‘अनयुजवल पीपल डू थिंग्ज डिफरन्टली’ या टी. जी. सी. प्रसाद यांच्या प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकाचा विनिता गनबोटे यांनी केलेला मराठी अनुवाद हा मूळ पुस्तकाला न्याय देणारा झाला आहे. असामान्य व्यक्ती नेहमीच वेगळा विचार करतात या विधानाचे विस्ताररूप सदर पुस्तक वाचताना प्रत्यंतराला येते.
सर्वसामांन्याच्या दैनंदिन आयुष्यामधील अनेक साध्यासोप्या व्यवस्थापकीय व व्यावसायिक बाबी नेहमीच दुर्लक्षित केल्या जात असतात. याउलट मोठय़ा कॉपरेरेट कंपन्यांतील व्यवस्थापना संदर्भातील सैद्धांतिक बाबींचे पुस्तक रूपाने मांडणी स्वरूपात लेखन केले जाते, जे खरे तर बोजड स्वरूपाचे असते असे प्रसाद यांचे निरीक्षण होते. म्हणूनच सर्वसामान्यांपासून यशस्वी लोकांपर्यंतच्या दैनंदिन आयुष्यातील व्यवस्थापकीय बाजू साध्या-सोप्या पद्धतीने मांडायचे प्रसाद यांनी ठरवले व त्यातूनच या पुस्तकाची निर्मिती झाली.
यशस्वी ठरलेले लोक खरे तर सामान्यच असतात. परंतु ते असामान्य गोष्टी करण्याचा सतत प्रयत्न करत असतात. एखाद्या कार्याला त्यांनी पूर्णपणे वाहून घेतलेले असते व सतत नवीन गोष्टी शिकण्याचा ते प्रयत्न करत असतात. स्वत:मध्ये परिस्थितीनुसार बदल करत ते निश्चयाने आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करतात. अशा विविध क्षेत्रांतील सुमारे ६५ व्यक्तींच्या ‘यशस्वी वाटचालीचा वेध’ यात घेतला आहे. या व्यक्तींत सी.ई.ओ, डॉक्टर्स, नर्स, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, सी.टी.ओ, वकील, चार्टर्ड अकौंटंट, शेफ , खेळाडू, सल्लागार यांचा समावेश आहे. या विविध व्यक्तींनी आचरलेले मार्ग आणि त्यांनी काम करण्यासाठी वापरलेली पद्धत यांचा त्यांच्या दैनंदिन जगण्याशी मेळ घालून एक छोटीशी कथा प्रत्येक प्रकरणात स्वतंत्रपणे तयार करण्यात आलेली आहे व त्यातून या लोकांच्या जगण्याचे मर्म मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.
मूळ इंग्रजी पुस्तकाला बांधीव रूप देण्यासाठी सहा मुख्य संकल्पनांमध्ये विविध क्षेत्रांतील यशस्वी व्यक्तींची विभागणी करण्यात आलेली होती, ती अनुवादित पुस्तकातही कायम राखल्याने पुस्तकाच्या वाचनीयतेला हातभार लाभला आहे. स्वतंत्र प्रकरणांच्या क्रमामुळे पुस्तकाचा मूळ गाभा लगेचच लक्षात येतो. धोरण व निर्मितीचा ध्यास असणारे, आकलनशील व सर्जनशील उपाय शोधणारे, व्यावसायिक व उत्कृष्टतेचा ध्यास घेणारे, यशासाठी व्यावसायिक कौशल्यांचा वापर करणारे, आघाडीवर राहून काम करणारे, संवेदनशील व ग्राहकाभिमुख असणारे असे सुसंगत क्रम पुस्तकाचे वाचनीय मूल्य वाढवतात. नामांकित समूहांपासून ते स्वतंत्र उद्योग करणाऱ्या अनेकांची वाटचाल या पुस्तकामधून उलगडते.
 गुणवत्तापूर्ण काम करण्याची व विविध क्षेत्रांत नेतृत्व करण्याची इच्छा असणाऱ्या सर्वानाच या पुस्तकाचा उपयोग होऊ शकतो.
‘असामान्य व्यक्तींच्या असामान्य कर्तृत्वाच्या कथा’  – टी. सी. जी. प्रसाद, अनुवाद- विनिता गनबोटे,
मनोविकास प्रकाशन, पुणे,  पृष्ठे – ३८१, मूल्य – ३०० रुपये.