भूषण कोरगांवकर

‘‘तुम्ही किलोमागे हजार रुपये रेट लावला तरी आम्ही तुमच्या वडय़ा विकत घेऊ.’’ बाबांना ही प्रतिक्रिया बऱ्याचदा मिळते; पण ‘छंदाचा व्यवसाय करायचा नाही’ ही त्यांची (आमच्या दृष्टीने चुकीची) ठाम समजूत!

goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती
in nashik ramnvami related garud rath miravnuk preparation
नाशिक : गरुड रथ मिरवणुकीची तयारी अंतिम टप्प्यात
Dealing with anti-recipe trolls on social media
एका पाककृतीविरोधातील ट्रोलधाडीला सामोरे जाताना…

माझे बाबा अ‍ॅक्युप्रेशर थेरपिस्ट आहेत. लोकांशी कनेक्ट होणं म्हणजे त्यांच्या डाव्या हातचा मळ. मॉर्निग वॉकच्या वेळेस त्यांच्याशी बोलायला येणाऱ्या लोकांना तीन गोष्टी फुकट मिळतात- आरोग्य सल्ला, अ‍ॅक्युप्रेशरचे उपचार आणि नारळाच्या वडय़ा. आमच्या संपूर्ण भागात आणि नातेवाईकांत ते याच तीन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत.

खोबऱ्याची कापा (कापं) किंवा खोबऱ्याच्या वडय़ा अशा नावाने ओळखला जाणारा हा पदार्थ गोवा-कोकणात सर्रास केला जातो. तीन वाटय़ा ताजं ओलं खोबरं, दोन वाटय़ा साखर, एक वाटी दूध हे मिश्रण एका पातेल्यात घालून मंद आचेवर सतत ढवळत राहिलं की पाऊण-एक तासात गोळा तयार होतो. वरून एक चमचा तूप आणि जायफळाची पूड घालून तो व्यवस्थित तूप लावलेल्या ताटात थापून थंड झाल्यावर त्याच्या वडय़ा कापायच्या.

हाच प्रकार साखरेऐवजी गूळ घालूनसुद्धा करतात आणि मला तो जास्त आवडतो. कुडाळच्या बाजारात ब्राऊन रंगाच्या वेगवेगळ्या छटांमध्ये तो सहज मिळतो; पण आमच्या घरात मात्र तो कधीच बनला नाही. माझी आजी यातल्या साखरेच्या प्रकाराचीच एक्स्पर्ट होती. वर दिलेली रेसिपी तिचीच. उन्हाळ्यात ती त्यात आंब्याचा रस घालायची. इतर मोसमात बटाटा, दुधी किंवा काजूची पूड. प्रत्येक तिखट पदार्थात गुळाचा किंवा साखरेचा अंश टाकला पाहिजे आणि प्रत्येक गोड पदार्थात मिठाचा ही तिची आवडती थिअरी होती, पण या खोबऱ्याच्या वडय़ा मात्र तिला अपवाद.

बाबा आवड म्हणून कधी तरी वडय़ा करायला लागले. आमच्या नातेवाईकांत गेल्या दोन पिढय़ांपासून गरज किंवा हौस म्हणून पुरुषांनी स्वयंपाक करणं ही गोष्ट फारशी चेष्टा, हेटाळणी किंवा कुचाळक्या न करता आणि कौतुकही अगदी वाजवी प्रमाणात करून स्वीकारली गेली आहे. अविकाका, आबामामा, पाटकरकाका, सतीशकाका ही आमच्या नात्यातली पुरुष मंडळी सर्रास स्वयंपाक करतात. त्यामुळे बाबांच्या या प्रयोगांचं आमच्या नातेवाईकांत ‘पुरुषाच्या हातचं म्हणून काही गोष्टी माफ’ प्रकारचं कौतुक अर्थातच झालं नाही. सुरुवातीला त्यांना परखड प्रतिक्रिया देऊन नाउमेदही केलं गेलं. तरीही त्यांनी प्रयत्न न सोडता, अनेक चुका करून यात मास्टरी मिळवलीच आणि आता गेल्या तीस वर्षांत तर ते वडय़ांमध्ये ‘शेवटचा शब्द’ बनले आहेत.

वडय़ांचे फ्लेवर्स आणि आकार यातही त्यांचे प्रयोग सुरू असतात. गाजर, बीट, भोपळा, जांभूळ, कच्ची पपई, पिकलेली पपई, अननस, सफरचंद, पेरू अशा अनेक फळांचे तुकडे किंवा कीस टाकून (एकावेळी एकच फळ) त्यांनी त्या त्या वडय़ा पॉप्युलर केल्या. ‘चव आणि करण्यातली सहजता’ या निकषांवर काळाच्या ओघात यातले फक्त गाजर, बीट आणि अननस टिकून राहिलेत.

बाबांचं पॅकिंगही ्रल्ल३ी१ी२३्रल्लॠ असतं- कधी चॉकलेट किंवा इतर मिठायांचे वापरलेले बॉक्स, तर कधी केळी, फणस, पिंपळ यातली मिळतील ती पानं.

बिटाच्या वडय़ा

साहित्य- दोन वाटय़ा बिटाचा कीस, दोन वाटय़ा साखर, एक वाटी ओलं खोबरं, एक वाटी दूध, दोन चमचे तूप, वेलची किंवा जायफळ पूड, काजू.

कृती- एक चमचा तूप पातेल्यात टाकून त्यावर कीस घालून ते झाकण लावून वाफवून घ्यायचं. दर दोन-तीन मिनिटांनी झाकण काढून ढवळायचं म्हणजे खाली लागणार नाही. पंधरा मिनिटांनंतर त्यात दूध घालून पुन्हा पंधरा मिनिटं वरील क्रिया करायची. मग झाकण काढून साखर आणि खोबरं टाकून दर २ मिनिटांनी ढवळत राहायचं. साधारण पंधरा-वीस मिनिटांनी (म्हणजे गॅस सुरू केल्यापासून तासाभरात) या साहित्याचा गोळा तयार होतो. मग हे सगळं मिश्रण वेलची पूड घालून, तूप लावलेल्या ट्रेमध्ये थापून त्याच्या मनासारख्या आकाराच्या वडय़ा पाडायच्या. वरून सजावट म्हणून काजू लावल्यास दिसायला आणि खायला मस्त वाटतं.

‘‘काका, एक तास होऊन गेला, अजून गोळाच बनत नाहीये,’’ असे फोन त्यांना सतत येत असतात.

‘‘काजू किंवा बदामाची पूड करून घाल आणि ती नसेल तर खवा आणि थोडीशी साखर.’’ बाबांचा सल्ला.

‘‘हे खूपच घट्ट झालंय हो, अगदी दगड बनलाय..’’ कधी कधी एखादीचा फोन येतो.

‘‘थोडी साय घालून ढवळ, सुटेल तो हळूहळू.’’ हे बाबांचे अनुभवाचे बोल.

अननसाच्या वडय़ा

साहित्य- दोन वाटय़ा खोबरं, दोन वाटय़ा साखर, एक वाटी अननसाचा कीस, एक चमचा तूप

कृती- फळवाल्याकडून अख्खं अननस स्लाइस न करता कापून आणायचं. सांभाळून किसून घ्यायचं. किसताना मधला दांडा काढून टाकायचा. रसाळ किसात खोबरं आणि साखर घालून ते सगळं मिश्रण मंद आचेवर ढवळत राहायचं. पाऊण-एक तासात याचा गोळा तयार होईल. साजूक तूप टाकून गॅस बंद करायचा. हा गोळा तूप लावलेल्या ट्रेमध्ये किंवा ताटात थापून त्याच्या वडय़ा पाडायच्या. कितीही मोह झाला तरी वेलची वगैरे टाकायची नाही, अननसाचा मूळचा सुवास दबतो.

या वडय़ांवर लोकांच्या उडय़ा पडतात; पण मला या वडय़ांपेक्षाही बाबांचं दुसरं एक हातखंडा  invention अतिशय प्रिय आहे, ते म्हणजे टोमॅटोचं सार. आमच्या घरी ते पारंपरिक पद्धतीने बनायचं; पण त्यात प्रोटीन्स नसतात हे लक्षात आल्यावर बाबांनी एक शक्कल लढवली. संपूर्णपणे त्यांच्या कल्पनेतून बनलेलं आणि पहिल्या प्रयोगापासून उत्तम जमलेलं हे सार म्हणजे भन्नाट चवीचा आणि पौष्टिकतेचा एक उत्तम नमुना आहे.

टोमॅटोचं सार

साहित्य- चणा, मूग, उडीद, तूर, मसूर या सर्व डाळी प्रत्येकी एकेक चमचा, पाच लवंगा, पाच मिरी, दालचिनीचा पाव इंची तुकडा, एक वाटी नारळाचं दूध, तीन टोमॅटो, दोन हिरव्या मिरच्या, हळद आणि काश्मिरी लाल तिखट प्रत्येकी अर्धा चमचा, कढीपत्ता, मोहरी, जिरे, तूप, मीठ.

कृती- तापलेल्या तव्यावर प्रत्येक डाळ स्वतंत्रपणे कोरडी भाजून घ्यायची. लाल झाली पाहिजे, पण काळी होता कामा नये. लवंग, मिरी, दालचिनीसुद्धा कोरडीच भाजून घ्यायची. या सगळ्याची मिक्सरमध्ये अगदी बारीक पूड करून घ्यायची. थोडंसं पाणी घालून टोमॅटो उकडून थंड झाल्यावर सोलून ठेवायचे. दुसऱ्या मिक्सरमध्ये त्याच पाण्यासकट त्याचा रस काढून घ्यायचा. डाळींची पावडर त्यात घालून पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून एकजीव करायचं. आता एका पातेल्यात साजूक तूप घेऊन त्यात मोहरी तडतडू द्यायची, मग जिरं, उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता याची फोडणी करून त्यात हे टोमॅटो आणि डाळींचं मिश्रण ओतायचं. साधारण पाच ते सात मिनिटांत त्याला उकळी फुटली की हळद, लाल तिखट, मीठ आणि नारळाचं दूध घालून अजून एक उकळी काढायची. गरमागरम सार तयार!

नारळाच्या दुधामुळे या साराला एक मस्त ठेहराव येतो. शिवाय साखर/ गूळ घालायची गरज राहत नाही. बाकीचे मसाले माफक असल्यामुळे लवंगांचा झटका व्यवस्थित जाणवतो.

हे सार, बीट किंवा कोनफळाची कटलेट्स, असे तिखट पदार्थ त्यांनी केले की घरी सगळे खूश असतात; पण वडय़ा करायला घेतल्या की आई, बहिणी, आत्या, मावश्या- सगळ्यांच्याच कपाळाला आठय़ा पडतात. ‘‘साखर आणि वेळेची किती ती नासाडी? तुम्ही स्वत: थेरपिस्ट असून एवढी साखर लोकांना वाटताना त्यांच्या तब्येतीचा काही विचार?’’ या त्यांच्या तक्रारींना- ‘‘एक-दोन वडय़ांनी काय होतंय? प्रेम आणि समाधान महत्त्वाचं.’’ हे बाबांचं ठरलेलं उत्तर असतं. दोन तासांनी वडय़ा छान सजून समोर आल्या आणि त्यातली एकेक तोंडात पडली की हेच प्रेम आणि समाधान उपस्थित महिलावर्गाच्या चेहऱ्यावर उमटतं.

अगदी सहजभाव म्हणून स्त्री-पुरुष समानता आचरणात आणणाऱ्या बाबांतर्फे उद्याच्या महिला दिनानिमित्त सर्वाना भरपूर शुभेच्छा!

(छायाचित्र सौजन्य : रोशन कोरिया)

bhushank23@gmail.com