गिरीश पांडुरंग कुलकर्णी 

मराठी नाटय़-चित्रपटसृष्टीतील सामाजिक भान असलेले संवेदनशील कलावंत गिरीश कुलकर्णी यांचे मनमुक्त पाक्षिक सदर..

‘‘सर, मैं आगयेला हूँ। नीच्चे हूँ।’’

‘‘हो, हो, आलोच.’’

शिशिरातील पहाट. थंडी छान बाळसं धरून. पडून राहावं पांघरुणात गुरगुटून अशी प्रबळ ऊर्मी. प्रत्यक्षात गरम पाण्यानं स्नान आणि थंडी पळवून लावणं. जाणं महत्त्वाचं. खरं तर महत्त्व अस्थानी द्यायचंच कशाला? किंवा असतं असं काही महत्त्वाचं? उगाच चिंतन. च्यायला डोकं थांबतच नाही. तिनं दिलेला चहा गरम. येत नाही पिता वेळ लावल्याशिवाय. मनात घडय़ाळ भोवंडत भीती घालतंय. अखेरी लिफ्टचे स्प्रिंगा लावलेले दरवाजे अलगद मिटत पाळणा खाली आणला. खाली तो उभाच होता. सलसर स्वेटर. दाढी. अंगानं गबदुल.

‘‘अरे, झाएद! तू?’’

‘‘हां सर.’’

‘‘अरे, किती दिवसांनी! शेवटचे कधी रे भेटलो आपण?’’

‘‘मावशीच्या शूटिंगला. तुमी, ते परभळवळकर सर, आगाशे सर. झायलो होती.’’

‘‘हो आठवलं. बरेच दिवस झाले रे.’’

एव्हाना सामान गाडीत चढवून पट्टे लावीत आम्ही प्रस्थानसज्ज. फष्र्ट टाकला अन् सदाशिवपेठी दोन-चार कुत्री विस्कटली. खेकसली वस्सकन्. मला उगाच लिफ्टचा दरवाजा आपटला गेला असता तर काय घडलं असतं, त्याचा प्रत्यय येण्याचा भास. सरळ रस्त्यानं गाडी नव्या पेठेत.

‘‘लेफ्ट-राइट बता दो हां सर.’’

‘‘झाएद, किती र्वष राहतोस रे पुण्यात- आँ? ड्रायव्हरचा व्यवसाय करायचा तर रस्ते ठाऊक नकोत? डावी घे.’’

‘‘नाही सर, ते मला एक्सिडेंट झाला होता ना, त्याच्यामुळं माझी मेमरी गेलीये. म्हंजे नाय का, बाकी आटवतं, पन काय काय नाही आटवत. शॉट्टम मेमरी लॉसे.’’

‘‘हो- हो. माहितीये मला. सांगितलंयस तू.’’

‘‘हॅ हॅ हॅ हॅ! सांगितलंय? विसरलो बगा.’’

मागल्या खेपेलाच त्यानं इत्थंभूत हकिकत बयाँ केली होती.

‘‘वो मैं एक्टिवापे जारेला था. स्पीड भी न क्या तीस-चालीस रहेंगा. इत्तेमें अचानक एक न क्या लेडीस, ऐसे बोळ में से आयी और मेरेको देखके उस्को ऐसा सुदराच नयी कुछ और सीध्धे आके मेरेको ठोकी. मैं ऐसा न क्या साइडपे गिरा और वोईच घबराके चिल्ला रहेली.. हॅ हॅ हॅ हॅ.. ख्यॅक्.’’

‘‘फिर?’’

‘‘तो मेरेकोयना वो फुटपाथ का कोना ऐसा कान के नीच्चे लगा. चक्कर आरेला था. फिर भी मैं गाडी उठाके साइड में लिया. पब्लिकबी न क्या पानीबिनी पिला रहेली और वो औरत को डाँट रहेली है. और फिर मेरेको कुछ सुदराच न. मैं न क्या डायरेक्ट हॉस्पिटलमेंच जग गया.’’

‘‘बाप रे! मग?’’

मग त्याचं काहीतरी ऑपरेशन कसं झालं, २६ दिवस तो कोमात कसा झोपून होता, घरचे सगळे हवालदिल वगरे न क्या सब बताया था झाएदने. मला पक्कं आठवत होतं. अर्थात दुहाई द्यावी असं काही स्मरण नाही उरलं माझं. म्हणजे अनेकदा सांगत असलेला मुद्दा विसरून भलभलतं बोलणं, अत्यंत प्रेमानं भेटत असलेल्या माणसाचं नावच न आठवणं, तिनं वळण लावण्याकरिता म्हणून सांगितलेलं काहीच लक्षात न राहणं इत्यादी चित्रं माझ्या स्मृतीची. मी तिला एकदा म्हटलोही बहुधा.. ‘‘अल्झायमर्स तर नसावा?’’ पण तुम्ही ‘हा सूर्य, हा जयद्रथ’ करायला जाऊ नका. मराठी असलात म्हणून लगेच स्मृतीतच रंजन शोधायचं कारण नाही.

‘‘वो गजनी पिच्चर जैसा न क्या? बीचमेंच याद आनेका और बीचमेंच नै.’’

‘‘पण मग कुटुंबीयांना फारच त्रास झाला असणार रे.’’

‘‘हां सर. उनकी दुवांओसेच मैं बचेला न क्या! मेरी वाईफ ने भौत किया. अभी सब ठीक है वैसे.’’

‘‘झाएद, मैं बोलता हूँ के तू अभी पूरा ठीक है. तू खालीपिली अ‍ॅक्सिडेंट हुआ था ये बात को पकड के बठेला है. उसको भूल जा, कोई प्रॉब्लेम न आयेगा.’’

‘‘ए.. झोपला काय? झोपला बगा साहेब हा.. हॅ हॅ हॅ हॅ.. ख्यॅक्.’’

टोलवसुली कारकून जाळीच्या कोनाडय़ात देह आक्रसून डुलकला होता. झाएदला लहान पोरागत हसू आलं. टोल भरून एकदाचा गाडीसह रस्ता सह्यद्रीच्या कुशीत शिरला तसं मी म्हटलं,

‘‘मी जरा डोळे मिटतो रे. चालेल ना?’’

‘‘तुमाला चा नाई प्यायचा?’’

‘‘नाही रे, आत्ता थोडी झोप हवीये मला.’’

‘‘मी चहाला थांबीन सर मॉलला. मी घरून निघताना चा नाय पिला.’’

‘‘बरं, पण मला उठवू नकोस.’’

‘‘मी एक आवाज दील. जागे असले तर चहा घ्या.’’

‘‘अरे, नकोय मला चहा. आणि तूही लवकर आटप.’’

‘‘हो सर.’’

‘ट्टिटरटय़ांव डय़ांव.. ट्रीर्टीयवं डिश टॅक टीटीटय़ांव टीटीटय़ांव डय़ांव..’ असं काहीतरी वाजायला लागलं. मी चमकून कानावरची शाल बाजूला करून पाहिलं.

‘‘ते बंद कर पाहू संगीत.’’

‘‘रेडिओ ए.’’

‘‘तेच ते. बंद कर. झोपायचंय म्हटलं ना!’’

‘‘मला न का सर, कितीबी म्युजिक लावलं ना तरी झोप येते.. हॅ हॅ हॅ हॅ.. ख्यॅक् ख्यॅक्.’’

‘‘ऑ! मग तरी का चालू केलंयस?’’

‘‘म्हंजे श्टेरिंगवर असलं का नाय; पन घरी असलो की मग येते झोप. तुमी झोपा. हे घ्या.’’

त्यानं प्लॅस्टिकची कानाला लावायची पट्टी माझ्या दिशेनं पुढं केली.

‘‘हे काय?’’

‘‘एक नंबरे सर! थंडी लगीच गुल होती.’’

‘‘तुला?’’

‘‘एकचे ना सर! मला कुठं झोपायचंय? तुम्ही लावा.’’

बोरघाटाची वळणं लागायच्या आधीच विचारांची पाघळ सुरू झाली. काय काय अन् कधी कधीचं आठवतं प्रवासात. अनेकदा विसरावंसं वाटलेलं स्मरण हटकून जागा सोडत नाही. नवं साचत राहतं उलट. सीटं भरल्यागत. आता हा झाएद! बसला अडकून. गाडी बोगद्यात शिरली तसे अनेक आठव टांगलेल्या दिव्यांगत क्षणकाल चमकून लोपले. सारेच प्रकार. साजरे काही. काही ओझ्याचे. काय करायचंय काय स्मृती साठवून? उगा प्रत्येक नव्या क्षणावर न जगलेल्या काळाचं ओझं लादायचं कशाला? यानंच निरागस राहता येईल. अनुभव, शहाणपणा जावा सगळा चुलीत. हसू तरी येईल निर्मळ. तसंही कुठं काय घडतं मानवी व्यथेच्या वा कल्याणाच्या बाबतीत? पुढेमागे दुडकी चाल. कधी मागल्या काळाबरहुकूम संहार अन् सूड, तर कधी नव्याची बेगुमानी. केले की अनेकांनी विचार. माणूसपणाचं लक्षण जागृत ठेवणारी आहेत की अनेक. आजकाल तर ती सारीच बोलभांड बोलत राहतात. त्यात कसलं आलंय अप्रूप? व्हायचंच असेल यंत्र आमचं, तर निदान हसून कुतूहल जागृत ठेवू.

रँगरँग रँगरँग लय पकडीत टायरसह डोकं गरागरा धावतंय.

‘‘अच्छाच हो गया न झाएद पर एकतरह से..’’

‘‘जागेच का तुम्ही अजून? हॅ हॅ हॅ हॅ.. ख्यॅक् ख्यॅक्.. लाऊ का रेडिओ? चांगली झोप लागती.’’

‘‘अरे, पण तुलाही लागेल ना!’’

‘‘श्टेरिंगपे न ना लग्ती सर. बोला ना मैं.’’

‘‘हे बरं लक्षात रालं रे? शॉट्टमच आधी बोल्ला होतास ना?’’

‘‘हॅ हॅ हॅ हॅ.. वैसा कुछ भरोसा न हैं. वो न क्या सामनेवाला टरक कब्बीबी लेन बदल सकता ना? वैसाच. कुछ कुछ रह जाता याद में, कुछ कुछ निसट जाता.’’

‘‘पण मग अशी कुठली गोष्ट आठवते रे अ‍ॅक्सिडेंटआधीची?’’

‘‘मेरी माँ सर! वैसे तो और भी कुछ कुछ याद आता.. पर माँ न क्या हलतीच न आँखो के सामने से.’’

‘‘अच्छा..?’’

‘‘हां सर, वो न क्या मेरे हात में जान छोडी.’’

‘‘काय?’’

‘‘हां सर, उसको ना हाथीपाँव हो गया था सर.. तो एक दिन न क्या भौत दुखरेला करके मेरेको हॉस्पिटल लेके चल बोली..’’

झाएद त्याची आठवण सांगण्यात रंगून गेला. रिक्षा आणली. माऊलीचा पाय उचलेना. खुर्ची आणवली. पाणी पाजलं. आणि या निरागस लेकराच्या कुशीत शिरून अम्मी चल बसी. डोळे झरतात. ते सहजी झरावेत म्हणून का हे आठव रुतून बसतात सीट पकडून, पट्टा लावून? कदाचित!

बहरहाल, झाएद ये सब सोचता न। जानके कुछ भूलता न।

खरं तर त्याला सांगायला हवं, की मला सारं आठवतं. अम्मीची गोष्टही. ऐकून ऐकून पाठ झालीए. पण मी सांगणार नाही. झाएदला सांगितल्याचं आठवणार नाही. त्याच्या आठवणींमुळे मी जागा मात्र राहतो. डोळे गाळून जिवंत असल्याचा भास होत राहतो. आमची गाठ पडत राहील. काळ मागे सरत राहील. नवं त्याला स्मरत नाही. माझं जुनं सुटत नाही.

बहरहाल, सकाळ धुरकटून मुंबईच्या घाईनं येते. पाखरं एव्हाना हायवे धरत चौखूर उधळलेली. वाहनांच्या आवाजांना काळाचा संदर्भ नाही. कोवळ्या पहाटेचा काहीच आब न ठेवता ते कानी किटतात. त्या आवाजी जगात अनेक मूक आठवणींनी प्रेरित माणसं दशदिशा धावताना दिसतात.

‘‘किधर जारेईले होते सारे लोग क्या मालूम?’’

‘‘अं?’’ तंद्री मोडत मी झाएदला प्रतिसाद देतो.

‘‘बम्बई में न क्या कब्बीबी ट्रॅफिक रैताच. इसलिए बोला. रातको, सुबाको लोग आपने जारेले. इधरसे उधर. हॅ हॅ हॅ हॅ ख्यॅक् ख्यॅक्.. और वो भी घाईघाईमें न क्या?’’

‘‘त्यांना आठवत असेल काही महत्त्वाचं!’’ मी स्वत:शीच पुटपुटल्यागत.

दृष्टी खिडकीबाहेरचे एव्हाना गर्दी झालेले चेहरे पाहण्यात दंग.

‘‘यांना शॉट्टम मेमरी लॉस झाला तर रे?’’

‘‘सबको?’’

‘‘हां?’’

‘‘क्या मालूम? घाई कम होंगी. साइड देंगे एक-दुसरें को न क्या!’’

ख्यॅक् ख्यॅक्च्या तालात गाडी हिंदकळत मुक्कामी पोचते. मला सोडून तो उलट पावली परत निघतो. वळणाआड दिसेनासा झाल्यावर कानाची पट्टी हातातच राहिली याची जाणीव होते. मला काळजी वाटते. झाएदला पट्टी विसरल्याचं आठवणार नाही. मला लक्षात ठेवायला हवं. पुढच्या भेटीत पट्टी आठवणीनं परत करायला हवी.

बहरहाल,

रस्ते सरतात, चित्रे हलतात

निळ्या खुळ्या समजुती

ख्यॅक् करीत हसतात

प्रवास चालू आहे, चालूच राहणार

डोळ्यातल्या जळी औदुंबर पाय सोडून बसणार!

girishkulkarni1@gmail.com