हेमंत प्रकाश राजोपाध्ये – rajopadhyehemant@gmail.com

भगवान पतंजली भारतीय संस्कृतीतील विलक्षण, अलौकिक व्यक्तित्व. ‘योगशास्त्राचे प्रवर्तक’ ही त्यांची ओळख गेल्या सहा-सात दशकांत अधिक रूढ झाली असली, तरी परंपरेनुसार पाणिनीकृत व्याकरणावरील साक्षेपी भाष्य अशी ओळख असलेले ‘महाभाष्य’ या ग्रंथाचे कर्ते पतंजली व योगमार्ग प्रवर्तक असलेले पतंजली अभिन्न असल्याची धारणा समाजात गेली दोन सहस्रकं अभिमत आहे. या दोन्ही शास्त्रांचे प्रवर्तक असलेली व्यक्ती एकच आहे की कसे, यावर अनेक अभ्यासकांनी मते मांडली आहेत. तरी त्यात न जाता आपण आपल्या विषयाला हात घालू. ‘महाभाष्य’ या व्याकरण, भाषाशास्त्राचे तत्त्वज्ञान मांडणाऱ्या  अद्वितीय ग्रंथाच्या सुरुवातीला पतंजली यांनी ‘शब्द म्हणजे नेमकं काय?’ यावर विवेचन केलं आहे. ‘गो’ अर्थात ‘गाय’ या शब्दाच्या माध्यमातून ‘शब्द’ संकल्पनेची व्याख्या केली आहे. पतंजली सांगतात, विशिष्ट धारणाधिष्ठित उच्चारण किंवा ध्वनी.. उदाहरणार्थ ‘गो’- ज्यातून गळ्यावरील लोंबणारी मांसाची पोळी, शेपूट, वशिंड, खूर  यांची प्रतीती होते तो शब्द. आधुनिक भाषाशास्त्राच्या चौकटीत फर्डिनांड दि सोस्यूर या भाषाशास्त्रज्ञाने मांजरीचे उदाहरण देत संबंधित ध्वनीच्या उच्चारणातून चार पायांच्या विवक्षित पशूची प्रतिमा मन:पटलावर उमटते तेव्हा विशिष्ट ध्वनिसंकेत, त्यातून निर्दिष्ट होणारी वस्तू किंवा कल्पना यांच्यातील नाते हे त्या वस्तूशी संबंधित ध्वनीचे जोडले जात असलेले काहीसे आभासी असते. म्हणजेच भाषेच्या संरचनेतून व्यक्त होणारे अर्थ हे नैसर्गिक नसून भाषिक संदर्भात ध्वनी किंवा शब्द, त्यांतून व्यक्त होणाऱ्या वस्तूंची ओळख आणि त्यांचे स्वतंत्र अस्तित्व किंवा भेद हे ध्वनी आणि वस्तूच्या नात्यातून लक्षात घेणे आवश्यक ठरते. भाषाशास्त्रीयदृष्टय़ा एखाद्या भाषेच्या घडणीचे ऐतिहासिक स्तर आणि विशिष्ट काळातील भाषेचे समकालीन संदर्भ या दोन चौकटी लक्षात घेणे गरजेचे असते. व्यावहारिक भाषेच्या विकसनात दोन घटकांच्या मिसळणीतून जे जे शब्द उच्चारले जातात, त्यातून त्या त्या वर्तमानातील भाषाव्यवस्था उदयाला  येत असते.. म्हणजेच आपल्या नित्याच्या भाषाव्यवहारातून- असं प्रतिपादन सोस्यूर यांनी केलं आहे.

Razmanama Mahabharata in Persian language
महाभारत संस्कृतातून फारसीत; अकबराच्या साहित्यिक आविष्काराबद्दल तुम्हाला माहितेय का?
Marathi Bhasha Din 2024 Oldest Inscription at Akshi Alibaug in Marathi
मराठी भाषेतील सर्वात प्राचीन शिलालेख कोणता? तो कुठे आहे? काय लिहिले आहे त्यात?
Stupa Architecture
UPSC-MPSC: भारतीय स्थापत्य रचनेतील स्तूपाची परंपरा नेमकी काय आहे?
kutuhal writer noam chomsky
कुतूहल : नोम चॉमस्की

क्लाउड लेव्ही स्ट्रॉस हे सोस्यूर यांच्या संशोधनाने प्रभावित झालेले सुप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ. त्यांनी सोस्यूर यांची भाषिक मांडणी व तिची चौकट लक्षात घेत समाजशास्त्राच्या अभ्यासात वंशवाद, पुराकथा, मानवी नात्यांची घडण यांच्याभोवती केंद्रित असलेली मानवी मने आणि समाजव्यवस्था कशा घडत जातात याचा मागोवा घेतला आहे. मानवाची मानसिक घडण विशिष्ट संकेत, मिथके यांमुळे प्रभावित होत असून, मानवी संवेदना आणि मिथकांतून येणारे प्रभाव यांच्यातून वेगवेगळ्या मानवी समुदायांमध्ये एक प्रकारची आंतरिक समानता बऱ्याच अंशी दिसून येते अशी मांडणी त्यांनी केलेली दिसते. त्यांच्या मांडणीनुसार, मिथकेदेखील एखाद्या भाषिक व्यवस्थेसारखे काम करत असतात. एखाद्या व्याकरण नियमाप्रमाणे किंवा विशिष्ट भाषिक संकेतव्यूहाप्रमाणे या मिथकांतून समाजमन घडत असते असे स्ट्रॉस यांनी दाखवून दिले. त्यांच्या प्रभावातून समाजातील विसंगती, मानवी मर्यादांची अपूर्णता या जाणिवांना मात देण्याचे प्रयत्न माणूस करत असतो. थोडक्यात, मानवी समाजाच्या घडणीचा प्रवास भाषिक शब्द, अर्थ यांचे संबंध आणि मानवी भावविश्वातल्या धारणा, त्यांना आकार देणारी मिथके आणि अन्य सांस्कृतिक व्यवहारांच्या सूक्ष्म ऐतिहासिक उकलीतून समोर आणण्याची प्रक्रिया सोस्यूर किंवा स्ट्रॉस यांनी विशिष्ट संशोधन प्रक्रियेतून मांडली. या प्रक्रिया पद्धतीला अकादमिक विश्वात ‘संरचनावाद’ अशी संज्ञा आहे. अर्थात या प्रक्रिया पद्धतीत- विशेषत: स्ट्रॉस यांच्या मांडणीतील वैश्विक सरसकटीकरणाचा असलेला धोका क्लिफर्ड गीर्ट्झ या अभ्यासकाने दाखवून दिला आहे.

भारतीय संदर्भात उदाहरण द्यायचं तर भारतीय समाजात संवेदनशीलतेचा विषय असलेली रामकथा ही आधुनिक संदर्भात दृश्य माध्यमांचे आविष्करण, राष्ट्रवाद, धर्मकारण या मध्ययुगीन अस्मितांच्या चौकटींनी व्यापलेल्या समाजात नव्याने प्रकट झाली, ज्यावेळी इथला मध्यमवर्ग जागतिकीकरण, नव्या राष्ट्रवादाच्या धारणा आणि आर्थिक स्थित्यंतरे यांना सामोरे जात होता. या काळात हिंदू धर्माच्या शाकाहारप्रवणतेचा पुरस्कार करणाऱ्या, राष्ट्रीय जाणिवांमध्ये मिसळून जाणाऱ्या धार्मिक जाणिवांचा प्रकर्ष होत असलेल्या काळात ही कथा दृश्य माध्यमांच्या तंत्रातून लोकांसमोर आली. त्यातून समाजातील कौटुंबिक मूल्यांच्या आदर्शापासून वेगवेगळ्या सांस्कृतिक धारणा आणि अस्मितांचे बेमालूमरीत्या एकजीवीकरण होण्यास मदत झाली. मात्र, रामानंद सागर यांनी दाखवलेल्या हिंदीभाषक समाजातील ‘तुलसी रामायणा’ने प्रभावित संस्करणाला ‘वाल्मीकी रामायण’ मानणे, असे मानताना ‘वाल्मीकी रामायणा’खेरीज अन्य भाषा व प्रदेशांतील रामायणे व त्यांच्या संबंधित प्रदेशातील, भाषक- समूहांतील प्रभावांना झाकोळून रामायणाविषयी एकसंध धारणा निर्माण झाल्या आणि त्यातून धर्मकारण आणि राजकारण यांना वेगळीच दिशा कशी मिळाली, यावर अनेक अभ्यासकांनी मांडणी केलेली आहे.

भारतीय समाज, संस्कृतीच्या अभ्यासात मॅदलीन बियादर किंवा लुई दुमों इत्यादी अनेक अभ्यासकांनी संरचनावादी रीतींचा वापर केल्याचे दिसून येते. संरचनावादाच्या आधारे या अभ्यासकांनी केलेल्या मांडणीच्या मर्यादा अभ्यासक दाखवून देत असले तरी सोस्यूर किंवा स्ट्रॉस यांनी मांडलेल्या प्रारूप आणि अभ्यासरीतीतून समाजधारणेच्या वेगवेगळ्या पदरांचा मागोवा लक्षणीय रीतीने घेता येतो. मात्र, भाषा, मिथके आणि अन्य कर्मकांडादी घटकांचे वेगवेगळे पदर ऐतिहासिक रीतीने उलगडण्याच्या दृष्टीने संरचनावादाने उभे केलेल्या पद्धती निश्चितच महत्त्व राखून आहेत.

संरचनावादाप्रमाणे उत्तराधुनिकतावाद हा समाजशास्त्रातला महत्त्वाचा सिद्धांत. मार्टिन हायडेगर या प्रसिद्ध तत्त्वज्ञाने ‘पाश्चात्त्य इतिहास आधुनिक म्हणवल्या जाणाऱ्या काळाच्या  कक्षा ओलांडण्याच्या टप्प्यावर येऊन ठेपला’ असल्याचे प्रतिपादन केले. जेन फ्रॅंक्वा ल्योटार्ड यांनी म्हटल्यानुसार, ‘आधुनिकता संबंधित काळातील वर्तमानाला नेहमीच त्या किंवा आधीच्या काळाच्या पुढे असलेल्या अवस्थेत नेत असतात.’ त्यामुळे ‘उत्तराधुनिकता’ या शब्दात आधुनिकता अध्याहृत धरली जाते. म्हणजेच उत्तराधुनिकता ही आधुनिकतेच्या पुनर्लेखनाच्या रूपात अभिव्यक्त होत असते. वाढत्या अभिव्यक्तीच्या अवकाशात व्यक्तिगणिक बदलत जात असलेली संभाषिते, धारणा, ज्ञानप्रक्रिया यांच्या गुंतागुंती आणि भेद यांतून त्या भेदांविषयीच्या आपल्या संवेदना अधिकाधिक स्पष्ट रूपात समोर आणण्याची क्षमता उत्तराधुनिकतेत असते असे ल्योटार्ड यांनी म्हटलं आहे.

त्यामुळे संरचनावादाला अभिप्रेत असलेल्या विशिष्ट आचार, रीती किंवा ग्रांथिक संदर्भाच्या आधारे अर्थनिर्णयनाच्या प्रक्रियेच्या मर्यादा ओलांडून उत्तराधुनिकतावाद अधिकाधिक विविधता, भेद आणि विकेंद्रित धारणांचे प्रतिनिधित्व करण्यावर व त्यानुसार ज्ञानरचना उभी करण्यावर भर देतो. या रचनांना आधारभूत ठरला तो एडमंड हस्सेर्ल व त्याचा शिष्य मार्टिन हायडेगर आणि त्यानंतर जॅक्स देरिदा या अभ्यासकाने अधिक विस्ताराने व व्यापक रूपात मांडलेला विखंडनवाद-ीिूल्ल२३१४ू३्रल्ल- सिद्धांत. देरिदा यांनी म्हटलं आहे त्यानुसार, ‘विखंडनवादातून खरे तर अस्तित्वात असलेल्या अनेक बाबी दाखवून देणे अधिक सुलभ होते. एखाद्या तात्त्विक मांडणीतून एखाद्या विषयाला अनुकूल किंवा प्रतिकूल अशा दोन्ही बाजू दिसून येत असतील व दोन्ही बाजूंना वेगवेगळी तथ्ये, सिद्धांताच्या खरे नाकारता येऊ शकत असेल अशी विधर्मी तथ्ये वेगवेगळ्या चौकटींच्या संदर्भात समोर आणण्याची क्षमता विखंडनवादातून मिळते. होमी के. भाभा किंवा गायत्री चक्रवर्ती-स्पिवाक यांनी या पद्धतीसोबत सायकोअनॅलिसिस आणि स्त्रीवाद, मार्क्‍सवाद यांची जोड देत भारतीय धर्माकडे बघण्याचा अकादमिक दृष्टिकोन मांडला. संस्कृतीची निर्मिती किंवा औचित्य हे मानवी राहणीच्या सुकरतेसाठी असेल तर स्थलांतर, पर्यावरणातील बदल किंवा विदेशात स्थायिक झालेले समूह आणि त्यांच्यावरील प्रभाव यांचा मागोवा घेत संस्कृती आणि त्या संस्कृतीच्या घडणीत भूमिका बजावणारे आधुनिक घटक यांचा परामर्श घेणे अगत्याचे असते, असे भाभा यांनी प्रतिपादन केले आहे. चक्रवर्ती-स्पिवाक यांची मांडणी कुठल्याही विशिष्ट सिद्धांतवादाला प्रमाण न मानता पाश्चात्त्य प्रभावाला प्रत्युत्तर देणारी, त्याचवेळी शोषित-वंचित अशा स्त्री व सबॉल्टर्न समूहांना प्रतिनिधित्व मिळवून देण्याकडे झुकलेली दिसून येते. प्रतिष्ठेच्या स्थानांचे फायदे बाजूला ठेवून पूर्वग्रह, आधीचे समज यांना बाजूला ठेवण्याचे आवाहन त्या उत्तराधुनिकतावादी अभ्यासकांना करतात.

आधुनिक विचारव्यूहांतील या चौकटींतून  इतिहासाच्या अभ्यासाच्या ज्या चौकटी समोर येतात त्यातून ग्रंथमीमांसा आणि रूढ अभ्यासाच्या रीतींमधून विश्लेषणाच्या ज्या पद्धती विकसित झाल्या त्यातून अभ्यासाच्या नव्या दिशा आधुनिक अभ्यासकांना मिळाल्या. अभिजात भाषा, अभिजात साहित्याच्या अभ्यास करणाऱ्या  देशांतील ज्ञानशाखांमध्ये या सिद्धांतांच्या चौकटींचा स्वीकार किंवा कमीत कमी त्यांचा विचार करण्यासंदर्भातील जाणीव किंवा तयारी अजूनही दिसत नसली तरी अभ्यासाच्या या चौकटींचा विचार केल्याशिवाय आधुनिक काळात ज्ञानव्यवहार करणे आज शक्य नाही. धर्म, धर्मविषयक धारणा किंवा मिथकांविषयीच्या विविध समूहांच्या विसंगत धारणा यांची आधुनिक, उत्तराधुनिक संदर्भात संगती लावताना आधुनिकतेचे मापदंड त्यांना लावणे क्रमप्राप्त ठरते. वेगवेगळ्या राष्ट्रवादविषयक धारणा असोत किंवा धर्म, संस्कृतींसंदर्भातील जाणीव असोत; त्यांचे आचरण, चिकित्सा, विचार ज्या काळात केला जातो, ज्या संसाधनांच्या आधारे केला जातो तो काळ, ती संसाधने आणि तंत्रज्ञान आधुनिकतेच्या, उत्तराधुनिकतेच्या चौकटी सोबत घेऊनच येत असतात. त्यामुळे त्यांना आज नाकारले गेले तरी आधुनिकता सर्व संस्कृती, धर्माच्या, विचारसरणींच्या अनुयायांच्या गळी आपली अपरिहार्यता उतरवत असते. अशा वेळी या सिद्धांतांना आत्मसात करत, अभ्यास-चौकटींच्या कक्षा अधिक रुंदावत संशोधन रीतींचा मोकळेपणाने व चिकित्सक वृत्तीने स्वीकार करण्याची शहाणीव बाळगणे अधिकाधिक औचित्याचे ठरते.

(लेखक ‘ऑब्झव्‍‌र्हर रीसर्च फाउंडेशन’ या संस्थेत वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहेत.)