२०१४ साल नुकतंच मावळलंय आणि २०१५ सालात आपण प्रवेश केलाय. अविरत कालपटलावर खरं तर एक वर्ष म्हणजे तसा एक नगण्य, क्षुल्लक बिंदू; परंतु माणसांसाठी मात्र तो एक मोठा कालखंड ठरतो. जागतिकीकरणानंतर तर त्यालाही आता प्रचंड वेग आलाय. वर्ष कधी सुरू होतं अन् हा हा म्हणता सरतं, कळतदेखील नाही. २०१४ साल भारताच्या आणि एकूणच जगाच्या दृष्टीनं प्रचंड घडामोडींचं गेलं. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं पाहता तर ते गजबजलेलंच होतं. दररोज नवनवं तंत्रज्ञान या ना त्या वस्तू वा उपकरणांच्या रूपात आपल्या घरात, वापरात येतंय. त्यामागचं विज्ञान जरी आपल्याला माहीत नसलं, तरी त्याचा वापर मात्र आपण लीलया करतो आहोत. ‘ग्लोबल व्हिलेज’ ही संज्ञाही आता जुनी वाटावी इतकी आपल्या अंगवळणी पडलीय. सामान्य माणसंही आज या ना त्या कारणानं जगभर हिंडू-फिरू लागलीयत. त्यांना पूर्वी छायाचित्रांतून वा सिनेमांतून दिसणारं जग प्रत्यक्षात अनुभवण्याची संधी मिळू लागलीय. याची परिणती अर्थातच त्यांची दृष्टी विशाल होण्यात झालीय.
या पाश्र्वभूमीवर जुन्या सालाचा निरोप घेताना नवं वर्ष निरनिराळ्या क्षेत्रांत काय नवं घेऊन येणार आहे याचा मागोवा घेणं खचितच अस्थानी ठरू नये.
२०१४ साल भारताच्या दृष्टीनं राजकीय स्थित्यंतराचं ठरलं. नरेंद्र मोदी नावाच्या झंझावाताने केंद्रातील कॉंग्रेस आघाडीचे सरकार गदागदा हलवून जमीनदोस्त केलं. एवढंच नव्हे, तर याउप्पर देशात एकपक्षीय सरकार कधीही येणं शक्य नाही, ही प्रचलित समजूतही त्यांनी पार मोडीत काढली. जनतेला ‘अच्छे दिन’ची ग्वाही देत सत्तेत आलेल्या मोदींनी त्यानंतर अश्वमेध यज्ञासारख्या देशोदेशीच्या दौऱ्यांनी आणि तिथल्या आपल्या ठाशीव भाषणांनी अक्षरश: जग घुसळून काढलं. गेल्या वर्षी देशात एक नवी उमेद जागविणाऱ्या मोदींना आता ‘करून दाखवा अथवा घरी जा’ (परफॉर्म ऑर पेरिश)या आपल्याच संदेशाचं प्रत्यक्षीकरण करण्याचं आव्हान यावर्षी पेलून दाखवावं लागणार आहे. त्यादृष्टीनं त्यांनी काही पावलंही उचललीयत. परंतु त्यांची दृश्य फळं अजून तरी दृष्टीस पडायची आहेत. त्याचवेळी ते ज्या संघपरिवाराशी नातं सांगतात त्या परिवारातील काही हिंदुत्ववादी संघटना मोदींच्या यशानं उन्मादी अवस्थेत पोहोचल्या असून देशाला पुनरुज्जीवनवादाकडे नेण्याची त्यांना घाई झाली आहे. परिणामी आजवर सहिष्णुता आणि सर्वधर्मसमभावाची कास धरलेल्या या देशाचं सुकाणू भलत्याच दिशेला जाणार की काय, अशी चिंता अनेकांना वाटू लागलीय. या कळीच्या प्रश्नासंबंधातही मोदी सरकारला आपली भूमिका लवकरात लवकर स्पष्ट करावी लागणार आहे. सार्वत्रिक निवडणुकांत गलितगात्र झालेल्या मोदींच्या विरोधकांसाठी हे आयतेच कोलीत मिळाले आहे. त्याचा फायदा ते उठवल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे या वर्षांत मोदींची मोठीच कसोटी लागणार आहे.
दुसरीकडे जगाचा विचार करता आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे कोसळलेले दर आणि आर्थिक मंदी यांनी सबंध जग ग्रासलेलं असताना जगाच्या भू-राजकीय परिस्थितीतही मोठीच उलथापालथ होताना दिसतेय. दिवसेंदिवस प्रबळ होत चाललेला चीन, ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळे आणि जागतिक महासत्तांनी घातलेल्या र्निबधांनी खिळखिळा झालेला रशिया, ज्यांना आपणच खतपाणी घातलं त्या दहशतवाद्यांनी आता आपल्यावरच नखं उगारल्यानं बावचळलेला पाकिस्तान, मंदीग्रस्त जपान, इस्रायलादी अरब देशांतली अशांतता, युरोपियन युनियनमधील कुरबुरी, जगातील तब्बल ४०-४५ देशांत यंदाच होऊ घातलेल्या निवडणुका आणि अमेरिकेच्या दहशतवादविरोधी मोहिमेला धूप न घालता जगभर बोकाळत चाललेला आतंकवादाचा भस्मासुर अशा अनेकानेक आघाडय़ांवर २०१५ हे वर्ष जगाच्या दृष्टीनेही कसोटीचेच असणार आहे.   
एकीकडे अशी नकारात्मकता भरून राहिलेली असताना दुसरीकडे विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मात्र आशेची नवनवी किरणे दृष्टीस पडताहेत. रोज नवनव्या तंत्राधिष्ठित गॅझेट्सने जगभरातल्या बाजारपेठा फुलून येताहेत. त्यांच्यामुळे माणसाचं जगणं अधिक सुखकर, आरामदायी होत आहे. त्याला भेडसावणाऱ्या नानाविध समस्यांचं निराकरण करण्याबरोबरच त्यानं आजवर न पाहिलेल्या स्वप्नांकडे नेण्याचं काम रोज विकसित होणारं नवं तंत्रज्ञान करीत आहे. माणसाची आयुर्मर्यादा वाढविणाऱ्या शोधांनी त्याला अधिकाधिक आश्वस्त करण्यात कसलीच कसूर ठेवलेली नाहीए. २०१५ सालात अशा अगणित शोधांचे प्रत्यक्ष उपयोजन त्यावर आधारित यंत्र व उपकरणांच्या रूपात आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. या सगळ्याचा समग्र धांडोळा नववर्षांचं स्वागत करताना घेणं अप्रस्तुत ठरू नये.
म्हणूनच विविध क्षेत्रांमध्ये २०१५ सालात काय काय बदल घडणार आहेत, कोणकोणतं नवं तंत्रज्ञान आपल्या हाताशी येणार आहे याचा मागोवा घेणारे विशेष लेख पान ७ वर देत आहोत..