गॅसवर दूध जास्त तापवत ठेवलं तर, उकळलेलं दूध ऊतू जातं, त्या वेळेला असं का झालं? असं कसं झालं? असं होतंच कसं? असं कितीही ओरडलं तरी नंतर भांडं बाजूला काढून, ओटा साफ करावा लागतोच. मग अशा छोटय़ा-मोठय़ा तणावाच्या प्रसंगात भावनिक नाटय़ाची खरंच गरज असते का? खरं तर उगाच क्रोध वाढवून रक्तदाब वाढवण्याची गरज नसते, तर भावनिक नाटय़ टाळून भावनिक प्रगल्भता दाखवणं महत्त्वाचं असतं. प्राकृत भावनांच्या म्हणजेच काम, क्रोध इ. भावनांच्या उद्दिपनावर जो नियंत्रण मिळवू शकतो वा ज्याने नियंत्रण मिळवलं आहे, असा मनुष्य खरा सुखी मनुष्य किंवा खरा योगी! ‘खरा योगी’ या व्याख्येत अतिशय समर्पकपणे बसणारी व्यक्ती म्हणजे युगपुरुष छत्रपती शिवाजीमहाराज! समर्थ रामदासांनी त्यांना ‘जाणता राजा’ अशी उपाधी उगाचच दिली नव्हती. ज्यांनी ‘दासबोधा’त ‘विवेकलक्षणे’ सांगितली आहेत, त्या समर्थ रामदासांनी छत्रपतींची कारकीर्द स्वत: पाहिली होती. म्हणूनच त्यांनी अशा विवेकाने वागणाऱ्या या राजास ‘जाणता राजा’ म्हटले.
अल्बर्ट एलिस यांनी सदसद्विवेकवर्तन उपचारपद्धती शास्त्रोक्त बठक देऊन प्रचलित केली, विकसित केली हे जरी निर्वविाद सत्य असलं तरी आपल्याकडे भारतातही या ‘विवेका’विषयी खूप काही लिहिलं, सांगितलं आहे. श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेली ‘गीता’ ही ‘विवेका’वरच आधारित आहे. वर दिलेली ‘खरा योगी’ची व्याख्या ही कर्मसंन्यास योगात भगवंतांनीच सांगितलेली आहे. तसंच समर्थानीदेखील त्यांच्या ‘दासबोधा’त जी विवेकलक्षणं सांगितली आहेत, ती खूप काही ‘विवेक’ शिकवतात.
तितुक्यांची अंतरे धरावी। विवेके विचारे भरावी॥
कडोविकडीची विवरावी। अंत:कर्णे॥
यात सांगितलेला विचार हाच आहे. नाना लोक येऊन एखाद्या समस्याग्रस्त व्यक्तीला नाना सल्ले देतात. आपण त्यांचा सन्मानाने विचार करावा, साकल्याने विचार करावा आणि आपल्या सदसद्विवेकबुद्धीस योग्य वाटेल तेच करावे. त्यासाठीच पुढे ते म्हणतात,
धकाधकीचा मामला। कैसा घडे अशक्ताला॥
नाना बुद्धी शक्ताला। म्हणोनी सिकवाव्या॥
म्हणजेच विवेकाने विचार कसा करावा, अविवेकाची कास सोडून विवेकाकडे कसे जावे या विषयीच्या विविध क्लृप्त्या शिकल्या तरच ताणतणावांना यशस्वीपणे सामोरं जाता येतं, हे ‘रॅशनल’ सत्य त्यात त्यांनी सांगितलं आहे. त्याच्या शेवटी त्यांनी असंही म्हटलं आहे,
धीरे सांडता काये होते। अवघे सोसावे लागते॥
नाना बुद्धी नाना मते। शाहाणा जाणे॥
म्हणजे, ताणतणावांना धीर न सोडता सामोरं गेलं पाहिजे, त्यांचा सामना केला पाहिजे. ‘शहाणपणाने’ विवेकाची कास धरून विविध मतमतांतराचा सामना करत पुढे गेलं पाहिजे, जो एक ‘जाणता राजा’ खरा विवेकी राज्यकर्ताच करू शकतो!
पण आपण विवेकाकडे जायचं कसं? त्यासाठीची पहिली पायरी असते, आपल्या परिस्थितीचा स्वीकार करणं. आपल्या अविवेकी दृष्टिकोनाचाही स्वीकार करणं. तो स्वीकार कसा करावा या विषयी संत ज्ञानेश्वरांनी अतिशय सुंदर शब्दांत वर्णन केलं आहे,
ना तरी जांभया। पसरे सुख॥
तेथे अवचिता पडे। पीयुख॥
जांभई द्यायला तोंड उघडावे त्यावेळी अवचितपणे पीयूष/अमृतच तोंडात पडावे अशी ही परिस्थिती आहे. म्हणजेच, ताणतणावाच्या स्थितीतही ही विकासाची, प्रगतीची संधीच आहे, असं बघावं असं थोडक्यात ज्ञानेश्वर सांगतात किंवा त्याच स्वीकारण्याबाबत पूज्य विनोबाजी गीताईत लिहितात, आपण जय, लाभ, वा सुखाचा जसा सहज स्वीकार करतो तसाच पराजय, हानी, दु:खाचा स्वीकार करावा. म्हणजेच हा स्वीकार झाला तर आपण पुढच्या बदलाला तयार आहोत हा सिग्नल मिळू शकतो. स्वीकारानंतरची पुढची पायरी असते ते आपल्या अविवेकी विचारांसमोर विवेकी विचारांना पडताळून पाहणे. अर्थात हे पडताळून पाहणे हे समुपदेशकाच्या मदतीनेच करता येते. विविध उदाहरणांसह किंवा कल्पनात्मक पातळींवर तसा विचार करून अनुभव घेणं हा एक भाग असू शकतो किंवा दैनंदिन जीवनातील विविध प्रसंगात तसा सुविचार करून त्याची अनुभूती घेणं हाही एक भाग असू शकतो. त्यासाठी त्याच विवेकी विचारांचा जप कसा करायचा हेही सांगितलं जाऊ शकतं. त्याच्याच जोडीला वर्तनोपचाराचा (Behavior Theropy)) उपयोग त्या त्या लक्षणांनुसार केला जाऊ शकतो. परंतु या सर्वासाठी एक प्रकारची स्वभावाची लवचीकता असणं आवश्यक आहे. स्वभाव हा जरी उपजत असला तरी त्यात ज्यांच्या स्वभावात लवचीकता असते ते किंवा जे स्वभावात प्रयत्नपूर्वक लवचीकता बाणवू शकतात तेच या बदलांना शेवटपर्यंत नेऊ शकतात. त्यामुळे असंच लवचीकत्व विवेकाकडे आपल्याला नेऊ शकतं व ताणतणावांचा सामना करण्यास सामथ्र्य देतं. म्हणूनच संत तुकारामांनी म्हटलं आहे,
महापुरे झाडे जाती। तेथे लव्हाळे रहाती॥

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Aajibaichi Shala
प्रेरणादायी…! वयाचे बंधन ओलांडले; नऊवारी नेसून अन् डोक्यावर पदर घेऊन आजीबाई गिरवताहेत शिक्षणाचे धडे
नात्यातील ताण्याबाण्यांची गंमत
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…