आव्हान आणि थेट संकट राहणार आहे. मुंबईवरच्या अतिरेकी हल्ल्याची पुनरावृत्ती अनेक शहरांत होऊ शकण्याची टांगती तलवार आता आपल्यावर आहे. आपले शेजारी हे आपले फारसे मित्र नाहीत. आणि पाकिस्तान तर पक्का शत्रूच आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, भारत यांची दक्षिण चीन महासागरातील मोट (quad) चीनला आव्हान देऊ शकते. हीच एक काय ती आपल्या जमेची बाजू!

भारतामध्ये अनेक अफगाणी विद्यार्थी शिकतात. अनेक इराकी आणि इराणी विद्यार्थीदेखील शिकतात. इराकी आणि इराणी विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिकवताना त्यांचा आत्मविश्वास, त्यांना भारताविषयी असलेली कृतज्ञता आणि प्रेम ठामपणे जाणवत राहतं. इराकी आणि इराणी विद्यार्थी हे अफगाणी विद्यार्थ्यांपासून अंतर राखून असतात हेही पाहिलं. जेव्हा कधी काही अफगाणी तरुण पेशंट म्हणून आले तेव्हा ते थोडेसे गोंधळलेले, थोडे तापट आणि कधी आपण टोळीप्रमुख असल्याच्या आविर्भावात वावरत असणारे वाटले. अर्थात यावरून काही निष्कर्ष काढता येत नाहीत. अनेक अफगाणी माणसांचे अतिशय चांगले अनुभव भारतीयांना आलेले आहेत. आणि अखेर माणसं ही माणसंच असतात याची मला कल्पना आहे. माझा तरुण मित्र सौरभ खोत म्हणतो तसं- ‘कुठल्याही कट्टरतावादात सर्वप्रथम फासावर जातं ते आधुनिक शिक्षण आणि मानव्य राखणारे उदारमतवादी विचार.’

तालिबानी कायद्यांचेच बघा : बायकांना रस्त्यात फटके मारणारे, स्त्रियांना एकटं घराबाहेर पडू देण्याचं स्वातंत्र्य हिरावणारे, मुलींसाठी शिक्षणाचे दरवाजे कायमचे बंद करणारे तालिबानी कायदे. अगदी आत्ताही तालिबानचा प्रवक्ता म्हणाला की, ‘मंत्रिमंडळात स्त्रियांना जागा नाही. त्यांचं काम मुलांना जन्म देण्याचं.’ (‘या खेपेस तालिबान जरा चांगले आहेत,’ असं म्हणणाऱ्या मंडळींचं आख्यान त्यामुळे बंद झालं आहे, हा एकमेव फायदा!) पण हेच तालिबान अफगाणिस्तानमध्ये वर्षांनुवर्ष चालत आलेल्या बच्चाबाजी प्रथेवर बंदी आणतं! दहा ते पंधरा-सोळा वर्षांच्या कोवळ्या तरुण मुलग्यांचा बळजबरीनं लैंगिक उपभोग घेणं हे अफगाणिस्तानमध्ये सर्रास होत असे आणि आजही होतं. तालिबानच्या मागच्या राजवटीमध्ये या विशिष्ट प्रथेवर मात्र कडक बंदी आली होती! म्हटलं तर अनेकदा राजकारण असं सापेक्ष, व्यामिश्र असतं.. माणसांसारखंच.

एवढं नक्की, की आंतरराष्ट्रीय युद्धात आणि टोळीच्या राजकारणात जेव्हा गावंच्या गावं उद्ध्वस्त होतात, गावातील अर्भकंदेखील मारली जातात, तेव्हा काजळाइतकी मिट्ट अंधारी रात्र पसरत असते. तेव्हा जो टाहो फुटतो तो त्या अंधारातच जिरतो. ती काजळरात जिवलगांचा श्वास, भविष्याचं स्वप्न आणि आजची भाकर सारंच ओढून घेऊन जाते! अफगाणिस्तानवर ती रात्र कायमसाठी राहू नये आणि त्या काजळरातीची अमंगल छाया आपल्यावर येऊ नये यासाठी आपण प्रयत्न करायला हवे.. करत राहायला हवं.

ashudentist@gmail.com