|| विजय पाडळकर

प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांच्या ‘भुवन शोम’ या पहिल्या चित्रपटाची अलीकडेच पन्नाशी झाली. त्यानिमित्ताने त्यात नायिकेची भूमिका केलेल्या सुहासिनी मुळे यांच्याशी केलेल्या अनौपचारिक गप्पा..

shehzad-khan-speaks-about-ajit
“माझे वडील गटारात झोपायचे…”, बॉलिवूडचा कपटी खलनायक अजित यांच्या मुलाचा मोठा खुलासा
actor shreyas talpade debut in south indian movie
बॉलीवूड गाजवल्यानंतर आता मराठमोळा श्रेयस तळपदे करणार दाक्षिणात्य चित्रपटात पदार्पण, म्हणाला…
aamir-khan2
ठरलं! ‘या’ चित्रपटातून आमिर खान करणार दमदार कमबॅक; प्रदर्शनाबद्दल मिस्टर परफेक्शनिस्टचा खुलासा
Sangeet Natak Academy Award announced to veteran actor Ashok Saraf for his performance in the field of theatre
नाट्य क्षेत्रातील कामगिरीसाठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर

अंधेरीच्या गजबजलेल्या वस्तीतून पुढे काही अंतर गेल्यावर लागणारा सात बंगला परिसर. दुपारी चारच्या सुमारास सुस्तावल्यासारखा वाटणारा. घराचा नंबर, पत्ता बाईंनी दिलेलाच होता. शोधायला काही वेळ लागला नाही. दरवाजावरील बेल वाजवली. बाईंच्या पतीनी दार उघडले. मी येणार हे त्यांना माहीत असावे.

‘‘बसा, त्या बाहेर गेल्या आहेत. इतक्यात येतीलच..’’ ते म्हणाले.

प्रशस्त दिवाणखान्यातील सोफ्यावर मी टेकलो. मोजके फर्निचर. साधी, पण अभिरुचीसंपन्न सजावट. समोरच्या भिंतीवर जपानी शैलीची काही चित्रे फ्रेम करून लावलेली. उजव्या हाताला एक फोटो. उत्पल दत्त आणि सुहासिनी मुळे यांचा. ‘भुवन शोम’मधील एका प्रसंगातला.

‘भुवन शोम’ हा माझा अत्यंत आवडता सिनेमा. हिंदी सिनेमात एक नवी लाट आणणारा म्हणून मी त्याला मानतोच; पण तो एक आनंदाचा खळखळता झरा आहे, हे त्याचे वेगळेपणही मनाला अतिशय भावलेले. या सिनेमाला नुकतीच पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने सुहासिनी मुळे यांची एक मुलाखत घ्यावी असा विचार काही दिवसांपूर्वी मनात आला होता. यासोबत आणखी एक उद्देश या मुलाखतीमागे होता. मी सत्यजित राय यांचे चरित्र लिहितो आहे. त्या संदर्भात वाचले होते की- सुहासिनी मुळे काही काळ त्यांच्या असिस्टंट म्हणून काम करीत होत्या. त्यांच्याकडून राय या व्यक्तीबद्दल काही माहिती मिळेल असेही मला वाटले होते.

सुहासिनीबाई पाचएक मिनिटांत आल्या.

‘नमस्कार!’ प्रसन्नपणे हसत त्या म्हणाल्या. तेच सुहास्य. पन्नास वर्षांपूर्वी साऱ्या ‘भुवन शोम’वर आणि आमच्या मनावरही त्याचा अमिट ठसा उमटला होता. क्षणात वाटले की, ‘गौरी’च समोर उभी राहिली आहे. काळाचे अंतर मिटून गेले.. आणि माझे अवघडलेपणही.

‘‘सॉरी, तुम्हाला फार वेळ थांबावे लागले नाही ना?’’

‘‘छे. उलट, मीच ‘सॉरी’ म्हणायला हवे. मी ठरल्या वेळेपेक्षा पंधरा मिनिटे लवकर आलो.’’

‘‘नो प्रॉब्लेम.’’

आदल्या दिवशी फोनवर बोललो होतो त्याचा धागा पकडून मी म्हणालो, ‘‘काल तुम्ही फोनवर अस्खलितपणे मराठी बोलताना ऐकून मी चकितच झालो होतो.’’

‘‘असे काय करता? अहो, मी जन्माने ‘मुळे’ आहे. पक्की महाराष्ट्रीय. हा- झाले असे की, आयुष्यातला बराच मोठा काळ मी महाराष्ट्राबाहेर राहिले. शिवाय शिक्षण सगळे इंग्रजीत झाले. त्यामुळे मराठी वाचनाची फारशी सवय नाही.’’

हे मात्र स्पष्ट दिसत होते. बोलण्याच्या लहेजावर असलेला अमराठी ठसा जाणवत होता.

सुहासिनीबाईंच्या आई- विजया मुळे हे डॉक्युमेंटरी क्षेत्रातील आदराने घेतले जाणारे नाव. आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या त्या अभ्यासक होत्या. साठच्या दशकात सत्यजित राय यांनी कलकत्त्यात भारतातील पहिल्या फिल्म सोसायटीची स्थापना केली. त्यापासून प्रेरणा घेऊन विजयाबाईंनी ‘दिल्ली फिल्म सोसायटी’ स्थापन केली. पुढे १९५९ मध्ये भारतातील आठ फिल्म सोसायटी एकत्रित येऊन ‘फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज् ऑफ इंडिया’ ही संस्था स्थापन झाली, तेव्हा सत्यजित तिचे पहिले अध्यक्ष होते व विजयाबाई जॉइंट सेक्रेटरी होत्या.

हा संदर्भ मनात ठेवून मी सुहासिनींना विचारले,

‘‘तुम्ही पहिलाच चित्रपट ‘भुवन शोम’सारखा ‘न्यू वेव्ह सिनेमा’ केला. त्यापूर्वी तुम्ही आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रपट पाहिले होते का?’’

‘‘कसे पाहणार? अलाऊड कुठे होतं? मी त्यावेळी सतरा वर्षांची होते. अठरा वर्षांखालील मुलांना ते सिनेमे पाहण्यास परवानगी नव्हती. पण खरे सांगू का? एखादा सिनेमा खूप गाजलेला असला की मी थिएटरवर जायची. विजयाबाईंची मुलगी म्हणून सारे मला ओळखत होते. मग मी ‘ऑपरेटर’ला गोड गोड बोलून तो चित्रपट तिकडे जाऊन पाहायची.

‘‘दुसरे म्हणजे ‘भुवन शोम’ करताना तो न्यू वेव्हचा आहे की काय आहे, याची मला काहीच कल्पना नव्हती.’’

‘‘मृणाल सेन यांनी या सिनेमातील नायिकेच्या भूमिकेसाठी तुमची कशी निवड केली?’’

‘‘ती एक लंबी कहानी आहे. तिची सुरुवात १९६५ किंवा १९६६ साली झाली. आता मला नेमके साल आठवत नाही. त्यावेळी मी सातवीत किंवा आठवीत होते, हे नक्की. कारण नववीला मी कलकत्त्याला गेले. माझी आई भारत सरकारच्या नोकरीत होती. त्यावेळी ती सेन्सॉर बोर्डावर होती आणि तिची बदली मुंबईला झालेली होती. तिची उमा नावाची एक  मत्रीण होती. ‘पीयर्स’ साबणाचे निर्माते एक जाहिरात तयार करणार आहेत हे तिला माहीत होते. ती काहीतरी आईला बोलली वाटते. एकदा मला आईने सांगितले की, शाळेतून येताना अमुक एका ठिकाणी जा, तिथे उमामावशी असतील, तिथे तुझे फोटोबिटो काढणार आहेत. मी गेले. तिथे एक बाई आल्या. त्यांनी माझे केस वगैरे विंचरले, थोडा मेकअप् केला आणि माझे फोटो काढले. कशासाठी, ते मला माहीत नाही. ते ‘इकडे पाहा’ म्हणाले, मी पाहिले. ते ‘स्टूलवर बस’ म्हणाले, मी बसले. ते ‘हस’ म्हणाले, मी हसले. झाले. फोटो काढल्यावर ते म्हणाले, ‘‘तुला काही हवे का?’’ मी म्हणाले, ‘‘मला चोकोबार आईस्क्रीम पाहिजे.’’ घरी आल्यावर आईने विचारले, ‘‘ते आणखी तुला काही म्हणाले का?’’ मी म्हणाले, ‘नाही.’ यानंतर तीपण विसरली, मीपण विसरले.

‘‘मग एक महिन्याने त्यांचा पुन्हा फोन आला. यावेळी त्यांना माझे रंगीत फोटो काढायचे होते. मी गेले. त्यांनी माझे पुन्हा फोटो काढले. माझी टय़ूबलाइट केव्हा पेटली? जेव्हा उमामावशी आमच्या घरी आली आणि तिने ‘पीयर्स’ साबणाच्या फोटोच्या आत बसवलेले माझे काही फोटो आम्हाला दाखवले. साबणाच्या कॅम्पेनसाठी त्यांना माझे काही लाइव्ह शूटिंग करायचे होते. मी ते केले. त्यावेळी त्यांनी माझ्यासाठी खास कपडे बनवले होते. शूटिंग झाल्यावर मी म्हणाले, ‘हे कपडे मी ठेवून घेऊ का?’ ते म्हणाले, ‘घे.’

‘‘या जाहिरातीच्या फिल्मला कोणते तरी आंतरराष्ट्रीय अवॉर्डसुद्धा मिळाले. ती जाहिरात मृणाल सेन यांनी पाहिली. मृणाल सेन त्यावेळी बनफूल यांच्या कादंबरीवर ‘भुवन शोम’ काढण्याच्या विचारात होते. त्यांना नायिकेच्या भूमिकेसाठी एक मुलगी हवी होती. ती शोधण्यासाठी ते पुण्याच्या फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये जाऊन आले. पण त्यांना योग्य अभिनेत्री तिथे मिळाली नाही. आमच्या उमामावशीची आणि त्यांचीही ओळख होती. मृणालदा तिला म्हणाले, ‘‘मला एक इनोसंट मुलगी हवीय. एकदम रॉ चालेल. अभिनय शिकलेली वगैरे नको.’’ मावशीने त्यांना सुचवले की- विजया मुळेंची मुलगी आहे, ती योग्य वाटते का पाहा. तिनेच पीयर्सची जाहिरात त्यांना रेफर केली असावी.

‘‘त्यावेळी मी दिल्लीला होते. मृणालदा तिथे आले. त्यांनी मला बोलावले. माझी टेस्ट घेतली आणि मला त्या भूमिकेसाठी निवडले.’’

त्यांची निवड किती अचूक होती हे नंतर काळानेच सिद्ध केले.

मी म्हणालो, ‘‘मृणालदांनी आत्मचरित्रात लिहिले आहे की, हा चित्रपट करताना आपण काहीतरी ‘ग्रेट’ वगैरे करतो आहोत अशी कुणाचीच भावना नव्हती. आम्ही फक्त वेडे होऊन काम करीत होतो.’’

‘‘खरे आहे. पण माझ्यापुरते सांगायचे तर माझ्या मनात तीही भावना नव्हती. सिनेमा करण्यापूर्वी त्यांनी मला कथा सांगितली होती. नंतर पटकथा वाचून दाखवली. पण खरे सांगू का, मला काहीच समजले नाही. स्टोरीमध्ये काय सांगायचे आहे, काय नाही.. काही पत्ता नव्हता. ते जसे सांगतील तसे मी करीत होते. मी युनिटमध्ये सर्वात लहान होते. पण मृणालदा मला मोठय़ा व्यक्तीसारखीच वागणूक देत. काही प्रश्न असले तर जवळ बसवून त्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करीत.

‘‘आणखी एक गंमत सांगते. मृणालदांचे हिंदी फार ‘आनंदमयी’ होते..’’ सुहासिनी सांगत होत्या. (‘आनंदमयी’ हा त्यांचाच शब्द!) ते हिंदीत काय बोलायचे, कुणालाच कळायचे नाही. के. के. महाजन हे या सिनेमाचे छायाचित्रकार होते. मृणालदा त्यांना सांगत, ‘अरे के. के., इसका पेड काटो.’ म्हणजे फ्रेममध्ये त्या व्यक्तीचे पाय दिसत असतील तर ते कापून टाक, दाखवू नकोस.

‘‘माझ्याकडून जास्तीत जास्त कसे चांगले काम करता येईल याचा मी प्रयत्न करीत होते. बस. पण एक गोष्ट- मी काम खूप एन्जॉय केले.’’

ही एन्जॉयमेंट सिनेमातही स्पष्ट प्रतिबिंबित झाली होती आणि सिनेमा अविस्मरणीय बनण्याचे ते एक महत्त्वाचे कारण होते. हा चित्रपट अनेकांचा ‘पहिला’ चित्रपट होता. मृणालदांचा व उत्पल दत्तचा तो पहिला ‘हिंदी’ चित्रपट. सुहासिनी मुळेंचा पहिला चित्रपट. संगीतकार विजय राघवन आणि छायाचित्रकार के. के. महाजन यांचाही हा पहिलाच सिनेमा. अमिताभ बच्चनची हिंदी सिनेमातील पहिली कमाई या चित्रपटातलीच. (त्याच्या आवाजात या सिनेमाचे सुरुवातीचे निवेदन होते.) यामुळे साऱ्याच चित्रपटाला एक ‘फ्रेश लूक’ मिळाला होता. तत्कालीन हिंदी सिनेमाच्या खूप पुढे असलेला हा ‘प्रयोग’ होता.

मी म्हणालो, ‘‘मी हिंदी सिनेमाचा इतिहास लिहितो आहे. त्याच्या प्रकाशित झालेल्या पहिल्या खंडाचे नाव मी ‘देवदास ते भुवन शोम’असे ठेवले. हिंदी सिनेमा हा दोन भागांत विभागला जाऊ शकतो; ‘भुवन शोम’च्या आधीचा सिनेमा आणि ‘भुवन शोम’च्या नंतरचा सिनेमा.’’

‘‘अगदी योग्य. मात्र, जरी त्याला तीन राष्ट्रीय पारितोषिके मिळाली तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे फारसे कौतुक झाले नाही.’’ सुहासिनीबाईंच्या बोलण्यातून याची खंत जाणवली.

‘‘या चित्रपटातील तुमच्या भूमिकेचे सर्वानीच कौतुक केले, पण नंतर तुम्ही चित्रपटांत काम का केले नाही?’’ मी विचारले.

‘‘एक तर मी त्यावेळी शिकत होते. दुसरे म्हणजे मला हिंदी सिनेमातील ‘झाडाभोवती नाचत फिरणारी’ टिपिकल नायिका बनायचे नव्हते. मी उच्च शिक्षणासाठी कॅनडाला गेले. तेथे ‘रेडिओ, टेलिव्हिजन अ‍ॅण्ड फिल्म्स’चा कोर्स केला. त्यावेळी मला डॉक्युमेंटरी क्षेत्रातील महान कलाकार जॉन ग्रीअर्सन यांच्याकडे शिकण्याची संधी मिळाली. ‘डॉक्युमेंटरी’ हा शब्द त्यांनीच निर्माण केला आहे. सिनेमा काय असतो हे त्यांनी मला शिकवले.’’

भारतात परत आल्यावर सुहासिनीबाईंनी सत्यजित राय आणि मृणाल सेन यांच्याकडे असिस्टंट म्हणून कामाचा अनुभव घेतला. मग त्या स्वत: डॉक्युमेंटरी बनवू लागल्या. या क्षेत्रात त्यांना राष्ट्रीय पातळीवरील चार पारितोषिके मिळाली.

‘‘सध्या काय करीत आहात?’’ मी विचारले.

‘‘मनात तर एक चित्रपट काढण्याची इच्छा आहे. मी माणिकदांची (सत्यजित राय) साहाय्यक म्हणून काम करीत होते तेव्हा मी पाहिले- मारवाडय़ाकडे हिशेबासाठी असते ना, तशाच एका लाल वहीत ते सविस्तर शॉट डिव्हिजन लिहून ठेवीत. अतिशय शिस्तबद्ध असे त्यांचे काम असे. तेव्हापासून मी एक लाल वही घेऊन ठेवली आहे. केव्हातरी मला फिल्म करण्याची संधी मिळाली तर मी त्या वहीत शॉट डिव्हिजन करूनच काम सुरू करणार आहे. (अ‍ॅज अ ट्रिब्युट टु द ग्रेट मास्टर!)

‘‘तुमची ही इच्छा लवकरच पूर्ण होवो..’’ मी समारोप करीत म्हणालो.

vvpadalkar@gmail.com