|| प्रकाश मगदूम

येत्या १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळकांचे स्मृतीशताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने- लोकमान्य टिळकांनी चित्रपटकलेच्या उगमापासूनच चित्रपटांची समाजप्रबोधनाच्या कार्यातील उपयुक्तता द्रष्टेपणाने जाणली होती. त्यांच्या या द्रष्टेपणाचा वेध घेणारा लेख..

Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
Sri Swami Samarth Maharaj s prakat din Celebrations to Commence in Akkalkot with Religious and Cultural Programs
श्री स्वामी समर्थ प्रकटदिनी अक्कलकोटमध्ये धार्मिक कार्यक्रम
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या सुरुवातीच्या काळात मोठय़ा संख्येने लोकांना सहभागी करून घेण्याचे तंत्र जर कुणाला जमले असेल तर ते लोकमान्य टिळकांना! जनमानसाची नस ओळखून त्यांना कशा प्रकारे चळवळीत सामावून घेता येईल याचा लोकमान्य कायम विचार करायचे. शिवजयंती आणि गणेशोत्सव सार्वजनिकरीत्या साजरी करण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे काही मूठभर लोकांपुरत्या आणि केवळ शहरांमध्ये मर्यादित असणाऱ्या स्वातंत्र्य चळवळीचा जनाधार व्यापक झाला. परंतु टिळक एवढय़ावर स्वस्थ बसणारे नव्हते. वेगवेगळ्या लोककलांचा उपयोग आपल्या उद्दिष्टासाठी कसा करता येईल यावर त्यांचे कायम लक्ष असायचे. म्हणूनच नानासाहेब जोगळेकर या त्यांच्या विद्यार्थ्यांला ‘किलरेस्कर नाटक मंडळी’ या प्रसिद्ध नाटक कंपनीत प्रवेश घेण्याविषयी टिळकांनी प्रोत्साहन दिले. टिळकांच्या आशीर्वादामुळेच नारायण श्रीपाद राजहंस हे ‘बालगंधर्व’ कसे झाले याची गोष्ट तर सर्वश्रुत आहे. अनेक नाटकांच्या प्रयोगांना टिळकांनी जातीने हजेरी लावल्याचे दाखले मिळतात. त्यामुळे नव्यानेच आलेल्या चित्रपटकलेकडे टिळकांचे लक्ष न गेले तर नवलच!

‘राजा हरिश्चंद्र’ हा दादासाहेब फाळक्यांचा १९१३ सालातील पहिला चित्रपट गावोगावी दाखवला जात असे. परंतु दुर्दैवाने त्याची प्रत नष्ट झाली. त्यामुळे फाळक्यांनी हा चित्रपट जवळपास सारे कलाकार तेच ठेवून पुन्हा १९१७ साली नव्याने बनवला. सध्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात उपलब्ध असलेली दोन रिळांची ‘राजा हरिश्चंद्र’ची प्रत ही १९१७ सालची आहे.

पुण्याच्या आर्यन थिएटरमध्ये ३ एप्रिल १९१७ रोजी ‘राजा हरिश्चंद्र’ प्रदíशत झाल्यानंतर दादासाहेब फाळके यांनी एक पत्रक काढून जनताजनार्दनासमोर आपली कैफियत मांडली. सिनेमाच्या धंद्यापायी यश मिळूनसुद्धा हजारो रुपयांच्या कर्जामध्ये अडकलेल्या फाळके यांनी देशबांधवांसमोर मदतीचे गाऱ्हाणे मांडले. यावर ‘केसरी’च्या १० एप्रिलच्या अंकात ‘पत्रकर्त्यांच्या स्फुट सूचना’ या सदरामध्ये मनोगत व्यक्त करण्यात आले. त्यात फाळके यांनी सिनेमा या नवीन कलेमध्ये मिळवलेल्या प्रावीण्याची प्रशंसा करून ‘केसरी’कार म्हणतात की, ‘करमणूक आणि शिक्षण या दोन्ही अर्थाने सिनेमाने हिंदुस्थानात टाकलेले पाऊल परत फिरेल असे वाटत नाही. सिनेमाची थिएटरे व  चित्रपट तयार करणारे कारखाने या दोहोंवर होणारा खर्च व त्यापासून होणारे उत्पन्न यांचे परदेशातील आकडे लक्षात घेता हिंदुस्थानातून तत्प्रीत्यर्थ दरसाल हजारो- किंबहुना, लाखो रुपये परदेशी जात राहणार हे उघड आहे. हा सर्व प्रवाह जरी न थांबवता आला तरी हिंदुस्थानात फाळके यांचा हा कारखाना किंवा त्या प्रकारचे इतर कारखाने मजबूत पायावर उभे करता आले तर काही अंशाने ते थांबवता येईल व शेकडो देशी मजुरांस व कारागिरांस नवीन धंदा मिळवून दिल्यासारखे होईल हे उघड आहे. रा. फाळके यांनी उपस्थित केलेला अवघड प्रश्न अमुकच रीतीने सुटेल असे जरी सांगता येणे कठीण असले तरी कोणत्या रीतीने का होईना, पण तो सुटो अशी आशा त्यांच्या इतर हितचिंतकांप्रमाणे आम्हीही करतो.’

त्यानंतर लगेचच म्हणजे १७ व १८ मे रोजी मुंबई प्रांतिक परिषदेचे अधिवेशन नाशिक येथे भरले. त्यावेळी फाळके यांनी लोकमान्य टिळक आणि दादासाहेब खापर्डे यांना आपल्या घरी आमंत्रित केले. तेथे आपल्या सिनेमाच्या कारखान्याविषयी फाळक्यांनी अतिशय कळकळीचे निवेदन सर्वासमोर मांडले. टिळकांनी त्यांचा कारखानाही पाहिला. या सर्व घटनेचा परिणाम म्हणून तिथे उपस्थित असलेल्या दोन-तीनशे प्रतिनिधींपकी शक्य तितक्या लोकांनी तिथल्या तिथे फाळके यांना आíथक मदत देऊ केली. ‘केसरी’ व ‘संदेश’ (अच्युत बळवंत कोल्हटकर) या वृत्तपत्रांतून आलेल्या आवाहनामुळे एका चित्रपटाची निर्मिती करण्याइतके पसे फाळके यांच्या हाती आले आणि त्यामधूनच ‘लंकादहन’ हा पुढील मूकपट निर्माण होऊ शकला!

त्यानंतर काही दिवसांनी लोकमान्य टिळक, शेठ मनमोहनदास रामजी, शेठ रतन टाटा इत्यादी लोकांच्या डायरेक्टरशिप खाली ‘फाळकेज् फिल्म लिमिटेड’ स्थापन करण्याचे निश्चित झाले. जया दडकर यांच्या ‘दादासाहेब फाळके : काळ आणि कर्तृत्व’ या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे काही कारणांमुळे हा बेत सिद्धीस गेला नाही. त्यानंतर १९१८ मध्ये वामन श्रीधर आपटे, लक्ष्मण बळवंत फाटक, मायाशंकर भट्ट, माधवजी जेसिंग आणि गोकुळदास दामोदर या उद्योजकांबरोबर फाळके यांचे भागीदारीचे करार झाले आणि ‘हिंदुस्थान फिल्म कंपनी’ जन्मास आली. यावेळी फाळके यांनी टिळकांना पत्र लिहून या भागीदारीविषयी सांगितल्याचे उल्लेख आहेत. ऑगस्ट १९१३ मध्ये पुण्यात ‘राजा हरिश्चंद्र’ (पहिला) प्रदíशत झाला. त्यानिमित्ताने फाळकेंचा मुक्काम पुण्यात असताना ‘केसरी’मध्ये त्यांची मुलाखत ‘स्वदेशी हालती चित्रे’ या नावाने प्रसिद्ध झाली होती.

१९१२ मध्ये श्री. ना. पाटणकर, व्ही. पी. दिवेकर आणि ए. पी. करंदीकर यांनी एकत्र येऊन ‘पाटणकर युनियन’ या फिल्म कंपनीची स्थापना केली. ‘सावित्री’ या पौराणिक चित्रपटाची निर्मितीही त्यांनी सुरू केली. परंतु चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतरही काही तांत्रिक चुकांमुळे हा चित्रपट पूर्णत्वास गेला नाही. हार न मानता त्यांनी आपले प्रयत्न चालूच ठेवले. त्यावेळी लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून भगवानदास चतुर्भुज आणि धरमदास नारायणदास यांनी ‘पाटणकर युनियन’ला १५,००० रुपये कर्ज दिले. त्यावर भागवतातील जैमिनी-व्यास कथेवर ‘जैमिनी / इंद्रिय श्रेष्ठ की विद्या / पॅशन्स व्हस्रेस लìनग’ हा चित्रपट त्यांनी तयार केला. त्यानंतर त्यांचा ‘नारायणराव पेशवे यांचा वध’ हा ऐतिहासिक चित्रपट प्रदíशत झाला. त्यानिमित्ताने ‘केसरी’ने १६ नोव्हेंबर १९१५ च्या अंकात कौतुक करताना म्हटले, ‘रा. फाळके हे तर विद्या शिकण्यास विलायतेस गेले होते.  रा. पाटणकर यांनी हा प्रयोग येथल्या येथेच मोठय़ा प्रयासाने व खर्चाने साध्य करून घेतला आहे.’

१९२० मध्ये बाबूराव पेंटर यांनी स्वदेशी बनावटीचा कॅमेरा वापरून बनवलेला ‘सरंध्री’ हा मूकपट तयार झाल्यावर तो प्रथम लोकमान्य टिळकांना दाखवण्यात आला. बाबूराव पेंढारकर यांनी त्यामध्ये कृष्णाचे काम केले होते. त्यांच्या ‘चित्र आणि चरित्र’ या आत्मचरित्रामध्ये याविषयी सविस्तर उल्लेख आहे. त्यानुसार बाबूराव पेंटरांनी तयार केलेला कॅमेरा पाहण्याची इच्छा लोकमान्यांनी व्यक्त केली. कोल्हापूरला जाऊन पेंढारकर स्वत: तो कॅमेरा घेऊन आले आणि लोकमान्यांना दाखवला. लोकमान्यांच्याच हस्ते ‘सरंध्री’चे उद्घाटन पुण्याच्या आर्यन थिएटरमध्ये करण्यात आले. हा चित्रपट पाहिल्यानंतर लोकमान्यांनी बाबूराव पेंटरांना ‘सिनेमा केसरी’ ही पदवी दिली. त्यावेळी लोकमान्य पेंटरांना म्हणाले, ‘ चित्रपटकला ही राष्ट्राच्या दृष्टीने फार उपयुक्त कला आहे. लोक-जागृतीच्या कार्यात हिचा उपयोग फार मोठय़ा प्रमाणात करून घेता येईल. तुम्ही जालियनवाला बाग हत्याकांडाचे चित्र काढा. त्यात काम करण्यासाठी ओडवायरसाहेबासारखा दिसणारा एखादा इसम मात्र शोधला पाहिजे. लोकजागृतीच्या दृष्टीने आमच्या शेकडो व्याख्यानांपेक्षा व लेखांपेक्षा चित्रपटाचं साधन कितीतरी पटीनं अधिक प्रभावी आहे.’ या घटनेच्या दोन वर्षे आधी- म्हणजे १९१८ मध्ये मुंबई येथे भरलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनावर बाबूराव पेंटरांनी एक वार्तापट बनवला होता. या अधिवेशनाला लोकमान्य टिळक आणि अ‍ॅनी बेझंट या नेत्यांबरोबर मराठी कादंबरीकार हरिभाऊ आपटेही उपस्थित होते. ‘सरंध्री’ या चित्रपटासमवेत मुंबईचे काँग्रेस अधिवेशन हा वार्तापट दाखवला जात असे.

टिळकांच्या निधनानंतर तीन भारतीय फिल्म कंपन्यांनी त्यांच्या अंत्ययात्रेवर आधारित वार्तापट बनवले. विशेष म्हणजे भारतीय चित्रपट उद्योगासाठी सेन्सॉर प्रमाणपत्रे देण्याची प्रथा सुरू झाल्यानंतरच्या अगदी सुरुवातीच्या काही दिवसांत हे वार्तापट बनवले गेले होते. त्यामुळे द्वारकादास संपत यांच्या कोहिनूर फिल्म कंपनीने टिळकांच्या अंत्ययात्रेवर बनवलेल्या १००० फूट लांबीच्या वार्तापटाला सेन्सॉर सर्टिफिकेट नंबर ७  मिळाला आणि ६ ऑगस्ट १९२० रोजी तो संमत झाला! त्याच दिवशी याच विषयावर ओरिएंटल फिल्म कंपनीने बनवलेल्या वार्तापटाला संमती मिळाली आणि त्याचा सेन्सॉर सर्टिफिकेट नंबर होता- ११! अमेरिकेत ‘व्हिटाग्राफ’मध्ये सिनेमा- निर्मितीचे शिक्षण घेऊन हिंदुस्थानात परत आलेल्या सुचेत सिंग या कलावंताने ही ओरिएंटल फिल्म कंपनी स्थापन केली होती. टिळकांच्या अंत्ययात्रेवरच ‘पाटणकर फ्रेंड्स आणि कंपनी’ यांनी ६०० फुटांची फिल्म बनवल्याचे उल्लेख मुंबई सेन्सॉर बोर्डाच्या रेकॉर्ड्समध्ये आहेत. गमतीची गोष्ट म्हणजे ही वार्तापत्रे प्रदर्शनासाठी संमत करताना सेन्सॉर बोर्डाने हे निर्बंध घातले होते की, केवळ अंत्ययात्रेसंबंधीचीच दृश्ये दाखवली जावीत, अन्य कोणतीही दृश्ये नकोत! १२ जानेवारी १९२१ रोजी कोहिनूर फिल्म कंपनीने बनवलेली  ‘द रिमेन्स प्रोसेशन ऑफ लोकमान्य टिळक इन पूना’ या नावाची ९६७ फूट लांबीची फिल्म सेन्सॉर बोर्डाने संमत केली होती. टिळकांच्या मृत्यूनंतर एका वर्षांने झालेल्या त्यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचे वार्तापत्रही कोहिनूर फिल्म कंपनीने बनवले होते. महात्मा गांधी यांच्या हस्ते झालेल्या या समारंभाची ४५० फूट लांबीची फिल्म यानिमित्ताने बनली होती. त्याचबरोबर कोहिनूर कंपनीनेच १५०० फुटांची- म्हणजेच एका रिळाची स्वतंत्र फिल्म टिळकांच्या वर्षश्राद्धानिमित्त तयार केली; जिला १७ ऑगस्ट १९२१ रोजी सेन्सॉरचे प्रमाणपत्र मिळाले. दुर्दैवाने यातील कोणत्याच फिल्म्स आजमितीस उपलब्ध नाहीत. म्हणजेच महात्मा गांधीजींपूर्वी भारताच्या स्वातंत्र्यलढय़ाचे सेनानी असलेल्या लोकमान्यांचे एकही फिल्म फुटेज या घडीस उपलब्ध नाही. मात्र, त्यांचे समकालीन असलेल्या गोपाळ कृष्ण गोखले यांचे ते दक्षिण आफ्रिकेत गेले असतानाचे काही सेकंदाचे फुटेज उपलब्ध आहे.

प्रभात फिल्म कंपनीच्या शेवटच्या कालावधीत लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित चित्रपट सुरू झाला होता. या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरणही झाले होते. सुप्रसिद्ध अभिनेते गजानन जागीरदार यांनी त्यामध्ये लोकमान्यांची प्रमुख भूमिका वठवली होती, तर विश्राम बेडेकर यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली होती. परंतु प्रभात कंपनी बंद पडल्यामुळे हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. ‘एक होती प्रभात नगरी’ या बापू वाटवे यांच्या पुस्तकात या चित्रपटासंदर्भात उल्लेख आहे. टिळक तुरुंगात शिक्षा भोगत आहेत व दामोदर चाफेकर याला फासावर चढविण्यापूर्वी तो लोकमान्यांची भेट घेतो. त्यावेळी लोकमान्य त्याला गीतेची प्रत देतात आणि त्यानंतर निर्भयपणे तो फाशीच्या तख्ताकडे जातो- या हृदयस्पर्शी प्रसंगाचे चित्रीकरणही झाले होते. अशा तऱ्हेने लोकमान्य गेल्यानंतर काही वर्षांतच त्यांच्या जीवनावर चित्रपट बनण्याचा योग आला होता. परंतु तो हुकलेला योग पुन्हा यायला टिळकांच्या मृत्यूनंतर तब्बल ९५ वर्षे जावी लागली. २०१५ मध्ये सुबोध भावे यांनी लोकमान्यांची भूमिका केलेला आणि स्वत: दिग्दíशत केलेला ‘लोकमान्य : एक युगपुरुष’ हा चित्रपट प्रदíशत झाला. महत्त्वाच्या व्यक्तींवर चित्रपट बनविण्याच्या सरकारच्या योजनेत विनय धुमाळे यांनी लोकमान्यांवर चित्रपट बनवला, परंतु तो चित्रपटगृहांमध्ये रीतसर प्रदíशत मात्र झाला नाही. मधल्या काळात स्वातंत्र्य चळवळीतील बहुतेक सर्व महत्त्वाच्या नेत्यांवर चित्रपट बनवले गेले. गांधीजी, सुभाषचंद्र बोस , भगतसिंग प्रभृतींवर तर वेगवेगळ्या कालखंडामध्ये एकापेक्षा जास्त चित्रपट बनले. टिळकांच्या नशिबी फिल्म डिव्हिजनने १९५७ मध्ये बनवलेला एक माहितीपट तेवढा होता. त्याचेही दिग्दर्शन विश्राम बेडेकर यांनीच केले होते. ४१ मिनिटांच्या या लघुपटामध्ये टिळकांच्या जीवनाचे नाटय़मय रूपांतर पडद्यावर दाखवण्याचा लक्षणीय प्रयत्न त्यांनी केला होता. विशेष म्हणजे टिळकांचे पात्र हे जाणूनबुजून प्रकाशात न आणता ही नाटय़मयता साधण्याचा प्रयत्न त्यात केला गेला होता.

ज्या लोकोत्तर पुरुषाने सिनेमाकलेचे महत्त्व सुरुवातीच्या काळातच ओळखून स्वदेशी चित्रपट बनविण्यास पाठिंबा दिला, इतकेच नव्हे तर दादासाहेब फाळके आणि बाबूराव पेंटर यांच्यासारख्या चित्रकर्मीना प्रोत्साहन दिले आणि ज्यांचे आयुष्य अनेकानेक नाटय़मय घटनांनी भरले होते अशा लोकमान्य नेत्यावर चित्रपट बनवण्याचे धर्य आतापर्यंत केवळ एकच दिग्दर्शक दाखवू शकला! ‘भारतीय असंतोषाचे जनक’ मानल्या जाणाऱ्या टिळकांचे स्मृतिशताब्दी वर्ष सुरू होत असताना ही अपेक्षा ठेवायला अजिबात हरकत नसावी, की अशा या बहुआयामी लोकनेत्याचे जीवन चित्रपटाच्या पडद्यावर निरनिराळ्या पलूंतून आणि दृष्टिकोनातून समर्थपणे जगासमोर यावे!

prakashmagdum@gmail.com

(लेखक राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे (ठाअक) संचालक आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)