डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय ओक यांचे भवतालातील घटितांची दखल घेणारे साप्ताहिक ललित सदर..
चेन्नईहून आलेले विमान मुंबईच्या धावपट्टीला लागले आणि रांगत रांगत आपल्या नियोजित पाìकग लॉटमध्ये येऊन थांबले. एखादी एस. टी. स्टॅण्डला लागल्यावर ट्रंका-वळकटय़ा काढण्यासाठी बाया-बापडय़ांची जशी झुंबड उडते तसेच आतले दृश्य होते.  माíगकेत जागा मिळाल्यावर मीही बॅग घेऊन उतरू लागलो.  हवाईसुंदरी सुहास्य वदनाने निरोप देण्यासाठी उभ्या होत्याच.  त्यांच्या पाठीमागे विमानाच्या कॉकपिटचा दरवाजा होता.  दरवाज्यावर लावलेल्या एका स्टिकरने माझे लक्ष वेधून घेतले..
“Beyond this point, you are not supposed to take your worries inside.” विमान चालविणाऱ्या वैमानिकांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देणारा एक प्रेमळ सल्ला असावा असे त्याचे स्वरूप होते. तुमचे बायकोशी भांडण झाले असेल, मुलांशी वितंडवाद झाला असेल, मुलांच्या Late night parties  तुम्हाला विवंचनेत टाकीत असतील, आई-वडिलांचे प्रकृतिस्वास्थ्य तुमचे मन पोखरत असेल, कर्जाचे हप्ते तुम्हाला भिववीत असतील, नोकरीतील अनिश्चितता तुमची झोप उडवत असेल.. कारणे काहीही असोत, ती व्यक्तिनिहाय बदलती का असेनात, त्या साऱ्या चिंता इथेच सोडायच्या. त्यांच्यासाठी जणू ही लक्ष्मणरेषा. येथून पुढचा दरवाजा उघडलात की तुम्ही एक व्यक्ती नसून कर्तव्यतत्पर मूर्ती आहात. असंख्य प्रवाशांनी आपला जीव तुमच्या हाती सुपूर्द केलेला आहे. तुम्ही केवळ वैमानिक नाही, तर या दोनेकशे प्रवाशांचे काही तासांपुरते का होईना, पालक आहात. तेव्हा तुमच्या वैयक्तिक आशा-आकांक्षा, अपेक्षा आणि चिंतांना येथे थारा नाही. आता तुम्ही कोणाचे बाप, भाऊ, मुलगा, नवरा नाही, तर आता तुम्ही फक्त वैमानिक आहात, हे सूचित करणारा तो स्टिकर मला मोहित करून गेला.
हा स्टिकर असाच्या असा घ्यावा आणि ऑपरेशन थिएटरच्या दारावर लावावा असे मनात आले. कर्तव्याच्या भावनेने मानवी हळुवार नात्यांवर पांघरुण घालणे आवश्यक आहे, हे अर्जुनाला सांगणारा कृष्ण आठवला. तो नसता तर ‘सीदन्ति मम गात्राणि, मुखं च परिशुष्यति’ म्हणणाऱ्या अर्जुनाला आजवर कोणीतरी स्मरले असते का? मनावर धोंडा ठेवून पतिनिधनानंतर कंबर कसून, पदर खोचून राबणाऱ्या विधवेची व्यथा ही त्या वैमानिकासारखीच नव्हे का?
दुख आणि चिंता कधीच संपत नाहीत. त्यांचे झाकोळ आपल्या कर्तव्यावर झडप घालते तेव्हा आपल्या हातून कळत-नकळत चुका होतात. आपली निर्णयक्षमता बाधित होते. आणि उच्च अधिकारपदावर बसणाऱ्या व्यक्तींनी भावनेच्या आहारी जाऊन घेतलेले निर्णय मोठय़ा प्रमाणात नुकसानकारक ठरतात, हे अगदी देशाच्या इतिहास-भूगोलापासून वाडय़ा-वस्त्यांच्या नियोजनामध्येही दिसून येते.
तेव्हा सांगायचे ते इतकेच, की ज्याला चिंता नाहीत असा माणूस नाही. जेथे ताणतणाव नाहीत अशी जागा फक्त जमिनीच्या खाली सहा फुटावर! पण जितेपणी ते भाग्य लाभणार नाही. तेव्हा कामावर आलो की घर आणि घरदार विसरायचे आणि सुकाणू हाती घ्यावयाचे.
.. सुहास्यवदना हवाईसुंदरीच्या पाठीमागे असलेल्या दरवाज्यावरच्या स्टिकरला मी हात उंचावून सलाम केला आणि तिचा बावचळलेला चेहरा दुर्लक्षून शिडीच्या पायऱ्या उतरू लागलो.