शाहू माणिक पाटोळे

‘‘हिंदू’नंतरची दहा वर्षे’ याबद्दल ‘लोकरंग’तर्फे लेख पाठवण्याचे आवाहन आम्ही केले होते. त्यास उत्तम प्रतिसाद लाभला. तथापि, विषयाच्या अनुषंगाने लिहिण्यापेक्षा या कादंबरीची चिकित्सा करण्यावरच अनेकांचा भर जाणवला. काहींनी बदलत्या काळानुरूप ‘हिंदू’च्या पुढच्या भागांत काय अपेक्षित आहे याचा पाढा वाचला. आजूबाजूचे झपाटय़ाने बदलणारे वास्तव ‘हिंदू’च्या पुढील भागांत कसे उतरेल याचे ठोकताळे काहींनी मांडलेले दिसले. तथापि काहीही असले तरी ‘हिंदू’कडून मराठी वाचकांना बऱ्याच आशा-अपेक्षा आहेत, हे वास्तव आहेच. त्यापैकी प्रातिनिधिक लेख..

भारंभार लिहिल्याने लेखक मोठा होत नसतो, तर तो काय लिहितो यावरून त्या लेखकाचे मूल्यमापन होत असते. अशा प्रकारच्या मोजके, पण सकस लिहिणाऱ्या लेखकांत भालचंद्र नेमाडे यांची गणना होते. पांडुरंग सांगवीकर व्हाया चांगदेव पाटील ते खंडेराव हा नेमाडे यांच्या लेखनाचा आणि लेखनात विस्तारत जाणाऱ्या जगाचा परीघ आहे. ‘हिंदू’ कादंबरी प्रकाशित झाली आणि मराठी साहित्यातील सर्व साहित्यप्रवाह, ओढे आणि वगळीतील लेखकांना जोराचा  झटका बसला. ‘‘हिंदू’ कादंबरीतील अमुक हे वर्णन खोटे आहे, काळाचे संदर्भ चुकीचे आहेत’ या प्रकारची फुटकळ  टीका तेव्हा झाली. तर ‘हिंदू’ कादंबरी कशी वाईट आहे हे सांगण्यासाठी औरंगाबादमध्ये तीन दिवसांचे चर्चासत्रही आयोजित करण्यात आले होते. एखादी साहित्यकृती वाईट आहे हे सांगण्यासाठी साहित्यिक, समीक्षक, विचारवंतांनी एकत्र यावे, यातच ‘हिंदू’चे यश सामावलेले आहे. ‘हिंदू’ची गेल्या दहा वर्षांत नीट समीक्षा झाल्याचे वाचनात नाही. ‘हिंदू’बद्दल एक तर विरोधात लिहिलं गेलं किंवा चांगलं! मराठीत चांगले समीक्षक नसल्याचे हे द्योतक वा दुश्चिन्ह असावे का?

‘हिंदू’मध्ये नेमाडे यांनी एकूणच गावगाडय़ातील आर्थिक, सामाजिक, धार्मिक, पारंपरिक परस्परसंबंधांचे खूप बारीकीने, तपशीलवार वर्णन केलेले असल्यामुळे ग्रामीण किंवा मागासवर्गीयांच्या विषयांवर तोपर्यंत हातखंडा लिहिणाऱ्या ग्रामीण पाश्र्वभूमी असलेल्या, पण शहरात स्थायिक असलेल्या साहित्यिकांची सद्दी गेल्या दहा वर्षांत कमी झाल्याचे दिसते. तोपर्यंत हे साहित्यिक गावाकडून गोळा करून आणलेला ऐवज सुटा सुटा करून लिहीत असत. ‘हिंदू’मध्ये त्यांना माहीत असलेलं आणि पुढे लिहायचं म्हणून राखून ठेवलेलं सगळं ‘डिटेल’मध्ये मांडलं गेल्याने या लेखकांकडील ‘साहित्यऐवज’ कालबाह्य़ झाला. यापुढे काही लिहावे, तर ‘हिंदू’त या आशयाचे लिहिलेले आहे, असं वाचक म्हणणार. पण ‘हिंदू’मुळे गेल्या दहा वर्षांत एक चांगली गोष्ट झाली. ती ही की, ग्रामीण भागातील नव्या पिढीतील साहित्यिक बदललेल्या परिप्रेक्ष्यात आपले अनुभव वेगळ्या अंगाने मांडू लागले आहेत. त्यांच्यावर ना ‘हिंदू’चे सावट वा प्रभाव आहे, ना पूर्वसूरींच्या ग्रामीण वा दलित साहित्याचा! गेल्या दहा वर्षांत ग्रामीण वा मानसिकदृष्टय़ा अर्धशहरी भागातील जी लेखकांची फळी पुढे येतेय, आलेली आहे; त्यांना आता कोणत्याच प्रवाहात बसवता येत नाही. ‘हिंदू’मध्ये वर्णन केलेला गावगाडा भलेही गेल्या काही वर्षांत जवळपास संपुष्टात आलेला असो, पण लोकांच्या मनात रुतलेला गावगाडा अजूनही संपलेला नाही. त्याची पुनस्र्थापना करण्याचे मनोरथ बाळगणारे संख्येने वाढल्याचे दिसते. नजीकच्या भविष्यकाळात काय घडेल ते कळायला अवकाश लागणार नाही असे वाटते. गेल्या दहा वर्षांत आरक्षणाचे चक्र उलटे फिरायला सुरुवात झालेलीच आहे; बघू या आणखी काय काय उलटे फिरणार आहे ते!