News Flash

थांग वर्तनाचा! : कन्फर्मेशन बायस

प्रयोग १: मृत्युदंडाची शिक्षा असावी की नसावी, याविषयी १५१ विद्यार्थ्यांची मतं जाणून घेण्यात आली.

|| अंजली चिपलकट्टी

अल्बर्ट ड्रायफस नावाच्या एका सेनाधिकाऱ्याच्या गोष्टीपासून सुरुवात करू. १८९४ च्या काळात तो फ्रेंच सैन्यात काम करायचा. एकदा कचरापेटीत फाडून फेकलेलं एक पत्र सापडलं आणि उघडकीला आलं की, कुणीतरी फ्रेंच सैन्यातला अधिकारी जर्मनांना आपली लष्करी गुपितं पुरवतो आहे. कसून तपास सुरू झाला आणि संशयाची सुई ड्रायफसपाशी येऊन थांबली. खरं तर त्याचं हस्ताक्षर त्या पत्रातल्या लेखनाशी जेमतेमच मिळतंजुळतं होतं. तरीही केवळ या आधारावर त्याला अटक झाली.  हस्ताक्षरतज्ज्ञांनी ते लेखन ड्रायफसच्या हस्ताक्षराशी जुळतं असा निर्वाळा दिला नव्हता. ड्रायफसचं आधीचं रेकॉर्ड अतिशय खणखणीत होतं. कोणत्याच गैरव्यवहारात त्याआधी त्याचा सहभाग आढळला नाही. खरी गंमत पुढे आहे. त्यानंतर त्याच्या घराची झडती घेतली तेव्हा हेरगिरीशी संबंधित काहीच पुरावे सापडले नाहीत. पण त्यामुळे अधिकाऱ्यांची अजूनच खात्री पटली. कारण त्यांच्या ‘लक्षात’ आलं की, ड्रायफसनं नुसती हेरगिरीच केली नाही, तर सर्व पुरावे नष्ट करण्याइतका तो हुशार होता! तो हुशार असण्याचा पुरावाही त्याच्या शिक्षकांनी दिला. त्यांनी हेही सांगितलं की, त्याची स्मरणशक्ती खूप तीक्ष्ण होती आणि त्याने शाळेत असताना परदेशी भाषा शिकल्या होत्या.. ज्यात जर्मनही होती. झालं! आता तर चौकशी अधिकाऱ्यांची खात्रीच पटली की तो दोषी आहे. कारण हेरांना जास्त स्मरणशक्तीची गरज असतेच. शिवाय त्याने नंतर हेरगिरी करता यावी म्हणून आधीपासूनच परदेशी भाषा शिकून घेतल्या होत्या. या समितीने आपलं दोषपत्र सादर केलं आणि सैनिकी कोर्टाने ड्रायफसला दोषी ठरवलं! त्याला अपमानास्पद वागणूक देत त्याची रवानगी एका बेटावर लष्करी कैदी म्हणून करण्यात आली.

ज्या समितीनं ही केस हाताळली त्यांनी मुद्दामहून ड्रायफसला अडकवण्यासाठी हे केलं होतं असं नक्की म्हणता येणार नाही. तरीही कोर्टातल्या ज्युरींना एवढय़ा क्षुल्लक पुराव्यांच्या आधारे कसं पटवलं गेलं? ड्रायफस ज्या हुद्दय़ावर होता त्या अधिकाऱ्यांपैकी तो एकमेव ज्यू होता.  ज्यूधर्मीयांविषयी असलेल्या पूर्वग्रहामुळे तयार होणारा नकारात्मक सुप्त भाव त्यावेळी युरोपमध्ये आणि त्यानुसार बऱ्याच फ्रेंचांवर होता. याच सुप्त प्रभावाचा परिणाम असा झाला की, तोच गद्दार असणार हे त्यांना इतकं पटलं होतं की मिळेल ती माहिती त्यांनी पुराव्यासाठी वाकवली. याला ‘मोटिव्हेटेड रिझनिंग’ असं शास्त्रीय परिभाषेत म्हणतात.

एखादी घटना, व्यक्ती किंवा बातमीविषयी आपलं आधीच काहीएक मत/ कल तयार झाला असेल तर नवीन माहितीकडे आपण आपल्या मताच्या ‘खिडकी’तूनच बघतो. आपल्याला अशीच माहिती, बातमी पटते/ आवडते, जी आपल्या मतानुसार असते. जर नवीन माहिती आपल्या मताविरुद्ध असेल तर आपण चक्क दुर्लक्ष करतो, नाकारतो. आपल्याला अशी माहिती देणाऱ्याचा राग येतो, वाईट वाटतं. त्याही पुढे जाऊन काही वेळा ती माहिती कशी चुकीची आहे हे दाखवण्यासाठी अजून पुरावे गोळा करू लागतो. याला वैज्ञानिक परिभाषेत ‘कन्फर्मेशन बायस’ असं म्हणतात. आपल्या नकळत शक्यतो आपण आपल्या विश्वासाला/ सुप्त प्रभावाला तडा जाईल असं वागत नाही.

‘‘मला नाही बुवा असा काही बायस.. ’’ असं म्हणूही नका. कारण ती आपल्याला उत्क्रांतीतून मिळालेली देणगी आहे- जी सर्व मनुष्यजातीला व्यापून राहिली आहे. याबाबत वैज्ञानिकांनी अनेक प्रयोग केले आहेत. त्यापैकी स्टॅनफर्ड विद्यापीठात वेगवेगळ्या वेळी केलेले दोन प्रयोग खूप बोलके आहेत.

प्रयोग १: मृत्युदंडाची शिक्षा असावी की नसावी, याविषयी १५१ विद्यार्थ्यांची मतं जाणून घेण्यात आली. त्यापैकी एकूण ४८ जणांना निवडण्यात आलं- ज्यात शिक्षेच्या बाजूने आणि विरोधी मत असलेले बरोबर सम प्रमाणात असतील. नंतर त्यांना बाजूने आणि विरोधी पुरावा देणारे वेगवेगळे अभ्यास वाचायला देण्यात आले. दोन्ही बाजूंचे अभ्यास अर्थातच काल्पनिक, पण विचारपूर्वक तयार केले गेले होते. नंतर त्यांच्यापैकी कोणाची मते बदलली, त्यांना कोणता अभ्यास जास्त बरोबर वाटला, असं विचारण्यात आलं. जवळजवळ सर्वानी त्यांची आधीची मते अधिक पक्की झाल्याचं सांगितलं. प्रत्येकाने स्वत:च्या मताला अनुकूल जे पुरावे होते तेच कसे अधिक विश्वासार्ह होते हे नीट मांडलं. शिवाय विरुद्ध बाजूचे पुरावे कसे कमी ताकदीचे आहेत असाही प्रतिवाद केला!

प्रयोग २ : ४२ सहभागींच्या जोडय़ा करून त्यांना काही स्थावर मालमत्तेचे (रिअल इस्टेट) फोटो दाखवले आणि त्याचं मूल्यमापन करायला सांगितलं. पहिल्या फेरीत हे काम एकेकटय़ाने करायचं होतं. दुसऱ्या फेरीत त्यांना या किमतीचा फेरविचार करून अंतिम किंमत सांगायची होती. पण त्याआधी त्यांना जोडीदाराने त्याच मालमत्तेची काय किंमत ठरवली ते दाखवण्यात आलं. ज्यावेळी जोडीदाराची किंमत त्यांच्या किमतीशी जुळत होती त्यावेळी त्यांनी दुसऱ्या फेरीत किंमत वाढवली. कारण त्यांना आता जास्त आत्मविश्वास वाटत होता. पण जेव्हा जोडीदाराची किंमत त्यांच्या किमतीशी जुळत नव्हती, तेव्हा मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं.

हे घडत असताना घेतलेल्या मेंदूच्या ऋटफक वरून असं लक्षात आलं की, दुसऱ्या फेरीत मताशी सहमती असेल तेव्हाच मेंदूचा विशिष्ट भाग (स्र्टाउ) उद्दीपित होतो. पण सहमती नसेल तर मात्र नाही. या मेंदूच्या भागाचा संबंध निर्णय घेणे आणि त्याची स्मृती ठेवणे या कामाशी निगडित आहे. थोडक्यात, मेंदू अशा निर्णयांची अधिक नोंद ठेवतो, ज्याला सहमती मिळते! याचं मूळ आपल्या उत्क्रांतीमधल्या सहजीवनात आहे असा अंदाज आहे. टोळीत राहताना एकमेकांच्या कौशल्यांची मदत घेत सहमतीने जगणं फायद्याचं ठरलं. अडचणी सोडवताना टोळीच्या निर्णयांना सहमती देणं आणि मिळवणं याला महत्त्व होतं.  आपल्या मताला इतरांचं अनुमोदन मिळणं म्हणजे आपलं टोळीतील स्थान बळकट होणं ही आनंदाची पर्वणीच! ‘तुझं पटलं बरं का! ’ असं कोणी म्हणालं, फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपवर लाइक्स आले की आनंद होतोच; इतकंच नाही तर तो माणूसही आवडू लागतो असा अनुभव तर आपण प्रत्येक जण अनेकदा घेतो. सहमतीमुळे मेंदूत डोपामाइन स्रवण्यानं या सुखद संवेदना जाणवतात. फेसबुक, ट्विटरसारखे सोशल मीडिया या डोपामाइनच्या लाटेवरच आरूढ असतात. आपल्या पोस्टला किती लाइक्स आले हे वारंवार बघितल्याशिवाय अनेकांना चैन पडत नाही, त्याचं मूळ कारण सहमतीची भावनिक गरज हे आहे. यात चुकीचं काय मग?

सहमतीची वृत्ती अर्थातच आपल्याला हवी आहे, कारण त्याचा फायदा विविध क्षेत्रांत होतोच. पण त्याचा ‘साइड इफेक्ट’ म्हणजे ‘कन्फर्मेशन बायस’ नको आहे. कारण सहमतीच्या आनंदाचं व्यसन लागलं की त्याच्या धुंदीत आपल्या मताला/ धारणेला अनुकूल असलेली माहिती, तिचे स्रोत जास्त विश्वासार्ह वाटतात, आणि असेच लोक जास्त आवडू लागतात. इंटरनेटवर माहिती मिळवताना आपण असेच पुरावे शोधतो, जे आपल्या मताला अनुकूल आहेत. आपण विरोधी पुरावे मिळाले तरी त्याकडे दुर्लक्ष करतो. दुसऱ्या बाजूचे विचार काय आहेत हे जाणून घ्यायची गरज वाटत नाही. एखादी माहिती आपल्या धारणेला तडा देणारी असेल तर मात्र ती माहिती विश्वसनीय नाही असं वाटतं. यामुळे विचार एकांगी होत जातात आणि सत्यापासूनही आपण लांब जात राहतो. याचा अजून एक पुरावा म्हणजे आपण पाहत असलेली न्यूज चॅनेल्स. आपण कोणती न्यूज चॅनेल्स पाहतो? आपल्या धारणा आणि मतांशी सहमती असणारी की त्याला विरोध करणारी? कदाचित तुम्ही दोन्ही प्रकारची चॅनेल्स पाहत असाल. पण कोणती चॅनेल्स बघायला तुम्हाला मनापासून आवडतात? (याची उत्तरं आपण स्वत:लाच द्यायची आहेत.)

पण बऱ्याचदा आपण असं जाणीवपूर्वक करत नाही! माणसाची ही सहजप्रवृत्ती आहे. मग आपण पुन्हा त्याच ऐरणीच्या मुद्दय़ापाशी येऊन पोचलो का? मेंदूची जैविक जडणघडण अशी आहे तर मग काय करणार? वगैरे..

निसर्गानं आपल्याला गुरुत्वाकर्षण ‘दिलेलं’ आहे, तरीही त्याला छेदून आपण उंच भराऱ्या घेतल्याच! ‘कन्फर्मेशन बायस’बाबत संशोधन करणाऱ्या माणसांनी स्वत:चे ‘बायस’ बाजूला ठेवत याचा अभ्यास केलाच ना!

आणि हो, त्या ड्रायफसच्या केसचं पुढे काय झालं तेही महत्त्वाचं आहे. ड्रायफस तुरुंगात गेल्यावर बदलून आलेल्या सैन्याधिकाऱ्याला तसंच एक हेरगिरी करणारं पत्र सापडलं. त्यानं गुप्तपणे केलेल्या तपासात दुसऱ्या एका फ्रेंच अधिकाऱ्याचा त्यात हात आहे असं त्याच्या लक्षात आलं. त्यानं ड्रायफसची केस पुन्हा कोर्टात उभी केली. ड्रायफास दोषी नाही असं सैन्यानं अधिकृतरीत्या मान्य केलं नाही, तरी त्याला सैन्यात परत त्याच पदावर नेमण्यात आलं!

ड्रायफसला न्याय मिळावा म्हणून त्याच्या बाजूने लढलेले अनेक सैन्याधिकारी, लेखक, फ्रेंच जनता यांनी हेच सिद्ध केलं की, ‘बायस’वर मात करून न्यायाची बाजू घेता येते!

anjalichip@gmail.com

(लेखिका वैज्ञानिक व विवेकवादी विचारपद्धती (दृष्टिकोन) या विषयाच्या अभ्यासक व प्रसारक आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2021 12:03 am

Web Title: beginning with the story of the albert dreyfus general akp 94
Next Stories
1 पुस्तक परीक्षण : सामान्यांचे जीवनचित्र
2 चवीचवीने.. : खार खुवा ओखोमिया
3 सदाबहार..
Just Now!
X