‘तत्त्वज्ञानाचा अंत झाला आहे,’ अशी घोषणा केली जात असताना वर्तमान वास्तवावरची प्रतिक्रिया म्हणजे रवींद्र रूक्मिणी पंढरीनाथ यांची ‘खेळघर’ ही कादंबरी आहे. एका अर्थानं एकविसाव्या शतकातील वर्तमानाचा अन्वयार्थ लावू पाहणारी ‘खेळघर’ ही उत्तर-आधुनिक कादंबरी आहे.
ही कादंबरी नायक वा प्रतिनायक केंद्री नाही. आणि केवळ वास्तववादीही नाही. कल्पित आणि वास्तवाच्या समन्वय केंद्रावर उभी असणारी ही कादंबरी ‘खेळघर’लाच नायक  करून आकारत जाते. त्यामुळे आपोआपच विविध तत्त्वज्ञानांच्या शाखा, विचारधारा यांची सातत्यानं चर्चा घडते. ‘खेळघर’ ही एक संकल्पना आहे. विविध स्तरातल्या लोकांनी येऊन एका निसर्गरम्य परिसरात स्थापन केलेली ही लोकवस्ती आहे. तिथं समाजाचे रूढ आदर्श, बंधनं, परंपरा नाहीत. भिन्न-भिन्न लोकांनी एकत्र येऊन मानवी आयुष्य अधिक समृद्ध करण्यासाठी सर्व तत्त्वज्ञानांचा समन्वय साधून निसर्ग, विज्ञान आणि विविध धर्म यांच्यातील पूरक मूल्यांचा स्वीकार करून एक नवी व्याख्या जन्माला घातली. ती व्यवस्था म्हणजे ‘खेळघर’. पंधरा जणांनी सुरू केलेली वस्ती म्हणजे समतामूलक, पर्यावरण स्नेही आणि सामूहिक जीवनपद्धती अशा नवीन स्वरूपाची व्यवस्था आहे. इथं कुठलीही कुणावर बंधनं असणार नाहीत. पण तरीही एक कमीत कमी शोषण करणारी आचरण पद्धती त्यांनी आखलेली आहे. या आचरण पद्धतीतून ‘खेळघर’ आकारताना जे जे संघर्ष होतात आणि त्यातून जी नवी मूल्यव्यवस्था आकाराला येते, त्या व्यवस्थेचं चित्रण म्हणजे ही कादंबरी आहे.
कोणतीही एकच विचारप्रणाली लवचिक नाही बनली आणि काळानुसार ती संवादी नाही राहिली की ती साचेबंद होते. एकदा तिच्यात साचेबंदपणा आला की तिच्यातही मूल्यव्यवस्था अडचणीची, गैरलागू ठरते. असंच काहीसं डाव्या, स्त्रीवादी, हिंदुत्ववादी वगैरे विचारसरणींचं स्वरूप झालं असल्याचं वास्तव नोंदवणारी ही कादंबरी त्या त्या विचारप्रणालींच्या मर्यादाही उघड करत जाते. माणूस, समाज आणि निसर्ग यांच्या समन्वय साधत आपल्या गरजा अधिकाधिक कमी ठेवीत अंतिमत: मानवी जीवन कमी गुंतागुंतीचं आणि सुखकर व्हावं यासाठी कोणतीही विचारप्रणाली असावी असा एक सूर या कादंबरीतून उमटत राहतो. हा सूर वास्तवावर भक्कम पाय ठेवून उभा असल्यामुळे तो रंजक किंवा आदर्शवादी न बनता अधिक अर्थपूर्ण बनत जातो. त्यामुळे ही कादंबरी केवळ वास्तव आणि कल्पिताचा खेळ उभारत नाही, तर एका अर्थाने एक सांस्कृतीक विधानापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करते, हे तिचं यश आहे.
‘खेळघर’मधील व्यक्तिरेखाही लक्षणीय आहेत. मार्क्‍सवाद व विवेकवाद यांचा समन्वय साधणाऱ्या कॉ. माधव कराडकरांची, त्यांची पत्नी शशी, मैत्रीण आणि मुलगी यांची जशी एक कुटुंबकथा येते, तशाच अनेक खेळघरातल्या सदस्यांच्या कथाही येतात. या सगळ्या कथांना सामावून आकारणारी ‘खेळघर’ची कथा विलक्षण बनते ती व्यक्तिरेखांच्या सादरीकरणामुळे. कारण येथे भेटणारी प्रत्येक व्यक्ती विचित्र द्वंद्वात सापडलेली आहे. प्रत्येक जण ‘आऊटसायडर’ होऊन स्वत:ला न्याहाळताना अचंबित होतो आहे. बुचकळ्यात पडतो आहे. तथाकथित रूढ नैतिक मूल्यसरणी कितीतरी कूचकामी आहे, तरीही त्या काचांसह जगताना स्वत:चा तळठावच लागू नये का, असा संभ्रम घेऊन ही माणसं जगताना दिसतात. या संभ्रमात ती अधिक एकटी पडून ‘खेळघर’ सोडून जातात, तर काहीजण रूढ संकेत नाकारून आतला आवाज ऐकत ‘खेळघर’ अधिक प्रगल्भ करू पाहतात. अर्थात हा जसा एक सामाजिक सलोख्याचा प्रयोग आहे; तसाच तो प्रत्येकाच्या शोधाचा स्वतंत्र प्रवासही आहे.
नात्यांना व एकेका मूल्यसरणीला कवटाळून राहिल्यामुळे वाटय़ाला आलेल्या एकाकीपणाला पर्याय शोधणारी माणसं या कादंबरीत भेटतात आणि तो पर्यायी प्रयोग ‘खेळघरा’त यशस्वी करतात. पटवर्धन काका, अन्वर काका, रमा, ऊर्जा, विजय, राजेंद्र, रेखा, राधा, मानसी अशा अनेक व्यक्तिरेखा भेटत राहतात. या व्यक्तिरेखा समाजसुधारणेचं व्रत घेऊन जगत नाहीत, तर आपला प्रवास कमी अडथळ्यांचा आणि संकेतमुक्त कसा होईल यासाठी धडपडतात. त्यांची ही धडपड स्वत:पुरती असली तरी ती इतरांना प्रकाश देणारी आहे. परंतु या प्रकाशाबद्दलही या व्यक्तिरेखा स्वत: संभ्रमित असलेल्या दिसतात. म्हणून ही कादंबरी समारोपाकडे येताना विधानात्मकतेकडे झुकते. बंधमुक्त स्वातंत्र्याचा आणि विविध वादांच्या समन्वयाला केंद्रस्थानी ठेवणारी ही कादंबरी निराशाजनक चित्र पुसून टाकते.
रूपबंधाला अधिक लवचिक करताना ही कादंबरी श्री. व्यं. केतकरांच्या कादंबरीची आठवण करून देते. चरित्र, डायरी, कविता, उर्दू शायरी, वृत्तपत्रातील स्तंभ, लेखन, निवेदन, बातम्या, वृत्तांत लेखन, दैनंदिनी, फ्लॅशबॅक, चर्चा, संवाद निवेदन अशा विविध अंगांनी आकारत जाते. एका अर्थानं नव्या समाजाचं चित्र नोंदवत समाजशास्त्रीय प्रबंधाकडे झुकते. पण त्याचवेळी आपलं कादंबरीपण जपत त्या समाजशास्त्रीय मांडणीला व्यक्तिरेखांच्या जगण्याचे आणि संघर्षांचे पैलू बेमालूमपणे जोडून वाचनीयता टिकवून ठेवते. एखादी व्यक्ती एखादी विचारधारा स्वीकारताना कोणत्याही एका दर्शनबिंदूतून त्याकडे न पाहता विविध दर्शनबिंदूंनी ती कशी अवतरू शकते, या  शक्यतांचा शोध घेताना दिसते. त्यामुळे कादंबरीचा रूपबंध कॅलिडोस्कोपी बनतो. तरीही त्या सगळ्या विभिन्न चित्रांना एका रेषेत बांधून ठेवणारी माधव-मैत्रेयी या बाप-लेकीच्या नात्याची व स्वत:च्या शोधाची अंतर्गत किनार हे बहुरंगी वस्त्र अधिक सुंदर बनवण्यास मदत करतं. विस्कळीतपणा आणि अंतर्गत मानवी तळाच्या शोधाचा सलग असा सुसंगतपणा या दोन टोकांमुळे रूपबंध तोलून धरण्यास मदत झाली आहे. निवेदनाचे असंख्य प्रकार, भाषेची प्रगल्भ जाण व कादंबरीकाराचा विवक्षित दृष्टिकोन कादंबरीचे यश बळकट करतो.
अंतिमत: विखंडीत डेडएण्डला आलेल्या मानवी जीवनात व एकूणच जागतिकीकरणाला तोंड देणारी आपली स्वत:ची ओळख निर्माण करणारी ही कादंबरी २१ व्या शतकातील मराठी कादंबरीच्या इतिहासात आपली दखल घ्यायला भाग पाडणारी असून, खुल्या समारोपांच्या विविध शक्यतांचा शोध घेतानाही आशादायक चित्र निर्माण करणारी आहे.
‘खेळघर’- रवींद्र रूक्मिणी पंढरीनाथ,
मनोविकास प्रकाशन, पुणे,
पृष्ठे- २८६, मूल्य- २९० रुपये.

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
lokmanas
लोकमानस: भाजपची हूल आणि गडी बाद