जगातील वादग्रस्त आणि बहुचर्चित लष्करी कारवायांपैकी एक म्हणून ‘ऑपरेशन ब्लू स्टार’चं वर्णन केलं जातं. शिखांचं सर्वात पवित्र धार्मिक स्थळ असणारं अमृतसरचं सुवर्णमंदिर अतिरेक्यांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी लष्करानं केलेली कारवाई आजही पंजाबमध्ये तितकीच संवेदनशील विषय आहे. उपरोक्त कारवाईत मारल्या गेलेल्या अतिरेक्यांच्या स्मरणार्थ काही वर्षांपूर्वी स्मृतिभवनाचा पायाभरणी सोहळा झाल्याचं वृत्त प्रकाशित झालं होतं. देशाच्या एकात्मतेला आव्हान देणाऱ्यांचा असा सन्मान होणं आणि लष्करी कारवाई चुकीची ठरविण्याचे प्रयत्न काही गटांकडून अव्याहतपणे होत आहेत. उपरोक्त कारवाईचं नेतृत्व करणारे लेफ्टनंट जनरल के. एस. ब्रार यांच्या ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ या पुस्तकातून या विषयाची दुसरी बाजू पुढे आली आहे.
जर्नेलसिंग भिंद्रनवाले आणि त्याच्या खलिस्तानवादी चळवळीचे पडसाद आजही अधूनमधून उमटत असतात. ‘ऑपरेशन ब्लू स्टार’चा संदर्भ देत तरुण पिढीची दिशाभूल करून भावना भडकविण्याचे पद्धतशीर प्रयत्न होत आहेत. इतक्या वर्षांनंतरही शीख मूलतत्त्ववाद आणि खलिस्तानी चळवळीच्या पुनरुत्थानासाठी देशात व परदेशात चाललेले प्रयत्न, राग, द्वेष व सुडाच्या राजकारणाचा प्रवास या पुस्तकात अधोरेखित करण्यात आला आहे. ‘गणपती दूध पितो’ अशी वंदता झाल्यावर शेकडोंनी रांगा लागणाऱ्या आपल्या देशात अफवा कशा पद्धतीनं काम करतात आणि कोणत्याही धार्मिक उन्मादाला वेळीच पायबंद घातला न गेल्यास काय भीषण परिस्थितीला सामोरं जावं लागतं; त्यासमोर तत्कालीन केंद्र व राज्य शासन कसं हतबल ठरतं; पंजाबच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणारे पोलीस दलदेखील कसं निष्प्रभ ठरतं आणि मग एकमेव शिल्लक असणारा लष्करी कारवाईचा निर्णय घेतल्यावर या संपूर्ण घटनाक्रमाचा दोष लष्कराच्या माथी कसा मारला जातो याची ही कथा आहे.
खरं तर जागतिक पातळीवर आजवर झालेल्या लष्करी कारवायांमधील अतिशय वेगळी आणि संवेदनशील अशी ही कारवाई होती. खलिस्तानवादी चळवळ रुजण्यापूर्वीची परिस्थिती, पंजाबविषयीच्या गैरसमजांची पाश्र्वभूमी, भिंद्रनवालेचा झंझावाती उदय या मुद्दय़ांचा ऊहापोह करत लष्करी कारवाई दरम्यान घडलेल्या लहान-सहान घडामोडींचा पट उलगडत जातो. बळाचा कमीत कमी वापर करताना भारतीय लष्कराला सुवर्ण मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागली. सुवर्ण मंदिराचा परिसर, लष्करी कारवाईचं नियोजन, तिचा आराखडा, कारवाईचं प्रत्यक्ष झालेलं मार्गक्रमण यासाठी नकाशांचा आधार घेतला गेला होता. त्या नकाशांचा वापर प्रस्तुत पुस्तकात केल्यानं ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ डोळ्यांसमोर उभं राहतं. त्यास कारवाईपूर्वी आणि नंतरची छायाचित्रं हातभार लावतात.
सुवर्ण मंदिर परिसरातील एका इमारतीवर खलिस्तानचा झेंडा फडकल्यानंतरही तत्कालीन केंद्र शासनाची असहाय स्थिती, पंजाबच्या तत्कालीन उपमहानिरीक्षकांसह शेकडो जणांचं हत्याकांड सुरू असतानाही थंड राहिलेलं तत्कालीन राज्य शासन, सुवर्ण मंदिराचं रूपांतर शस्त्रागारात होत असताना गाफील राहिलेली गुप्तचर यंत्रणा, अतिरेक्यांच्या हातचं बाहुलं बनलेले तत्कालीन अकाली दलाचे नेते, कायद्याला न जुमानणाऱ्या आणि सुवर्ण मंदिराचा गैरवापर करणाऱ्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न न करणारी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती, भिंद्रनवाले यास अकाल तख्तमध्ये आश्रय घेण्यापासून रोखण्याची जबाबदारी टाळणारे तत्कालीन धर्मगुरू, भय आणि दहशत पसरविणाऱ्या भिंद्रनवालेच्या कृत्यांना वारेमाप प्रसिद्धी देणारी प्रसारमाध्यमं असे सर्व पदर उलगडत या कारवाईत दोष नेमका कोणाचा, याचा निर्णय लेखकानं वाचकांवर सोडला आहे.
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ जसं घडलं तसं..’ – ले. ज. (निवृत्त) के. एस. ब्रार, अनुवाद- भगवान दातार, रोहन प्रकाशन, पुणे, पृष्ठे- १५२, मूल्य- १९५ रुपये.