News Flash

शापित वास्तूची अरण्यपहाट!

ब्रिटिशांनी महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतराजीच्या वनवैभवी मेळघाटात बेलकुंडचा डाकबंगला १८९१ मध्ये बांधला.

| August 16, 2015 01:41 am

ब्रिटिशांनी महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतराजीच्या वनवैभवी मेळघाटात बेलकुंडचा डाकबंगला १८९१ मध्ये बांधला. त्याकाळी रस्त्यांचे जाळे विणताना इंग्रज अधिकारी विश्रांतीकरिता त्याचा वापर करीत असत. सुरुवातीला या वास्तूची बांधकाम दगडी भिंती आणि गवताच्या छताचे होते. कालांतराने त्यात सुधारणा होत होत शिरावर इंग्रजी कवेलू आले. त्यानंतर सिमेंटचे पत्रे आले. तर व्हरांडय़ासाठी लोखंडी ग्रिल लागले. पूर्वी जवळून वाहणाऱ्या निर्झराच्या स्वच्छ, निर्मळ पाण्यावर येथे येणारे जीव आपली तृष्णा भागवायचे. आज ही वास्तू सव्वाशे वर्षांची झाली आहे. शतकापूर्वीचा प्रारंभीचा इथला काळ होता अनाघ्रात, अस्पर्श जंगलाचा. या अरण्याचं ऐश्वर्य म्हणजे वाघ, बिबटे, अस्वल, रानगवे, रानकुत्रे, सांबर इत्यादी वन्यजीव त्याच्या अंगाखांद्यावर खेळायचे. बागडायचे. नानाविध पक्षी भूपाळी गाऊन या जंगलातील पाखरपहाट जागवायचे. तर निसर्गप्रेमी तसेच निसर्ग अभ्यासक मंडळी पौर्णिमेच्या दुधाळ चंद्रप्रकाशात या जंगल परिसराचं मनसोक्त सौंदर्य आस्वादायचे. पूर्वी येथे बेलवृक्षांची प्रचंड दाटी होती. त्यावरील बेलफळांचा स्वाद पशुपक्षी मनसोक्त चाखायचे. या अरण्यात किडे-कीटक आपली कुळं वाढवायचे. या घनगर्द अरण्यात त्याकाळी होता इंग्रजांचा एक ‘पडाव’! ऐश्वर्यसंपन्न ‘बेलकुंडचा डाकबंगला’! हे आता सांगायचे कारण म्हणजे अलीकडेपर्यंत हा डाकबंगला अखेरच्या घटका मोजत होता. पण आता पुन्हा तो नव्याने कात टाकण्याची शक्यता बळावली आहे.
त्याकाळी ब्रिटिश अधिकारी शिकारीचा परवाना घेऊन वाघांची शिकार करत आणि आपली मर्दुमकी दाखवीत. पुढे देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही बरीच वर्षे बेलकुंड विश्रामगृहाचं जंगलक्षेत्र मोठी श्रीमंती बाळगून होतं. या बंगल्यानजीक चार पावलांवर रस्त्यावर जो काळ्या शिळांचा चंद्रकोरी कमानीचा दगडी पूल आहे, तो तर या डाकबंगल्यापेक्षाही जुना- म्हणजे सन १८८६ सालातला आहे. १२९ वर्षांपासून आजही तो मोठय़ा दिमाखात उभा आहे. नुसताच उभा नाही, तर चारचाकी, दहा-दहा चाकी वाहनं त्यावरून बिनधास्तपणे ये-जा करीत असतात. मात्र गेल्या आठ-दहा वर्षांपासून या विश्रामगृहाची वाताहात सुरू आहे. शिकारी मोकाट सुटलेत. डाकबंगल्याची खिडक्या, दारे तोडली गेली आहेत. छताला भोकं पडली आहेत. बंगल्यामधील ब्रिटिशकालीन फर्निचरची नासधूस झाली आहे. एवढंच नव्हे तर दगडी पुलावरील बांधकामाचे वर्ष, तो बांधणाऱ्या इंजिनीअरचे नाव असलेली लोखंडी पाटीसुद्धा काढायचा प्रयत्न झालेला आहे.
डाकबंगल्याची ही दुरवस्था व्हायचं कारण म्हणजे इंग्रजी राजवटीपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या या विश्रामगृहाचा ताबा वनविभागाला हवा होता. कारण तो मेळघाट व्याघ-प्रकल्पाच्या क्षेत्रात येतो. या वादाला जवळपास आठ-दहा वर्षे झाली. त्यामुळे या डाकबंगल्याचं अस्तित्वच जणू धोक्यात आलं.
निसर्गसंपन्न मेळघाटात एकेकाळी ऐश्वर्यसंपन्न असलेला, परंतु गेल्या काही वर्षांपासून बंद असलेला बेलकुंडचा हा डाकबंगला आता पुन्हा सुरू होण्याची लक्षणे आहेत. तसा या विश्रामगृहाचा इतिहास फार जुना आहे. ब्रिटिश राजवटीत १८९१ साली त्याची उभारणी झाली. त्याच्या पलीकडे जो काळ्या शिळांमध्ये बांधलेला चंद्रकोरी पूल आहे, तो १८८६ साली बांधलेला आहे. अलीकडेच बेलकुंडचे हे रेस्टहाऊस सार्वजनिक बांधकाम विभागाकडून व्याघ्र-प्रकल्पाच्या ताब्यात आले आणि या डाकबंगल्याला जगण्याचे नवे बळ मिळाले. लवकरच या पुरातन वास्तूची डागडुजी होईल. साफसफाई होईल. त्यात सोलर दिवे लावले जातील. चौकीदार येईल. वनाधिकारी, पर्यटक, अभ्यासक येथे पुन्हा मुक्कामास येऊ लागतील. पूर्वीसारखेच ते निसगसौंदर्याचा आनंद लुटतील. अपरात्री ‘चक्कू चक्कू चक्कू’ अशा रातव्याच्या आवाजाच्या साथीने आभाळातील टपोरं चांदणं अंगावर घेतील. पुन्हा एकवार या विश्रामगृहाला त्याचं हरवलेलं रूप परत लाभेल आणि इथल्या समृद्ध अरण्यराजीच्या सान्निध्यात त्याच्या शापित सौंदर्यावरील संधिप्रकाश मावळून नवी अरण्यपहाट उगवेल.
एक अरण्ययात्री म्हणून माझ्या असंख्य स्मृती बेलकुंड डाकबंगल्याशी निगडित आहेत. गेली तीस-बत्तीस वर्षे मी बेलकुंडच्या प्रेमात आहे. येथील सहाही ऋतूंतले निसर्गसोहळे मी अनुभवले आहेत. बेलकुंडच्या निखळ, निर्मळ सौंदर्यानं मला भुरळ घातली आहे. बाजूला वाहणारी गडगा नदी, डाकबंगल्याच्या शेजारून वाहणारा बेलनाला यामुळे पावसाळ्यात या जंगलाचे नितळ सौंदर्य स्वर्गसुखाचा आनंद देते. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तर येथील अरण्यभूमी रानझेनिया, रानहळद, भूमका, कळलावी, रानपऱ्हाटी इत्यादी नानाविध फुलांच्या ताटव्यांनी बहरते. हे जंगल सिरोपिजीयासारख्या अत्यंत दुर्मीळ वनस्पतीसाठी प्रसिद्ध आहे. येथेच माझ्या हातून बरेच अरण्यलेखन झाले. ‘पडाव’ या पुस्तकाची कल्पनाही मला इथे वन्यजीवांच्या सहवासात सुचली. बेलकुंडच्या रानावनात मी आजवर खूप भटकलोय. कित्येक मुक्काम केले. रात्रीच्या वेळी बेलकुंड रेस्टहाऊसच्या व्हरांडय़ात वाघाची डरकाळी ऐकली. अस्वलाचे गुरगुरणे ऐकले. रानकुत्र्यांनी सांबराची केलेली शिकारही मी पाहिली. या सर्व मुक्कामांत येथे सर्वाधिक काळ चौकीदार राहिलेले गणपतराव साळुंके यांच्याशी रात्रीच्या गप्पा रंगत. वनाधिकारी, कर्मचारी, पक्षी-अभ्यासक, पर्यटक यांची पूर्वी येथे भरपूर वर्दळ असे. अलीकडे ती थांबली आहे.
गेल्या आठ-दहा वर्षांपासून येथे एकही चौकीदार नाही. बफर क्षेत्रात असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेलं हे रेस्टहाऊस मेळघाट व्याघ्र-प्रकल्पाच्या ताब्यात द्यावं म्हणून वाद सुरू होता. या सगळ्या धामधुमीत निसर्गकुशीतील या रेस्टहाऊसकडे अत्यंत दुर्लक्ष झालं. दारं, खिडक्या, छप्पर, व्हरांडा, फर्निचरची नासधूस झाली. चौकीदारासाठी असलेले निवास कोलमडून पडले. मात्र, आता हा डाकबंगला मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या ताब्यात आल्याचं समजतं. त्यामुळे आता या डाकबंगल्याच्या दुरुस्तीचे, नवीन चौकीदारासाठीचे, त्याच्या देखभालीसाठीचे प्रस्ताव तयार होतील. लवकरच बेलकुंड रेस्टहाऊसला पुनश्च त्याचं गतवैभव प्राप्त होईल. त्याचीच आता प्रतीक्षा आहे. ठ

निसर्गसंपन्न मेळघाटात एकेकाळी ऐश्वर्यसंपन्न असलेला, परंतु गेल्या काही वर्षांपासून अडगळीत पडलेला बेलकुंडचा डाकबंगला पुन्हा सुरू होण्याची लक्षणे आहेत. हे विश्रामगृह ब्रिटिशांनी सव्वाशे वर्षांपूर्वी बांधले आहे. मालकी हक्काच्या वादात सापडलेले हे रेस्टहाऊस अलीकडेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून व्याघ्र-प्रकल्पाच्या ताब्यात आले आहे. त्यामुळे लवकरच या वास्तूला नवी झळाळी प्राप्त होईल आणि पर्यटक व वन-अभ्यासकांच्या सहवासात त्यास नवसंजीवनी लाभेल अशी आशा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2015 1:41 am

Web Title: belhund dak banglow
Next Stories
1 अनवट रागांचा बादशहा
2 सिंहस्थातील विकासयोग
3 आधुनिक तंत्रयोग!
Just Now!
X