अंदमान नुसतंच सुंदर नाही तर वेड लावणारं आहे. विमानातून दिसणारी त्याची पहिली झलकच थरारून टाकते. आणि या भूमीवर टाकलेल्या प्रत्येक पावलागणिक हिरव्या आणि निळ्या रंगाच्या असंख्य छटा सापडत जातात.
मुं ल्लबई ते चेन्नई आणि चेन्नई ते पोर्ट ब्लेअर या जवळपास साडेचार तासांच्या कंटाळवाण्या विमानप्रवासात अखेर ‘दहाच मिनिटात आपण पोर्ट ब्लेअरला पोहोचू,’ वगैरे घोषणा झाल्या आणि खिडकीपाशी बसलेल्या प्रत्येकाचे डोळे बाहेर पांढऱ्याफेक ढगांशिवाय काही दिसते का, ते शोधू लागले. विमान किंचितसं खाली उतरलं आणि उरलेसुरले पांढुरके ढगही बाजूला झाले. खाली जे दृश्य होतं ते प्रत्यक्षच बघायला हवं! सूर्यकिरणांत चमचमणारा, काही ठिकाणी निळसर हिरवा, तर काही ठिकाणी गडद निळा भासणारा समुद्र आणि सोनेरी वाळूच्या आधाराने विसावलेले हिरव्या जंगलांचे असंख्य तुकडे! हे अंदमानचं पहिलं दर्शन!
‘मेक माय ट्रिप’ या सहल कंपनीतर्फे पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या पर्यटन दौऱ्याच्या निमित्ताने अंदमानचं सौंदर्य अनुभवण्याची संधी मिळाली. वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे झेपावत असतानाचं प्रत्येक दृश्य डोळ्यांत साठवून घेण्यासारखंच. हे विमानतळ अगदी छोटंसं. बाहेर येऊन हॉटेलचा रस्ता धरला की गोव्याचीच आठवण यायला लागते. कमी गर्दीच्या, अरुंद आणि स्वच्छ रस्त्यांवरून ‘सुशेगात’ सुरू असलेली वाहतूक आणि आजूबाजूला झाडीच झाडी. इथली बरीचशी हॉटेल्स विमानतळापासून लांब नाहीत. पण मुळात सगळंच इटुकलं- पिटुकलं असल्यामुळं विमानतळापासून किंवा बंदरापासून हॉटेलवर पोहोचेपर्यंत पोर्ट ब्लेअर शहराचा निम्मा भाग तरी बघायला मिळतोच. हॉटेल्सच्या बाबतीतही इथं निवडीला भरपूर वाव आहे. ‘बॅगपॅकर्स’साठीची अगदी कमी खर्चिक हॉटेल्सही इथे आहेत. अंदमानमध्ये पोहोचल्या पोहोचल्या जाणवणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं आपल्या हाती असलेल्या वेळेची मर्यादा. इथं संध्याकाळी सहाच्या सुमाराला गुडुप अंधार होतो. त्यामुळे पर्यटनासाठी संध्याकाळी सहानंतरचा वेळ फारसा उपयोगाचा नाही, हे लक्षात ठेवूनच कार्यक्रम आखावे लागतात.
पोर्ट ब्लेअरला भेट देणारे बरेचजण पर्यटनाची सुरुवात मात्र पोर्ट ब्लेअरपासून करत नाहीत. हातात असलेल्या दिवसांचा पुरेपूर उपयोग करून घ्यायचा असेल तर ते योग्यही ठरतं. पोर्ट ब्लेअरच्या जवळ ‘हॅवलॉक’ नावाचं बेट आहे. अंदमानमध्ये जाऊन मुळीच चुकवू नयेत अशा बऱ्याच गोष्टी याच बेटावर बघायला मिळतात. जहाजातून सुमारे दीड- पावणेदोन तासांत हॅवलॉकला पोहोचता येतं. हॅवलॉकला पोहोचताना सकाळची वेळ साधता आली तर इतर कुठेही वेळ न घालवता ‘हॅवलॉक दर्शना’ची सुरुवात ‘एलिफंट बीच’नं केलेली उत्तम. हॅवलॉकच्या बंदरावर उतरल्यानंतर या बीचवर जाण्यासाठी मोटारबोट किंवा स्पीडबोट मिळतात. सुमारे अध्र्या तासाच्या या प्रवासात पाण्यात ठिकठिकाणी विखुरलेली बेटं बघायला मिळतात. पाण्यातून अचानक उंच उडी घेत पोहणारे चंदेरी रंगाचे उडते मासे (हो, त्यांना उडते मासेच म्हणतात!) पाहायला मिळणं इथं नेहमीचंच. दिवस फारच चांगला असेल तर डौलात उसळी घेणारे डॉल्फिन मासेही दिसतात. एलिफंट बीच हा हॅवलॉकमधल्या नेहमी गजबजलेल्या समुद्रकिनाऱ्यांपैकी एक. किनाऱ्यावरच्या मऊ रेतीत उन्मळून पडलेल्या मोठाल्या वृक्षांचे बुंधे आणि समुद्राचं पाणी किनाऱ्याच्या आतपर्यंत शिरून तयार झालेले लहानसे नदीसारखे प्रवाह पाहण्यासाठी इथं जायला हवं. हा पर्यटकांचा लाडका समुद्रकिनारा असल्यामुळं पाण्याशी संबंधित सगळ्या लोकप्रिय गोष्टी- म्हणजे काचेच्या तळाच्या बोटींमधून पाण्याखालचं जग बघणं, ‘गेम फिशिंग’ करणं किंवा ‘सी वॉक’ म्हणजे पाणबुडय़ासारखं भलंमोठं हेल्मेट घालून समुद्रतळावर चालणं हे इथं करता येतं. हॅवलॉकमधला दुसरा प्रसिद्घ समुद्रकिनारा म्हणजे राधानगर बीच. इथं हॅवलॉकमधून मोटारीतून जाता येतं. आशियातल्या सगळ्यात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक अशी या किनाऱ्याची ख्याती आहे. पर्यटक इथं खास सूर्यास्त बघण्यासाठी येतात. एलिफंट बीचसारखे समुद्राचं पाणी आत शिरून तयार झालेले नद्यांसारखे उथळ प्रवाह इथंही आहेत. एक प्रवाह चालत ओलांडून पुन्हा दुसऱ्या प्रवाहात शिरणं हा विलक्षण अनुभव प्रत्यक्षच घ्यायला हवा.
खरं अंदमान पाण्यात उतरल्याशिवाय दिसणार नाही. एखाद्या समुद्रकिनाऱ्यावर आपण एकटे- अगदी एकटे आहोत अशी कल्पना करून बघा. या कल्पनेतला थरार अनुभवता येतील असे काही समुद्रकिनारे इथे नक्की आहेत. पण त्यासाठी पर्यटकांनी गजबजलेल्या अंदमानपासून थोडं बाजूला व्हायला हवं. हॅवलॉकच्या जवळ अशी दोन बेटं आहेत. ‘साऊथ बटन आयलंड’ आणि ‘हेन्री लॉरेन्स आयलंड.’ हॅवलॉकमधल्या सहलींच्या नेहमीच्या ‘पॅकेजेस’मध्ये ही बेटं सापडणार नाहीत. अर्थात त्याचे काही फायदेही आहेत. फारसे पर्यटक इकडे न फिरकल्यामुळेच ही दोन्ही बेटं त्यांच्या मूळ स्वरूपात राहू शकलीत. ‘साऊथ बटन’ आणि ‘हेन्री लॉरेन्स’वर जाण्यासाठी खास सहल आखावी लागते. या दोन्ही बेटांच्या आसपास समुद्रात असलेली प्रवाळ बेटं (कोरल्स) आणि नानाविध प्रकारचे मासे जवळून बघण्यासाठी इथं येऊन ‘स्नॉर्कलिंग’ करण्याचा पर्याय उत्तम. हॅवलॉकमध्ये पर्यटकांना ‘स्कूबा डायव्हिंग’ किंवा ‘स्नॉर्कलिंग’साठी नेणाऱ्या काही चांगल्या संस्था आहेत. या संस्थांमधून ‘साऊथ बटन’ आणि ‘हेन्री लॉरेन्स’ची सहल आखता येते. त्यामुळे संस्थेचे ‘डायव्हिंग इन्स्ट्रक्टर्स’ पाण्यात सतत आपल्यासोबत असतातच.
हॅवलॉकमधून ‘साऊथ बटन’वर स्पीडबोटनं जावं लागतं. बेट म्हणजे तिथे समुद्रकिनारा असेल आणि त्यावर उतरता येईल, हा आपला समज इथं सपशेल खोटा ठरतो. ‘साऊथ बटन’ म्हणजे समुद्रात बेटासारखा उभा ठाकलेला नुसता खडक आणि त्या खडकाच्या आधारानं वाढलेलं जंगल! त्यामुळं इथं आल्यावर बोट पाण्यातच उभी करून ‘स्नॉर्कलिंग’साठी थेट पाण्यात उतरणं हाच एकमेव मार्ग. इथला समुद्र उथळ नाही. गार पाण्यात पोहताना मधूनच समुद्रात कोमट पाण्याच्या झऱ्यांचा स्पर्शही जाणवतो. ‘साऊथ बटन’च्या खडकापासून थोडं दूर राहून या बेटाला पोहत वळसा घालता येतो. ‘साऊथ बटन’पासून ‘हेन्री लॉरेन्स’ बेट फारसं दूर नाही. या बेटाला मात्र छान समुद्रकिनारा आहे. इथं समुद्र थोडा उथळ असल्यामुळं ‘स्नॉर्कलिंग’ करण्यासाठी पाण्यात थोडंसं चालत जाऊन मग पोहायला सुरुवात करावी लागते. पाणी उथळ असलं तरी इथं काय नाही! रंगीबेरंगी जिवंत प्रवाळांच्या जवळपास पोहणाऱ्या माशांबरोबर पोहण्याचा अनुभव इथं घेता येतो. ‘हेन्री लॉरेन्स’वर शंखशिंपल्यांचा अक्षरश: खच पडला आहे. हातात मावणार नाहीत असे मोठमोठाले शंख आणि तितकेच सुंदर मखमली रंगांचे शिंपले पिशव्या भरभरून न्यावेत अशी इच्छा होणं साहजिक आहे, पण तो मोह इथं आवरावा लागतो. अंदमानच्या कोणत्याही समुद्रकिनाऱ्यावरून काहीही उचलायला कायद्यानं बंदी आहे. ते योग्यही आहे. त्यामुळंच इथले समुद्रकिनारे इतके सुंदर राहू शकतात. (विशेष म्हणजे परतीच्या विमानप्रवासाच्या वेळी जेव्हा प्रवाशांच्या बॅगांची ‘स्कॅनर’खाली तपासणी होते तेव्हा त्यात शंखशिंपल्यांसारखे जैविक पदार्थ सापडले तर प्रवाशाला त्या वस्तू समुद्रकिनाऱ्यावरून उचललेल्या नव्हेत तर रीतसर खरेदी केल्या आहेत, हे सिद्ध करण्यासाठी त्याची पावती दाखवावी.)
‘लक्झरी’ सहलींसाठी हॅवलॉकइतकी चांगली जागा नाही. लाकडाचे अतिशय सुंदर काम केलेल्या खोल्या असलेली अनेक लक्झरी रिसॉर्टस् इथं आहेत. हॅवलॉकमधले रस्तेही तुरळक गर्दीचे आणि दुतर्फा हिरवाई असलेले. सायकल हे इथं फिरण्यासाठीचं उत्तम वाहन. काही रीसॉर्टस्मध्ये पर्यटकांना फिरण्यासाठी सायकली किंवा दुचाकी गाडय़ा भाडय़ाने मिळतात. ज्यांना चालत फिरायला आवडतं त्यांच्यासाठी रस्त्यांवर सुबक प्रशस्त फुटपाथदेखील आहेत. हॅवलॉकमध्ये येऊन मासे न खाता परत जाणं म्हणजे गुन्हाच! नव्यानं ‘सी-फूड’ ‘ट्राय’ करायचं असेल तर यापेक्षा दुसरी चांगली संधीही नाही. माशाला ‘माशाचा वास’ न येणं (!) म्हणजे काय, हे इथं मासे खाल्ल्यावरच कळतं. सहसा इतर ठिकाणी न मिळणाऱ्या ‘लॉब्स्टर’ किंवा ‘स्विड’च्या डिशेश न चुकता खाव्यात अशाच. हॅवलॉकच्या बंदराजवळ ‘बी- थ्री’ नावाचा एक सुंदर बार आहे. या बारमध्ये फक्त ‘मॉकटेल्स’ मिळतात. तरीही तो प्रचंड लोकप्रिय आहे. या बारची ‘रेट्रो’ सजावट बघण्यासाठी तरी इथं जायलाच हवं.
हॅवलॉक मनसोक्त बघून झाल्यानंतर पोर्ट ब्लेअरवर परतण्यासाठी पुन्हा जहाजाचा प्रवास आलाच. यातली काही जहाजं ‘नील’ बेटामार्गे पोर्ट ब्लेअरला जातात. नील हेही पर्यटकांचं लाडकं बेट आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये येऊन चुकवू नयेत अशा दोन गोष्टी म्हणजे ‘सेल्युलर जेल’- अर्थात काळ्या पाण्याचा तुरुंग आणि ‘ह्य़ूमन अँथ्रॉपॉलॉजिकल म्युझियम’; सेल्युलर जेलचा इतिहास जरी काळा असला तरी या कारागृहाची इमारत वास्तुस्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे. पूर्वी या कारागृहाच्या सात ‘विंग्ज’ होत्या. आता त्याचा काहीच भाग पर्यटकांना पाहता येतो. बरेचसे पर्यटक इथं खास स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची कोठडी पाहण्यासाठी येतात. हाताशी पुरेसा वेळ असेल तर सेल्युलर जेल दोन टप्प्यांत पाहणं चांगलं. संध्याकाळच्या वेळेस इथं कारागृहाच्या इतिहासाची माहिती देणाऱ्या ‘लाइट अँड साऊंड शो’चे खेळ होतात. इतिहासाची प्राथमिक ओळख करून घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही ‘शो’ उत्तम. कारागृह आतून पाहण्यासाठी मात्र दिवसाच आणि निवांत वेळ घेऊन यायला हवं. अंदमानला येतानाच्या विमानप्रवासात विमानाच्या योग्य बाजूला आणि योग्य खिडकीशी बसायला मिळालं तर आकाशातून या इमारतीचं आणखी चांगलं दर्शन घडतं.
पोर्ट ब्लेअरमधलं ‘ह्य़ूमन अँथ्रॉपॉलॉजिकल म्युझियम’ पाहण्यासाठी मानववंशशास्त्राची जाण असायलाच हवी असं मुळीच नाही. अंदमान आणि निकोबार बेटांवर हजारो वर्षांपासून राहणाऱ्या आणि स्वत:च्याच समूहांमध्ये राहणं पसंत करणाऱ्या भटक्या वनवासी जमातीची माहिती काही प्रमाणात का होईना, इथं मिळते.
ब्रिटिश राजवटीची साक्ष देणारं ‘रॉस आयलंड’ हे आणखी एक बेट पोर्ट ब्लेअरजवळ आहे. कधीकाळी हे बेट इंग्रजांचं अंदमानमधलं प्रमुख ठाणं होतं. आज मात्र इथं ब्रिटिश बनावटीच्या असंख्य इमारतींचे केवळ भग्न अवशेष उरले आहेत. या इमारतींना कवटाळून वाढलेली उंचच उंच वडाची झाडं, पर्यटकांची मुळीच भीती न बाळगता मुक्तपणे विहरणारी हरणं (हो, हरणंच!) आणि नारळीच्या रांगांमधून दिसणारा स्वप्नात शोभावा असा समुद्रकिनारा यासाठी ‘रॉस’ लोकप्रिय आहे.
अंदमानच्या सफरीचा शेवट खरोखर डोळ्यांत साठवून ठेवण्यासारखा करायचा असेल तर पोर्ट ब्लेअरपासून थोडंसं दूर असलेल्या ‘चिडिया टापू’वर जावं. चिडिया टापू ही जागा आणि तिथला ‘मुंडा पहार बीच’ सूर्यास्तासाठी प्रसिद्ध आहे. दूरवर टेकाडाच्या मागे अस्ताला जाणारा सूर्य आणि केशरी प्रकाशात चमकणाऱ्या बॅकवॉटर्समध्ये बुडालेले झाडांचे बुंधे या दृश्याचं वर्णन करणंच अवघड आहे.
नवं अनुभवत, पण शांततेत सुटी घालवू इच्छिणाऱ्यांसाठी अंदमान हे अगदी योग्य ‘डेस्टिनेशन’ आहे. निळ्या आणि हिरव्या रंगांमध्ये मिसळून जात स्वत:ला शोधण्याची ही सफर ती करणाऱ्याच्या हाती ती सरतेशेवटी खूपसं देऊन जाते. त्यात फक्त निळ्या आणि हिरव्या रंगांचे तुकडे नसतात. त्यात असतो प्राणवायू! पुढे कित्येक दिवस टिकणारा!    

How Sugar Effects On body can digestive cookie make you fat
बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते? क्रीम, गोडाची व चटपटीत बिस्किटांची निवड करताना काय बघावं?
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका