News Flash

एकलकोंडय़ाचा आत्मरत कबिला

दाग हॅमरशोल्ड यांनी एके ठिकाणी म्हटलंय की, ‘द लाँगेस्ट जर्नी इज द जर्नी इनसाइड.

| September 6, 2015 01:23 am

दाग हॅमरशोल्ड यांनी एके ठिकाणी म्हटलंय की,  ‘द लाँगेस्ट जर्नी इज द जर्नी इनसाइड.’ प्रत्येक कलावंताचा प्रवास हा असाच असतो. हा प्रवास आतला असतोच; पण तो नि:संशय एकटय़ाचाच, किंबहुना एकाकीच असतो. मात्र, त्यास कळणारही नाही अशा प्रकारे सत्य आणि कल्पनांचा तांडा त्याच्या हृदय आणि मस्तकातून त्याच्यासोबत निरंतर चालत असतो. कधी कधी त्याची एकजीव गजबज असह्य झाली की पायातला काटा खसकन् काढावा तशी कविता लिहित्या बोटाशी येते. मात्र, कागदावर ती उतरते तेव्हा गोमुखातून पडणाऱ्या धारेसारखी आकार घेऊन अवतरते. या आकारप्रक्रियेमध्ये हा कबिला बुद्धीला आपले प्रमुखपद देऊन टाकतो आणि नाळ कापल्यानंतर आईने पुढील संस्कारांसाठी आपले मूल दुसऱ्याहाती सोपवावे तशी बुद्धीकडे पुढील जबाबदारी सोपवतो.‘एकलकोंडय़ाचा कबिला’ या आपल्या कवितासंग्रहाच्या शीर्षकानेच ही सारी सर्जनात्मक प्रक्रिया चित्रित करण्याची किमया कवी नितीन मोरे यांनी साधली आहे. या कबिल्यात आपण कधी सामील झालो आणि कधी सामावून गेलो, हे कळूही नये, इतकी मुग्ध गतीलय या कवितांमध्ये आहे. तिच्या रूपात एखाद्या प्रगल्भ सौंदर्यशालिनीचे रूपदर्शन आहे. तिच्याकडे आकृष्ट होण्याची सारी कारणे सबळ असतानाच ‘हमसफर चाहिये, हुजूम नहीं। एक मुसाफिर भी काफिला है मुझे’ अशी अट घालत ती मनस्वीपणे पुढे चालत राहते. मग‘स्वप्नांचे ठिपके मातीच्या देहावर उमटतात.. आपलं मीपण बिनदिक्कतपणे गहाण ठेवता येतं.. दु:ख पावसाच्या धारांसारखं झेलता येतं.. निखाऱ्यासारखं तळहातावर ठेवून पाहता येतं आणि अमावास्येच्या रात्री चंद्रकिरणांसारखं झेलता येतं..’या साऱ्या कवितांचं वैशिष्टय़ म्हणजे त्या आपल्याबरोबर येण्याचं आवाहन करतानाच विशिष्ट अंतर राखण्याचा आबही राखतात. शरणागत मोहितेइतक्या सहजपणानं गळ्यात हात घालतील असं वाटत असतानाच वाचकाच्या परिपक्वतेची लक्ष्मणरेषाही नजाकतीनं आखून ठेवतात.मांजरपावलांनी माझ्या घरात आलेल्या या रात्रीला/ घाल त्या अमृतक्षणांचे पैंजण/ चांदण्याच्या गाण्याला/ माझीही थोडी साथसंगत..’ अशा भावसुंदर प्रतिमा रातराणीसारख्या सहज उमलत जात असतानाच ‘पाखियांची माळ’सारखी ‘निळी आव्हाने’ही पेरत जातात. ज्यांना सन्मुख होणं प्रगल्भ रसिकतेच्या काही यत्ता पार केलेल्या भावलोलुपांसाठी नितांतरमणीय ठरतं.कवितेबरोबर नाटक हा कवीचा आवडता प्रांत असल्यामुळे साऱ्या कवितांमध्ये चित्रमय दृश्यात्मकता बासरीतल्या श्वासाइतकी सहजपणाने भरून राहिली आहे. कवीची लेखणी अनेक ठिकाणी कुंचल्याचे रूप घेते. ‘दिवस मिटत जातो’, ‘मळहळ्ळी’ या कविता अशा प्रकारच्या आहेत. एखाद्या लाटेनं वर्तुळाकार होऊन प्रवाहातल्या वस्तूला कवळून घ्यावं तशी कवीची भाषा एखाद्या भावसंवेदनेला कवळून रूपाकार करते. ती एकाच वेळी तरल आहे, सशक्त आहे, ललितमधुर आहे आणि बुद्धिगामी अनुसरिताही!!म्हणूनच अनेक ठिकाणी चेतनागुणोक्तीचा सहज लीलया वापर व सुंदर रूपके- वसा, खोडी, गुंजा, लय, दंश, वादळ.. आढळतात. भावनांचा सच्चेपणा, आर्ततेला शब्दरूप देण्याचा अभ्यासूपणा, आशयाचे तरंग भेदत केंद्रस्थानी घेऊन जाण्याची निपुणता हे खऱ्या कवितेचे काही निकष! एकाच वेळी भोगण्याची आणि प्रसवण्याची निकड हे कवीचे प्राक्तन असते. याचे तादात्मीकरण कवित्वाचा प्राण असते. उगीच नाही केशवसुतांनी कवितेला आकाशाची वीज म्हटले आहे! तिला धरणे ज्याच्यासाठी अटळ; त्याला पोळणेही अटळ.. आणि पोळलेल्या हातावरची नक्षी न्याहाळणेही अटळ! आणि कवी नितीन मोरे यांच्या अशा ओळी- ‘तिच्या युगंधर दु:खापुढे। माझ्या जखमा पोरसवदा। .. आणि रक्तातून वाहत येतो। संतापाचा लाव्हा। तुझ्या मातीइतकं मला। मोठं होता येत नाही। पण बघीन, करीन प्रयत्न। ठिगळं लावत लावत’ (शिकवण) हीच नक्षी समोर धरतात.

‘पोएट्री इज कटिंग नीअर द एकिंग नव्‍‌र्ह’ असं एका आंग्ल कवयित्रीने म्हटले आहे. कुणाची ही जखम भळभळ वाहते, तर कुणाची संयतपणे. नितीन मोरे यांची कविता ही दुसऱ्या प्रकारातली आहे. आत साचलेले कवितेतून असं निमूट वाहणंच वाचणाऱ्याला अधिक चटका लावतं. ‘आपल्यामध्ये पसरलेलं। उष्ण अबोल वाळवंट। रात्रीवर कुठं कुठं सांडलेलं गरम गरम शिसं.. किंवा माझ्या डोळ्यातलं धुकं। सांडे अवतीभवती। दिसे नाही कुठे काही। आणि विजा कोसळती..’

या कवितेत निसर्ग अनेकदा येतो. पण म्हणून कवीला ‘निसर्गप्रेमी’ अशा ढोबळ रकान्यात टाकणं अक्षम्य चूक ठरेल. कारण तो त्या निसर्गातून आपलं जगणं किंवा आपल्या जगण्यातून तो निसर्ग ओवून घेतो. हे दोन्ही मिळून मग एक उत्कट समीकरण तयार होतं. त्याच्या डोळ्यांनी दिसणारं निसर्गरूप हे त्याच्या जगातलं होऊन येतं. त्याच्या कवितेच्या मुशीत येऊन त्याच्या आत्मीयतेची, अस्वस्थतेची, धगीची, सावलीची, चांदण्याची वस्त्रे लेवून येतं. कवितेतल्या आशयाला लगडून राहतं. लौकिक रूपाची भूल पडू न देता कवीच्या मानसिक आंदोलनात मिसळून जातं. ‘पाऊस अजूनही आवरतो आहे। त्याच्या आठवणींचे कढ। आणि आपले ऊबदार अश्रूही। त्याच्यासारखेच पिकून आलेले..’

कविता म्हणजे आपल्या ‘असण्या’चे आकलन! ते प्रत्येकाचं वेगळं. जगण्यातल्या प्रत्येक कणाची कविता करणं त्यालाच शक्य होतं; ज्याच्या अनुभूतींच्या पायात संवेदनेला त्या कणापर्यंत पोहोचण्याइतकी ऊध्र्वगामी करण्याची ताकद असते. ‘एकलकोंडय़ाचा कबिला’मधल्या कविता म्हणजे या ताकदीची पावतीपुस्तके आहेत. स्वत:ची अशी एक काव्यभाषा असणं ही देवदत्त देणगी आहे. तिची जाणीव झाली की मग काही गिरवण्याची जरूर पडत नाही. ‘चालविसी हाती धरोनिया’ अशी प्रचीती लख्खपणे येते. या भाषेतली कविता ही ‘विनासायास’ या खानदानात जन्मलेली आणि म्हणूनच कुलीन आणि सृदृढ असते. नितीन मोरे यांची कविता अशा खानदानात जन्मलेली आणि आपले खानदानी अस्सलपण जपणारी आहे.‘तुझी माया, तुझी किमया। ओथंबून आलीये। एखाद्या उंचावर टांगलेल्या पुष्ट मधाच्या पोळ्यासारखी। आता वीज मारेल खडा आणि उठेल मोहोळ। वाऱ्याचं, धारांचं। त्याचा बोचरा दंश डसेल सगळ्यांना। आणि त्यांचं विष होईल जीवनदान..’किंवा ‘एक तुझा, एक माझा। फुलो आलेला टपोर अश्रू। लगडून आलेत बाल्कनीच्या राजाला। दिवाळीतल्या दिव्यांच्या माळेसारखे..’या देणगीच्या जोरावरच संवेदनांचे, त्यामागच्या मनाचे भाषांतर करता येते.कवितेच्या मागे ‘स्व’ला अस्पष्ट ठेवत वाचकाला अर्थाचे तलम पदर उकलण्याचे आवाहन करणे; आणि स्वत: एकाच वेळी अलिप्त राहून झोकून देण्यातला बेभानपणा साधणे, या काव्यसिद्धीच्या कठीण पायऱ्या आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी संवेदनशीलतेइतकाच वैचारिक व्यायामही आवश्यक आणि अपरिहार्य! श्रेय (१०१), वादळ (९९), पारमिता (७५) यांसारख्या कवितांमधून या पायऱ्यांपर्यंतची कवीची पदचिन्हे स्पष्टपणे दिसून येतात. ‘अर्थोनुधावति’ शब्दकळा, आधुनिक जगात मिळवलेली लौकिकसंपन्नता, निसर्गाला शारीर करण्याची विद्या, व्यापक वैविध्यपूर्ण जीवनशैली, अभ्यासू वृत्ती, सांगीतिक रुची यांच्या विणीतून बनलेली ही कविता एकाच वेळी मनाला झंकारतेही आणि बुद्धीला खुणावतेही. ती एकाच वेळी पारंपरिक, तर हव्या त्या ठिकाणी बिनदिक्कत तरुणपणे परभाषिक शब्दांची पेरणी करणारी आधुनिकही आहे!काही कवितांवर मात्र कवीतल्या संकलकाची कात्री फिरली तर त्या अधिक टोकदार होतील असे वाटते. उदा. नातं, स्वप्न, तुज माघारी.. सोबत, नकोस अशा काही.‘एकलकोंडय़ाचा कबिला’ वाचताना कवी नितीन मोरे यांच्या संयत, विचक्षण, जीवनोत्सुक, आशावादी व्यक्तिमत्त्वाचे, कालप्रभावी विचारसरणी व भाषिक प्रयोगशीलतेचे आणि आयुष्याविषयीच्या उत्सुक प्रश्नचिन्हांचे प्रतििबब सहजपणे जाणवू शकते.कवितासंग्रहाचे यश त्यातल्या कवितांबरोबरच वाहून घेणारे अनेक घटक असतात. मुखपृष्ठ, मलपृष्ठ, मांडणी, अक्षरांचा घाट, कागदाचा दर्जा, इ. कवितेवर प्रेम करणाऱ्या उन्मेष प्रकाशनासारख्या प्रकाशन संस्थेने हा कवितासंग्रह प्रकाशित केला असल्यामुळे हे सारे घटक कवितेच्या अस्सलपणात भर घालतातच. डॉ. रमेश धोंगडे यांची मूलगामी, भूषणास्पद अशी दीर्घ प्रस्तावना, ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांची मलपृष्ठावरची मर्मग्राही दाद कवितासंग्रहाला पोषक अशी पाश्र्वभूमी तयार करतात. (मुखपृष्ठावर अमूर्त चित्र असते तर..!) मात्र या सर्व घटकांत महत्त्वाचा असतो तो कवितांचा त्या पुस्तकातला क्रम! पहिल्या कवितेने वाचकाला हृदयाशी ओढून घ्यावे आणि प्रातिभसंवेदनांचा आलेख उंचावता उंचावता शेवटच्या कवितेने काळजाशी कटय़ारीचे टोक टेकवावे.. या कवितासंग्रहाने हे साधले आहे. हे सारे समजण्यासाठी तो मुळातून वाचायला हवा. कवितेला हृदयाशी जिव्हार खेळ खेळू देणाऱ्या वाचकांसाठी हा कवितासंग्रह नेमका ठरेल.

 

‘एकलकोंडय़ाचा कबिला’- नितीन मोरे, उन्मेष  प्रकाशन, पृष्ठे- १३६, किंमत- १९० रुपये.
sbokil2003@yahoo.co.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2015 1:23 am

Web Title: book review 76
Next Stories
1 दूरदर्शन- भाग २
2 मॉन्टेरोसोचा लिंबू महोत्सव
3 जर्मनीतले सणवार
Just Now!
X