मंगला गोडबोले Dmangalagodbole@gmail.com

तसे स्वर्गलोकात भाई आता आतापर्यंत खूश असायचे. मुळात कोणत्याही ठिकाणी गेले तरी आपल्या प्रसन्नतेने, हसतमुखाने त्या जागेचा ‘स्वर्ग’ करण्याची हातोटी त्यांच्यापाशी होतीच; त्यात गेली १८ वर्ष तर ते साक्षातही ‘स्वर्ग’वासी! त्यांच्या आगेमागे बरेच सखेसोबती तिथे पोचलेले. मग काय, खाली अड्डा जमवायचा तो आता वरती, एवढाच फरक. गोविंदराव पोचले तेव्हापासून लागेल तेव्हा रशिया-अमेरिकेची उलटतपासणी सुरू. शांताबाई पोचल्या तेव्हापासून ज. के. उपाध्ये, माधवानुज, तिवारी, टेकाडे वगैरेंच्या ओळीमागून ओळी आठवण्याचे खेळ सुरू. अशी सगळी मजा असायची संध्याकाळी. पण गेले काही दिवस वातावरणात तो मोकळेपणा नाहीये, मंडळी तणावग्रस्त दिसताहेत, हे भाईंच्या चाणाक्ष नजरेतून सुटणं शक्यच नव्हतं. आणि फार काळ तणावामध्ये राहणं त्यांना पृथ्वीवरही मंजूर नव्हतं, तर स्वर्गात का असेल?

ताणावर वरताण कशी करता येईल, या एकाच विचारात भाई संध्याकाळचा फेरफटका मारायला बाहेर पडले तर बघावं तिथं, ऐकावं तिथं कुजबुज सुरू..

‘‘तुमची झाली?’’

‘‘माझी नाहीये बुवा एवढय़ात. वाचलो.’’

‘‘आता कोणाची?’’

‘‘छे! छे! मी कळूच देणार नाही माझी कधी आहे ते.’’

‘‘मला वाटतं, आता त्यांची येऊ घातलीये. भोगा म्हणावे आपल्या कर्माची फळे.’’

‘‘मी नाही.. मी नाही.. म्हणजे मी ९९ नंतर एकदम १०१ च व्हावं म्हणतो. शंभरी भरवून घ्यायची हौस आहे कोणाला?’’

‘‘मुलं लवकर पोटाला लागावीत म्हणून आमच्या माडगुळात उगाच वयं वाढवायचे हो पोरांची त्या काळात. त्यात मी धाकला. जरा हुच्चपणा करणारा. १९२७ आपलं लिहिण्यापुरतं. खरा मी तीन-चार वर्षे नंतरचाच असणार.’’

‘‘पळू नका तात्या.. एक ना एक दिवस तुमचीही शताब्दी येणारच.’’

..अशी दबल्या आवाजात चौफेर बोलणी! त्यातल्या त्यात ज्ञानपीठवाले विंदाच एकटे निवांत दिसत होते. कल्पवृक्षाच्या बुंध्याचं लाकूड वापरून घरच्या घरी टेबल बनवण्याच्या प्रयत्नात असताना पुटपुटत होते, ‘‘मी तर बाबा थोडक्यात वाचलेला.’’ चाल अर्थातच ‘मी तर बाबा झपाटलेला’ची होती. भाईंना ती चाल कळली. एकूण हालहवाल कळली. पण सवाल उरलाच. ‘आजकल इतना सन्नाटा क्यों है भाई?’

अशी कोणतीही साहित्याबाबतची, साहित्य- जगताबाबतची शंका आली की शांताबाईंकडून तिचं निरसन करून घ्यायची भाईंची जुनी सवय होती. ते शांताबाईंना ‘रेडी रेकनर’च म्हणत. शांताबाईही वेळात वेळ काढून, संदर्भ शोधून अचूक माहिती पुरवण्यात तत्पर असत. ‘‘असं काय करता पुलं? मुक्तिबोधाचं ‘नवी मळवाट’ आलं तेव्हा नाही का, म्हणजे बघा.. भांडवलशाहीतल्या अंतर्विरोधाचं भेदक चित्रण करताना नाही का..’’ वगैरे शेलके संदर्भ हौसेने पुरवत. आताही त्याच अपेक्षेने भाईंनी शांताबाईंच्या दिशेने हळूच मोहरा वळवला. (गुडघेदुखीमुळे कुठेही वळायला त्यांना जरा त्रासच पडे. तरी बरं, स्वर्गातले रस्ते बरे होते. पुण्यातल्या रस्त्यांवर फिरताना भाईंना स्वर्गापेक्षा जास्त देव दिसायचे.)

शांताबाईंकडे जाऊन भाई बघतात तो काय, तिथे सुनीताबाई बसलेल्या. दोघींचेही चेहरे गंभीर. शांताबाईंनी ‘या’ म्हटलं खरं, पण त्यातही त्यांचा नेहमीचा जोर नव्हता. काळजीने विचारल्यावर म्हणाल्या, ‘‘माझीही जवळ आलीये ना.. म्हणून जरा अस्वस्थ आहे.’’

‘‘काय जवळ आलीये शांताबाई? सारखंतेच ऐकतोय. म्हणे आली का .. झाली का.. होऊन गेली.. भरली.. काय चाललंय?’’

‘‘जन्मशताब्दी हो.’’ शांताबाई डोक्यावरचा पदर सावरत पुटपुटल्या. पदर सावरला तरी मूड काही सावरला गेला नव्हता.

‘‘बावीस सालची ना मी..’’ पुन्हा त्यांच्या तोंडून आलं. भाईंना मजाच वाटली.

‘‘अहो शांताबाई, माणूस एकदा जन्मला की त्याची शताब्दी होणारच. मृत्यूची तारीख अज्ञात, पण शताब्दीची ठरलेली, जगजाहीर. आता लवकरच तुमची येईल. नंतर तीन वर्षांनी सुनीताची, गोविंदरावांची..’’

‘‘ते पुढचं. अगोदर बापटांचा नंबर आहे. बरोबरीचे ना आम्ही दोघं? आमच्या शंभऱ्या भरणार.. त्यानिमित्ताने पटपट पटपट चरित्रपट निघणार आमच्यावर.. शताब्दीच्या बसून कुशीत, बायोपिकची गाडी चालली खुशीत..’’ शांताबाई त्रासून म्हणाल्या.

‘‘अच्छा! म्हणजे तुम्ही दोघी बायोपिकच्या काळजीने ग्रस्त आहात तर..! नाहीतर म्हटलं एवढी कौतुकाची धाकली पाती अध्यक्ष झाली, संमेलन झालं तरी ‘गमते उदास’चा भाव का?’’

इथे ‘गमते उदास’च्या संदर्भाने सुनीताबाई संवादात शिरल्या आणि चढय़ा आवाजात म्हणाल्या, ‘‘मग दुसरं काय होणार भाई? आपल्या पश्चात कोणीतरी आपल्या नावावर काहीबाही खपवणार, दाखवणार. लोक मजेने बघणार, चघळणार. आपण फक्त अगतिकतेने ऐकणार..’’

‘‘मग ऐकू नये. ऐकून न ऐकल्यासारखं करावं.’’

‘‘ती तुमची खास सिद्धी आहे पुलं. आमच्यासारख्यांना कुठून जमायला? मला आधी हेच कळत नाहीये, की हे बायोपिकचं पीक आलंच कसं एवढं फोफावून?’’

‘‘शांताबाई, एक ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ काय निघाली, आपल्या लोकांनी बायोपिकांची फॅक्टरीच सुरू केलीये हो खालती. लोक जन्मतारखांच्या पुढच्या दहा-वीस-पन्नास वर्षांच्या याद्याच घेऊन बसल्येत म्हणे. कोणाची शंभर भरतात कधी आणि आपण सिनेमा करतो कधी.. काय हा नाद?’’

‘‘चालायचंच सुनीता. तू असं बघ ना, बायोपिकमध्ये फार पोटेन्शिअल दिसतंय लोकांना. खूप व्हरायटी. खूप स्कोप.’’

‘‘तो कसा रे भाई?’’

‘‘सोपंय.. सिनेमाभर नाना माणसं नाचवायची. पण त्यातली खरी कोण, काल्पनिक कोण, कोणाचं कोणाशी काय नातं, याचा थांगपत्ता लागू द्यायचा नाही. झाला की नाही साध्या सिनेमाचा रहस्यपट? आपल्या जगण्यात काही का रहस्य नसेना; रहस्यपट तयार! बरेच बालिश विनोद दाखवले की झाला बालचित्रपट! रातोरात किंवा अकस्मात प्रचंड यश मिळाल्याचं दाखवलं की झाली परीकथा!’’

‘‘तू घे सावरून भाई. पण मला तरी हे सगळे भयपटच वाटताहेत.’’ सुनीताबाईंनी सवयीने आपला मुद्दा लावून धरला. शांताबाईंनी मधेच कलात्मक समस्येकडे लक्ष वेधत म्हटलं, ‘‘पण का हो पुलं? आपणसुद्धा सिनेमा-नाटकातले, गाण्यातले लोक होतोच. आपण तर महायुद्धातली, स्वातंत्र्ययुद्धातली मोठी पर्वताएवढी माणसं प्रत्यक्ष पाहिली. आपण कसे नाही हो त्यांच्यावर चरित्रपट बनवायला लागलो?’’

‘‘सोपंय शांताबाई. आपण आपल्या कल्पनेतून वेगळं विश्व निर्माण करू शकत होतो. अर्ध्याकच्च्या वास्तवाला वेठीला धरण्याची वेळ येत नव्हती आपल्यावर. उगाच ‘प्रातिभ शक्ती’ वगैरे मोठे शब्द वापरत नाही मी.. ती सवय नाही मला. पण आपण आपल्या हिमतीवर नव्याने काही ना काही करणारे होतो, हे तर पटेल तुम्हाला?’’

‘‘पुढचे लोकही हिमतीवरच करताहेत हं भाई. ते नको सांगूस. काळ, वेळ, माणसं, नाती, श्रेणी, अधिकार सगळं उलटंपालटं करण्याची हिंमतच नाही का? म्हणायला ‘कलात्मक स्वातंत्र्या’चं पांघरूण, की तुम्हा स्वातंत्र्यवादी लोकांची बोलतीच बंद होणार. तू आयुष्यभर कलावंताच्या स्वातंत्र्याचाच जप केलास ना!’’

‘‘होय सुनीता. पण थोडंसं चुकतंय. कलात्मक स्वातंत्र्य खरं, पण क्रीडात्मक स्वातंत्र्य असं कोणी म्हटलंय का?’’

‘‘क्रीडात्मक स्वातंत्र्य? हे काय नवीन पुलं?’’ शांताबाईंनी यावेळी भूमिका बदलली. शंका त्यांची, निरसन पुलंकडून!

‘‘ते असं आलं. ‘क्रीडात्मक स्वातंत्र्य’ म्हणजे दुसऱ्याच्या आयुष्याशी खेळण्याचं स्वातंत्र्य. त्यात आपण पडलो स्वर्गात.. खेळ पृथ्वीवर. इथे इंटरनेट नाही. ‘धैर्य दे अन् नम्रता दे.. पाहण्या जे जे पहाणे’ असं संदर्भ बदलून म्हणूया, अन् काय? बाकी तुम्हा दोघींना काळजी नाही- आमच्यासारखं होण्याची.’’

‘‘का?’’

‘‘आम्ही ‘असा मी..’ लिहीत बसलो. ‘खरा मी.. खरा मी..’ असं आत्मचरित्र लिहायचं राहिलं. तुमची दोघींची काय बुवा, आत्मचरित्रं आहेत. ‘आहे मनोहर..’ झालंच, तर तुमचं ‘धूळपाटी’ आहे.’’

‘‘भले.. म्हणजे लोक ती वाचूनबिचून सिनेमा बनवतील म्हणता की काय? आता खर्रेखर्रे विनोदी लेखक शोभलात हं. आता ‘धूळपाटी’ चालत नाही खाली, कोरी पाटी चालते. धूळबीळ उडवली, मस्त पॅकेज बनवलं, माध्यमांचा भडिमार करून लोकांच्या गळी उतरवलं की चालतं सगळं. अमुक रकमेचा धंदा झाला की बाकी आहे काय अन् नाही काय?’’

‘‘तसं भाई, तुझ्यावरही अभ्यास करून सविस्तर लिहिलेलं आहेच की! पण वाचनात कोण घेतो?’’

‘‘असंच चालायचं शांताबाई..’’

‘‘असेल. पण उद्या ‘जयप्रभा’मध्ये मी बाबांच्या खांद्यावर हात ठेवून उभी आहे असं दाखवलं किंवा कोळीगीतं लिहिण्यापूर्वी मी मासेमारी शिकले असं म्हटलं, मासे पकडतानाचा माझा लाँग शॉट दाखवला तर.. नाही म्हटलं तरी मन:स्ताप..’’

‘‘अजून तीन वर्ष आहेत ना शांताबाई? मानसिक तयारी सुरू करा. आम्ही धीर द्यायला असूच. नाही का गं सुनीता? वाटल्यास आतापासूनच म्हणतो, तुम्हा ते शताब्द सुखकर हो.. तुम्हा ते शताब्द..’’

‘‘शताब्द नाही पुलं.. शताब्दी.. आता हे काय मी का तुम्हाला सांगायचं?’’

‘‘तेवढी क्रिएटिव्ह लिबर्टी आम्हालाही घेऊ द्या की! का फक्त लोकांनीच आमच्यावर ती चैन करायची होय?’’

(उल्लेख आलेल्या सर्व ज्येष्ठ-श्रेष्ठ प्रतिभावंतांची दोन्ही कर जोडून क्षमा मागून हा कल्पनाविलास, परिहासविजल्पित सादर केला आहे.)