News Flash

‘मॅड’पट!

‘पॅरडी’ हा चित्रप्रकार सर्व काळांत सक्रिय असला, तरी सवंगपणाच्या आरोपाखाली दबलेला आणि त्यामुळे फारसा मान नसलेला मानला जातो. एखाद्या किंवा अनेक चित्रपटांचे विनोदी अनुकरण, त्यातील

| November 18, 2012 04:14 am

‘मॅड’पट!

‘पॅरडी’ हा चित्रप्रकार सर्व काळांत सक्रिय असला, तरी सवंगपणाच्या आरोपाखाली दबलेला आणि त्यामुळे फारसा मान नसलेला मानला जातो. एखाद्या किंवा अनेक चित्रपटांचे विनोदी अनुकरण, त्यातील सुंदरतेचे विडंबन अतिशयोक्तीच्या आधारे कुरूपीकरण वा विकृतीकरण असल्याचे मानून पॅरडीपटांना विनोदी चित्रपटांच्या पंक्तीत स्थान मिळत नाही. कल्पना मॅडपणाच्या पातळीवर राबविणारा हा चित्रप्रकार मूíतभंजनाचा कार्यक्रम राबवीत असतो. चित्रपट आणि साहित्य या दोन्ही ठिकाणी त्याची उपेक्षा झालेली आहे. मात्र आजचे जगभरातील जाहिरात आणि पोर्न विश्व विडंबनाच्या शक्तीचाच वापर करून भरभराटीला आलेले दिसत आहेत.
सलग चार दशके चाललेल्या ब्रिटनमधील ‘कॅरी ऑन’ मालिका, बॉण्ड चित्रपटांना मूर्ख ठरविणारे ‘ऑस्टिन पॉवर्स’ – ‘जॉनी इंग्लिश’ यांच्यासारखे चित्रपट, प्रेक्षकप्रिय चित्रपटांना लक्ष्य करणारे ‘हॉट शॉट्स’ आणि ‘स्केअरी मूव्हीज’चे विविध भाग या चित्रप्रकाराची ठळक जाणीव प्रेक्षकाला करून देत होते. पण त्यातील विनोदाचा घसरत जाणारा दर्जा त्यावरचे सवंगपणाचे आरोप अधिक खरे ठरवत होता. शिवाय या विडंबनपटांना तात्कालिकतेची मर्यादा पार करणे कधीच शक्य झाले नाही. याउलट विडंबनाचा मॅड हेतू कायम ठेवून काही नव्या संकल्पना राबविणाऱ्या पॅरडी आणि विनोदाच्या सीमेवरच्या चित्रपटांची निर्मिती या दशकामध्ये लोकप्रिय झाली. ‘शॉन ऑफ द डेड’ – ‘डेड स्नो’ (झॉम्बीपटांचे विडंबन), ‘हॉट फझ’  (कॉप मूव्ही पॅरडी), ‘किल बुलिओ’ (क्वेन्टीन टेरेन्टीनोच्या चित्रपटांचे विडंबन) या चित्रपटांनी पॅरडीपट अश्लीलता वगळूनही बनू शकतो, हे दाखवून दिले. हे चित्रपट आवडण्यासाठी विडंबन होणाऱ्या मूळ चित्रपटांची माहिती असणे आवश्यक नव्हते किंवा पॅरडी चित्रपटांचे चाहते असणेही गरजेचे नव्हते. निव्वळ तिकडम कल्पना, सभ्यतेच्या कक्षेत राबविलेला मॅडपणा यांनी त्यांचे अस्तित्व अधोरेखित केले. तात्कालिकतेची मर्यादा ओलांडणाऱ्या आणि सुरुवातीपासून शेवटापर्यंत विडंबन एक्स्प्रेसचा वेग सांभाळणाऱ्या चित्रपटांच्या गोतावळ्यातीलच एक म्हणून ‘कंग पाऊ – एंटर द फिस्ट’ या पॅरडीपटाची ओळख आहे.
कंग पाऊ हे स्टीव्ह ओइडेकर्क या दिग्दर्शक- पटकथा लेखक आणि अभिनेता या तिन्ही भूमिका मुद्दाम वठवणाऱ्या वल्लीच्या डोक्यातील अचाट कल्पनांचे रसायन आहे. जिम कॅरीचे माकड चाळ्यांचे डुगडुगते करिअर उभे करणाऱ्या ‘एस व्हेंच्युरा’, ‘ब्रुस ऑलमायटी’ किंवा ‘पॅच अ‍ॅडम्स’ सारख्या गाजलेल्या विनोदी हॉलीवूड चित्रपटांचा कर्ता म्हणून त्याची एक ओळख आहे, तर दुसरी ‘थमेशन’ या अभिनव शॉर्ट फिल्म्स मालिकांचा निर्माता म्हणून. केवळ अंगठय़ाला रंगरंगोटीद्वारे मानवी रूपात आणून चित्रपटांचे खरपूस विडंबन करणारी थमेशनची मालिका कमालीची स्वस्त आणि कल्पनेची श्रीमंती दाखविणारी होती. ‘थम वॉर्स’ ( स्टार वॉर्सचे विडंबन), ‘बॅटथम’ (बॅटमॅन), ‘गॉडथम’ (गॉडफादर), ‘थम्टॅनिक’ (टायटॅनिक), ‘ब्लेअरथम’ (ब्लेअर विच प्रोजेक्ट) ही नावेही या दिग्दर्शकाच्या चक्रम डोक्याची साक्ष देण्यास पुरेशी आहेत. ‘कंग पाऊ – एंटर द फिस्ट’ या चित्रपटाद्वारे त्याने कुंग फू चित्रप्रकाराचे विडंबन करण्याचे योजले. मात्र त्यासाठी वेगळी यंत्रणा, सेट्स आणि कलाकारांचा ताफा आदी खर्चिक तपशिलांनाच गाळून टाकले. एका जुन्या कुंग फू चित्रपटामध्येच तांत्रिक कलाकारीने अतिरिक्त फूटेज जोडून त्याने नवी पटकथा रचली. ब्रुस ली ते जेट ली या नव्या-जुन्या स्टार्सनी गाजविलेले सुरुवातीचे चित्रपट इंग्रजीमध्ये येताना त्यात दुय्यम दर्जाची ध्वनी यंत्रणा आणि तांत्रिक त्रुटी यांची भरपूर रेलचेल असे. त्यांचे कथानक अन्याय आणि मेलोड्रामाने दुथडी भरलेले असे. सरधोपट खलनायक आणि अजस्र अडचणींवर केवळ कुंग फू कौशल्याच्या बळावर मात करणारा नायक ही गुळगुळीत कथावस्तूही ठरलेली असे. या सगळ्याचा वापर विडंबनासाठी करून कंग पाऊ – एंटर द फिस्ट हा चित्रपट साकारला आहे.
इथला नायक जन्मापासून ‘चोझन वन’ या नावानेच ओळखला जातो. त्याची निवड कशासाठी याचा तपशील दिला न जाताच त्याच्या जन्मदिवसापासून चित्रपटाला सुरुवात होते. बेट्टी नामक क्रूरकर्मा खलनायक याच दिवशी चोझन वनच्या कुटुंबाला ठार करतो. चोझन वन मात्र पाळण्यातच (वयाच्या पहिल्या दिवशी) शक्तिमान बेट्टीला चकवून आणि चुकवून जिवंत राहतो. पुढच्याच दृश्यामध्ये अनेक वर्षांचा पल्ला गाठून मोठा झालेला चोझन वन ( खुद्द स्टीव्ह ओइडेकर्क) समोर येतो. कुंग फूमधील वस्ताद म्हणून. चाळीसेक जणांना आपल्या मार्शल आर्टद्वारे सहज लोळविणारा आणि कुंग फू हाणामारीचे अतिशयोक्त प्रयोग राबविणारा चोझन वन कुटुंबीयांच्या हत्येचा सूड पूर्ण करण्यासाठी बेट्टीच्या शोधार्थ गावोगाव पालथे घालतो. टँग या वृद्ध मार्शल आर्ट शिक्षकाच्या गावात त्याचा शोध संपतो. मात्र बेट्टीला ठार मारण्यासाठी आणखी कौशल्य प्राप्त करणे आवश्यक असल्याचे टँग चोझन वनला सांगतो. चोझन वन मग टँगचे शिष्यत्व पत्करून कौशल्याची पुढली पायरी गाठतो आणि क्रूरकर्मा बेट्टीला पराभूत करण्यासाठी सज्ज होतो. या पारंपरिक कुंग फूपट टप्प्यांमध्ये ओइडेकर्क विडंबनाचे रसायन भरभरून ओततो.
एका दिवसाच्या मुलाचे पाळण्यातील कुंग फू पदलालित्य तयार करून, चिनी पालकांच्या पोटी झालेला चोझन वन मोठेपणी अमेरिकी चेहऱ्यात दाखवून, चोझन वनकडून कसरतींचे अशक्य प्रकार राबवून, गंभीर व्यक्तींना विनोदी रूपात मांडून, तर गंभीर प्रसंगांमध्ये व्यक्तींकडून भलतीच कृती करवून घेऊन, संवादांचे विचित्र पंच तयार करून निव्वळ वेडेपणाचा कळस येथे गाठण्यात आला आहे. इथे गायीसोबत मार्शल आर्टचे प्रदीर्घ युद्ध आहे आणि त्याला मेट्रिक्समधील हाणामारी दृश्यांचा संदर्भ आहे. प्रसिद्ध पॉप बँड्सचा उल्लेख आहे आणि सीएनएन वेदर रिपोर्ट म्हणणारी आकाशवाणीही आहे. मार्शल आर्ट सिनेमांमधील सर्वच घटकांना मॅड मुलाम्याद्वारे मांडून हसवत ठेवण्याचा ओइडेकर्कचा अट्टहास आहे. इथल्या दिसणाऱ्या अभिनयाच्या, हाणामारींच्या आणि संवादांच्या चुका या जाणीवपूर्वक केल्या गेल्या आहेत. नायिकेची विचित्र बोलण्याची लकब ही डब सिनेमांच्या त्रुटींना सजवून साकारण्यात आली आहे. सदोष बनूनही त्या त्या प्रसंगांना मिळालेली विनोदाची झळाळी गमतीदार बनली आहे.
जुन्या चित्रपटांच्या चौकटीत नवे कथानक, नव्या कल्पना आणि टोकाचे विडंबन यांचे एकत्रीकरण ‘कंग पाऊ’मध्ये भन्नाट परिणामकारक ठरले आहे. स्पेशल इफेक्ट्स आणि जोडकामाची कल्पकता ही चित्रपटाची सर्वात महत्त्वाची बाजू आहे. ब्रूस ली, जॅकी चॅनच्या चित्रपटांच्या नामावळीला दिसणाऱ्या अवघड स्टंट्सप्रमाणे येथील नामावळीमध्ये या जोडकामांची दृश्ये दिसतात. नवी पात्रे आणि संवाद यांचे बेमालूम मिश्रण साधण्याचे काम मूळ आणि नव्या दृश्यासह सादर होते.  
विडंबन स्वरूप विसरायला लावून हास्यसम्राट बनणारी ही पॅरडी या चित्रप्रकाराविषयी कुतूहल असणाऱ्यांनी चुकवणे चूक ठरेल. पॅरडीपटांमधील स्वारस्य आणखी विस्तारण्यास हा चित्रपट मदतच करेल. कारण भरभरून हसायला लावणाऱ्या विनोदी सिनेमांहून इथल्या विडंबनाची धार तीव्र आहे. मात्र ती अनुभवण्यासाठी आपल्या तर्काच्या शास्त्राला बाजूला ठेवणे आवश्यक आहे. आपला सिनेमा पाहताना ते अवलंबण्यात पारंगत असलेल्यांना हा सिनेमा अनपेक्षित अनुभवाची सफर घडवेल, यात शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2012 4:14 am

Web Title: birds view paready type of film
Next Stories
1 बुरखा पांघरलेला चित्रपट!
2 बर्डस व्ह्यू : भयभयाट
Just Now!
X