News Flash

कवतिक एकुलत्या लेकीचं!

एका बापाचं मनोगत.. माझी मुलगी जन्माला आली. तिला बघून नंतर घरी जाण्यासाठी हॉस्पिटलमधून बाहेर पडलो. रस्त्यावर समोरून तीन-चार मुली येत होत्या.

| September 15, 2013 01:02 am

एका बापाचं मनोगत.. माझी मुलगी जन्माला आली. तिला बघून नंतर घरी जाण्यासाठी हॉस्पिटलमधून बाहेर पडलो. रस्त्यावर समोरून तीन-चार मुली येत होत्या. माझ्यात काय सळसळत गेलं मला कळलंच नाही. त्या मुलींकडे बघणारी माझी नजर नेहमीप्रमाणे त्यांची मापं मोजणारी नव्हती. तर माझी नजर त्यांच्यामधली ऊर्जा, त्यांचा अवखळपणा शोधत होती. या मुलींच्या घरी त्यांची काळजी करणारा एक बाप असेल आणि तो काळजीने त्यांची वाट बघत असेल, असं काहीतरी मनात तरळून गेलं आणि मी एकदम हललो.. असा काहीतरी विचार मी पहिल्यांदाच करत होतो. तिकडे माझी मुलगी जन्माला आली होती आणि इथे माझ्यामध्ये एका मुलीच्या बापाचा जन्म होत होता..’
आणखी एका बापाचं मनोगत-
‘माझ्या मुलाच्या जन्मानंतर तीन वर्षांनी माझी मुलगी जन्मली. मुलगा वाढत होता तसा प्रचंड दंगामस्ती करायचा. अंगाखांद्यावर उडय़ा मार, इकडून तिकडून झेप घे, हवेत उंच फेकायला लावून झेल असले सगळे खेळ त्याला फार आवडायचे. मुलगी जन्माला आली तेव्हा मी तिला सगळ्यात पहिल्यांदा हातात घेतलं आणि मला आपोआपच आतून जाणवलं, हे अगदी नाजूक जुईचं फूल आहे. तीही थोडी मोठी झाल्यावर दंगामस्ती करते. पण मी तिच्याशी आपोआपच नाजूकपणे दंगा करतो. तिच्याशी खेळताना एक प्रकारची कोवळीक माझ्यात आतूनच उमलून येते..’
मुलगी आपल्या आयुष्यात नेमके काय बदल घडवते, याची निरीक्षणं नोंदवणारी ही दोन संवेदनशील पुरुषांची मनोगतं. त्यातच ही लेक एकुलती एक असेल तर आई किंवा वडील यांच्याबाबतीतली पालक म्हणून प्रक्रिया कशी असेल हे उलगडून दाखवणारं अरुण शेवते यांनी संपादित केलेलं पुस्तक आहे-एकच मुलगी’. अरुण शेवते आणि त्यांच्या ऋतुरंग प्रकाशनाबद्दल फारसं काही सांगायची गरज नाही. दरवर्षी एका विषयाला वाहिलेला दिवाळी अंक आणि त्या अंकातील लेखांची पुस्तकं ही परंपरा त्यांनी गेली अनेक वर्षे जपली आहे. त्यातून आत्तापर्यंत ३९ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. एकच मुलगी’ हे त्याच मालिकेतलं चाळिसावं पुस्तक आहे.
एका वर्षी त्यांनी दिवाळी अंकासाठी स्त्री’ हा विषय घेतला होता. आई, पत्नी, बहीण, मैत्रीण, मुलगी अशा वेगवेगळ्या नात्यांमधून दिसणारी स्त्री मांडायचा त्यात प्रयत्न केला होता. त्याच अंकात ज्यांना एकच मुलगी आहे, अशा समाजातील विविध प्रसिद्ध व्यक्तींनी आपल्या मुलीबद्दल लिहिलं होतं. त्यात कलावंत तसंच सामाजिक कार्यकर्ते, लेखक होते. मृणाल गोरे, ना. सं. इनामदार, निळू फुले, गुलजार, सुलोचना, रीमा लागू, आरती अंकलीकर टिकेकर, नीलम गोऱ्हे, रझिया पटेल, सदा कऱ्हाडे, बेगम परवीन सुलताना, अरुण शेवते यांचे लेख या पुस्तकात आहेत. त्याशिवाय पंडित जवाहरलाल नेहरू यांनी इंदिरेला लिहिलेली काही पत्रे, हिलरी क्लिंटन यांच्या लिव्हिंग हिस्ट्री’ या पुस्तकातला भाग या पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. या सगळ्या मालिकेत एकच वेगळा लेख सुप्रिया सुळे यांचा आहे आणि त्यांनी आपल्या वडिलांवर तो लिहिला आहे. शरद पवार यांचा लेख मिळू शकला नाही म्हणून सुप्रिया सुळे यांचा एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेला लेख पुनर्प्रकाशित केला आहे. त्यातून एकुलती एक मुलगी किती समृद्ध आयुष्य जगू शकते हे समजतं म्हणून तो लेख घेतला, असं आपली भूमिका विशद करताना संपादकांनी प्रस्तावनेत म्हटलं आहे.
या लेखाच्या सुरुवातीला दिलेली अवतरणं या पुस्तकातली नाहीत, पण ती मुलीविषयी संवेदनशीलता व्यक्त करणारी आहेत. या पुस्तकामागची कल्पनाही तीच आहे. मुलीच्या रूपात आपल्या आयुष्यात येणारी स्त्री कसं नंदनवन निर्माण करत असते, हे खूप जणांना समजतही नाही. त्यामुळेच जगण्यातल्या रसरशीतपणाशी जोडून ठेवणारा हा धागाच ते तोडून टाकायचा प्रयत्न करतात. स्त्रीभ्रूणहत्येच्या वर्तमानपत्रातून सतत येणाऱ्या बातम्या हे त्याचंच हिडीस रूप आहे. या भयंकर रूढीविरुद्ध आवाज उठवण्याचा, तिला उत्तर देण्याचा एकच मुलगी’ हा एक सकारात्मक प्रयत्न आहे. कारण या पुस्तकात समाज ज्यांना मानतो, अशा वेगवेगळ्या कलावंतांनी आपल्या लाडक्या लेकीने आपलं आयुष्य कसं बदललं, आपल्या आयुष्यात कसा आनंदाचा झरा निर्माण केला याच्या सुंदर आठवणी सांगितल्या आहेत.
या लेखांमधून या प्रसिद्ध पालकांची आणि त्यांच्या मुलींची विलोभनीय रूपं आपल्यासमोर येतात. मुलीच्या जन्माचा उत्सव करणारी, तिच्या काळजीत बुडून जाणारी, तिच्या आनंदात रममाण होणारी, तिच्या बोबडय़ा बोलात हरवून जाणारी, तिच्या गमतीजमती सांगताना फुलून जाणारी ही पालकांची रूपं वाचताना आपणही हरवून जातो. प्रसिद्ध अभिनेत्री रीमा लागू यांची मुलगी शाळेतल्या नाटकात काम करते आणि नाटक झाल्यानंतर आपलं पाकीट मागते. आईलापण नाटकात काम केल्यावर नाइटचं पाकीट मिळतं, मग ते आपल्यालाही मिळायला हवं असं तिचं म्हणणं असतं. मुलं आपल्या आसपासच्या पर्यावरणातून काय टिपत असतात, याचं हे बोलकं उदाहरण आहे. तर सदा कऱ्हाडे यांची लेक बालवाडीतच दीप्ती मराठी शाळेतल्या बाईंनी नीट वागवलं नाही, आई-वडिलांवरून अपमान केला म्हणून त्या नकळत्या वयात इंग्रजी माध्यमाकडे वळते. तिचं म्हणणं नीट समजून घेणारे, तिच्या त्या वयातल्या स्वयंनिर्णयाच्या क्षमतेला वाव देणारे वडील या लेखातून भेटतात. टीव्ही बघताना एका चित्रपटात निळू फुलेंना कुऱ्हाड मारली जाते हे बघून लहानगी गार्गी आपल्या बाबाला मारताहेत म्हणून मोठमोठय़ाने रडायला लागली. तो अभिनय आहे हे काही त्या बालमनाला कळेना. मग निळू फुलेंचं शूटिंग कुठे सुरू आहे, हे शोधून काढून तिच्या आईने गार्गीची आणि तिच्या बाबांची फोनवर गाठ घालून दिली आणि मग बाबाने मला काही झालेलं नाही, रक्त आलेलं नाही, लागलेलं नाही, मी लवकर घरी येतो हे फोनवर सांगितलं तेव्हा तिचा आकांत शांत होतो.
गुलजार यांची बोस्की, मृणाल गोरे यांची अंजू, सुलोचना यांची कांचन, ना. सं. इनामदारांची मोहिनी, नीलम गोऱ्हे यांची मुक्ता, निळू फुले यांची गार्गी, बेगम परवीन सुलताना यांची शादाब, आरती अंकलीकर टिकेकर यांची स्वानंदी, रझिया पटेल यांची नेहा, अरुण शेवते यांची शर्वरी या सगळ्याच मुलींचे आई-वडील हे समाजातल्या प्रसिद्ध व्यक्ती म्हणून आपल्याला माहीत आहेत. पण त्यांची आई-वडील म्हणून जडणघडण कशी झाली, तीही या मुलींनी ती कशी केली, हा समृद्ध प्रवास कसा झाला याची मांडणी हे पुस्तक करतं.
 पंडित जवाहरलाल नेहरू यांनी इंदिरेला लिहिलेली पत्रं वाचताना तर कुणाही मुलीला आपले वडीलच आपल्या समोर बसून हे जगाचा इतिहास सांगत आहेत, असं वाटत राहतं इतकी ती प्रातिनिधिक आहेत. चेल्सीची आई म्हणून हिलरी क्िंलटन यांनी जे लिहिलं आहे, ते वाचतानाही जगात कुठल्याही समाजात गेलात तरी मातृहृदय हे सारखंच असतं आणि आई-वडिलांना आपल्या लेकीबद्दल वाटणारी माया, प्रेम, अभिमान, काळजी हे जगातल्या सगळ्या संस्कृतींमध्ये सारखंच असतं याचं प्रत्यंतर येतं.
 या सगळ्याच पालकांच्या बाबतीत नमूद करायची गोष्ट म्हणजे हे सगळेच जण समाजातले कुणीतरी आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी आपापलं स्थान निर्माण केलं आहे. पण आपल्या लेकीने काय करावं, आपल्याच क्षेत्रात यावं का याबाबतचे कोणतेही आग्रह ते मांडताना दिसत नाहीत. आपल्या त्या वेळच्या परिस्थितीत सर्वोत्तम तेच आपल्या लेकीला द्यायचा त्यांनी प्रयत्न केला आहे आणि प्रवाहाचं पाणी जसं नैसर्गिकपणे वाहतं तसं त्यांनी वाहू दिलं आहे. समाजातली मोठी माणसं जे करतात ते अनुकरण्याचा समाजाकडून प्रयत्न होत असतो. याचं उदाहरणच द्यायचं तर पुरुषप्रधान क्षेत्र म्हणूनच ओळखल्या जाणाऱ्या राजकारणात वावरणाऱ्या शरद पवार यांनी त्रेचाळीस वर्षांपूर्वी एकाच मुलीनंतर ऑपरेशन करून घेतलं, याचा पश्चिम महाराष्ट्रात कळत नकळत खूप परिणाम झाला आहे. एकुलत्या एका लेकीकडे आनंदाची खाण म्हणून बघणाऱ्या या पालकांचं आज ना उद्या समाजात अनुकरण होईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.
‘एकच मुलगी’ – संपादन – अरुण शेवते, ऋतुरंग प्रकाशन, मुंबई, पृष्ठे – २०७, मूल्य – २०० रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2013 1:02 am

Web Title: book review ekach mulgi
टॅग : Samiksha
Next Stories
1 कचरा
2 कॉफी हाऊस
3 दुसरी बाजू..
Just Now!
X