News Flash

खडूची भुकटी

त्यादिवशी या गोष्टीतल्या शाळेसमोरची पितळी घंटा पोरं बडवतात. घंटेचा घणघणाट गावभर होतो. पण खेळात रमलेल्या दिनूला ही घंटा ऐकूच येत नाही.

खडूची भुकटी

त्यादिवशी या गोष्टीतल्या शाळेसमोरची पितळी घंटा पोरं बडवतात. घंटेचा घणघणाट गावभर होतो. पण खेळात रमलेल्या दिनूला ही घंटा ऐकूच येत नाही. शेवटी आईने आठवण करून दिल्यावर दिनू जड पावलांनी शाळेत निघतो. चौकात आल्यावर दिनू दोन बोटं तोंडात घालून शिट्टी वाजवतो. मित्र गोळा होतात. गंमत

lok03

म्हणजे या पोरांपैकी कुणीच गुरुजींनी दिलेला गणिताचा गृहपाठ पूर्ण केलेला नसतो. गणिताच्या मास्तराचा राग परवडणारा नाही म्हणून पोरं शाळेला ठेंगा दाखवतात आणि निघतात ओढय़ाकडं. हिरव्यागार दाट झाडीतून खळाळणारा पांढराशुभ्र ओढा! पोरं वाळूत हुंदडतात. खेळताना अडचणीची ठरणारी पुस्तकं-पाटय़ा वाळूत पुरून ठेवतात. मग सुरू होतो- सूर्यप्रकाशात चमकणाऱ्या पाण्यात मासे पकडण्याचा खेळ. मासेच ते; लवकर सापडत नाहीत. झडप घालून ओंजळीत मासे पकडण्याचा खेळ खूप वेळ सुरू राहतो. डोकरा, काळ्या पाठीचा छोटा मिशावाला झिंगा.. अशा माशांचा परिचय दिनूला सोबतच्या आबास, हामजा या मित्रांमुळं होतो. शेवाळाखाली लपण्याची माशांची जागा कळते. मासे स्वच्छ कसे करायचे, भाजायचे कसे, आणि चटणी-मीठ लावून गट्टम कसे करायचे, हे ऐकून दिनूच्या तोंडाला पाणी सुटतं.
या खेळाचा कंटाळा आल्यावर पोरं घुसतात काटेबनात. तिथं बोराटीच्या झाडावरची व्हल्याची अंडी मिळवतात. व्हल्याच्या व रानचिमणीच्या अंडय़ातला फरक दिनूला लक्षात येतो. व्हल्या-पारव्याची अंडी शोधताना, खारीमागं धावताना पोरं रमून जातात. बाभळीचा डिंक गोळा करतात. हा गोळा केलेला डिंक दुकानदाराला विकण्याचं ठरतं. त्या आलेल्या पैशातून जत्रेत शिट्टी, रेवडय़ा घेण्याचा बेत आखला जातो. त्यातच दिनूला देवबाभळ व रामकाठी बाभळीची खासीयत ध्यानात येते. शिवाय त्या दिवशी जंगलात अनेक नवीन गोष्टी दिनू पाहतो. सुरेख पक्षी, पांढरे उंदीर, सोनकिडे, तांबडीलाल फळं, मधाची पोळी अशा कितीतरी गोष्टी दिनू अधाशासारखा पाहत जातो. यात नवी भर म्हणजे आबासच्या पायात काटा घुसतो. आबास ओरडायला लागतो. देवबाभळीच्या मोठय़ा काटय़ाने पायातला काटा काढण्याचा प्रयत्न यशस्वी होत नाही. शेवटी रुईचा चिक काटा मोडलेल्या ठिकाणी लावला जातो. आता तो काटा सकाळी आपोआप बाहेर पडणार असतो. पाहता पाहता संध्याकाळ होते. गुरं माघारी फिरतात. पोरंही पुरून ठेवलेली पाटी-पुस्तकं घेऊन घरी परततात. घरी परतलेला दिनू आईला अपेक्षित असणाऱ्या शाळेत गेलेलाच नसतो; तर त्याला मनापासून आवडलेल्या, खुल्या आभाळाखाली भरलेल्या शाळेतून परतलेला असतो. व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘शाळा’ गोष्टीतील दिनूला न कंटाळता, न छडी खाता खूप ज्ञान सहज मिळालेलं होतं.
ही गोष्ट मी प्रथम पंधरा-सोळा वर्षांपूर्वी वाचली असेन. तेव्हाही या पोरांची जंगलातील भटकंती मला मोहक वाटली होती. त्याबरोबरच ज्या गणिताच्या मास्तरच्या भीतीमुळं या पोरांनी जंगलाचा रस्ता धरला होता, त्या मास्तराची दहशतही जाणवली होती. बेशरमीच्या फोकानं मारणारे माझे गणिताचे शिक्षक आठवले होते. शिकवण्याचा कुठलाही आविर्भाव न आणता शिकवणाऱ्या जंगलात सहज स्वाभाविकता आहे. अशी स्वाभाविकता आपल्या शिक्षणाला किती प्रमाणात पकडता आलीय? शाळा सुटल्यावर ‘हुय्याऽऽ’ करीत वर्गाबाहेर पडणारी पोरं पाहताना त्यांना आपण कोंडलं होतं की काय असं वाटतं. जुन्या काळातल्या मारकुटय़ा मास्तरांची गौरवानं केलेली वर्णनं मला कधीच आवडली नाहीत. काही मास्तरांच्या दहशतीमुळं त्यांचा विषयच नावडता झालेला असतो. यात गणित, इंग्रजीचा क्रमांक वरचा आहे. ‘छडी लागे छमछम, विद्या येई घमघम’ असल्या जुनाट म्हणी त्रासदायक जात्यासारख्या संग्रहालयात ठेवून द्यायला हव्यात.
हा विषय कालबाहय़ वाटणाऱ्यांच्या पुढय़ात एक ताजी घटना ठेवतो. तीनेक महिन्यांपूर्वी तेलंगणातील एका खासगी शाळेतील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनं वर्गात इंग्रजीतून संभाषण केलं नाही. तो विद्यार्थी त्याच्या मातृभाषेत- तेलुगुतच बोलत होता. याचा राग आल्यामुळं वर्गशिक्षिकेनं त्या कोवळ्या पोराला बदडून काढलं. चक्क त्याला चावा घेतला. त्याचं डोकं भिंतीवर आपटलं. हे सर्व सुरू असताना वर्गातील बाकी चिमुकल्या मुलांची काय अवस्था झाली असेल? त्या बिचाऱ्या पोराला शारीरिक-मानसिक आघात झाला. मेंदूला इजा झाली. रात्रीतून त्या विद्यार्थ्यांची तब्येत बिघडल्यामुळं हैदराबाद येथील हॉस्पिटलमध्ये त्याला अ‍ॅडमिट केलं; पण दुसऱ्या दिवशी पहिलीतलं ते कोवळं पोर त्या आघातानं मरण पावलं. या घटनेतून पुन्हा एकदा दहशतच उजागर होते. नव्या काळात मुलांना मारणं हा गुन्हाच आहे. तरीही मुलांना एवढं अमानुषपणे बदडलं जातं म्हणजे मारकुटय़ा पंतोजीचे अवशेष अजून शाबूत आहेत.
दप्तराचं ओझं, बेसुमार फीची चिंता, इंग्रजी भाषेत अवघडलेली पोरं, त्यांच्या भाषेचं झालेलं कडबोळं, दडपलेली कल्पनाशक्ती या सगळ्याचा विद्यार्थ्यांबरोबरच पालकांवरही आताशा ताण पडलेला असतो. पण मारकुटय़ा मास्तरांची परंपरा मात्र जुनी आहे. एका अज्ञात कवीनं ही मारकुटी दहशत नेमकेपणानं पूर्वीच शब्दांत पकडलेली आहे..
शाळेसी जाताना
रडे कशाचे रे आले
भय माऊली वाटले
पंतोजीचे

शाळेचा पंतोजी
त्याचा केवढा दरारा
मुलं कापती थरारा
थंडीवीण

पंतोजी पंतोजी
शाळा बाळाला आवडो
घरी ना दडो
तुमच्या धाके

अशा पंतोजींना साने गुरुजी नावाचे शिक्षक माहीत असतील काय? हातून झाडाची फांदी तुटली म्हणून प्रायश्चित्तापोटी दिवसभर उपाशी राहणारे, मुंगळ्यांची रांग जातेय म्हणून स्वत: स्तब्ध उभं राहणारे, मुलांसोबत स्वत: वसतिगृहात राहणारे, एवढंच काय- स्वत:चा पगार विद्यार्थ्यांच्या अडीअडचणीला वापरणाऱ्या साने गुरुजींची परंपरा का बरं क्षीण होत गेली असेल? अर्थात आजही काही अपवादात्मक चांगले शिक्षक-शिक्षिका आणि हाताच्या बोटावर मोजण्याएवढय़ा का होईना, पण चांगल्या शाळा आहेत. बाकी आज शिक्षणसंस्था काढण्यामागचा हेतूच बदललाय. पेट्रोल पंप, एखादी गॅस एजन्सी, सूतगिरणी, कारखाना तशी एखादी शिक्षणसंस्था! मग ज्ञानार्जनापेक्षा अर्थार्जन महत्त्वाचं ठरतं. शिक्षक, प्राध्यापक निवडीच्या वेळी ‘दक्षिणा’ निर्णायक ठरते. व्यावसायिक अभ्यासक्रमापासून ते बालवाडीपर्यंत प्रवेशासाठी राजरोस ‘दक्षिणा’ घेतली जाते. ‘दक्षिणे’ची परंपरा आजही वेगळ्या रूपात सुरू आहे. फक्त ‘दक्षिणा’ घेणारे हात बदललेत. ‘तोंडी पुरोगामित्व आणि हातात दक्षिणा’ अशी नवी रीत झाली आहे. याबद्दल सर्वत्र सामसूम आहे. कुणीच काही बोलत नाहीय.कुणाची शिक्षक- प्राध्यापक म्हणून निवड झाल्यावर त्याच्यासाठी पहिला प्रश्न असतो- ‘किती द्यावे लागले?’ भाषेत सुवर्णपदक मिळवणारा एक विद्यार्थी- ज्यानं चांगल्या गुणांसह बी. एड. पूर्ण केलंय- माध्यमिक शिक्षक म्हणून नुकताच रुजू झालाय. अर्थात रुजू होण्याचा- म्हणजे निवड होण्याचा आणि गुणवत्तेचा काहीही संबंध नाही. त्याने थोडी काही शेती विकून, स्वत:चं लग्न ठरवून, भावी सासऱ्याकडून काही रक्कम घेऊन संस्थाचालकाच्या दक्षिणेची भरती केली आणि बिच्चारा गुणवान पोरगा शिक्षक म्हणून रुजू झालाय. आता तो वर्गात ‘हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणाच्या मखमलीचे’ कविता शिकवणार आहे. त्यानं दिलेला पेढा गोड नव्हता. नोकरी लागल्यावरही बऱ्याच राजकारणी संस्थाचालकांकडे शिक्षकांना ‘शिकवणे’ सोडून दुसरीच कामं करावी लागतात. हा शिक्षकाच्या ज्ञानाचा अपमान आहे. पण बोलणार कोण? अशा वातावरणात शिक्षकांकडून काय अपेक्षा ठेवणार? तरीही शिक्षकाने एखाद्या विद्यार्थ्यांला अमानुष मारण्याचं समर्थन करताच येत नाही. पण त्या शिक्षकाच्या हिंसक होण्यामागची कारणं मात्र शोधायला हवीत. त्या शिक्षिकेचा राग खरंच त्या विद्यार्थ्यांवर आहे की व्यवस्थेनं केलेल्या कुचंबणेवर आहे, हेही स्पष्ट व्हायला पाहिजे.
शाळेत असताना सरांनी मला एकदा फळा पुसायला सांगितला होता. शिक्षक- पुन्हा त्यात गणिताचे.. मग त्यांची आज्ञा शिरसावंद्यच. मोठे कडक आणि मारकुटे होते ते. दिवसभर शाळेत त्यांचा दरारा असे आणि रात्रीसुद्धा सरांना विश्रांती नव्हती. कारण रात्री आमच्यासारख्या गणित चुकणाऱ्या पोरांच्या स्वप्नात बेशरमीचा फोक घेऊन वटारलेल्या डोळ्यांनी ते उभे असत. गणितं तर हमखास चुकायचीच; पण सर समोर असताना आपला श्वासोच्छ्वासही चुकतोय अशी भावना व्हायची. सरांनी सांगितल्याबरोबर मी बेंचावरून उठून व्यवस्थित फळा पुसला. डस्टर जागेवर ठेवताना मी सहज सरांकडे पाहिलं. चष्म्याच्या वरतून सर माझ्याकडं पाहत होते. मी गडबडलो. डस्टर हातातून खाली पडलं. खडूची भुकटी उडाली. हवेत पांढरे कण तरंगू लागले. खिडकीतून आलेल्या प्रकाशाच्या पट्टय़ात ते पांढरे कण चमकत होते. ठसका लागला. त्यानंतर काही दिवसांनी रिवाजाप्रमाणे चुलीतला अंगारा लावून, चुलीच्या पाया पडून झोपलो तरी रात्री एक भयंकर स्वप्न पडलंच. स्वप्नातल्या वर्गात खडूची प्रचंड भुकटी उडत होती. भिंती, छत, बेंच, आम्ही सारी पोरं, सरांची खुर्ची, टेबल, टेबलावरची हजेरी, बेशरमीचा फोक, सर, सरांच्या मिशा.. सारं सारं खडूच्या भुकटीनं भरून गेलेलं होतं. नाका-तोंडात ते पांढरे कण गेल्यामुळं सगळ्यांनाच ठसका लागला होता. भुकटी मात्र वाढतच होती. श्वास घ्यायला खूप त्रास होत होता. घाबरून मी जागा झालो. चांगलाच घामाघूम झालेला होतो. तेव्हा वडीलही जागे झाले. ‘‘झाली का सुरू बडबड तुझी? चल ऊठ, मोरीवर जाऊन ये..’’ असं बोलून कूस बदलून ते झोपी गेले- एवढं आजही स्पष्ट आठवतंय. पण हे स्वप्न आत्ताच का आठवलं, हे मात्र लक्षात येत नाहीये.

दासू वैद्य – dasoovaidya@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2015 12:23 pm

Web Title: blackboard chalk powder
Next Stories
1 सीमेवरचं नाटक
2 अंधारातला नट
3 कटिंग