कोकणस्थ असूनही वयाची ५३ वष्रे मी कधी कोकणात गेलो नव्हतो. मुंबई-पुण्यापलीकडे माझा परीघ विस्तारत नव्हता. पण गेले वर्षभर दर महिन्याला श्रीक्षेत्र डेरवणच्या वालावलकर रुग्णालयात शनिवार-रविवारी शस्त्रक्रियांचे कॅम्प्स सुरू झाले आणि माझ्या कोकणात महिनोगणती फेऱ्या होऊ लागल्या. पाली-माणगाव-महाड-खेड-पोलादपूर-चिपळूण रस्ता आपलासा वाटू लागला. डोंगर-दऱ्या-झाडे-धबधबे-नद्या यांची नव्याने ओळख झाली. ऋतू-ऋतूंमधला फरक अनुभवू लागलो आणि मग कोकण माझे झाले. कोकणस्थ असल्याचा अभिमान वाटला. आणि जरी आपण मुंबईकर असलो तरी प्रांत कोकणसाठी आपल्याला एन.आर.आय. स्टेटस आहे असे वाटू लागले. ओल्या काजूची भाजी, सार, उकडीचे मोदक यांचा दरवळ आला. बल्लाळेश्वरापासून परशुरामापर्यंतच्या नव्या माहितीने मनाचा गाभारा उजळून निघाला. पण या सगळ्या सुंदर गोष्टींबरोबर आणखीन एक गोष्ट परिचयाची झाली. खेड-पोलादपूर मार्गावर आमचा सुदेश ड्रायव्हर गाडी थांबवत नसे. कशेडी घाट, भोस्ते घाटात त्याचे डोळे कोणत्या तरी न दिसणाऱ्या गोष्टीला शोधत. लघुशंकेसाठीही तो जागा काळजीपूर्वक निवडे. ‘‘अरे, मघाशी तिथे का नाही थांबलास?’’ या माझ्या प्रश्नाला त्याचे उत्तर असे – ‘‘सर, त्या झाडापाशी ‘ती’ असते.’’ सुदेश
२३ वष्रे या मार्गावर गाडी चालवतो. त्याच्याशी गप्पा मारताना मला कोकणची आणखी एक नवी ओळख पटली.. अताíकक, अनसíगक, अतींद्रिय अस्तित्वांची.. कोकणातील भुतांची.
.. आजवर माझ्या लेखी ‘आतले’ आणि ‘बाहेरचे’ म्हणजे फक्त उदरपोकळीशी संबंधित intraperitoneal, extraperitoneal असे शब्द होते. त्यात आता नव्याने भर पडली. हडळ, जखीण, मुंजा, चेटकीण, समंध यातला बारीक फरक कळला आणि भूतलोकामध्येही promotional cadres असतात याची जाणीव झाली. कशेडी घाट आणि खेड-पोलादपूरचा मार्ग हा तर मृत्यूचा सापळा. इथे झालेल्या अपघातांची माहिती मिळाली आणि विस्तारित मार्ग, रिफ्लेक्टर्स, वळणांवरचे काळे-पांढरे दिशादर्शक दगड.. हे सारे सारे असताना रात्री अचानक ‘ती’ गाडी पुढे येते.. तुम्ही गाडी थांबवली तर ठीक; ती रस्ता क्रॉस करून जाते. पण पुन: पुन्हा ती समोर येतच राहते.. आणि तिच्या अंगावर गाडी घातलीत तर ती गाडी उचलून फेकून देते.. हे सारे नवे ज्ञान मिळाले. जितके भात पेरले जाते, तितक्याच भुतांच्या कथा कोकणात जन्म घेताना दिसतात.
..पण हे काही माझ्या लाडक्या कोकणातच फक्त घडतेय असे नाही. सुमेर, बॅबिलियन, मेसापोटेमियापासून भुतांचा वावर आहे. त्यांना खरोखरच स्थळ, काळ, वेळेचे बंधन नाही. ती हॅम्लेटच्या बापाचे रूप घेतात आणि आफ्रिका-अमेरिकन संस्कृतीतही ‘स्पिरीट’ आणि ‘स्पूक’ म्हणून वावरतात. पडका वाडा, निर्मनुष्य जागा, झाडांची दाटी, सळसळणारी पाने, घोंघावणारा वारा, रातकिडय़ांची किरकिर त्यांना विशेष प्रिय. कोकणचा हिरवागार, अंधारणारा निसर्ग हा त्यांच्यासाठी paradise  ठरावा यात विशेष ते काय? या अतींद्रिय अस्तित्वाचा उल्लेख कथा, लघुकथा, नाटक, कादंबऱ्या यात सर्वत्र आढळतो. शेक्सपिअरला मोह पडतो आणि आमच्या
द. मा. मिरासदारांनाही भुताचा जन्म घडविण्याची कल्पना सुचते. ‘गेलेल्यांच्या अतृप्त इच्छा’ या सदराखाली वास्तविक पाहता मागे उरलेल्यांच्या मनातील न शमलेल्या आकांक्षा असतात आणि त्यांना अतींद्रियतेचे कोंदण लाभते, हेच खरे. ते शमविण्याच्या उपायांत या आकांक्षेचे प्रतििबबही पडते. अनेकदा ते भयानक, विद्रूप, विकृत आणि विखारी असते आणि तेव्हा भूत बाहेर नसून ते माणसाच्या मनात आत दडलेले आहे याची साक्ष पटते. माझे भुतांशी तसे काही वाकडे नाही; पण जेव्हा त्यांचा दाखला देऊन समाज वैद्यकीय उपचारात दिरंगाई करतो, तेव्हा मी अस्वस्थ होतो. ‘अंनिस’चे कार्यकत्रे जागोजागी कार्यक्रम करतात, प्रा. श्याम मानव आपले उभे आयुष्य वेचतात आणि माझ्याच मिरज वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले डॉ. नरेंद्र दाभोलकर बलिदान करतात.. भुते तरीही उरतात.. ती जनात-मनात वावरतात. पिढय़ान् पिढय़ा हस्तांतरित होतात. आणि हातात आयपॅड घेणारा आमचा नातूही ‘डरना मना है’मध्ये गुंतून पडतो.
माणसाचे मन हेच भुतांचे खरे जन्मस्थान आहे. कधी अतृप्त इच्छा, कधी आवाक्याबाहेरच्या महत्त्वाकांक्षा, कधी असूया, तर कधी सूडबुद्धी. कधी वर्तमानाला नाकारण्याचा अट्टहास, तर कधी भूतकाळातच वावरण्याचा आग्रह, कधी शास्त्रीय प्रगतीचे वावडे. तर कधी आपल्याला ती अवगत नसल्याचे कोतेपण.. या साऱ्या साऱ्या गोष्टी भुताखेतांना जन्म देतात. मग त्यातून बुवाबाजी उदयाला येते. असा कोणताही पंथ-धर्म-जात नाही, जेथे अतींद्रिय शक्तींचा उल्लेख नाही. पण अंगारे-धुपारे-उदी यांचे स्तोम वाढविण्याचे काम मात्र बुवाबाजीची व्यावसायिकता करते.
.. हे सगळे हळूहळू बदलेल या आशेवर मी आहे. डायरिया झालेली बाळे डिहायड्रेट होण्यापूर्वी रुग्णालयात पोहोचतील, एपिलेप्सी असलेल्यांना झाडाला उलटे टांगले जाणार नाही, वंशवृद्धीसाठी नरबळी होणार नाही, आजच्या संदर्भात बोलायचे ठरविले तर येणारी प्रत्येक मुलगी ‘म्हाळसा’ ठरेल.. आणि हे सगळं घडतानाच रस्ते अधिक विस्तारतील.. सुरक्षित ड्रायिव्हगची संस्कृती रुजेल. मग ‘ती’ हळूहळू अंतर्धान पावेल. आमिर खानच्या इन्स्पेक्टर शेखावतला गुन्हेगारांचा ‘तलाश’ करण्यासाठी मग करिनाच्या भुताची मदत लागणार नाही. समाजाची सर्वच अंगे अधिक प्रगल्भ, प्रौढ होतील. केवळ साक्षर होऊन चालणार नाही! समजूतदार व्हावे लागेल.
.. लेख संपवीत असतानाच अमेरिकेहून माझ्या १२ वर्षांच्या पुतण्याचा फोन आला. ‘‘काका, या वर्षीच्या हेलोव्हेन (Halloween) मध्ये मी कोणते भूत होऊ?’’ .. तो मला विचारता झाला.                                                                                                                                                    

loksatta analysis report on status of leopards in india
विश्लेषण : बिबटे वाढलेत… शेतात, गावच्या वेशीवर आणि सिमेंटच्या जंगलातही!
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!
quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?