17 July 2019

News Flash

जांभूळ आख्यान

बहरहाल

(संग्रहित छायाचित्र)

गिरीश पांडुरंग कुलकर्णी 

तर बरं का, दोन बारकी पोरं होती. बारकी म्हंजे किती बारकी, तर पुढय़ातली पत्रावळ कावळा चोचीत धरून उडून गेला तरी कळायचं नाही. किंवा एकावर एक उभी केली तर बापूंची पैरण खुंटीवरून काढता यायची नाही. किंवा गुडघ्यावर बसवली तर आचळानंच दूध पितील इतकी बारकी. बरं बारकी तर बारकी, पण बेरकी किती म्हनाल? तर, अबाऽबाऽबा! गावावर जरब असलेल्या माईआजीनंही बोटं तोंडात घालावी असे एकेक पराक्रम. अर्थात, दोन्ही अगदीच एकसारखी नव्हती बरं. एका गावचीपन नव्हती. एकमेकांची भावंडं मात्र होती. त्यातलं एक .. काय बरं नाव ठेवू या? ‘गंप्या’! हं, तर गंप्या शहरात शाळेत ज्युनियर केजी का काय ते शिकायला आणि दुसरं.. आता याचं नाव ठेवू- ‘झंप्या’! तर, झंप्या तितंच म्हंजे गोष्ट घडली त्या गावातच हातभराचं गुडघ्याएवढं झालेलं. गाव तालुक्याचं. घर वर्दळीचं. मोठा बारदाना. चुलते, चुलत्या, आत्या, आज्या, पोरंटोरं, गाई, म्हशी, बैल, बिस्तरा.. सगळंच. दोन चौकी वाडय़ातला कालवा नदीला ऐकू जायचा. बापू प्रतिष्ठित वकील. त्यामुळं पक्षकार, कास्तकार कज्जे लढवायला ओसरीवर गर्दी करून. घरातल्या आया, मावशा, काकवा, आत्या सैपाकात अन् धुण्याभांडय़ात करकचलेल्या. वडील, चुलते, दादा शेतात, दुकानात, हापिसात वा शाळेत. स्वत:च्या पायांनी चालनाऱ्या आणि स्वत:च्या हातांनी खानाऱ्या गुडघ्याएवढय़ा बारक्यांना रोजच १५ आगश्ट!

दिवस उन्हाळी सुटीचे. अहो, म्हणून तर ते गंप्या गावात आलंय मालक! मग? त्याच्या माई आजीचं घर आहे. आजोळ काय नाय, पण त्याच्या वडिलांची मावशी लागती माई आजी. दर सुटीला रातरानीनं येतंय पुन्याहून. अशा काय फार सुटय़ा नाही झाल्या, पन दरसाल येतंय खरं. आलं की चुरुचुरु बोलून सगळ्यांकडून लाड करून घेतंय. त्याच्या बोलन्यातला ‘ण’ ठन्न वाजतोय. जो तो कौतुकानी गालगुच्चे घेतो. काय काय पक्षकार तर बारक्याला नंदीबैलागत नाचवून घेत्यात. एखांदी लिमलेट तळहातावर चिटकवली, की गंप्या चावी दिलेल्या भावलीगत बोलतंय, नाचतंय. गोबऱ्या गालाचं अन् कोरडय़ा नाकाचं गंप्या म्हैनाभरात पंद्रा-वीस रुपायचा गल्ला जमवतंय. सुटी संपवून निगताना खिशातला खुर्दा खन्खन् वाजतोय, पन भाषेतला ‘ण’ नदीच्या पान्यात गढूळतोय अन् एक-दोन आठवडे ज्युनिअर केजीतली पोरं फॅऽऽ करीत हसत्यात गंप्याच्या बोलन्याला.

एक नंबर उलट झंप्या! नाकातल्या तुपाच्या घान्याची धार अन् कमरेवरची चड्डी वर खेचता खेचता झंप्याची चाल दुडकी व्हतीय. बोलनं फार नसलं, तरी टबूनं डोळं एकटकीनं काय काय पाहत ऱ्हात्यात. नीट न्याहाळलं, तर बेरकीपनापन दिसंल कुनाला. अंगानंपन जरा डबलहाडीच. वयानं बारकं असलं, तरी बाकी पोरांपेक्षा ईतभर उंचच भरंल. भीती म्हनून कसली न्हाई. चौथीतल्या पोराचं नाकाड फोडनं आसू द्या, नाय तर गटारातली आडदांड लेकुरवाळी डुकरीन हुसकनं आसू द्या; झंप्या सगळ्यात फुडं! माई आजीनंतर कुनाची असलीच तर झंप्याची दहशत. पूर्न तालुक्यात फेमस. एखांदं कारटं ईदरटावानी वागलं, की आया ‘झंप्या चावलं काय मेल्या’ म्हनत बडवायच्या.

तर बेहेराल, या दोन बारक्यांचा जानी दोस्ताना. झंप्या गंप्याला घ्युन गावभर फिरायचं. ‘माजा भौ ए’ म्हनत भाव खायचं. अन् झंप्या कुटंकुटं घ्युन जातंय म्हनून गंप्या खूष असायचं. कदी नदीकडं, कदी तैसील हाफीसच्या मागच्या आवारात, कदी केशवकाकाच्या दुकानी, तर कदी एश्टय़ा बघायला श्टँडात. तालुक्याचं असलं, तरी गाव तसं बारीकच. या बारीकरावांची जोडी कुटंही गेली तरी कुनीन्कुनी घरी आनून सोडील म्हणून घरची निच्चींतीनं जाऊ  द्यायची. एकेक पंद्रा आगश्ट साजरा करीत ही बारकी नवनवी करामत करत ऱ्हायची. तिन्हीसांजच्या आत हातपाय धुन ‘शुभंकरोती..’ म्हनली, की दिस गोड व्हायचा!

तर बरं का, आसंच एका दुपारी गावठी आंब्याचा रस, भजी कुरडयाचं तळन, कैरीकांद्याची चटनी अन् पालकाचा मुद्दा खाऊन घर लवंडल्यालं. बारकीपन दडपून झोपी घातल्याली. झंप्या काईच कुरकुर न करता झोपायचं. पडल्या पडल्या बाया ग्वासीप हानाय लागल्या, की उलटं खवळायचं अन्- ‘‘अशानं भाएर वसरीवरच जाऊन झोपतो,’’ असा दम द्यायचं. ‘‘ह्यचा भारी बै धाक,’’ असं म्हनत माऊल्या डोळ्यावर पदर वडायच्या. बाऽऽस. झंप्याचं टबूनं डोळं बारीक नजर ठय़ून असायचे. जरा आयामावशा घुर घुर करायला लागल्या, की लगीच ते पायानं गंप्याला ढोसरायचं आनि दोघं मांजराच्या पावलांनी चवडय़ावर तरंगत माजघरातून निगायची ते थेट वाडा वलांडल्यावरच जिमिनीला टाच लावायची!

तर, त्या दिवशीपन शेमटूशेम भाएर आली दोगं. हातातल्या चपला रपकन् आपटत झंप्या पळत सुटलं नदीकडं. गंप्या शँडलचं बंद बांदीस्तवर त्यानं भास्कर भटजीचा वाडा वलंडला व्हता. मग गंप्यानंपन शाळेतली रेशिंग आटवली अन् चिंगरिंग पळालं मागं. नदीवर आली तर फार कोन नवतं. एक गाडीवान पान्यानं टिपाडं भरून भाऊ  डाक्टरच्या बांदकामाकडं निगाला व्हता. कुसाभाएरली एक दोन पोरं बेडकं का काय पकडत व्हती. कुनी पवत व्हती. व्हय राव, ऐन उन्हाळ्यात पानी व्हतं नदीला! खोटं कशाला सांगू? व्हय व्हय, मराठवाडय़ातलंच गाव अन् तरीबी पानी व्हतं नदीला! जूनी गोष्टंय ओ!

तर बरं का, तेवडय़ात झंप्याला बागवानाचा सलीम्या गडी दिसला. सलीम्या हेऽऽ दांडगा गडी. पन बोलायला तोतरं. नदीपलीकडून टप्पोरी जांभळं घेऊन आलतं. आनि आता पान्यात धून पाटीत गोल पानं मांडून हारीनं रचत हुतं. गंप्यानंबी एव्हाना जांभळं बगीतली व्हती. त्येच्या तोंडाला नदीबरुबर पानी. त्ये झंप्याला म्हनलं, ‘‘माग की दोन-चार.’’

‘‘नाय, त्ये नाय देनार सलीम्या..’’

‘‘विचारून तर बघ.’’

‘‘येवडं वाटतंय, तर तू जा की ईचार.’’

‘‘एऽऽऽ मामा, दोन-चार जांबळं देता का?’’ गंप्यानं तोंडचं पानी सावरत आरडून ईचारलं.

सलीम्यानं एकदाच जांभळं भरलेला तळहात डोळ्यापाशी नेत तिरीप चुकवत बगीतलं आणि ‘‘च्यॅक’’ असा आवाज काढीत कामात गुंतलं ते.

‘‘त्येला पैशे लागतीन,’’ झंप्यानं व्यवहार सांगितला.

‘‘माझे जमलेले आहेत की!’’

‘‘कुटं? आईकडं?’’

‘‘हो.’’

‘‘चल, मग जाऊ  आनुत आठाने.’’

आल्या पावली चिंगरिंग करत बारकी वाडय़ावर.

गंप्या हळूच आईपाशी लवंडलं. तिच्या पोटावर हात टाकून कानात बोललं, ‘‘आईऽऽ, माजे पैशे दे ना.’’

‘‘अंऽऽऽ काये रे? पडू दे की जरा.’’

‘‘आठाणे दे ना.’’

‘‘गपचूप झोपतोस का आता? गारेगार खाल्ल्यानी खोकला होतो.’’

‘‘गारेगार नाही जांबळं..’’ असं गंप्या म्हननार तेवढय़ात उंबऱ्यावर उभं ऱ्हाऊन खुना करनाऱ्या झंप्याकडं त्यानं पालं. झंप्या डावा डोळा दाबत निगून यायची खून करत व्हतं. गंप्या आईच्या कुशीतून सरपटतच निसटलं. आल्लाद भाएर आलं. झंप्या त्येला वसरीवरच्या बापूंच्या खोलीकडं घ्युन गेलं. खुंटीला पँट अडकवल्याली व्हती. झंप्यानं हरनाच्या मुठीच्या काठीनं आल्लाद पँट खाली काडली. खिशात हात घालून मूठभर चिल्लरखुर्दा चड्डीच्या खिशात भरला अन् पँट पुना अडकवून दोगं धपापत्या उरानं भाएर आली. वाडय़ाभाएर आल्या आल्या ‘घ्याँऽऽऽ घ्याँऽऽऽ’ असा गाडीचा आवाज काढीत नदीकाठी सलीम्यापाशी आली.

‘‘सलीम्या, आठाने के द्येव,’’ झंप्यानं दोन चाराने पुढे करीत म्हटलं. सलीम्या चपापला.

‘‘क् क् किसने दिया रे पैसा. चूर चूर चूर..’’ – त्याच्या या चुरचुरीला बारकी फिस्कारली, तशी रागानं त्याला शब्द फुटला, ‘‘चुराके लाए क्या?’’

‘‘खाऊचेच हैं इसके.’’ झंप्यानं नवलाईच्या विनम्रतेनं सांगितलं. डोळंही आक्रसलं.

‘‘द्-द्-देखो, झू-झू-झूठ बोलन्नेका नै, नै त्-त्-तो अल्ला त्-त्-त्-तुम्हारी ज्-ज्-जबान तोतऽऽली करेगा.’’

‘‘नै झूठ नै, शप्पत!’’ झंप्यानं एकदम केविलवाना चेहरा केला- ‘‘ये पुन्याहून आलाय. त्येला जांबळं मिळत नाय तिकडं. म्हनून खायचेत.’’

झंप्याच्या या चलाखीनं गंप्या हरखून गेला व्हता. पन जबान तोतरी व्हील म्हनून गप्प बसला व्हता. अखेर, ‘‘देखो हाँ, माई मेरेकु डाँटेगी’’ वगैरे काचकूच करत सलीम्यानं ओंजळभर जांभळं बारक्यांना दिली. दोगांनी तिथंच नदीवर बसून फस्त केली. लईच ग्वाड व्हती जांभळं. बारकी जाम खूश झाली. दोगांनी भरपेट पानी पीलं आनि मग जरा त्या बेडूकमार पोरांत रमून माघारी परतली. येताना गंप्यानं ईचारलं, ‘‘कुनाला कळनार नै ना?’’

‘‘न्हाई. आपन उरलेली चिल्लर ठय़ून द्यू परत.’’

‘‘हाँऽऽऽ’’ म्हनत गंप्या आश्वस्त झाला.

वाडय़ावर एव्हाना संध्याकाळची लगबग उडाली व्हती. आया-मावशा पदर खोचून घरभर फिरत व्हत्या. माई आजीची खुर्ची वसरीवर मांडली व्हती. आजी दमादमानं चालत यून माळ वडत बसली व्हती. आत येतानाच तीनं बारक्यांना पालं.

‘‘हिकडं या रे दोगं,’’ तिनं आवाज दिला.

बारकी तिच्याफुडं जाऊन उभी ऱ्हायली.

‘‘जांभळं कुनी दिली?’’

पहिल्याच प्रश्नानं बारकी पार चकित झाली.

‘‘कुनी न्हाई,’’ झंप्या हटला न्हाई.

‘‘खरं सांग, तू सांग रे गंप्या,’’ माई डाफरली.

‘‘अं! नाई..’’

‘‘हे पा, खरं सांगितलं तर बंदा रुपया दीन.’’

बारक्यांनी एकमेकांकडं पालं. हिला कसं कळलं, याचा उलगडा दोगांलाबी व्हत नव्हता. बारकीच ती. शर्टावर जांभळानं रंग भरलाय कुटलं ध्यानात यायला! माईनं जरा दरडावलं तसं झंप्या म्हनला, ‘‘सलीम्यानं दिली.’’

‘‘फुकट?’’

‘‘हाऽऽ’’ आसं झंप्यानं म्हनताच, गंप्या रडाय लागला. आता झंप्याची जबान तोतरी व्हील म्हनून त्यानं समदं खरं खरं सांगून टाकलं. झंप्याला लय मार पडला. गंप्याला रुपायची कमाई झाली. रात्री हळूच झंप्याजवळ जात डोळ्यांत पानी काडून गंप्या म्हनला, ‘‘तू तोतरा होशील म्हनून मी.. चुकलं?’’ आनि रडाय लागला.

तशी झंप्यानं दोनी तळहातांनी त्याचं डोळं पुसलं.

‘‘आसूं दे. उद्या रुपायची खारीमुरी खाऊ.’’

दोगं एका पांगरुणात गुरगुटली तवा आया-मावशांचं गुराळ चालू व्हतं. रातकिडय़ावानी किरकिर निस्ती!

बहरहाल, परवा अचानक जांभळीखाली बसण्याचा योग आला. गंप्या-झंप्याची गोष्ट आठवली. बारकी आता बरीच मोठी झालीएत. मोठी म्हणजे किती? तर, दोघांना आता दोन-दोन बारकी आहेत. गंप्या कुठल्या तरी कंपनीत कामाला आहे. बायकोशीही खरंच बोलतो म्हणे. खरं बोलून मिळालेल्या रुपयाशिवाय विशेष कमाई काही नाही. त्या रुपयाची

आणि तोतऱ्या जबानीची गोष्ट त्याच्या बारक्यांना सांगतो म्हणे. झंप्या मात्र कुठल्याशा चॅनेलवर पत्रकार आहे. खूप प्रसिद्ध झालाय म्हणे. खरं खोटं ओरडत असतो दिवसभर त्या खोक्यातून. जबान तोतरी तर नाहीच, उलट उर्मट झाली आहे. अहो, खरंच सांगतोय. खोटं कशाला सांगू?

girishkulkarni1@gmail.com

First Published on March 10, 2019 12:50 am

Web Title: baharhal article by girish pandurang kulkarni 3