News Flash

अरतें ना परतें… : लेखकाचा तिसरा डोळा

मनातल्या मनात हसून आपण त्याच्यावर एक काट मारून बाजूला होतो. 

|| प्रवीण दशरथ बांदेकर

मध्यंतरी जुझे (होझे) सारामागो या माझ्या आवडत्या पोर्तुगीज लेखकाची एक मुलाखत वाचनात आली होती. त्याचं म्हणणं होतं, ‘कादंबरी लिहिण्यापूर्वी मला त्यातील व्यक्तिरेखा आधी दिसू लागतात. त्यांचे आवाज ऐकू येतात, कृती दिसतात, मृत्यूही दिसतात. माझी लेखनपूर्व अस्वस्थता त्यातूनच निर्माण होत असावी.’ हे वाचत असताना मला चिं. त्र्यं. खानोलकरांची आठवण झाली. खानोलकरही आपल्या पात्रांविषयी असंच काहीसं बोलत असत असं मी वाचलं होतं.

चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू या लेखकाविषयी मला नेहमी कुतूहल वाटत आलं आहे. त्यांचं उपलब्ध असलेलं बरंचसं साहित्य मी वाचलं आहे. कोकणातील त्यांच्या काही समकालीन मित्रांकडून त्यांच्याविषयी अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. अनेकांनी त्यांच्याविषयी लिहिलं आहे; तेही बरंचसं वाचनात आलं आहे. या सगळ्यावरून खानोलकर हे लेखनाच्या अनिवार ओढीने ‘झपाटलेलं झाड’ होतं, अशीच त्यांची एक प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहते. विशेषत: नाटक वा कादंबरीसारखं दीर्घ स्वरूपाचं लेखन करण्यासाठी आवश्यक असलेलं स्वास्थ्य किंवा अनुकूल वातावरण फारसं उपलब्ध नसतानाही खानोलकरांनी निर्माण केलेल्या काही व्यक्तिरेखा पुन:पुन्हा अभ्यासाव्यात, सहजासहजी विसरता येऊ नयेत अशाच आहेत.

ही अशी पात्रे खानोलकरांना कुठे दिसली असावीत? खानोलकरांच्या बहुतेक कलाकृती कोकणच्या पार्श्वभूमीवर घडतात. खानोलकरांच्या आयुष्याचा बराचसा काळ कोकणातल्या वास्तव्याशी निगडित असल्याने हे तसं साहजिकच असल्याचं म्हणता येईल. पण ज्या काळात खानोलकर कोकणात वावरत होते, त्या काळात किंवा त्यानंतरही अशी माणसं कोकणात कितीशी होती? मुळात होती का? मग खानोलकरांनाच ती कशी आणि कुठे बरं दिसली असावीत? खानोलकर काही प्रत्यक्ष वास्तवात अस्तित्वात असलेल्या व्यक्तींवरून आपली पात्रे निर्माण करत असावेत असं त्यांच्या एकंदरीत लेखनप्रकृतीवरून म्हणता येत नाही. किंबहुना, त्यांची पात्रे अनेकदा आभासी, वास्तवाचे विरूपण असल्यासारखी, असंबद्ध, असंगत किंवा अतार्किक विचार करणारी, अपवादात्मक भोग वाट्याला आलेली दिसत राहतात. या विलक्षण प्रतिभेच्या लेखकाला लाभलेल्या ‘तिसऱ्या डोळ्या’मुळे फक्त त्यांनाच ती तशी दिसत होती असं म्हणायचं का? म्हणजे सारामागोने म्हटलंय तसं खानोलकरांनाही बाजीराव, लक्ष्मी, परशुरामतात्या, चानी अशी सगळी पात्रं आधीच दिसली होती का? बाजीरावाचे विदुषकी चाळे, असंबद्ध बोलणं, लक्ष्मीचं जगावेगळं रूप आणि तिच्यापाशी जाणाऱ्या प्रत्येक पुरुषाचं लोळागोळा होऊन जाणं, जीवाला बीजारंभीच नष्ट करून टाकणारी मुळी गवसलेले आणि त्यापायी आयुष्यभराची फरफट ओढवून घेतलेले परशुरामतात्या, चानी आणि तिच्यासारख्या खानोलकरांच्या बहुतेक नायिकांच्या वाट्याला आलेले भोग… हे सगळं खानोलकरांना आधीच दिसलं होतं?

एखाद्या लेखकाच्या संदर्भात हे ‘दिसणं’ म्हणजे नक्की काय असतं? मीही एक लेखक आहे, मग मला असं काही दिसलं आहे का? काहीतरी दिसू लागलं आहे याची धूसरशी तरी जाणीव कधी झालीय का? की आपल्या हे कधी लक्षातच आलं नसावं? किंवा आजकालचे आधुनिक अभ्यासक म्हणतात तसा हा काहीतरी रोमँटिक प्रकार नसेल ना? म्हणजे त्यांना असं वाटतं की, हे असं काही पात्रं दिसणं, लेखनासंदर्भात स्वप्नात दृष्टान्त होणं, लेखनाला पूरक ठरतील असे काही दिव्य भास होणं- असलं काहीही प्रत्यक्षात नसतं. मुळात काही ठरावीक लोकांकडेच प्रतिभेची दैवी देणगी असते, तेच लिहू शकतात किंवा काही नवं निर्माण करू शकतात, हाही असाच पिढ्यान् पिढ्या चालत आलेला गैरसमज आहे. थोडक्यात, कुणालाही सुचू शकतं, कुणीही लिहू शकतं- असंच या अभ्यासकांना म्हणायचं असतं. त्यामुळे पात्रं किंवा कथानक वगैरे दिसणं किंवा त्याचा साक्षात्कार होणं म्हणजे लेखकाने स्वत:ची एक विशिष्ट प्रतिमा तयार करण्यासाठी, स्वत:भोवती वलय निर्माण करण्यासाठी रचलेला बनाव असू शकतो, असा आक्षेप नव्या अभ्यासकांकडून घेतला जाऊ लागला आहे.

मला स्वत:ला इतकी टोकाची भूमिका घेणं पटत नाही. ‘लिहिता येणं’ आणि ‘लेखक असणं’ या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत असं मला वाटतं. म्हणजे मला सरावानं थोडंफार बरं लिहिता येतंय, माझ्यापाशी अनुभवांचा साठा आहे, मला भाषा वश आहे, माझं व्याकरण पक्कं आह याचा अर्थ मी ‘क्राइम अ‍ॅण्ड पनिशमेंट’, ‘ब्लाइंडनेस’ किंवा ‘वन हंड्रेड इअर्स ऑफ सॉलिट्युड’ लिहू शकेन असा नाही ना होत! अभिजात म्हणाव्यात अशा या कलाकृती निर्माण करण्यासाठी वेगळंच काहीतरी जादाचं सहावं इंद्रिय असावं लागतं. कदाचित तोच या कलावंतांचा ‘तिसरा डोळा’ असू शकतो. घडलेल्या आणि न घडलेल्या गोष्टीही पाहू शकण्याची क्षमता त्यामुळेच आलेली असू शकते. ‘जे न देखे रवी, ते देखे कवी’ ही किमया या अतिरिक्त नजरेमुळेच साधली जात असावी. हा तिसरा डोळा म्हणजे कदाचित कलावंताची इतर सर्वसामान्य लोकांपेक्षा वेगळी असलेली सेन्सिबिलिटी असू शकते. त्या आगळ्या सेन्सिबिलिटीमुळेच बहुधा त्याला इतरांना न ऐकू येणारे दुरातलेही रात्री-अपरात्रीचे विलाप ऐकू येतात. कुजल्याचे/ जळल्याचे/ जाळल्याचे आणि कसले कसले नष्ट करून टाकण्याच्या कटकारस्थानांचे वास येतात. भूतकाळातल्या जाणिवांचे आणि भविष्यातल्या हेतूंचे स्पर्श ओळखू येतात. माणसं त्यांच्या कृती-विकृतींसह दिसून येतात. हे फक्त लिहिण्याच्या प्रक्रियेपुरतंच मर्यादित आहे असं नाही. बोलता येणं, गाता येणं, चित्र काढता येणं, अभिनय करता येणं अशा अनेक गोष्टींशी हे ताडून पाहता येईल. संगीतकार नौशाद यांनीही एकदा ‘मला गाण्याचे शब्द वाचता वाचताच गाण्याची चाल दिसायला लागते,’ असं म्हटलं होतं. ही अतिशयोक्ती आहे किंवा आपली एक प्रतिमा निर्माण करण्यासाठी त्यांनी असं म्हटलं असावं असं म्हणून आपण त्या विधानाकडे दुर्लक्ष केलं तरी नौशाद यांचं संगीतकार म्हणून असलेलं उत्तुंग काम आपण डावलू शकत नाही. संगीत देणारे अनेक असतात, गाणारे अनेक असतात, तसे लिहिणारेही अनेक असतात. पण या सगळ्यांनाच सूर दिसतील, प्रतिमा दिसतील, पात्रं दिसतील असं नाही. तुकोबा म्हणतात तसे ‘विधीचे जनिते’ असलेल्या ‘स्वयंभू’ लोकांनाच बहुधा हा तिसरा डोळा लाभू शकतो. बाकी आयत्या अनुभवावर जगू पाहणाऱ्या परजीवींना हे दिसेलच असे नाही.

असं असलं तरी यात आणखी एक मेख आहे. काही वेळा असाही अनुभव येतो की एखादा उत्तम लिहिणारा- म्हणजे बाकीबाब बोरकरांच्या भाषेत- ज्याच्या लेखनाला परातत्त्वाचा जणू स्पर्श झाला आहे अशा स्वरूपाचं लिहिणारा भेटतो. आवडता लेखक भेटला म्हणून आपण एकदम हर्षभरित होऊन त्याच्याशी गप्पा करू लागतो. किती बोलू नि किती नको अशी आपली अवस्था झालेली असते. त्याच्या लेखनातील आपल्या आवडत्या जागांविषयी आपल्याला त्याला सांगायचं असतं. हे त्याला कसं सुचलं, अमुक एक पात्र कुठे भेटलं, अमका प्रसंग, तमकं वर्णन, आपल्याला लागलेले कलाकृतीतले ‘बिटवीन द लाइन्स’ अर्थ त्याच्याही मनात तसेच होते का, असे एक वाचक म्हणून आपल्याला पडलेले कैक प्रश्न त्याला विचारून आपलं समाधान करून घ्यायचं असतं. त्याच्या कलाकृतीचं अर्थपूर्ण वाचन करताना आपल्या सर्जनशीलतेने निर्माण केलेल्या एका नवीनच कलाकृतीचा त्याला प्रत्यय आणून देऊन त्याच्या डोळ्यांत आपल्या वाचकाविषयी निर्माण होणारं कौतुक न्याहाळायचं असतं. पण कुठचं काय! त्याच्याशी बोलताना हळूहळू आपल्या लक्षात यायला लागतं की, आपल्या मनात असलेली त्या कलाकृतीच्या लेखकाची प्रतिमा आणि प्रत्यक्षातला हा लेखक यांत जमीन अस्मानाचा फरक आहे. आपण त्याच्या कलाकृतीतील रिकामी जागा शोधून लावलेल्या अर्थांमध्ये, निर्मितीप्रक्रियेविषयी दाखवत असलेल्या कुतूहलामध्ये त्याला फारसा रस वाटत नाहीये. तो फक्त स्वत:च्या कोडकौतुकात, त्याला मिळालेल्या मानसन्मानांच्या स्तुतीमध्येच अखंड बुडालेला आहे. त्याविषयीच बोलत राहिला आहे. त्याच्या बोलण्याने आपला भ्रमनिरास होऊन जातो. इतक्या मोठ्या कलाकृतीचा हा निर्माता अगदीच सामान्य कुवतीचा माणूस आहे असं आपल्या मनात येऊ लागतं. त्याच्याशी बोलण्याचा आपला उत्साह संपून जातो. हिरमोड होऊन जातो आपला. अशा लेखकाने मग एखाद्या कार्यक्रमामध्ये, एखाद्या मुलाखतीमध्ये वगैरे मला ती कलाकृती कशी आधी दिसली होती, पात्रं कशी माझा झोपेतही पाठलाग करत होती, हे आणि ते- कितीही काहीही सांगितलं तरी आपण सगळं ओळखून असतो. मनातल्या मनात हसून आपण त्याच्यावर एक काट मारून बाजूला होतो.

अशा वेळी वाटतं, आधुनिक अभ्यासक म्हणतात ते बरोबर आहे. लेखक वेगळा, त्याची कलाकृती वेगळी. लिहिलं की लेखक मेला. वाचकापुरता संपला. त्याच्याशी आपला संबंध येऊ देऊ नये. आपण आणि कलाकृती एवढंच पुरेसं. त्याला कसं सुचलं, कुठे दिसलं… काय करायचंय? काय संबंध आपला? आपल्याला जे हवंय ते कलाकृतीत शोधावं, काय तो सर्जनशील अन्वयार्थ लावावा, त्याचा आनंद घ्यावा, निमूट बसावं; पण काय वाट्टेल ते झालं तरी लेखकापर्यंत जाऊ नये. ऑथर इज डेड फॉर मी. त्यामुळे आता मीच लेखक, मीच अभिकर्ता, माझीच ही कलाकृती… हेच मनाला समजवावं.

तुकोबा स्वत:च्या अभंगरचनांबाबत बोलताना आपलं कवित्व, आपली वाणी, आपले शब्द- स्वत:चं काहीच नसल्याचं सांगतात. ‘तुका म्हणे बोल माझा बोलतो विठ्ठल’ किंवा ‘करितो कवित्व म्हणाल हे कोणी, नव्हे हे माझी वाणी पदरची/ माझिया युक्तीचा नव्हे हा प्रकार, मज विश्वंभर बोलवितो’ हे तुकोबांचे शब्द आहेत. मला वाटतं, एखाद्या मोठ्या लेखकालाही हेच म्हणायचं असतं. मी लिहितो ते शब्द माझे नाहीत, तो अनुभव माझा नाही, ती पात्रं माझी नाहीत. मी निव्वळ प्रतिनिधी आहे तुमचा… न बोलणाऱ्या समूहाचा. मी तुमच्या वतीने लिहितो. युंग नावाचा मानसशास्त्रज्ञ म्हणतो, ‘तुमच्या नेणिवेतील व्यापार एक तर तुमच्या तीव्रतम इच्छा वा ध्यासांशी किंवा तुमच्या आसपासच्या घडामोडींशी संबंधित असतात.’ म्हणजे समजा, मी लेखक आहे आणि मला एक भयंकर स्वप्न पडलं आहे की… माझ्या देहाचं विघटन झालं आहे, माझे सगळे अवयव इतस्तत: विखरून पडले आहेत, मुंग्या एकेक अवयव घेऊन जात आहेत- असं काहीतरी… तर त्याचाही संबंध समाजात घडणाऱ्या किंवा या समाजाचा घटक असणाऱ्या माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या काही घटनांशी निश्चितपणे असू शकतो असे म्हणता येते. या घटनांमागील सूत्रांचा मला शोध घ्यायचा आहे, तो माझा ध्यास असू शकतो. म्हटलं तर हेच लेखकाच्या तिसऱ्या डोळ्याला दिसणारं काहीतरी. हाच त्याला होणारा स्वप्नातील दृष्टान्त. भविष्याचं किंवा वर्तमानाचं सूचन करणारा. त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा, काय अन्वयार्थ लावायचा, हे ज्याच्या त्याच्या कुवतीवर अवलंबून असतं.

थोडक्यात काय, तुम्हाला तुमच्या आंतरिक गाभ्यापर्यंत पोचायचं असेल तर आधी सामूहिक नेणिवेचा तळ धुंडाळावा लागेल. त्यासाठी तुमच्यातल्या लेखकाला त्याचा तिसरा डोळा उघडून संवेदनशीलतेनं जगाकडे पाहावं लागेल. त्यासाठी ‘तुम्हाला तुमचे हात चांदण्याहून पारदर्शक करावे लागतील’ हे नाही तरी आरती प्रभूंनी सांगून ठेवलंच आहे.

samwadpravin@gmail.com 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2021 12:06 am

Web Title: author third eye akp 94
Next Stories
1 मोकळे आकाश… : राईट-ऑफ
2 अंतर्नाद : अझान, गिनान आणि सोज-मर्सिया
3 पडसाद :  वस्तुस्थितीदर्शक विश्लेषण
Just Now!
X