|| सुधीर माईणकर

प्रख्यात तबलावादक पं. भाई गायतोंडे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाचा धांडोळा घेणारा लेख..

गायतोंडे कुटुंब तसं मूळचं कोकणातलं. भाईंचे वडील डॉक्टर होते. प्रॅक्टिस करण्याकरता पुढे ते कोल्हापूरला आले आणि तिथेच स्थायिक झाले. डॉक्टरसाहेब स्वत: हौसेने हार्मोनियम वाजवीत असत. भाईंच्या लहानपणीच त्यांची तबल्याची आवड पाहून वडिलांनी त्यांना तबल्याचे शिक्षण चालू केले. तबल्याचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूरच्या तबला-शिक्षकांकडे झाल्यावर त्यांना संगीत क्षेत्रातील असामान्य कलाकार पं. जगन्नाथबुवा पुरोहित (गुणिदास) हे गुरूम्हणून लाभले. बुवांकडे ही जी शिकवणी सुरू झाली, त्या शिकवणीतच भाईंचा एक महान तबलावादक होण्याचा पाया रचला गेला. सुदैवाने त्यावेळेस बुवांकडे वेळ असल्यामुळे भाईंना जी कठोर आणि शिस्तबद्ध तालीम मिळाली त्याचे वर्णन असे करता येईल : रोज सकाळी तीन तास बुवा भाईंच्या घरी येत असत. अखंड तीन तास ही शिकवणी चालायची. या तालमीत तबल्याचा हात तयार करून घेणे आणि त्या शिस्तबद्ध हातांच्या आणि  बोटांच्या पोझिशनमधून शिकवलेल्या बंदिशी परत परत वाजवून घेणे. ही शिकवणी तीन वर्षे चालू होती. रोज सकाळी या शिकवणीत लेहरा वाजवण्याकरता राजोपाध्ये हे कलाकार त्यांच्या घरी येत असत. त्यामुळे भाईंचा जो रियाज झाला तो तालबद्धच असे. त्यामुळे भाईंची लयही पक्की झाली. या तीन वर्षांच्या शिकवणीच्या काळात भाईंच्या कॉलेजमध्ये संध्याकाळी प्रॅक्टिकलचे वर्ग ज्या दिवशी असायचे, ते वगळता उरलेल्या सर्व दिवशी संध्याकाळी आणखी दोन तासांची शिकवणी होत असे.

भाईंच्या आयुष्यातला हा तीन वर्षांचा शिकवणीचा काळ फार महत्त्वाचा होता. कारण गुरूंनी भाईंचा तबल्यावरचा हात शुद्ध केला. तबल्यावर वाजणाऱ्या अक्षरांमध्ये नादमाधुर्य निर्माण झाले. तबल्यातले महत्त्वाचे वादनप्रकार- म्हणजे पेशकार, कायदा, रेला, गत आणि तुकडा यामधील उत्कृष्ट बंदिशी बुवांनी भाईंना  शिकवल्या. समर्थपणे व प्रभावीरीत्या ते त्या वाजवू शकतील इतक्या तयारीने त्यांनी त्यांच्या हातात बसवल्या. थोडक्यात, तीन वर्षांअखेरीस भाईंचा हा प्रवास ‘तबल्याचा विद्यार्थी ते समर्थ तबलावादक कलाकार’ या अवस्थेप्रत पोहोचविणारा होता.

संगीतात आपण ज्यावेळी एखाद्या कलाकाराचे प्रस्तुतीकरण ऐकतो, त्यावेळी बहुसंख्य जाणकार श्रोत्यांच्या मनात प्रथम हा विचार येतो- की याचा गुरूकोण? कारण श्रोत्याला त्या गुरूचा अधिकार, त्यांनी दिलेली तालीम याविषयी कायम कुतूहल असते. आणि या कुतूहलापोटीच वाटते की भाईंचे गुरूजगन्नाथबुवा पुरोहित यांच्याविषयीही आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे.

जगन्नाथबुवा हे मूळचे आग्रा घराण्याच्या शैलीचे गायक. अनेक गुरूंकडून त्यांनी विद्या घेतली असली तरी त्यांचे मुख्य गुरू आग्रा घराण्याचे खलिफा उस्ताद विलायत हुसैन खाँ. गाणे शिकत असताना त्यांच्या मनात असे आले असावे,की आग्रा घराण्याची लयकारी समर्थपणे प्रस्तुत करता यावी याकरता आपण तबलाही शिकायला हवा. कदाचित स्वतंत्रपणे त्यांना तबलावादन आवडत असावे. त्यामुळे त्यांनी काही काळ गाणं शिकणं थांबवून फरुकाबाद घराण्याचे उस्ताद थिरकवां यांचा गंडा बांधून दीर्घकाळ तबल्याचे सखोल शिक्षण घेतले आणि थिरकवां शैलीच्या तबलावादनावर  प्रभुत्व मिळवले.

त्यानंतर पुन्हा तबला सोडून बुवा गाण्याकडे वळले. गायक म्हणून आणि गायनविद्येचे गुरू म्हणून त्यांनी अनेक गायकांना गाणे शिकवले. पं. जगन्नाथबुवांच्या गायनविद्येच्या शिष्योत्तमांत पं. राम मराठे,  पं. सी. आर. व्यास, पंडिता माणिक वर्मा,  पं. जितेंद्र अभिषेकी, पं. सुरेश हळदणकर, बालकराम आदींचा उल्लेख करावा लागेल. पण  बुवांकडे तबलावादक म्हणून जी विद्या आणि कौशल्य होते ते त्यांनी एकाच व्यक्तीला द्यायचे ठरवले. आणि ती व्यक्ती म्हणजे पं. भाई गायतोंडे. भाईंचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना तबल्याबरोबरच ते आणखीनही बरंच काही शिकत होते. त्याचबरोबर त्यांना क्रीडाप्रकारांचेही आकर्षण होते. आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धामधून भाई राजाराम कॉलेजमधून ओपनिंग बॅट्समन म्हणून खेळत असत. उदरनिर्वाहाचा व्यवसाय निश्चित करण्याच्या दृष्टिकोनातून ते केमिकल इंजिनीअर झाले आणि त्या ज्ञानावर पुढे त्यांनी काही वर्षे नोकरी आणि स्वत:चा व्यवसायही यशस्वीरीत्या केला. हे सर्व चालू असताना किंवा त्यानंतरही भाईंचा तबल्याचा सहवास आणि रियाज यात कधीच खंड पडला नाही. १९५४-५५ च्या सुमारास करिअर करण्याकरता ते मुंबईत आले आणि मुंबईकर झाले. पुढे ते ठाणेकर म्हणून स्थिरावले.

भाईंच्या तबलावादनाविषयी बोलायचे झाले तर त्यांचा तबल्यावरील हाथरखाव अत्यंत शास्त्रशुद्ध आणि प्रेक्षणीय होता. त्यांनी वाजवलेली तबल्यावरील नादाक्षरे स्वरमय असत. त्या नादामध्ये सकसता होती, पण कर्कश्शता नव्हती. नाजूकता होती, पण दुबळेपणा नव्हता. जगन्नाथबुवांनी दिलेल्या बंदिशी आणि त्यांचा निकास हा इतका आदर्श होता, की डोळे मिटले असता त्या बंदिशी ऐकताना आपण उस्ताद थिरकवा खाँसाहेबांनाच ऐकत आहोत असा भास होत असे. त्यांची ही वादनशैली संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालीच; पण हळूहळू उत्तर हिंदुस्थानातही भाईंचा हा थिरकवा शैलीचा तबला सर्वमान्य आणि प्रिय झाला. भाईंचे तबलावादन इतके प्रभावी असे,की जो रसिक भाईंचे तबलावादन पहिल्यांदाच ऐकत असे, त्याच्या मनात एकच प्रतिक्रिया उमटत असे. ती म्हणजे.. ‘ते आले, त्यांनी पाहिलं, आणि त्यांनी जिंकलं’!

भाई तबल्यावर उत्तम साथसंगत करत असत. पं. रामभाऊ मराठे, पं. कुमार गंधर्व, त्याचप्रमाणे राजाभाऊ कोगजे आणि अन्य ज्येष्ठ कलाकारांना ते संयमित साथ करत. तबलावादनाइतकेच तबलावादनशास्त्र, तालशास्त्र या विषयांसाठीही ते वेळ काढत असत. गांधर्व महामंडळाच्या लेखी व तोंडी परीक्षांना ते परीक्षक म्हणूनही जात असत. तबल्याचा अभ्यासक्रम काय असावा, या विषयातही त्यांना रस असल्याने विद्यापीठे आणि गांधर्व महाविद्यालय यांचे अभ्यासक्रम तयार करणे आणि त्यांच्यात सुसूत्रता आणण्याचे काम  ते करत असत. संगीताच्या राष्ट्रीय स्तरावरील परिसंवादांत (पुणे विद्यापीठ, इंदिरा कला विश्वविद्यालय- खैरागड, आयटीसीएसआरए, शिवाजी विद्यापीठ, संगीत नाटक अकादमी) ते आवर्जून सहभागी होत असत. तसेच तबल्याच्या कार्यशाळांतही ते भाग घेत असत. त्यांच्या असामान्य कलागुणांकरता त्यांना विविध संस्थांकडून पुरस्कार प्राप्त झाले. त्यातील अत्युच्च पुरस्कार म्हणजे केंद्र सरकारचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार!

तबल्याचा नसला तरी त्यांच्या संगीताचा वारसा त्यांचे सुपुत्र डॉ. दिलीप गायतोंडे पुढे चालवीत आहेत. संवादिनीपटू विश्वनाथ पेंढारकर यांच्याकडे त्यांचे शिक्षण झाले आहे. ते ठाण्यातले कुशल नेत्रचिकित्सक आहेत. अशा तऱ्हेने गायतोंडे घराण्याच्या रक्तातले संगीत अखंडपणे प्रवाहित आहे.