News Flash

साहित्यिकांकडून अपेक्षा..

बॅ. नाथ पै हे आपल्या अमोघ वक्तृत्वाने संसद गाजविणारे अभ्यासू नेते होतेच; त्याचबरोबर एक अत्यंत बुद्धिमान, बहुपेडी व्यक्तिमत्त्वाचे रसिकाग्रणीही होते.

बॅ. नाथ पै

बॅ. नाथ पै हे आपल्या अमोघ वक्तृत्वाने संसद गाजविणारे अभ्यासू नेते होतेच; त्याचबरोबर एक अत्यंत बुद्धिमान, बहुपेडी व्यक्तिमत्त्वाचे रसिकाग्रणीही होते. आजकाल दुर्मीळ झालेल्या अशा ‘राजकीय प्रजाती’ची ओळख वर्तमान पिढीला व्हावी याकरता

बॅ. नाथ पै यांच्या पुण्यस्मृतीस पन्नास वर्षे (१८ जानेवारी) होत असल्याचे निमित्त साधून १९७० साली महाबळेश्वर येथे झालेल्या साहित्य संमेलनात त्यांनी केलेल्या उद्घाटनपर भाषणातील संपादित अंश. सोबत अदिती पै यांनी लिहिलेल्या ‘बॅ. नाथ पै’ या चरित्रात्मक पुस्तकाचे मुखपृष्ठ.

मराठी भाषा, साहित्य व संस्कृती यांच्या सर्वश्रेष्ठ आणि प्रातिनिधिक अशा या संमेलनाचं उद्घाटन करण्याचं हे मौलिक भाग्य आपण मला दिलंत, त्याबद्दल परिषदेचा आणि आपणा सर्वाचा मी अत्यंत ऋणी आहे.

मी मराठी काव्याकडे जो खेचलो गेलो तो अपघातानं. कारण प्रतिभाशाली लेखक व्हायला जर प्रतिभा प्रकर्षांनं वास करायला हवी, तर चांगला रसिक व्हायला प्रतिभेचा कमीत कमी स्फुल्लिंग असावा लागतो. आस्वाद घ्यायलासुद्धा संपूर्ण का नसेना, पण सरस्वतीचा वरदहस्त लागतो असं मला वाटतं. मी बा. भ. बोरकरांच्या कवितेकडे आकृष्ट झालो विद्यार्थी म्हणून. बेळगावला वाङ्मय चर्चा मंडळ साहित्य सत्र चालतं, त्याला मी गेलेलो होतो आणि तिथं मी काव्यगायन ऐकलं होतं. मराठीमध्ये जे जे काही आहे- नादमाधुर्य आहे, कल्पनारम्यता आहे, भावनांची तरलता आहे-  ते सारं बोरकरांच्या कवितेत आहे. नादमाधुर्याचं सर्वात सुंदर चित्र बोरकरांच्या कवितेत आहे. त्यामुळं मी प्रभावित झालो आणि मराठी काव्याची मला ओढ लागली. पुढं त्याचं वेड लागलं.

ज्यावेळी गोवा मुक्त झाला- त्यांचं ते एक मोठं वेड होतं, स्वप्न होतं, एक छंद होता, एक हट्ट होता, हव्यास होता- त्यावेळी त्यांनी (१९४६ मध्ये गोवामुक्ती सत्याग्रह सुरू झाला होता.) लिहिलेली कविता मला आठवली. गोवामुक्तीचा मलाही नितांत आनंद होत होता.  मी त्या आनंदाच्या भरात त्यांच्या कवितेची ओळ त्यांना तारेच्या स्वरूपाने पाठविली. ती ओळ :

‘त्रिवार मंगलवार आजला

त्रिवार मंगलवार’

दुसऱ्या दिवशी उत्तर आलं :

‘धन्य जाहलो मीही याचा

घेउन साक्षात्कार’

कारण ही ओळसुद्धा या कवितेतच आहे.  मला कल्पना नव्हती,  या कवितेतील हीच ओळ उद्धृत करून ते त्यांचं उत्तर देतील.

राजकारणात कोण जात असतो?

त्याचं उत्तर आता सर्वाच्या ओठावर तयार आहे. ज्याला आमदार व्हायचं असतं, खासदार व्हायचं असतं, मंत्री व्हायचं असतं-  मी प्रधानमंत्री म्हणालो नाही, कारण ती जागा हिंदुस्थानात रिझव्‍‌र्ह दिसते अलीकडे; परंतु अशी व्यक्ती राजकारणाकडे आकृष्ट होते, खेचली जाते, बांधली जाते- अनुमानं तुमच्या मनात तुम्ही ठरविलेली आहेत.

परंतु मी याबाबतीत जे सांगणार आहे ते थोडंसं वेगळं आहे. मला वाटतं, कीट्सनी वर्णन केलेलं आहे- आणि इथं साहित्यिक, कलावंत आणि चांगला राजकारणी यांचा एक समान धर्म सुरू होत असतो. तो असा : मानवतेबद्दलची कणव, वेदना, संवेदना, सहानुभूती ओथंबून ज्यांच्या अंत:करणात असते, तो कधी स्वातंत्र्यसंगामाचा सेनानी म्हणून राजकारणात उतरतो, तर कधी देशातील ती गुलामगिरी पाहवत नाही म्हणून आत्मयज्ञासाठी तयार होतो. कधी अंदमानात जाऊन ‘ने मजसी ने’ म्हणून मातृभूमीला आळवत असतो, कधी स्वत:ला गोळी लागल्यावर ‘यांना देवा क्षमा कर’ असं सांगून मानवतेला उजाळा देत असतो.

मला आपल्याला नम्रपणे असं सांगायचं आहे की, चांगला कलावंत- मग तो साहित्यिक असू द्या, नाटककार असू द्या, कवी असू द्या अथवा ध्येयवादी राजकारणी असू द्या- त्यांचं सर्वाचं ध्येय एकच असतं.. एकच असू शकतं. लुई पिरांदेलोंनी असं सांगितलं होतं : जो कलावंत असेल, साहित्यिक असेल, कवी असेल, प्रतिभाशाली असेल, त्याच्यासमोर एकच उद्दिष्ट सदैव असायला पाहिजे, मनुष्य- मानव! त्याची उंची कशी वाढवायची, त्याचं जीवन समृद्ध कसं करायचं, त्याच्या पाठीवरचं ओझं रत्तीभर का होईना, कमी कसं करायचं, त्याच्या डोळ्यांतील अश्रू संपूूर्ण पुसता आले नाहीत, तरी एक आसू कसा पुसायचा- ही ज्यांची वेदना असते, ही ज्यांची तळमळ असते, ही ज्यांची व्यथा असते, तो मनुष्य कधी शिल्पकार बनतो आणि मायकेलएंजलोच्या रूपानं पियेटा नावाचं अमर शिल्प त्या ठिकाणी उभं करतो, कधी बर्मिनीच्या रूपानं सौंदर्याचा साक्षात्कार घडवतो. कधी तो वेरूळला येतो, कधी अजिंठय़ाला जातो, कधी एलिफंटाला जातो. त्यांचा वंश एक, त्यांची कुळी एक. त्यांचा रंग वेगळा होता, धर्म वेगळा होता.  पण त्यांना मिळणारी जी प्रेरणा होती, ती एकच होती.

‘निराशेच्या गामी कधि नच महाराष्ट्र बुडवी!’ हे निराशेचा सूर. कुणी म्हणेल, कवीनं कृत्रिमपणानं आशावादाचा ध्वज धरला पाहिजे का? असा आग्रह मी धरणार नाही. परंतु व्यक्तित्व ज्यावेळी या विश्व-अनुभवाशी समरस होतं; त्यावेळी महान कलाकृती साकार होत असते.. जन्म घेत असते. हे लक्षात घेतल्यानंतर स्वत:च्या या मनोऱ्यात किती काळ कोंडून घ्यायचं? यावेळी भोवतालची व्यथा, दु:ख आणि जखम केवढी मोठी आहे, हा प्रश्न कलावंतांनी आणि साहित्यिकांनी स्वत:ला विचारला पाहिजे. आधुनिक मराठीमध्ये हे फार तेजस्वी उद्गार असे मला वाटतात-

‘जे दिव्य दाहक म्हणुनि असावयाचे

बुद्धय़ाचि वाण धरिले करिं हे सतीचे’

त्यानंतर राजकारण तेजस्वी झालं आणि साहित्यही तेजस्वी झालं होतं. आज ही कविता किंचित बदललेली दिसते, म्हणून राजकारण कसं आहे, ते तुम्ही पाहता. त्याचं वर्णन करण्याचं धारिष्टय़ माझंसुद्धा होत नाही. परंतु ते कसं झालं- ‘की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने’ याच्या शेवटच्या दोन ओळी- ‘जे दिव्य दाहक म्हणुनि असावयाचे’ याच्यात थोडा बदल झालेला दिसतो. साहित्यिकांच्या मनात आणि राजकारण्यांत‘जे धुंद मादक म्हणुनि असावयाचे, बुद्धय़ाचि वाण धरिले करिं हे सतीचे’ याच्या ऐवजी ‘बुद्धय़ाचि वाण धरिले करिं हे परीचे’ असा बदल दिसू लागला आहे.

हा आशय राजकारणाला आणि साहित्याला लागू झाला आहे. आज देशामध्ये ध्येयहीनता आहे. सारी श्रद्धास्थानं आज कोलमडू लागली आहेत. आज जनतेचा तेजोभंग होऊ लागलेला आहे, कारण यांचं तेज आज हरपू लागलं आहे.  असं होत असताना साहित्यिकांनी काय करावं? आमचे प्रमाद आणि आमच्या चुका मी सांगितल्या; परंतु तेजस्वी नेतृत्व आणि प्रतिभाशाली चारित्र्य ही एकाच जीवनाची दोन अंगं असतात. साहित्य दुबळं झालं, निश्चल झालं, रडकं झालं तर नेतृत्व तेजस्वी, पराक्रमशाली, आकाशाला गवसणी घालणारं नसतं. आजच्या हिंदुस्थानात वाङ्मयाला आवाहन करणारं, आव्हान देणारं काही नाही. आणि काल्र्याला, अजिंठय़ाच्या, वेरूळच्या लेण्यांना शोभणारी वाङ्मयीन लेणी निर्माण करणाऱ्या घटना घडत आहेत, पण त्यांचे पडसाद मराठी वाङ्मयात निघाले नाहीत, उठले नाहीत- ही माझी वेदना आहे. हे माझं दु:ख आहे.

तुमच्याकडून माझी अपेक्षा कुठली? आज हिंदुस्थानामध्ये अनेक गोष्टींची कसोटी होत आहे. अनेक गोष्टी टिकणार की नाहीत, अनेक मूल्यं आमच्याकडे राहणार की नाहीत, जे जिवाचं मोल देऊन मिळालं होतं, तेही राहणार की नाही? आता कसोटीच्या काळातून हे राष्ट्र, महाराष्ट्र, भारत- दोन्ही जात आहेत. आणि हे जर टिकवायचं असेल, तर हिंदुस्थान एक दुय्यम दर्जाचं, इतरांच्या कृपेवर आणि भिकेवर जगणारं राष्ट्र हे त्याचं स्थान राहता कामा नये. भाऊसाहेब खांडेकरांनी त्यांच्या पहिल्या अध्यक्षीय भाषणात असं सागितलं होतं, ‘मराठी भाषेला नोबेल प्राइझ लवकर मिळण्याचं भाग्य लाभो आणि तेही ‘याचि देही, याचि डोळा’ मला बघायला मिळो.’  मी असं म्हणणार नाही. मी अशी प्रार्थना करू इच्छित नाही. अनेक नोबेल प्राइझेस अनेकदा ओवाळून टाकावीत इतकं साहित्य, इतकं साहित्यभांडार मराठीचं आहे, महाराष्ट्राचं आहे असं मी मानतो. परंतु माझी जी अपेक्षा आहे ती वेगळी आहे. आता भारतभर जी एक धडपड चाललेली आहे- ती एक महाराष्ट्रातच आहे असं नाही- नवा भारतीय हा अधिक मुक्त असावा, अज्ञानापासून अधिक मुक्त असावा, त्याची बौद्धिक, सांस्कृतिक आणि शक्य असेल तर त्याची भौतिक उंचीही थोडी अधिक असावी.

तुम्ही तुमच्या हस्तिदंती मनोऱ्यात राहिलात आणि आम्ही आमच्या सत्तेच्या कैफात राहिलो तर कसं होईल? कारण तुमची जी साधनं आहेत, तुमची जी माध्यमं आहेत, ती आमच्या माध्यमांपेक्षा फार श्रेष्ठ आहेत. म्हणून मी हे तुम्हाला सांगू इच्छितो की, जे कालातीत आहे त्याचा वेध घेण्याची किमया साहित्यिकांमध्ये असते. तात्कालिकांत जे गुरफटलेलं असतं, त्याला चिरंतन करण्याची जादू आणि सामथ्र्य तुमच्याकडे असतं. जे सामान्यत: बुद्धीच्या आणि तर्काच्या पलीकडे कुठंतरी तरंगत असतं; त्याचं आकलन करणं, त्याला मूर्तिमान करणं, त्याला अर्थपूर्ण करणं हे कवीचं, साहित्यिकाचं काम असतं. आमचं साधन असतं ते तुटपुंजं असतं. ते हातात आधी येत नाही- ते म्हणजे सत्ता. त्याच्यासाठी केवढी यातायात! आणि ती मिळाली तर सत्तेची छिन्नी हातात घेऊन राजकारणी आपल्या स्वप्नातील समाजपुरुषाची मूर्ती बनविण्याचा प्रयत्न करीत असतो. परंतु सत्तेचं हे असं दुर्दैव असतं, की तत्कालीन- म्हणजे हातात असताना तिच्याइतकं प्रभावी काही नाही; आणि ती हातातून गेली की तिच्याइतकं दुबळं, कुचकामी काही नसतं. सत्तेची ही दुर्बलता असते. परंतु तुमच्या हातातील जी साधनं आहेत, जी माध्यमं आहेत, ती मात्र चिरंजीव असतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2021 2:56 am

Web Title: barrister nath pai dd70
Next Stories
1 ‘किशोर’चे मंतरलेले दिवस
2 नवतंत्रज्ञान रूपात..
3 पन्नाशीतला  ‘किशोर’
Just Now!
X