गणेश मतकरी यांच्या ‘खिडक्या अध्र्या उघडय़ा’ या नवीन पुस्तकाचे लौकिकार्थाने जरी कथासंग्रह म्हणून वर्गीकरण करता आले, तरी या सर्व कथा माळेत ओवलेल्या मण्यांप्रमाणे एकाच दोऱ्यात गुंडाळलेल्या असून, त्या वाचकाला एक विलक्षण अनुभूती देतात. जागतिकीकरणाच्या रेटय़ात अपरिहार्य होत गेलेल्या बदलत्या राहणीमानाचे, नवश्रीमंतीने लादलेल्या नव्या मानसिकतेचे आणि मध्यमवर्गातून स्थलांतरित होऊन उच्च मध्यमवर्गीय या एका नव्याच वर्गश्रेणीत स्थिरावलेल्या माणसांच्या आयुष्याचे एक अपरिचित दर्शन या कथासंग्रहातून घडते. आपल्याच भोवतालच्या या नव्या समाजाचे, माणसांचे, कुटुंबांचे आणि त्यांच्या मानसिकतेचे एक कॅलिडोस्कोपिक दर्शन लेखक या कथांमधून घडवतो. कॅलिडोस्कोपमधून पाहताना जशा त्याच त्याच काचांचे नवनवीन रंगीबेरंगी दर्शन दर्शकास घडते, त्याचप्रमाणे या संग्रहातील प्रत्येक कथेतून आधी भेटलेलीच पात्रे आपल्याला पुन्हा पुन्हा भेटत जातात; पण दरवेळी (दर कथेत) या माणसांच्या आयुष्याचे आणि मानसिकतेचे नवनवीन पलू आपल्यासमोर उलगडतात.
सानिका, आगाशे आणि अनंत या तीन वास्तुविशारदांनी एकत्रित स्थापन केलेल्या एसएनए आíकटेक्चरल फम्र्स या वास्तुविशारद कंपनीभोवती या सर्वच कथांचे कथानक फिरत असले, तरी प्रत्येक कथेमधून भेटणाऱ्या माणसांच्या व्यामिश्र नातेसंबंधांचे लेखकाने घडवलेले दर्शन अत्यंत वेधक आहे. सानिका आणि सुश्रुत हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे जोडपे, त्यांचा कुत्रा रोबी, त्यांच्याच इमारतीत आपल्या बँजो नामक मांजरासोबत राहणाऱ्या एकटय़ा जोशीकाकू आणि त्यांचा परदेशी स्थिरावलेला व तिथे राहून आईची काळजी करणारा मुलगा हा या कॅलिडोस्कोपचा एक कोन. या कॅलिडोस्कोपचा दुसरा कोन सानिकाचा बिझनेस पार्टनर अनंत, त्याचा शाळेत जाणारा किशोरवयाकडून कुमारवयाकडे जाणारा मुलगा रोहन, त्याचा मित्र भाविन, रोहनची मत्रीण सौम्या,  सौम्याची मोठी बहीण रिधिमा अशा अनेक व्यक्तिरेखांना स्पर्श करून जाणारा आहे. एसएनएमधील कॉर्पोरेट घडामोडी, त्यातून निर्माण होणाऱ्या आणि तत्त्वांशी केल्या जाणाऱ्या अपरिहार्य तडजोडी, कालचा सूड आज, आजचा उद्या घेण्याची वृत्ती आणि हळूहळू वळवळत मोठा होत जाणारा भ्रष्टाचाराचा किडा, हा या कॅलिडोस्कोपचा तिसरा कोन.
सुश्रुत आणि सानिकाचे कथानक हे तसे पाहता या बहुकथासूत्रांतील प्रमुख सूत्र असे म्हणायला हरकत नाही. कारण या बहुकथासूत्रांची सुरुवात आणि शेवट या दोन प्रमुख पात्रांभोवतीच होतो. सुश्रुत आणि सानिका मध्यमवर्गीय कुटुंबातून जन्माला येऊन पुढे गेलेले जोडपे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याने त्यांच्यात स्वत:च्या नात्याविषयी सतत ठसठसत असणारी असुरक्षितता. सुश्रुतला सातत्याने लागलेली सानिकावर अस्तित्वनिहाय अवलंबून असण्याची टोचणी. त्याचवेळी सानिका आणि स्वरूपा या जुन्या मत्रिणींमध्ये अनेक वर्षांपूर्वी झालेला बेबनाव आणि वर्तमानात जुन्या नात्याला उजाळा देण्याच्या प्रखर इच्छेपुढे बाजूला पडलेले दोघींचेही स्वाभिमान; आणि सुश्रुत व जोशीकाकूंच्या एकटेपणातली समांतरता, असे अनेक अंतप्र्रवाह नात्यांच्या या पहिल्या कोनातून पाहता येतात. या बहुकथासूत्रांतील सर्वाधिक प्रबळ असा हा कोन असून वेगवेगळी पात्रे, त्यांची मानसिकता आणि मुंबईच्या बेसुमार गर्दीतही प्रत्येकाला जाणवणारा एक ठसठशीत एकटेपणा हे सारे प्रभावीपणे चितारण्यात लेखक यशस्वी झालेला आहे.
या बहुकथासूत्रातील दुसऱ्या कोनाच्या केंद्राभोवती रोहन हा शाळकरी मुलगा असला, तरी कथानिवेदनाचे सूत्र अशा पद्धतीने फिरते की, रोहन भोवतालची अनेक माणसे, पात्रे कवेत घेत हे सूत्र एकटय़ा रोहनचे न राहता त्याचे वडील आणि सानिकाचा बिझनेस पार्टनर अनंत, त्याचे कॉर्पोरेट आयुष्य, त्या कॉर्पोरेट आयुष्याच्या दाबापुढे एकुलत्या एक मुलाकडे पुरेसे लक्ष देता न आल्याची त्याला लागलेली टोचणी यासारख्या अनेक मानवी भावभावनांचे रंग भरत पुढे सरकते. विशेषत: रोहनचे भावविश्व खूपच उत्तम पद्धतीने पुढे येते.
अनेक पात्रांच्या, माणसांच्या गर्दीत वावरणारी ही सगळीच पात्रे, माणसे आयुष्यात कुठे तरी एकटी आहेत. या बहुविध माणसांच्या एकटेपणाचा अंतप्र्रवाह, सुश्रुत सानिकाच्या नात्यात निव्वळ असंवादामुळे (विसंवादामुळे नव्हे!) पडत जाणारी दरी; रोहन, सौम्या, पुशी यांचे कुमारवयीन भावविश्व; तसेच राम्या, रिधिमा आणि हर्षचे करिअरिस्टिक मार्गावरील कॉलेज जीवन आणि तद्नुषंगिक मानसिकतेचे चित्रण या गोष्टी विशेष उल्लेखनीय आहेत. मुंबईतली गर्दी, पाऊस, जत्रा अशा घटकांद्वारे लेखक या कथांमधून मुंबईचे जे ओझरते दर्शन घडवतो ते अधिक स्पष्ट करता येणे शक्य होते. असे असले तरी ते एका वेगळ्याच स्मरणरंजनाच्या विश्वात नेते हेही नाकारता येत नाही.
मुळात या कथांमधून आपल्याला भेटणारी ही सगळी माणसे एकमेकांशी या ना त्या तऱ्हेने जोडली गेलेली आहेत. ही माणसे एका वेगळ्या जगातली असली तरी ते जग वाचकाला पूर्णत: अपरिचित नाही. कालपर्यंत मध्यमवर्गीय असलेली पण आज वेगाने ऐहिक प्रगतीच्या दोन पायऱ्या वर चढून गेलेली ही माणसे, त्यांचे स्वभाव आणि त्यांची बदलत गेलेली रुची-राहणीमान यांचे एक विलक्षण पारदर्शी चित्रण या कथा करतात. प्रत्येक कथेला वेगळा प्रथमपुरुषी निवेदक घेऊन या सर्व माणसांच्या अंतर्गत स्वभावप्रवाहांचे यथार्थ चित्रण करताना निवेदनशैली म्हणून स्वीकारलेला भाषेचा पोतही नावीन्यपूर्ण आणि म्हणूनच प्रशंसनीय आहे. बदलत्या जगातील भाषिक आक्रमणाचे भान ठेवून भाषेचा जो पोत भाषिक अस्मितेला बाजूला सारून लेखक अंगीकारतो तोही कौतुकास्पद आहे. विशेषत: या भाषेच्या पोतातील सातत्य आणि त्यावर ठेवलेले नियंत्रण चकीत करणारे आहे. असे असले तरी, या संग्रहातील दहा कथांमधून प्रकट झालेले दहाही निवेदक निवेदनाचा (स्वप्रकटीकरणाचा) एकच सूर अवलंबतील का, हा प्रश्न पडतोच. विशेषत: कुमारवयीन रोहन बोलताना इंग्रजी वाक्ये वापरतो, पण लगेचच ‘भीषण’सारखा शब्दही वापरतो हे खटकते. जोशीकाकू सॉलीटेयर खेळतात हे गमतीदार आहे; पण त्यांनी ‘नतिक अनेस्थेटिक’ वगैरे शब्द निवेदनात वापरणे खटकते.
अनेक छोटय़ामोठय़ा अंतप्र्रवाहांना कवेत घेऊन ‘खिडक्या अध्र्या उघडय़ा’ वेगाने बदलणाऱ्या आधुनिक समाजाचे एक यशस्वी चित्रण करते. हे सारे करताना निवडलेला, एकमेकांशी साखळी पद्धतीने बांधलेल्या छोटय़ामोठय़ा, कथांचा आकृतीबंधही नावीन्यपूर्ण आणि म्हणूनच वेधक व प्रशंसनीय आहे. आधुनिकीकरणाच्या अपरिहार्य दाबाखाली नव्या अंगरख्यानिशी समोर येणारी ही आपल्या भोवतालची माणसे, त्यांचे किंचित बदललेले; पण तरीही ओळखीचे जग आणि त्यांच्या परस्पर नात्यांचा अन्योन्यसंबंधांच्या चित्रणात लेखक यशस्वी झालेला आहे हे मात्र निसंशय.
‘खिडक्या अध्र्या उघडय़ा’ – गणेश मतकरी, समकालीन प्रकाशन, पुणे, पृष्ठे – १५८ , मूल्य – १५० रुपये.

iPhone users in 91 countries warned to beware of Pegasus like spyware
‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरपासून सावधान! ९१ देशांतील आयफोन वापरकर्त्यांना इशारा
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान