कुठल्याही बोली भाषेत उपहास खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त होत असतो. कारण त्यात सहजता असते आणि जगण्याचा पीळही असतो. त्यातही वऱ्हाडी बोलीत तर उपहास खूपच कडक आणि धारदारपणे व्यक्त होतो. वऱ्हाडातील माणसांची व्यक्त होण्याची तऱ्हाच अशी तऱ्हेवाईक आहे. म्हणजे वऱ्हाडी माणूस त्याच्या मुलाला अभ्यास कर, असे सरळ न सांगता, ‘‘बाबू, किती अभ्यास करसीन बाप्पा! थकला अससीन अभ्यास करू करू त आता टीव्ही पाह्यना उलीसाक पाच-सहा तास..’’ असे म्हणेल. अर्थात हे भाषिक बारकावेदेखील श्याम पेठकरांशी बोलताना सहज कळत गेलेले आहेत. त्यांचे ‘भावलीचे लगीन’ वाचताना याचा वारंवार प्रत्यय येत गेला. वऱ्हाडी भाषेतली कादंबरी आहे. कुठल्या तरी लग्नाबद्दल सांगणार आहे कादंबरीकार, याचा अर्थ ती खूप सहजतेने घ्यावी अशी हलकीफुलकी आहे असे समजून कुणी ही कादंबरी वाचायला घेत असेल तर पाण्यात उतरल्यावर अचानक आपल्या पायाला कुणी दगड बांधले आहेत, असे कळत खोल तळाशी गटांगळत जावे, अशीच गत ही कादंबरी वाचताना होण्याची शक्यता आहे. कादंबरीत उपहास आहे, व्यंग आहे, पण हसता हसता ‘दिल ही मे खिंचती है’ अशी स्थिती होते. खूप साधेपणाने या कादंबरीच्या आशयाशी भिडण्याचा प्रयत्न कुणी करू नये.
तसं वर वर पाहता कथानक अगदीच साधं आहे. ते सुरूही अगदी साधेपणानंच होतं. एखाद्या सालस बोधकथेनं संपता संपता अंतर्मुख करून टाकावं तसंच काहीसं होतं. ‘भगवानपूर मालूम हाय का तुमाले?’ असं निवेदक सुरुवातीला विचारतो आणि मग भगवानपूरचा पत्ता सांगण्याच्या निमित्ताने तो त्या भूप्रदेशाचा, तिथल्या माणसांच्या जगण्या-वागण्याच्या तऱ्हांपासून आयुष्याला लागलेल्या ताण्याबाण्यांसकट सगळेच अगदी रीतसर अन् तपशीलवार सांगून जातो. भगवानपूर हे पुनर्वसनात अन् शासन-प्रशासनाच्या निब्बर दिरंगाईत कसं कुरूप झालेलं गाव आहे, हे अगदी सहजपणे व्यक्त होऊन जातं. पेठकरांच्या प्रतिपादनाची शैली ‘सशाला बीळ दाखवा’ या लहान मुलांच्या कोडय़ासारखी आहे. सहज वाटते, मात्र मग पुढे निघून गेल्यावर पुन्हा मागे येऊन तिथल्या संदर्भाचा धागा पकडीत पुढे जावे लागते. त्यांच्या ‘ऋतुस्पर्श’ या निखालस देखण्या ललितबंधाचे पुस्तक वाचतानाही हा अनुभव येतोच. मात्र त्यातली भाषाशैली आणि या कादंबरीचे त्यांचे सांगत जाणे यात फरक आहे. या कादंबरीची तुलना ‘निशाणी डावा अंगठा’शी करण्याचा मोह समीक्षकांना होऊ शकतो. मात्र दोन्ही सटायरच असलीत तरीही विषयामुळे असावे किंवा आणखी काही कारण असावे, पण श्याम पेठकरांची ही कादंबरी वेगळी आहे.
एका अडचणींनी अवघडलेल्या गावात असलेली त्या गावकऱ्यांमध्ये असलेली एकी खूप विलोभनीय वाटते आणि मग खरेच असे असू शकते का, इतके कुटुंबातही दिसत नाही असे सख्य गावात, असा प्रश्न पडतो. मात्र जगापासून तुटलेल्या या गावातली माणसे एकमेकांना धरून राहतात, सहवासातून जगण्याची ऊर्जा निर्माण करतात, हे नंतर पटत जाते. गावात लग्नच जुळत नाहीत अन् सोयरीकीही येत नाहीत. गेल्या काही वर्षांपासून गावात मुला-मुलीचा बघण्याचाही कार्यक्रम झालेला नाही. त्यातून गावातल्या शाळेच्या मास्तरच्या लेकीला बघायला पाव्हणे येतात आणि गावात मोबाइलची रेंज नाही, या कारणाने तो मुलगा मास्तरांची सई पसंत असूनही नकार देऊन जातो. गावाला हे जिव्हारी लागते, मात्र हा गावाला लागलेला नाट आहे अन् तो काढायचा असेल तर गावात हिरवा मंडप पडायला हवा अन् त्यासाठी मग कुणाचेही लग्न व्हायला हवे. कुणाचे? तर मग भावला-भावलीचे!
लग्न हा त्या दोन जिवांच्या रेशीम बंधनाचा सोहळा असतो, मात्र त्याचा समारंभ, उत्सव करण्याच्या नादात रीत-रिवाज अन् त्यातून आलेल्या ‘इगो’मध्ये एका चांगल्या नात्याचा आपण विचका करत असतो. ते जिवंत नवरा-नवरीही आपल्यासाठी भावला-भावलीच होऊन जातात. त्यांच्या नाजूक भावविश्वाचा आपण विचारच करत नाही. अगदी आपल्या पाहण्याचा कार्यक्रमही ‘पपेट शो’ असतो. भावला-भावलीचा पाहण्याचा कार्यक्रम पार पडताना वाचत असताना हेच सारे जाणवत राहते. नंतर मात्र घटना वऱ्हाडी सहजतेने घडत आहेत असे वाटत असताना आत आत ओढत नेतात. पृष्ठभागी वाटणाऱ्या अर्थापेक्षा खूप गहिरा असा अर्थ साध्या अन् गमतीदार वाटणाऱ्या या घटनाप्रसंगात आहे, असे जाणवत राहते. पाहण्याचा कार्यक्रम झाल्यावर होकार द्यायचा तर भावलीची कुंडली मागितली जाते. भावली पांढऱ्या पायाची असेल तर? अशी शंका घेतली जाते. मग साक्षगंध, मानपान ते प्रत्यक्ष लग्नापर्यंतचा प्रवास आपल्या विवाहपद्धती आणि विवाहसंस्था यावरचे सटायरच आहे.
उपरोधाच्या भाषेत ग्रामीण जीवनही या कादंबरीत प्रवाही झालेले आहे. तिथले राजकारणही आहे. माध्यमांचा प्रभावही आहे. लग्न हा दोन जिवांना जोडणारा एक साधा विधी आहे. तो एक स्नेहाचा, प्रगाढ प्रेमाचा आणि बंधनाचा करार आहे. मात्र, त्याचे इतके अवडंबर आपण करून टाकले आहे की आठाण्यात होणारे लग्न कोटींच्या घरात जाते. त्याचा विस्तार कितीही होऊ  शकतो. लग्न कसे नि कुठे केले यावरून प्रतिष्ठा नक्की होत असते. साध्या भावलीच्या लग्नाचा विस्तार राज्याच्या पातळीवर होतो. वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्या कशा ‘बात का बतंगड’ बनवून टाकतात, यावर उपहासात्मक भाष्य या कादंबरीत आहे. या लग्नाची बातमी वर्तमानपत्रात येते. त्यातले ‘टीआरपी’ मूल्य ओळखून एक वृत्तवाहिनीवाला ती बातमी त्याच्या चॅनलवर चालवतो आणि मग हे लग्न एकदम राज्य स्तरावरचे होते. त्यात गाव आणि परिसरातले राजकारण शिरते. भावला-भावलीची जात आणि धर्मही मग तपासला जातो..!
‘टीआरपी’च्या नादात सर्वच वाहिन्यांवर ‘गांव मे हो रही है, गुड्डा-गुड्डी की शादी’ ही बातमी चालते. मुख्यमंत्र्यांपासून अनेक बडे नेते आणि कलावंत या लग्नाला येतात..
वऱ्हाडी भाषेतून अत्यंत मिश्कीलपणे कोपरखळ्या मारत कथानक चित्रदर्शीपणे डोळ्यासमोर साकारण्यात पेठकर यशस्वी ठरले आहेत. लग्नावर भाष्य करणारी ही कादंबरी राजकारण आणि समाजकारणातले व्यंगही नेमकेपणाने पकडते.  वास्तवही हेच आहे की, लग्नापासूनच समाज घडत जातो आणि विवाह हा समाजमान्यतेचाच विधी आहे. लग्न मंडपात ज्या पद्धतीचे राजकारण रंगत असते तितके अगदी देशाच्या राजधानीतही रंगत नसावे. अगदी मानपान आणि खुर्ची, सत्ता, पैसा, बळ सारेच एका विवाहाचे अविभाज्य अंग झाले आहेत. पेठकरांची कादंबरी वाचत असताना हे सारे अगदी प्रबळपणे मनावर ठसत जाते. पेठकरांची भाषा खूप वेगळ्या धाटणीची आहे. समकालीन राजकारण आणि समाजकारणातून उभी झालेली माणसांची मानसिकता ते नेमकेपाणे पकडतात. माणसं वाचण्याची अन् त्यांच्यावर कुठलाही अन्याय न करता, पूर्वग्रह न ठेवता त्यांना अत्यंत स्नेहाने जवळ करण्याचे निसर्गदत्त कसब लेखकाकडे आहे. त्यामुळे ते कादंबरीतल्या पात्रांना त्यांच्या सर्व गुण-दोषांसकट कवेत घेतात. त्याच्या स्वभाव घडण्यामागची कारणमीमांसा अगदी चपखलपणे सांगतात. ‘मेरा मरद रावन है’ असे सांगता सांगता कधी ती त्याला राम करून टाकेल याचा अंदाजही न येणारी हमीदाबी, तिची सून चाँदबी, बाप मेल्यावर शेतीचा अन् इस्टेटीचा सारा पसारा सांभाळण्यासाठी शिक्षण सोडून आलेली अन् सगळ्यांचे सगळे करता करता अविवाहित राहिलेली शांताक्का, परक्या गावातून येऊन याच गावचा झालेला शिवशंकरभाऊ  रंगराव, भूमा, कौतिक, वांझ असलेली तुळसाक्का, तिचा नवरा दुलिराम, वामन, रेखी, राघव आणि सुशी, या लग्नाचा विरोधक आमदार पडोळे आणि सूत्रधार असलेला सरपंच प्रभाकर, मंत्री देशमुख.. ही सगळी पात्रे आपल्याला भेटली आहेत. भेटत राहिलेली आहेत, असे वाटून जाते. काही काळानंतर तर या पात्रांशी सलगी
होऊन जाते.
राजकारण आणि पत्रकारिता यातले बारकावेही खूप चांगले टिपले आहेत. या कादंबरीच्या निमित्ताने मराठी साहित्यात एका चांगल्या कलाकृतीची भर पडली आहे अन् एक वेगळा प्रवाह गतिमान करणारी, वेगळी वाट चोखाळणारी ही कादंबरी समकालीन वाङ्मयात दखल घ्यावी अशीच आहे. ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ हा पेठकरांनी लिहिलेला चित्रपट बघताना त्यात एका सशक्त कादंबरीची बीजे दिसली होती, आता ही कादंबरी वाचत असताना वाचकांना दमदार चित्रपट बघत असल्याची अनुभूती होते.
भावलीचं लगीन- श्याम पेठकर, विजय प्रकाशन, नागपूर. पृष्ठे- ३३५, किंमत- ३०० रु. 

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
puberty starting earlier and why it matters health experts Said About signs caution and care You Must Know About
कमी वयात पौगंडावस्थेत येण्याची लक्षणे कोणती? त्यावर काही उपचार आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला…