19 February 2020

News Flash

आत्मचरित्र एक लिहिणे

गेल्या महिन्यात माझ्या वाचनात मराठीतली दोन उत्तम आत्मचरित्रे आली. एक अच्युत गोडबोले यांचे ‘मुसाफिर’ आणि दुसरे विजया मेहतांचे ‘झिम्मा’. त्यातच परवा एक विद्यार्थी म्हणाला, ‘सर,

| December 23, 2012 12:03 pm

गेल्या महिन्यात माझ्या वाचनात मराठीतली दोन उत्तम आत्मचरित्रे आली. एक अच्युत गोडबोले यांचे ‘मुसाफिर’ आणि दुसरे विजया मेहतांचे ‘झिम्मा’. त्यातच परवा एक विद्यार्थी म्हणाला, ‘सर, तुम्ही पण तुमचे आत्मचरित्र लिहा. सर्जरीतल्या प्रवासापासून पालिकेतल्या सुरस कथांचीही वर्णी लावा,’ आणि मी दचकलोच. आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलल्याशिवाय असे पुस्तक लिहिणे सोपे नाही. त्यातले काळ-वेळ आणि व्यक्तिनिहाय; प्रसंगानुरूप संदर्भ पाळणेही आवश्यक. ‘अरे, अजून मला खूप काम करायचे आहे,’ असे त्याला सांगून मी विचार झटकला आणि पुढच्या मीटिंगला बसलो, पण दातात अडकलेल्या खोबऱ्याच्या तुकडय़ासारखा तो विचार छळत होता.
साहित्यात आत्मचरित्राला काय स्थान आहे? ते ललित लेखन किंवा अभ्यासू समीक्षेच्या तुलनेत कोठे बसते, हे मला ठाऊक नाही, पण एखादे उत्तम आत्मचरित्र वाचकांना खूप काही देऊन जाते, हेच खरे. व्यक्ती ज्ञात असतेच, पण तिची दैनंदिनी वाचकांना उलगडते. त्या व्यक्तीची जडणघडण कोणत्या व्यक्तींच्या प्रभावामुळे आणि संस्कारामुळे झाली, हेही नजरेसमोर येते. जीवनातले प्रसंग; घडामोडी.. ज्यांच्यामुळे त्या व्यक्तिच्या कंगोऱ्यांची जडणघडण झाली, ते स्पष्ट होतात. विशिष्ट वेळी व्यक्ती तशी का वागली, या रहस्याचा भेद होतो.. कधी वादालाही तोंड फुटते.. तर काही मंडळी कायमची दुरावतात, पण तरीही.. आपण ज्याला आजवर आदर्श मानले त्याचाही प्रारंभ आपल्यासारखा सामान्य होता, हा दृष्टांत वाचकांना दिलासा देऊन जातो. आत्मचरित्रात अनेकदा दशकांपूर्वीची स्थळ-काळाची वर्णने डोकावतात. आज जेथे मॉल आहे; तिथल्या छोटय़ा वाणसामानाच्या दुकानात आपली उधारीची डायरी होती, ही स्मृती आपल्याच जीवनातले स्थित्यंतर दाखवते. अडचणी; संकटे सर्वानाच येतात. परमेश्वराने फक्त आपल्यालाच डाव्या हाताने वाढलेले नाही, हे कळते. अडचणी आल्यावर काय करायचे, याचा वस्तुपाठ मिळतो.
आत्मचरित्रातून अनेकदा व्यक्तीचे न पाहिलेले प्रतिबिंब दिसते.. कधी त्यामुळे त्या व्यक्तिबद्दलचा आपल्या मनातील आदरभाव शतगुणित होतो व कधी त्या प्रतिमेला थोडासा चराही जातो. प्रामाणिकपणा हे आत्मचरित्राचे बलस्थान असणे आवश्यक.
‘ढळला रे ढळला दिन सखया; संध्याछाया भिवविती हृदया,’ अशी ही सांजवेळ जवळ येऊ लागली की, आपणच आपल्या गत आयुष्याकडे त्रयस्थतेने पाहायला लागतो. जुने हेवेदावे सरलेले असतात.. हिशोब अर्थशून्य भासू लागलेले असतात; आणि तेव्हा उरलेल्या आयुष्याला एक नवा अर्थ प्राप्त झालेला असतो. आत्मचरित्र लिहिण्याची वेळ ही नेमकी तेव्हाची असावी.
अर्थात वाढल्या आयुर्मानाबरोबर विस्मरण आणि अल्झायमरचा शाप लाभलेला नसणे आवश्यक. ८६ वर्षे वय असलेल्या माझ्या वडिलांना सकाळचे दुपारला आठवत नाही. तर ८० वर्षांच्या मातोश्रींना ७० वर्षांपूर्वीच्या गोष्टीही मिनिट-टू मिनिट आठवतात आणि फोटोग्राफिक मेमरीच काय ‘थ्री-डी इमेजिंग’ फिक्के पडावे असे त्यांचे ती वर्णन करू शकते, हे व्यक्तिनिहाय फरक आहेत. अशा जबरदस्त आठवण असणाऱ्या माणसांनी जरूर आत्मचरित्र लिहावे; त्यातून केवळ व्यक्तीच्या आयुष्यातील बदलच नाहीत तर सामाजिक, राजकीय आणि नागरी परिवर्तनाच्याही प्रतिमाही पुढच्या पिढीला परिचयाच्या ठरतील.
माझ्या आईच्या मते, मी वडिलांच्या वळणावर गेलेला आठवणींचा खंदक असल्याने तूर्तास तरी आत्मचरित्र लिहिणे नाही. त्यापेक्षा एक चमचा च्यवनप्राश खाल्लेला बरा!.. पुढे-मागे मेंदू तल्लख ठेवायला उपयोगी पडेल.

First Published on December 23, 2012 12:03 pm

Web Title: autobiography writing
Next Stories
1 बाहेर खाताना.. जरा जपून!
2 निरोप
3 इतिहास घडवणारा पोलादी पुरुष
Just Now!
X