हिंदी चित्रपटसृष्टीने कात टाकल्यानंतर दिलीपकुमार, देव आनंद आणि राज कपूर अशी त्रिमूर्ती उदयास आली. या तिघांच्या चित्रपटांचे संगीतकारही ठरलेले. त्यातून सुरू झालेल्या निकोप स्पध्रेमुळे आणि उत्तमोत्तम संगीत देण्याच्या ध्यासामुळे िहदी चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ अवतरला. विलासदत्त राऊत हे त्या पिढीचे प्रतिनिधी. या पुस्तकात त्यांनी या सुरेल आठवणींना उजाळा दिला आहे.
विलासदत्त राऊत हे रूढ अर्थाने लेखक नाहीत. (चित्रपट व गाण्यांची आवड, समविचारी मित्र यामुळे आपल्याला लेखनाची प्रेरणा मिळाली असे ते सांगतात.) त्यामुळे यातील लेखन हे आखीवरेखीव, गोळीबंद नाही. अनेक ठिकाणी संपादनही सदोष आहे. तरीही त्यांच्या लेखनातील साधेपणा भावतो. गाण्यांविषयीची त्यांची असोशी पानोपानी जाणवते. ‘राज कपूर, शंकर-जयकिशन, ओ. पी. नय्यर, बलराज सहानी, संगीत संयोजकांची उपेक्षित दुनिया, इनॉक डॅनियल्स, जयसिंग भोई, सुवर्णकाळ संगीताचा’ अशा आठ प्रकरणांत या पुस्तकाची विभागणी केलेली आहे. राज कपूर, शंकर-जयकिशन आणि ओपी यांच्याबद्दल वेळोवेळी अनेकांनी लिहिले असल्याने ते वाचताना पुन:प्रत्ययाचा आनंद मिळतो, इतकेच. ‘आरके कँप’मध्ये गीतकार शैलेंद्र यांचा प्रवेश कसा झाला, याबद्दलच्या कथनाची तर दोन प्रकरणांत पुनरावृत्ती झाली आहे. बलराज सहानी यांच्यावरील लेख मात्र माहितीपूर्ण आहे.
या पुस्तकाचे ठळक वैशिष्टय़ म्हणजे लेखकाने संगीत संयोजक या उपेक्षित कलाकारवर्गास लेखणीद्वारे दिलेला न्याय. मुळात संगीतकार ही जमात पडद्यामागे वावरणारी. कर्णमधुर वाद्यमेळाद्वारे या संगीतकारांची गाणी खुलवणारे संगीत संयोजक तर आणखीनच उपेक्षित. त्यामुळे सेबास्टियन डिसूझा, रामप्रसाद, मनोहारी सिंग, इनॉक डॅनियल्स, बाळ पार्टे आदी संगीत संयोजक तसेच जयसिंग भोई या अवलिया वादकांची त्यांनी सांगितलेली माहिती आगळीवेगळी ठरते.
नौशाद यांच्या नावे असलेल्या ‘लीडर’, ‘दिल दिया दर्द लिया’, ‘साथी’, ‘आदमी’ या चित्रपटांतील सगळ्या चाली त्यांचे संगीत संयोजक मोहम्मद शफी यांच्या होत्या, असे एक खळबळजनक विधान लेखक करतो. त्यात तथ्य असेलही; मात्र त्याच्या पुष्टय़र्थ कोणताही संदर्भ वा कोणाचेही अवतरण न दिल्याने हे विधान मोघम ठरते. नौशाद यांच्या जिभेवर साखर होती, असे म्हणून लेखकाने बरेच काही सूचित केले आहे. एकंदरीत, रसिकांच्या मर्मबंधातील सुरेल आठवणींना हे पुस्तक उजाळा देते.
‘ये रे मेरे गीत जीवनसंगीत’ – विलासदत्त राऊत, कॉन्टिनेंटल प्रकाशन, पुणे, पृष्ठे- १७३, मूल्य- १५० रुपये.