देशातील एक महत्त्वाचे रसायनशास्त्रज्ञ अशी ओळख असलेले व नुकताच ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त झालेले वैज्ञानिक सी. एन. आर. राव यांचे ‘सी. एन. आर. राव- अनोख्या रसायनाने बनलेला माणूस’ हे माधुरी शानभाग यांनी लिहिलेले चरित्र एक लक्षवेधी पुस्तक म्हणावे लागेल. त्यांच्या रसायनशास्त्रातील संशोधनाच्या खडतर प्रवासाबरोबरच त्यातील पायाभूत संकल्पनांची माहिती अतिशय सुलभ व रंजक स्वरूपात या चरित्रात मांडल्याने ते वाचनीय झाले आहे.
१७ प्रकरणांत विभागलेले १७५ पानांचे हे चरित्र डॉ. राव यांच्या बालपणापासूनची जडणघडण ते त्यांचा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर विज्ञान क्षेत्रात झालेला प्रवास नेमक्या शब्दांत मांडते. डॉ. राव यांचे आजवर १४०० शोधनिबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाले असून त्यांनी लिहिलेल्या व संपादित केलेल्या पुस्तकांची संख्या ४५ च्या वर आहे. देशातील व परदेशातील ४८ नामवंत विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान केल्या आहेत. पद्मश्री, पद्मविभूषण या किताबांबरोबरच त्यांना विज्ञान क्षेत्रातील महत्त्वाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत.
देशातील संशोधन संस्थांच्या महत्त्वपूर्ण पदांवर काम करणाऱ्या डॉ. राव यांच्या या प्रवासाचे व त्यातील यशाचे मूळ त्यांच्या बालपणात व कुटुंबातील संस्कारांत असल्याचे सुरुवातीच्या भागांत उलगडत जाते. आई-वडिलांनी शिक्षणाबरोबरच साहित्य, संगीत व इतर कलांचे केलेले संस्कार, विज्ञानाची गोडी लावणारे शाळेतील शिक्षक, लहान वयातच सी. व्ही. रामन यांच्यासारख्या थोर शास्त्रज्ञाशी झालेली भेट, स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात पं. नेहरू, डॉ. राधाकृष्णन यांची भाषणे ऐकायचा आलेला योग, म्हैसूर संस्थानाचे विलीनीकरण या व इतर अनेक घटना त्यांच्या जडणघडणीत कशा महत्त्वाच्या ठरल्या, हे ‘हिरवळीवरील बालपण’मध्ये वाचायला मिळते. डॉ. राव यांच्या प्रारंभीच्या टप्प्यावरील काही आठवणी यात आल्या आहेत. उदा. विद्यार्थी असताना त्यांना परीक्षा का आवडत नसे, घोकंपट्टीची व ती करून मार्क मिळवणाऱ्यांची त्यांना चीड का येत असे, या व इतर अनेक किश्श्यांतून त्यांचा स्वतंत्र, सर्जनशील स्वभाव समोर येतो.
पदवी मिळाल्यावर आपण पैसे कमवायच्या मागे न लागता संशोधन क्षेत्रात जाऊन ज्ञान कमवावे व त्यातून आपला व देशाचा विकास करावा म्हणून डॉ. राव यांनी उत्तर प्रदेशातील बनारस हिंदू विद्यापीठात एम. एस्सी. करायचा निर्णय घेतला. येथील शिक्षणविषयक गोष्टी ‘गंगाकिनारी’ या प्रकरणात वाचायला मिळतात. बनारस हिंदू विद्यापीठात झालेले देशभक्तीचे, संगीत व इतर कलांचे, शिस्तीचे संस्कार, डॉ. जोशी व डॉ. सहस्रबुद्धे या शिक्षकांमुळे आयुष्याला मिळालेले सकारात्मक वळण, विज्ञानविषयक विविध पुस्तकांचे झालेले वाचन, लिनस पॉलिंग या अमेरिकन रसायनशास्त्रज्ञाचा त्यांच्यावर पडलेला प्रभाव हे सारे रोचक पद्धतीने आपल्यासमोर येते. पीएच. डी. करताना अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे नाइलाजाने त्यांनी अमेरिकेतील पडर्य़ु विद्यापीठाची निवड केली आणि त्यांच्या आयुष्यात नव्या क्षितिजाचा उदय झाला. पडर्य़ु आणि बर्कले विद्यापीठांतील संशोधन सुविधा, मार्गदर्शन अत्यंत दर्जेदार असल्याने डॉ. राव यांनी अक्षरश: दुप्पट मेहनतीने आपले संशोधन कसे केले, याची हकीकत ‘नवी क्षितिजे- पडर्य़ु अन् बर्कले विद्यापीठ’ या प्रकरणात येते.

पीएच.डी. झाल्यावर अमेरिकेत राहून संशोधन करावे की भारतात जाऊन संशोधन वा नोकरी करावी, असे दोन पर्याय त्यांच्यासमोर असताना त्यांनी आपल्या मातृभूमीची निवड केली. कारण या काळात भारताला स्वातंत्र्य मिळाले होते आणि नवनिर्माणाचे वारे वाहत होते. पण इथला अनुभव मात्र दु:खदायक होता. अनेक छोटय़ा छोटय़ा गोष्टींसाठी त्यांना झगडावे लागले. पण त्यांनी हार मानली नाही. अत्यंत संयमाने त्यांनी अडचणींवर मात करत उत्कृष्ट संशोधक व उत्तम प्रशासक म्हणून भारत व जगभर नाव कमावले. त्यांच्या या खडतर प्रवासाची कल्पना ‘कानपूरचे व्यस्त दिवस’, ‘आय. आय. ए. सी.च्या परिसरात’, ‘लालफितीचे साहाय्यक रसायन’, ‘सत्तेच्या परिघात’, ‘अनोख्या रसायनाने बनलेला माणूस’ या प्रकरणांतून येते. आपल्याच देशात संशोधनाच्या सोयी मिळवण्यासाठी डॉ. राव यांना प्रचंड झगडावे लागले. सरकारी यंत्रणा व अधिकारी यांना संशोधनाचे महत्त्व पटवून देऊन लालफितीच्या कारभाराच्या जंजाळातून नव्या वाटा शोधाव्या लागल्या. डॉ. राव यांनी हे काम नाउमेद न होता केले.
रसायनशास्त्राची शाळा-महाविद्यालयांतील मुलांमध्ये गोडी निर्माण व्हावी म्हणून या वयोगटातील मुलांसाठी पायाभूत रसायनशास्त्राची पुस्तके लिहिण्यापासून ते रसायनशास्त्रावर आधारीत विविध कार्यक्रम घेण्याचे काम डॉ. राव यांनी आपल्या अत्यंत व्यस्त अशा वेळापत्रकातून केले व अजूनही करत आहेत. आयआयटी व तत्सम संशोधन संस्थांबरोबर काम करत असताना दुर्गम खेडय़ापाडय़ांतील मुलांत विज्ञानविषयक गोडी निर्माण करण्यासाठी काय करता येईल, यावर विचार करून स्वत: अनेक कार्यक्रम तयार करून त्यांची अंमलबजावणी अत्यंत उत्साहाने करणारे डॉ. राव या पुस्तकात भेटतात. सतत कार्यरत राहून राजकारण, हेवेदावे, मत्सर यांना दूर ठेवत तरुण पिढीला रसायनशास्त्रातील नव्या वाटा, संधींची दारे उघडे करणारे डॉ. राव नावाचे अजब रसायन या पुस्तकाच्या पानापानांतून प्रेरणा देत राहते.
डॉ. राव यांनी रसायनशास्त्रात आजवर केलेल्या कार्याची अतिशय मोजक्या शब्दांत माधुरी शानभाग यांनी ओळख करून दिली आहे. ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’चा पदभार सांभाळण्यापासून विविध संस्थांची पायाभरणी करून दर्जेदार संशोधनात स्वत:ला झोकून देणाऱ्या, उत्कृष्टतेचा आग्रह धरणाऱ्या संशोधन क्षेत्रातील या अवलियाचे हे चरित्र सर्वच क्षेत्रांत नवे काही करू पाहणाऱ्यांसाठी आदर्शवत व स्फूर्तिदायी ठरावे.
भारतातील संशोधन क्षेत्रातील निराशाजनक वातावरण दूर करून उपलब्ध साधनसामग्रीच्या साहाय्याने अडथळ्यांवर मात करत गुणवत्तापूर्ण कामांतून डॉ. राव यांनी अनेक सकारात्मक बदल करून दाखवले. संशोधन, तंत्रज्ञान व देशविकास याबाबतच्या त्यांच्या भूमिका अतिशय स्पष्ट आहेत. १९८८ च्या ‘सायन्स काँग्रेस’च्या अध्यक्षपदावरून बोलताना त्यांनी जागतिकीकरणाने र्सवकष बदल घडणार असून त्यात सामान्य असेल ते पाचोळ्यासारखे उडून जाईल आणि चोख बावनकशी तेच उरेल व टिकेल, हे स्पष्ट केले होते. यातून डॉ. राव यांच्या मर्मज्ञ दृष्टीचा प्रत्यय येतो. पुस्तकात डॉ. राव एक कुटुंबवत्सल माणूस म्हणूनही भेटतात. डॉ. राव व त्यांची पत्नी इंदुमती राव यांची जवाहरलाल नेहरू केंद्र, बेंगरुळू येथे घेण्यात आलेली दीर्घ मुलाखत सारांशरूपाने शेवटी दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्राशी असलेले त्यांचे नाते उलगडले आहे. अशा डॉ. चिंतामणी नागेश्वर रामचंद्र राव अर्थात डॉ. सी. एन. आर. राव यांची ओळख या चरित्रातून  होते. मात्र, या पुस्तकात काही महत्त्वाचे मुद्रणदोष आढळतात. त्यामुळे आशयाची संगती लागण्यात मर्यादा येतात.
‘सी. एन. आर. राव. : अनोख्या रसायनाने बनलेला माणूस’ – माधुरी शानभाग, राजहंस प्रकाशन, पुणे. पृष्ठे – १७५, मूल्य – २०० रुपये

anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान