‘नीलरंगी रंगले’ अशी अवस्था होती ती! गुहेत अद्भुत निळा प्रकाश पसरला होता.. छताकडे अंधार, पण खाली निळं पाणी अक्षरश: लखलखत होतं. त्या निळाईला एक विलक्षण चंदेरी झळाळी होती.. काप्री बेटातल्या या निळय़ा गुहेच्या अर्थात ब्लू ग्रोटोच्या प्रवासाची चित्तरकथा!
भूमध्य समुद्रातली सिसिली, कॉर्सिका ही इटालियन बेटं अनेक गुन्हेगारीकथा, कादंबऱ्या, चित्रपट यांतून गाजली आहेत. ही बेटं भौगोलिकदृष्टय़ा तसंच क्षेत्रफळाने मोठी आहेत.
या मोठय़ा बेटांबरोबरच स्ट्रॉबोली, इश्चिया, प्रोसिदा, काप्री ही चिमुकली बेटं व्हेसुवियस ज्वालामुखीच्या उद्रेकापासूनचा इतिहास सांगत भूमध्य सागरात विसावली आहेत. यातल्या काप्री बेटावर निसर्गाचा एक अद्वितीय चमत्कार पाहायला मिळतो. तो म्हणजे ‘ब्लू ग्रोटो!’ इटालियन भाषेत ‘ग्रोटो अझुरा’ म्हणजे ‘समुद्रातली निळी गुहा’ पाहण्याचा योग अलीकडेच आला.
इटलीतल्या नेपल्स या समुद्राकाठच्या शहरातून काप्रीला जाणाऱ्या बोटी सुटतात. रोमपासून दोन तासांवर असलेलं नेपल्स (स्थानिक भाषेत ‘नापोली’) दक्षिण इटलीतल्या कंपानिआ प्रांतात येतं. व्हेसुवियस ज्वालामुखीच्या छायेतलं नेपल्स हे पुरातन शहर राजवाडे, चर्चेस, म्युझियम्स, मॉनेस्ट्री अशा अनेक मानवनिर्मित प्रेक्षणीय स्थळांबरोबरच नयनरम्य परिसरासाठीही प्रसिद्ध आहे. नेपल्समधल्या टेकडय़ांच्या रस्त्यांवरून तिथल्या बंदराचा विहंगम देखावा दिसतो. इथूनच समुद्रात दूरवर दिसणारी बेटं, समुद्रातून वर आलेले हजारो फूट उंचीचे डोंगर, निळंशार पाणी पाहणाऱ्याला खुणावत राहतं. नेपल्सला गेल्यावर मग त्या निळय़ा काप्री बेटाची ट्रिप अपरिहार्य ठरते.
काप्रीला जाण्यासाठी नेपल्समधला आमचा मार्गदर्शक अलेक्झांडर याने आधीच बोटीच्या प्रवासाची तिकिटं काढून ठेवली होती. सकाळी लवकरच नेपल्स हार्बरवरून बोट सुटली. अत्यंत आरामशीर बैठकव्यवस्था, दोन्ही मजल्यांवर सुंदर डेक्स असलेल्या त्या बोटीवर आमचा छोटा ग्रुप वगळता सगळी अमेरिकन आणि युरोपीयन मंडळी होती. काप्री हे एकेकाळचं फॅशन डेस्टिनेशन! अनेक फॅशन शोज् काप्री आयलंडमधल्या हेरिटेज व्हिलाज हॉटेल्समध्ये आयोजित होत. त्याची आठवण करून देणारे अत्याधुनिक पोशाख, गॉगल्स, सॅण्डल्स, पर्सेस, बेल्टस, रंगीबेरंगी माळा ल्यायलेली गौरवर्णी मंडळी बोटीत होती.
आम्ही थोडा वेळ डेकवरून नेपल्स बेचं दर्शन घेतलं. दूरवर व्हेसुवियस पर्वत आणि त्यावरचं ज्यालामुखीचं विवर अगदी स्पष्ट दिसत होतं.
नेपल्स ते काप्री बेट हा पाच मैलांचाच प्रवास आहे. काप्री जवळ येऊ लागलं तसं भूमध्य सागराचं पाणी निळसर दिसू लागलं. दूरवर दिसणाऱ्या समुद्रातल्या हिरव्या टेकडय़ा जवळ आल्या आणि पाहता पाहता बोट काप्रीला पोहोचली.
मरिना ग्रेनेड हे काप्रीचं बोट स्टेशन. इथूनच पाण्यातली निळी गुहा अर्थात ब्लू ग्रोटोकडे जाणाऱ्या छोटय़ा लाँच सुटतात. आमच्या बोटीमधून उतरलेली सगळी मंडळी भराभर पुढच्या प्रवासासाठी वेगवेगळय़ा लॉन्चेसमध्ये शिरली. बाकीचं काप्री बेट निवांत पाहता येतं, पण ब्लू ग्रोटोसाठी सकाळचीच वेळ गाठावी लागते. कारण सूर्य मध्यान्हीला पोहोचेपर्यंत गुहेतला तो अद्भुत निळा प्रकाश सर्वाधिक सुंदर दिसतो, असं म्हणतात.
पहिल्या मोठय़ा बोटीमधून आता दुसऱ्या छोटय़ा बोटीमधला प्रवास सुरू झाला. समुद्राचं पाणी विलक्षण निळं दिसत होतं. पाण्यात नीळ घालून त्यात कपडे बुडवण्याआधी ते पाणी कसं दिसतं, चक्क तसं पाणी चहूकडे पसरलं होतं. पांढरे समुद्रपक्षी मधूनच त्या पाण्यावर झेप घेत होते.
आमचा मार्गदर्शक अलेक्झांडर ब्लू ग्रोटोची माहिती सांगू लागला.. भूमध्य समुद्राचाच भाग असलेल्या तिरहेनियन समुद्रातलं काप्री बेट अडीच हजार वर्षांपासून ग्रीक, रोमन, ब्रिटिश, फ्रेंच अशा वेगवेगळय़ा राजवटींकडे फिरत राहिलं. रोमन सम्राट टायबेरियस याने काप्रीला स्वत:चं वसतिस्थान बनवलं. आजही या रोमन व्हिलाचे भग्नावशेष काप्री बेटावर पाहायला मिळतात.
देखण्या समुद्रामुळे, निसर्गरम्य परिसरामुळे काप्री पूर्वापार चित्रकार, कवी, लेखक यांच्या आकर्षणाचे केंद्र बनलेले आहे.
त्यातलाच एक जर्मन चित्रकार – लेखक ऑगस्ट कोपिश यांनी १८२२ साली काप्रीच्या समुद्रात पोहताना ‘ब्लू ग्रोटो’चा शोध लावला. पण ब्लू ग्रोटो रोमन सम्राटांना पूर्वीपासून माहीत होतं, याचे पुरावे नंतर सापडले, कोपिशनी हा शोध लावण्याआधी कैक वर्षांपूर्वी ही निळी गुहा रोमन सम्राटांचा हमामखाना होती. या छोटय़ा गुहेच्या तळाशी पाण्यात बुडालेलं अजून एक तोंड आहे. जेव्हा सूर्यप्रकाश तिथे पोहोचतो तेव्हा तळाशी असलेल्या चुनखडीवरून प्रकाश परावर्तित होऊन तो पाण्याला हा अद्भुत चमचमता निळा रंग देऊन जातो. त्या निळय़ा पाण्याचं आणि उजेडाचं हे शास्त्रीय रहस्य!
मे, जून, जुलै या महिन्यांमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाशित दिवशी भरती-ओहोटीचं गणित पाहून ब्लू ग्रोटोची भेट ठरवावी लागते. काप्रीला पोहोचून समुद्र खवळलेला असेल तर मरिना ग्रेनेडवरून बोटी गुहेकडे जात नाहीत. आम्ही मात्र या ‘जर-तर’ मधला योग्य दिवस गाठला होता. त्यामुळे आता त्या निळाईची ओढ लागली होती.
निळं शाईसारखं पाणी कापत जाणाऱ्या, ब्लू ग्रोटोच्या दिशेने निघालेल्या छोटय़ा-मोठय़ा नौका मधूनच मागे-पुढे जात होत्या. लांबून परत पाण्यात उंच डोंगर दिसू लागले. उंच चुनखडीसारख्या पांढऱ्या दगडांच्या कपारी, थोडा पठारी भाग असेल तिथे वृक्षराजी, त्यातून डोकावणारे बंगले सगळं जवळ येऊ लागलं.
डोंगरातल्या एका उंच कडय़ाच्या पायथ्याशी निळय़ा पाण्यात अनेक बोटी उभ्या होत्या. त्यांच्या पुढे छोटी होडकी पाण्यात हेलकावत होती.
ब्लू ग्रोटो आल्याचं अलेक्झांडरनी सांगितलं आणि पाण्याचा तो नीळसोहळा बघायला मन अगदी आतुर झालं.
ब्लू ग्रोटोचं पहिलं दर्शन लहानपणी पुलंनी घडवलं होतं. ‘जावे त्यांच्या देशा’ या पुस्तकातला ‘निळाई’ हा त्यांचा लेख म्हणजे ब्लू ग्रोटोचं लिखित वर्णन नसून जणू प्रत्यक्ष दर्शन आहे. मोठं होईपर्यंत कितीतरी वेळा ते वर्णन वाचलं होतं. आता ते प्रत्यक्ष पाहण्याची घटिका येऊन ठेपली होती.
दुसऱ्या बोटीतून आता परत तिसऱ्या बोटीत शिरायचं होतं. बोट कसली, अगदी छोटी होडकीच होती ती! नावाडी धरून चार माणसं दाटीवाटीनं बसतील
एवढीच जागा!
त्या छोटय़ा होडक्यात बसण्यासाठीही मोठी प्रतीक्षा यादी होती. आमच्या बोटीचा नंबर लागल्यावर आम्ही भर समुद्रात त्या धिप्पाड इटालियन नावाडय़ांच्या मदतीने छोटय़ा होडक्यात शिरलो. भरती होती. त्यामुळे दोन्हीही बोटी हिंदकळत होत्या.
समोर पाहिलं तर डोंगराच्या पायथ्याशी अगदी छोटय़ा पाणगुहेच्या तोंडाशी आमच्या चिमुकल्या होडक्यासारखी सात-आठ होडकी पाण्यात हिंदकळत होती. सूर्य डोक्यावर आला होता. उन्हामुळे निळं पाणी चमकत होतं. पण पुढे जी अपूर्व निळाई दिसणार होती, त्याच्या प्रतीक्षेने हृदयाची धडधड वाढली. अखेर आमच्या होडक्याचा नंबर लागला. गुहेच्या तोंडाशी ‘लाय डाऊन’असा इशारा नावाडय़ाने केला. इतक्या निमुळत्या तोंडाच्या गुहेत ‘लाय डाऊन’ करूनही कपाळमोक्ष होणार असं वाटत असतानाच तो न होता होडी झपकन् गुहेत शिरली.
भरतीचं पाणी वेगात असावं. कारण होडी खूपच हिंदकळत होती. अचानक काही चीत्कार घुमले! नावाडी म्हणाला, ‘लूक!’ उठून डोकं वर केलं. पारलौकिक वाटावा अशा निळय़ा उजेडाने ती होडी आणि आतले आम्ही पाचजण क्षणार्धात उजळून निघालो.
‘नीलरंगी रंगले’ या अवस्थेतून भानावर येऊन आजूबाजूला पाहिलं तर बऱ्यापैकी लांब-रुंद अशा त्या गुहेत शब्दात वर्णन करता येणार नाही असा अद्भुत निळा प्रकाश पसरला होता. गुहेत छताकडे अंधार होता, पण खाली निळं पाणी अक्षरश: लखलखत होतं.
त्या निळय़ात एक विलक्षण चंदेरी झळाळी होती. होडीतून खाली पाण्याकडे पाहिलं. रुपेरी निळा रंग त्यात पाऱ्यासारखा चमकत होता.
होडीतले आम्ही पाचही जण त्या उजेडात रुपेरी निळ्या पुतळ्यासारखे दिसत होतो.
आईच्या पोटात नाळेला धरून पोहताना असाच निळा रंग आजूबाजूला असेल किंवा प्राण कुडी सोडून जाताना अशाच निळय़ा चंदेरी रंगाचा लोळ ते बोलावणं घेऊन येत असेल असा चमत्कारिक विचार क्षणात मनाला स्पर्श करून गेला. कुठल्याशा पारलौकिक तत्त्वाचं त्या निळय़ा रंगाशी द्वैत घडलं होतं. किती वेळ असा गेला, ते कळलं नाही. पण तीन ते पाच मिनिटांच्या वर तिथं आत कुणी थांबत नाही, हे बाहेर आल्यावर कळलं. आतल्या निळाईत वेळ, स्थळ-काळ-वेळेचं भान हरपून गेलं होतं.
नावाडय़ाने जोरात वल्हे मारल्यावर निळं पाणी हवेत उंच उडालं. हजारो निळे खडे हवेत उधळून दिल्याचा भास झाला. हा त्या निळय़ा उत्सवाचा जणू ग्रँड फिनाले!
गुहेतून होडी बाहेर आली. स्वच्छ उन्हात अंगावर सांडलेला रुपेरी निळा रंग क्षणार्धात अदृश्य झाला. ते निळं स्वप्न पाहता पाहता विरून गेलं.
‘हजार मोरांचेच पिसारे अंधारावर आले वेढून आले तिच्याच देहा तिच्याच देही मिटले’ या आरती प्रभूंच्या ओळी मनात दिडदा दिडदा वाजत होत्या. काप्री बेटातल्या त्या निळय़ा गुहेने बेटावर प्रवेश करतानाच मन भरून टाकलं. परत मोठय़ा बोटीमध्ये बसून मरिना ग्रेनेडला परतलो. डोंगराच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या टुमदार, देखण्या अॅना काप्रीचा प्रवास छोटय़ा बसमधून सुरू झाला. पण नुकत्याच घेतलेल्या गहिऱ्या निळय़ा अनुभवांनी मन तुडुंब भरलं होतं. निसर्ग हा जगातला अद्वितीय कलाकार आहे, हे सार्वकालिक सत्य त्या चिमुकल्या गुहेत पुन्हा एकदा प्रत्ययाला आलं होतं.