‘संवाद समन्वयात ग्राहक कल्याणम्’! भारतीय ग्राहक चळवळीचे हे सूत्र. ग्राहक शोषणमुक्ती साधण्यासाठी संग्राम करावयाचा असला, तरी कोणाविरुद्धही शत्रूता नाही. संघर्ष असला, तरी संहार नाही, या तत्त्वाने अथकपणे ग्राहक चळवळीची वाटचाल सुरू आहे. पुण्यात बिंदुमाधव जोशींनी लावलेल्या ग्राहक चळवळीच्या रोपटय़ाचा गेल्या ३८-३९ वर्षांच्या प्रवासात वटवृक्ष झाला आहे. माजी न्यायमूर्ती महंमद करीम छागला यांनी या ग्राहक चळवळीचे नामकरण १९७५ मध्ये ‘ग्राहक पंचायत’ असे करताना हे उदाहरण देशात स्वीकारले जाईल, असे व्यक्त केलेले भाकीत आज अक्षरश: खरे ठरल्याचे दिसून येत आहे. राजकीय पक्षांपासून अंतर राखून शासकीय अनुदान न घेता तोडफोड, उपोषण, घेराव असे मार्ग न स्वीकारताही ही ग्राहक चळवळ वाढत गेली. तिने कधीही आपल्या तत्त्वांशी फारकत घेतली नाही. त्याचे श्रेय निश्चितपणे बिंदुमाधवांच्या विचार व आचरण सिद्धांताचे आहे. ग्राहक चळवळीचे सिद्धांत आणि कार्यशैली वेदांतातील सूत्रांनुसार अनुसरल्याने ग्राहकांचे राष्ट्रोत्थानच नाही, तर ती देशाच्या नवनिर्माणाच्या उद्दिष्टांकडेही वाटचाल करणारी आहे. कारखानदार, व्यापारी, शेतकरी, श्रमिक आणि ग्राहक ही अर्थपुरुषाची उपांगे असून एकमेकांत संघर्ष नाही, तर सुसंवाद साधल्याने ही चळवळ यशस्वी होईल, अशा पद्धतीने कार्य सुरू आहे. त्यामुळे तिला ग्राहकांच्या युनियनचे स्वरूप प्राप्त झालेले नाही.
गेल्या अनेक वर्षांच्या वाटचालीत आपल्या मूळ उद्दिष्टांपासून आणि कार्यशैलीपासून जराही न ढळता ग्राहक चळवळीच्या मार्गावरील मैलाचे दगड गाठले गेले. त्याचे सविस्तर विवेचन ‘भारतीय ग्राहक चळवळ, सिद्धांत-साधना-सिद्धी’ या बिंदुमाधव जोशी यांनी लिहिलेल्या पुस्तकात करण्यात आलेले आहे. वेदांतातील सूत्रांनुसार ग्राहक चळवळीची मांडणी कशी करण्यात आली. अगदी ग्राहक पंचायतीच्या मुहूर्तापासून राजकीय नेत्यांना तिच्यापासून दूर ठेवण्यासाठी काय करावे लागले, या प्रसंगांचे वर्णन त्यात आहे. जगातील ग्राहक चळवळ किंवा कन्झ्युमर चळवळीचे वर्णन करताना ‘उपभोक्ता आंदोलन’ असे संबोधले जाते. पण ‘कन्झ्युमर’ म्हणजे ‘उपभोक्ता’ हा शब्द केवळ मानवी इंद्रियांची भोगेच्छा व्यक्त करतो. तर ‘ग्राहक’ हा शब्द मानवी शरीर, मन, बुद्धी व आत्मा या मनुष्याच्या इच्छापूर्तीशी संलग्न आहे. डेव्हिड मेकॉर्ड राईट याच्या ‘ओपन सिक्रेट्स ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ’ आणि बर्नार्ड शॉ यांच्या ‘रीड ऑफ फ्रीडम’मधील आर्थिक विकास आणि समाजवादाविषयीच्या उल्लेखांचा मथितार्थ पाहता उपभोग व उपभोक्ता हा पशुतुल्य विचार आहे. मानवी जीवन मनकेंद्रित आहे, तर पशू जीवन शरीरकेंद्रित आहे. त्यामुळे शरीर, बुद्धी, मन आणि आत्मा याने ग्रहण करतो तो ग्राहक, ही भारतीय चळवळीची भूमिका वेदांतवादी आहे. वेदांती दृष्टिकोन आणि संकल्पना मानवी जीवनाचा परिपूर्ण विचार आहे. त्यामुळे ‘ग्राहक’ हा विचार समग्र असून ग्राहक पंचायतीने ‘एकात्म ग्राहकनीतीच्या’ सिद्धांतावर भारतीय ग्राहक चळवळ उभारली आहे. पाश्चात्य देशातील चळवळ उपभोगावर आधारलेली असल्याने तिला मर्यादा आहेत. केवळ ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करणारे ते आंदोलन आहे. जगभरातील चळवळीपेक्षा भारतीय ग्राहक चळवळीचे हे वेगळेपण आहे.
१९७२ मध्ये पुण्यात ‘युवक महामंडळ’च्या माध्यमातून राष्ट्र उभारणीचे कार्य करताना राजकीय महत्त्वाकांक्षांकडे झुकणारे कार्यकर्ते मिळाले. इंदिरा गांधी पुण्यात येणार असल्याने प्रतिबंधात्मक अटक करून पोलिसांनी जोशी यांना आठवडाभर तुरुंगातही टाकले. त्यानंतर ‘युवक महामंडळ जनता ग्राहक चळवळ’ या पक्षविरहित विधायक चळवळीची दिशा सापडली. १९७२-७५ या काळात व्यापारात दलाल-मध्यस्थांचे प्राबल्य असताना ती मोडून काढण्यासाठी जोशी यांनी पुण्यात २५ कुटुंबांच्या ग्राहक संघांची साखळी तयार केली. पाहता-पाहता शेकडो आणि त्यातून हजारो ग्राहकांचे संघटन झाले. दिवाळीत लक्ष्मी रस्त्यावरील कापडाचे व्यापारी मोठी दरवाढ करून नफेखोरी करतात. त्यांना नामोहरम करण्यासाठी बहिष्कार आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले. मुंबईहून कापड गिरणीतून थेट माल मागविण्यात आला. पुणेकरांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला. ग्राहक पंचायतीच्या मुहूर्तमेढीची वर्षपूर्ती ज्येष्ठ साहित्यिक पु.ल. देशपांडे आणि रत्नाप्पा अण्णा कुंभार यांच्या उपस्थितीत साजरी झाली. पुण्यातील उद्योगपती, ज्येष्ठ संपादक यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळींचा पाठिंबा ग्राहक चळवळीला लागला आणि ग्राहक पंचायत व्यापक होत गेली. एखादी राजकारणविरहित चळवळ अनेक अवघड प्रसंगांना तोंड देत हजारो लोकांचा सहभाग असतानाही निर्दोष कार्यशैली ठेवत यशस्वी करून कशी दाखविता येते, याचा हा वस्तुपाठ सामाजिक क्षेत्रातील मंडळींना निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे.
पुण्यातील ग्राहक चळवळ राज्य पातळीवर पोचली व देशभरातही काम सुरू झाले. या प्रवासात माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री, ज्येष्ठ नेते जयप्रकाश नारायण, न्या. छागला, ज्येष्ठ गायक व संगीतकार सुधीर फडके आदी ज्येष्ठांचे मार्गदर्शन व पाठिंबा लाभला. संघटनेला दिशा व बळ मिळालेच होते. शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात १९९६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाअंतर्गत ग्राहक कल्याण उच्चाधिकार समिती स्थापन करून िबदुमाधव जोशींना अध्यक्षपद दिले. या काळात राज्य ग्राहक संरक्षण परिषदेची पुनर्रचना, ग्रामीण ग्राहकांच्या उत्थानाला प्राधान्य, घरगुती गॅस वितरकांचा आढावा, ग्राहक मंचांची नवी मांडणी, विद्यापीठ व शाळांमधून ग्राहक संरक्षण विषयाचा अभ्यासक्रमात समावेश आदी अनेक कामगिऱ्या केल्या. ग्राहक संरक्षण कायदा झाला आणि राष्ट्रीय ग्राहक प्रबोधिनीही स्थापन झाली. राजकीय पक्षापासून दूर राहिल्याने हे यश मिळाल्याचे बिंदुमाधव जोशींना वाटते आणि ज्या दिवशी ही चळवळ एखाद्या राजकीय पक्षाची शाखा होईल त्यादिवशी ती संपून जाईल. ग्राहकांच्या शोषणमुक्तीसाठीचा लढा सुरू ठेवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे त्यांचे आवाहन आहे.  विदेशी कंपन्यांचे आक्रमण, भांडवलशाहीच्या वातावरणात ग्राहकहित जपण्यासाठी हे आवश्यक आहे. ग्राहक चळवळीच्या वाटचालीतील टप्पे या पुस्तकात नमूद करण्यात आले आहेत. चार मित्रांनी किंवा शेजाऱ्यांनी एकत्र येऊन होलसेल दराने खरेदी केल्यास ती फायद्याची ठरते, या साध्या तत्त्वापासून घेतलेल्या गरुडझेपेची वाटचाल सर्वानाच वेगळे काही सांगून जाणारी व नवी दिशा देणारी ठरेल. त्यादृष्टीने हे पुस्तक वाचनीय आहे, यात शंका नाही.
‘भारतीय ग्राहक चळवळ, सिद्धांत-साधना-सिद्धी’ – बिंदुमाधव जोशी, राष्ट्रीय ग्राहक प्रबोधिनी, कसबा पेठ, पुणे,    पृष्ठे – ४००, मूल्य – २२० रुपये.