बघता बघता वर्ष संपत आलं आहे आणि ‘लयपश्चिमा’चा हा शेवटचा लेख. ‘‘आता काय लिहिशील?’’ हा प्रश्न येऊन माझ्या पुढय़ात थांबला आहे! खरंच, काय लिहायचं आजच्या लेखात? निरोपाइतकं सघन काव्य क्वचितच कुठलं असेल. एका बाजूला सदरामुळे अनेकांना पाश्चात्त्य प्रसिद्ध संगीतप्रकार माहीत झाले, आवडू lok10लागले याचा आनंद आहे आणि दुसरीकडे केवढंतरी लिहायचं शब्दमर्यादेमुळे राहून गेल्याची भावनादेखील आहे. अर्थात केवळ पाश्चात्त्य पॉप्युलर संगीताची माहिती देणारं हे सदर नव्हतं. ‘गूगल’ आणि ‘विकिपीडिया’वरून झरझर ‘माहिती’ उतरवून वाचकांसमोर आणणारं लिखाण मराठीमध्ये सध्या भलत्याच तेजीत चाललेलं आहे. ‘माहिती’देखील आवश्यक असते; पण मला मात्र माहितीपलीकडे जाऊन वाचकांना ‘अनुभव’ द्यायचा होता. तो अनुभव मांडताना ‘माहिती’ही आपोआप मग आलीच. सदराचं स्वरूप हे पाश्चात्त्य संगीतप्रकार वर्णणारं नसून सामाजिक अंगानं त्यांचा वेध घेणारं होतं. एकाच गाण्याकडे दहा तऱ्हांनी पाहणं शक्य आहे. मी गाण्याचं समाजशास्त्र बघत होतो. एखादं गाणं, गायक, संगीतप्रकार समाजाला भावतो तेव्हा त्याच्या आसपास पुष्कळ सामाजिक घटना घडत असतात. रॉक संगीतावरच्या चार-पाच लेखांनी रॉकमुळे भारतीय समाजामध्ये होणारं परिवर्तन दाखवलं; आणि मुळात भारतीय तरुण बदलल्यामुळेच रॉकचं पेव फुटलं आहे, हेदेखील. मेटल संगीतामधली हिंसा, शून्यवाद, स्त्रीला वस्तू म्हणून बघण्याचा अट्टहास हा अनेक वर्षे मेटल संगीत चवीनं ऐकणाऱ्या एका तरुण वाचकमित्रालाही ठाऊक नव्हता. (अर्थात, सगळं मेटल संगीत मुळीच तसं नाही.) रॉक आणि मेटलच्या मारानं जे वाचक हादरले त्यांना कंट्री संगीताचा उतारा लगोलग होता. ‘बटरफ्लाय फ्लाय अवे’ हे गाणं अनेक वाचकांनी ऐकलं आणि मग डोळ्यांत पाणी घेऊन त्यांनी मला ई-मेलदेखील केले. हिप-हॉप संगीत हे तर सामाजिक संगीतच आहे. काळ्या अमेरिकन माणसाचं तापलेलं गाणं. जसं हिप-हॉप आपण बघितलं तसंच त्याच्या उलटय़ा टोकाचं पॉपदेखील! मायकेल जॅक्सनवरचा लेख वाचून अनेकांना त्याच्या कळाहीन, भकास बालपणाची सांगड तितक्याच भकास, विषयासक्त मृत्यूशी घालता आली. 

पॉपचं अर्थकारण जसं सदरात उतरलं तसंच पॉपस्टार्सचं ‘सेलेब्रिटी’ आयुष्यही. कारण संगीतावर फक्त काळी पाच, पांढरी सहा, एकताल, मायनर एफ अशा भाषेत बोलणं हे त्या संगीतावरही अन्याय करणारं असतं. संगीत ही मूलत: सामाजिक घटना आहे- Music is a Social Phenomenon – हे सदराचं मुख्य सूत्र मी पहिल्याच लेखात मांडलं होतं. आणि वर्षभर उलटसुलट विचार करूनही मी माझ्या विधानाच्याच बाजूला आहे. पण अर्थात् संगीत ही घटना किती व्यापक परिमाणं असलेली आहे. तारा ब्रॅबझोन यांच्या पॉप्युलर संगीताविषयीच्या पुस्तकात त्यांनी ती फार सूत्रबद्धपणे मांडलेली आहेत. (या ताराबाईंच्या पदरात तीन पदव्या, तीन मास्टर्स पदव्या आणि संस्कृतीशास्त्राची पीएच. डी. आहे!) संगीतविषयक चर्चा कशा होऊ शकतात याची त्यांनी दिलेली यादी रोचक आहे : संगीत आणि कॉपीराइट कायदे, संगीत आणि सेन्सॉरशिप, संगीत आणि वर्णभेद, संगीतमधले गे आणि लेस्बियन्स, संगीत आणि संगणकीकरण, संगीत आणि सामाजिक चळवळ! साधी शीर्षकं वाचतानाही आपल्याला जाणवू शकतं, की संगीत ही गोष्ट अनेक उर्वरित गोष्टींना जोडली गेलेली आहे.
आता अगदी मुळात बघू या : एकेकाळी संगीत ही ‘ऐकायची’ गोष्ट होती. आता संगीत आपण ‘बघू’ शकतो (व्हिडीओ अल्बम्स, चित्रपट संगीत); संगीतावर नृत्य करू शकतो. संगीत ही गोष्ट विचारप्रवर्तकही असते. आणि काहींलेखी (म्हणजे दस्तुरखुद्द) संगीत ही लिहिण्याचीही गोष्ट असू शकते. पैकी संगीताचं दृश्यरूप हे सर्वात महत्त्वाचं. कधी कधी गाणं ठीकठाक असतं; पण व्हिडीओमधली हलती चित्रं त्या गाण्यामधल्या गाळलेल्या जागा भरून काढतात. ‘जब वी मेट’मधलं ‘आओगे जब तुम साजना’ हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. ते गाणं मुळात सुदैवानं चांगलंच आहे; परंतु चित्रपटाच्या कथानकाच्या संदर्भात ते गाणं अशा मोक्याच्या वेळेला येतं, की करिना कपूरची असहायता कशी जिवंत होते! तिचा चेहरादेखील मग त्या गाण्याला वेगळा ‘आय्रनिकल’ (ironical) अर्थ प्राप्त करून देतो. मुळात असं आहे ना, की संगीत आणि दृश्यकला या सख्ख्या नसल्या तरी मावसबहिणी नक्कीच आहेत. त्यांचं नातं वरवरचं आहे असं म्हणता येणार नाही. ‘Songs Summon Visuality’ हे एका संगीत समीक्षकाचं विधान मला आठवतं आहे. त्यामुळे हा बदल महत्त्वाचा आहे. संगीत आणि दृश्यकला जवळ येत आहेत.

माझ्या ‘मुळारंभ’ या कादंबरीतला ओम एका टप्प्यावर म्हणतो, ‘‘..पण बदल हा असतोच. एकतर जग तुम्हाला बदलवतं, किंवा तुम्ही ताकदीचे असाल तर तुम्ही जगाला बदलवता. पण बदल मला नकोच असं म्हणायची मुभा नियतीनं दिलेली नाही.’’ संगीताच्या बाबतीतही हे तंतोतंत खरं आहे. साधाच बदल बघू या : गाणं पूर्वी मैफलीत ऐकायचे. मग ग्रामोफोनवर, रेकॉर्डस्वर. मग आला टेपरेकॉर्डर आणि कॅसेट्स. आणि नंतर गोल चकाकणाऱ्या सीडीज्. आताचं गाणं हाताळायलाही लागत नाही. ते एम.पी. थ्री रूपात असतं.. थेट अमूर्त! पण कानांपर्यंत मात्र पोचतं ते हेडफोन्सद्वारे. आता हा बदल महत्त्वाचा आहे आणि सामाजिकदृष्टय़ा खूप गंभीरही. पूर्वी घरात रेडिओ लागला की साऱ्यांच्याच कानावर गाणं पडायचं. आता आय-पॉडवरचं गाणं हे एकटय़ा-एकटय़ापुरतं, खासगी, स्वतंत्र झालेलं आहे. ज्यांच्या घरात तरुण मंडळी आहेत त्यांना माझं हे म्हणणं लगेचच कळेल. ती मंडळी आपल्या खोलीत कानात हेडफोन्सरूपी बोळे घालून नादब्रह्मात गर्क झालेली असतात आणि बाकीचं घर त्यांची वाट पाहत थांबलेलं असतं. पीटर गॉचरनं ‘Generation coming up may never own a stereo…’ (‘पुढची पिढी बहुधा कधीच स्पीकर्सवाली संगीतयंत्रणा बाळगणार नाही.’) असं म्हटलं आहे. ते खरं झालं तर जगभरच्याच संगीतश्रवणामध्ये मोठ्ठा बदल झाल्याचं दिसेल. मराठी साहित्यामध्ये लाडक्या असलेल्या अस्तित्ववादाच्या भाषेत सांगायचं तर संगीताचं ‘एलिनिएशन’ होईल! आता इथे ‘स्माइली’ टाकता येत नाही म्हणून उद्गारवाचक चिन्ह वाक्याशेवटी दिलं आहे. तोही एक बदलच आहे मोठा. शब्दांचं सकस माध्यम सोडून व्हॉट्सअ‍ॅपवरची नाना चित्रं परस्परांना पाठवताना माणसं पाहिली की शब्द जिवंत राहणार आहेत का? आणि मग शब्द-संगीतही? पण त्यावर बोलण्याआधी पुरातत्त्वशास्त्रज्ञ असलेल्या निरंजन कुलकर्णी या माझ्या वाचकमित्रानं सदराविषयी काय लिहिलं आहे ते मांडतो. तो लिहितो- ‘‘ ‘लयपश्चिमा’ची दोन सूत्रे जाणवतात. एक ‘रॉकस्टार’मधलं ‘साडा हकक एथ्थे राख’ या गाण्यामधलं अ‍ॅटिटय़ूड आणि दुसरं सूत्र स्थलांतराचं. बंडखोरी तुझ्या शब्दाशब्दांत दिसते. विषयांच्या निवडीपासून पारंपरिक मानसिकतेवर जे हल्ले तू करतोस, त्यात ती बंडखोरी दिसते.’’ मी हे एवढय़ाचसाठी मांडलं, की एक तर निरंजन कुलकर्णी अचूक निदान करतात आणि आपल्या मागच्या प्रश्नाशीही त्याचा संबंध आहे. शब्द मरतील, शब्दसंगीत मरेल, भाषा मरेल (मराठी भाषा मेल्याची हाकाटी तर गेली शंभर वर्षे तरी होते आहे.) असं मला वाटत नाही. जगभर सहज-सोपं होत चाललेलं स्थलांतर आणि बदलासाठी उत्सुक असलेली, साऱ्यांच्याच आत कमी-जास्त असलेली बंडखोरी हे दोन घटकच भाषा आणि संगीत जिवंत ठेवतील. कारण त्या दोन घटकांमुळे अनेक अर्थगर्भ अनुभव माणसांना येत आहेत. आणि साहित्य-संगीताची अनुभव मांडण्याची क्षमता असीमित आहेच! तेव्हा बदल होईल तो ‘स्वरूपा’त; मुदलात नव्हे. टी.व्ही. आले तरी रेडिओ चाललेच आहेत. किंबहुना, अनेक खासगी वाहिन्या रेडिओवर आल्या आहेत. आणि टीव्हीवर तिन्हीत्रिकाळ बातम्या दिल्या जात असतानाही तुम्ही हे वर्तमानपत्र, हे माझं छोटंसं सदर वाचताहातच की! आणि तेही वर्षभर! हा, तुमच्यातले काहीजण निवांत चहाचे घुटके घेत पेपरमधलं ‘लयपश्चिमा’ वाचतात; तर काहीजण न्यूयॉर्कच्या मेट्रोमध्ये उभ्या उभ्या ‘लोकसत्ता’च्या मोबाइल साइटवर!
आणि केवढी भरभरून दाद तुम्ही वाचक मला देत आहात! वर्षभर अनेक वाचकांनी मला दीर्घ ई-मेल्स पाठवल्या; अनेक जाणकार लेखक, संगीतकार, गायक, चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक यांनीही ‘लयपश्चिमा’ आवडल्याचं आवर्जून कळवलं. साऱ्यांचे मन:पूर्वक आभार! सदर संपत असलं आज, तरी आपला संवाद राजहंस प्रकाशनातर्फे येत असलेल्या माझ्या नव्या पुस्तकाद्वारे चालूच राहणार आहे. त्यामध्ये ‘लयपश्चिमा’चा पुष्कळ विस्तारलेला, दीर्घ पैस आहे.
आणि आता निरोप : खराखुरा. आणि तो नेहमीच जड असतो. दर दोन आठवडय़ांनंतर आपली होणारी भेट आपण ‘मिस’ करणार आहोत. पण ज्या सर्वव्यापी, अनुभवसन्मुख गाण्याविषयी आपण वर्षभर बोलत होतो, ते मात्र अक्षय आहे. अरुणा ढेरे यांनी फार पूर्वीच समर्थपणे म्हणून ठेवलं आहे :
‘‘ते गाणे कसले? होता नुसताच निळासा रंग
आयुष्य समजण्याचाही तो निळा निळा प्रारंभ..’’
सदर संपत असलं तरी गाण्यासकट आयुष्यही समजून घ्यायचा प्रारंभ जणू होतो आहे. आणि त्या आनंदात मला न दिसणाऱ्या, पण जाणवणाऱ्या तुम्हा
साऱ्यांना सहभागी करता आल्याचं समाधान आज माझ्या या लेखणीपाशी रेंगाळतं आहे!
(समाप्त)