News Flash

‘हिरव्या प्रकाशा’चं उत्तरायुष्यातलं मंद, स्निग्ध रूप!

सुप्रिया दीक्षित यांचे ‘अमलताश’ हे आत्मकथन अलीकडेच प्रकाशित झाले आहे. सुप्रिया या प्रकाश नारायण संत यांच्या पत्नी. प्रकाश नारायण संत हे इंदिरा संत यांचे थोरले

| June 2, 2013 01:02 am

सुप्रिया दीक्षित यांचे ‘अमलताश’ हे आत्मकथन अलीकडेच प्रकाशित झाले आहे. सुप्रिया या प्रकाश नारायण संत यांच्या पत्नी. प्रकाश नारायण संत हे इंदिरा संत यांचे थोरले चिरंजीव आणि ‘वनवास’, ‘शारदासंगीत’, ‘पंखा’ आणि ‘झुंबर’ या कथासंग्रहांमुळे कथाकार म्हणून ख्यातनाम झालेले लेखक. साहित्यिकांच्या सहचारिणींनी लिहिलेल्या आत्मकथनांचे एक स्वतंत्र दालन मराठीत निर्माण झाले आहे; तथापि ‘अमलताश’ हे आत्मकथन त्यांत स्वत:च्या वेगळेपणाने उठून दिसणारे आहे. साहित्यिकांच्या सहचारिणींनी लिहिलेली अनेक आत्मकथने चर्चेचा विषय ठरली ती त्या आत्मकथनांमागच्या भूमिकांमुळे. आपला पती हा लोकप्रिय लेखक. वाचकांच्या मनात त्याचे काही एक स्थान आहे, याची जाणीव सतत मनात बाळगून साहित्यिकांच्या सहचारिणी त्यांच्याबरोबर घालवलेल्या आपल्या जीवनाचा लेखाजोखा मांडत आहेत, असे ही आत्मकथने वाचताना वाटत राहते. अर्थात याचा अर्थ असा नाही की, लेखक म्हणून त्याची निर्मिती, त्यामागची प्रक्रिया, त्याचा लेखनप्रवास, त्यातले चढउतार, यशापयश या गोष्टींवर या आत्मकथनांमधून त्यांना प्रकाश टाकायचा आहे. तसे असते तर या आत्मकथनांचे मोल अधिक वाढले असते, पण तसे नाही. वाचकाला परिचित असणारा त्याचा आवडता लेखक हा पती म्हणून कसा होता, वाचकाच्या मनात त्याची जी काही प्रतिमा आहे तिच्याहून तो कसा वेगळा होता; नव्हे, मी अनुभवलेला माणूस म्हणून तो तुमच्या मनातील प्रतिमेपेक्षा, प्रत्यक्षात हा असा होता-आहे- तुम्हाला ठाऊक नसलेले त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे हे रंग बघा, कसे मी त्याच्याबरोबर आयुष्य घालवले ते बघा, असा एक सूर आत्मकथनांमधून ऐकू येत राहतो. एक प्रकारच्या आविर्भावाने ही आत्मकथने सांगितलेली आहेत आणि त्यामुळे साहित्यिकांचे गुणदोष (आणि स्वत:चे गुण!) आहेत त्याहून  गडद रंगवले गेले आहेत.
सुप्रिया दीक्षित (ऊर्फ सुप्रिया-सुधा-संत) यांच्या आत्मकथनामागे ‘प्रसिद्ध कथालेखक प्रकाश नारायण संत’ यांच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवणे हा उद्देशच मुळात नाही. ‘अमलताश’ हे आत्मकथन लिहिण्यामागे वेगळी मानसिक गरज आहे. जुलै २००३ मध्ये प्रकाश संत यांचे अचानक अपघाती निधन झाले. आयुष्याची सुमारे साठेक वर्षे ज्याच्या सोबतीने घालवली, तो सहचर एकाएकी मृत्यू पावल्यानंतर त्याच्याबरोबर घालवलेले जीवन पुन्हा एकदा मनोमन जगणे हा या कथनामागचा हेतू असल्याने या आत्मकथनाला एक वेगळा पोत लाभला आहे.
सुप्रिया दीक्षित यांचे माहेरचे नाव सुधा ओळकर. लहान असतानाच त्या आईबरोबर आईच्या माहेरी आल्या. आजोबा निष्णात वकील, पुरोगामी. मुलगी माघारी परतल्यावर त्यांनी तिला शाळेत घातले. उच्च शिक्षण देऊन आत्मनिर्भर बनवले. आजी-आजोबा, मामा यांच्या प्रेमळ सावलीत सुधाताईंचे बालपण, शालेय जीवन किती सुखात गेले याचे वर्णन प्रारंभी येते, पण ते ओघात आणि जागा व महत्त्व टाळून. आई बेळगावलाच मराठी ट्रेनिंग कॉलेजात नोकरी करत होती, त्या वेळी इंदिरा संत त्यांच्या सहकारी होत्या. पतिनिधनानंतर इंदिराबाई प्रकाश, रवी आणि पुष्पा या तीन मुलांसह राहू लागल्या होत्या. त्यांच्या आईंनी प्रकाशला दत्तक घेतले असल्याने प्रकाश हा भालचंद्र गोपाळ दीक्षित झाला. या चंदूशी सुधाची चांगली मैत्री झाली. वडिलांच्या अकाली निधनाने ओढवलेल्या खडतर परिस्थितीने चंदू प्रौढ, गंभीर झाला होता, पण घरातल्या वाङ्मयीन आणि कलासक्त वातावरणाने तो इतर मुलांहून वेगवेगळ्या वैशिष्टय़ांनी समृद्ध कसा होता हे त्या वयात सुधाला कळत होते. वाचन, चित्रकला, संगीत यांची त्याला आवड होती. त्याची अंतर्मुख वृत्ती, सौंदर्यदृष्टी, त्याची परिपक्वता यामुळे कुमारवयातच सुधा त्याच्याकडे आकर्षित होऊ लागली होती. या बालमित्राच्या सहवासात घालवलेला काळ सुधाबाईंनी अगदी निमग्न होऊन उभा केला आहे. पुढे सुधा वैद्यकीय शिक्षणासाठी मुंबईला आणि चंदू जिऑलॉजीत बी.एस्सी. होण्यासाठी पुण्याला राहू लागतात. चंदूचे ललित लेख ‘सत्यकथे’तून प्रकाशित होऊ लागले होते. निसर्गात रमणारा, रसिक, संवेदनक्षम चंदू सुधाला पत्रे लिहू लागला. दोघांच्या पत्रव्यवहारातून सुधाला त्याचे हळवे मन अधिकाधिक कळू लागले. सुधाचे ध्येय निश्चित होते. तिला डॉक्टर व्हायचेच होते- आईसाठी, आजोबांसाठी. अशा स्थितीत नुकताच बी.एस्सी. होऊन कुवेशीला खाणकामाचे ट्रेनिंग घेणाऱ्या चंदूने तिला लग्नाविषयी विचारले तेव्हा मनात होकार असूनही सुधा त्याला नकार कळवते आणि जेव्हा ती एम.बी.बी.एस. होते तेव्हा लग्न करायचे तर ते फक्त चंदूशीच हे ती आई-आजोबांना सांगते. २२ मार्च १९६२ साली दोघे विवाहबद्ध होतात.
सुमारे ३५० पृष्ठांच्या या आत्मकथनाचा हा पूर्वार्ध शंभर पृष्ठांच्या आतच निवेदिलेला आहे. चंदू-प्रकाश- हे या आत्मकथनाचे केंद्र आहे. सूर्याच्या भोवती सूर्यमालेतल्या ग्रहांच्या कक्षा असाव्यात तशी आई, आजी, आजोबा, मामा, इंदिरा संत, त्यांच्या भगिनी कमल फडके, सुधाच्या मैत्रिणी, प्रकाशची भावंडे, असे अनेक आप्तमित्र यांच्याविषयी सुधाताई सांगतात, पण केंद्र प्रकाश हेच असते. वास्तविक पाहता इंदिरा संत, कमल फडके,
ना. सी. फडके ही त्या काळातली वलयांकित माणसे, पण त्यांच्याबद्दल काही भरभरून लिहायचे असा सुधाबाईंचा मानस नाही. क्वचित इंदिराबाई किंवा कमलाताई यांच्या संदर्भात, प्रकाश संतांची पत्नी या नात्याने, नव्या भूमिकेत वावरताना डॉक्टर झालेली सूनवायरी सुधा आणि तिच्याकडून असणाऱ्या अपेक्षा यांच्या मनावर क्षणभर ओरखडे उठवणाऱ्या प्रसंगांच्याही आठवणी येतात, पण ते सांगणाऱ्या सुधाबाई त्या त्या प्रसंगांच्या वेळीही आपला तोल कुठेही जाऊ देत नव्हत्या हे जाणवत राहते. सुधाच्या डॉक्टर असण्यापेक्षा तिने प्रकाशची पत्नी असणे महत्त्वाचे असणाराच तो काळ होता. त्यातून अपेक्षा, अपेक्षाभंग, समज, गैरसमज यांच्या वावटळी आल्या आणि विरल्या. प्रसंगी स्वत:च्या करिअरची, महत्त्वाकांक्षेची पर्वा न करता प्रकाशचा संसार, दोघांचे सहजीवन आणि प्रकाशचे मन सांभाळणे हेच सुधाबाईंनी आपले कर्तव्य मानले. हे सांगत असताना कुरकुर, तक्रार अन्यायासंबंधीचा काही उच्चारदेखील त्या करत नाहीत. आणि आपण कुठे काही तडजोड करतो आहोत, त्याग करतो आहोत याचा कोठेही आविर्भाव दिसत नाही.
प्रकाश संतांचा हळवा, चटकन् स्वत:ला दुखवून घेणारा स्वभाव वेळोवेळी सुधाबाईंची सत्त्वपरीक्षा घेत असे, पण त्यापेक्षा त्यांची रसिकता, वाचन, संगीत आणि चित्रकला यात रमणारे मन, सगळ्या गोष्टींमध्ये सुधाबाईंना सहभागी करून घेण्याची वृत्ती या संदर्भातले क्षण सुधाबाईंनी अधोरेखित केले आहेत. त्यांचे कुटुंब मोठे, काही ना काही अडचणी, दुखणी, अचानक उद्भवत. कराड-कोयनानगर परिसरात झालेले भूकंप, नोकरीतले कसोटीचे प्रसंग यांनीही हादरून जावे असे अनुभव येत- आनंदाच्या क्षणाला गालबोट लागण्याचे क्षण येतच. सर्व प्रसंगांतून सुधाबाईंचे संयत, खंबीर, संकटातही न डगमगणारे, स्वत:चा आणि प्रकाश संत आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या प्रतिष्ठेचा आब राखण्याची काळजी घेणारे प्रगल्भ आणि समंजस व्यक्तिमत्त्व या आत्मकथनातून प्रकट होत राहते. उत्कट तरीही समतोल असे हे आत्मकथन भावविवशता, प्रौढी, आक्रस्ताळेपणा, आत्मकरुणा, अतिरंजितपणा, ऊरबडवेपणा अशा स्त्रियांच्या आत्मकथनात हटकून डोकावणाऱ्या दोषांपासून स्वभावत:च दूर आहे. जे आहे ते आहे त्याहून सुंदर दाखवणे किंवा जे नाही तेच वेगवेगळ्या प्रकारे अधोरेखित करत राहणे हे दोन्ही प्रकार या आत्मकथनात नाहीत.
सांसारिक जीवनातले हर्षखेद अनुभवताना, कवी अनिलांच्या ‘आणीबाणी’ कवितेतल्या ओळीप्रमाणे, ‘फक्त हाती हात होते’ हेच सहजीवनाचे सार्थक त्यांना सांगायचे आहे. प्रकाश संत लिहू लागले ते नारायण संतांच्या लघुनिबंधांपासून प्रेरणा घेऊन. पण पुढे त्यांच्या लेखनात खंड पडला. आपण त्यांना संसारात गुंतवून घेतल्यामुळे तर असे झाले नाही ना याची खंत सुधाबाईंना वाटत असे, इतरांनाही. तसेच तर वाटत नाही ना, या जाणिवेनेही त्या अस्वस्थ होत. पण ‘लंपन’चे भावविश्व उलगडणाऱ्या कथा प्रकाश संत वेगाने लिहू लागले ते जवळजवळ तीस वर्षांच्या काळानंतर. ‘बांध फुटल्यासारखं प्रकाशांचं लेखन चाललं होतं.. महापूर आला होता. मी फक्त मोजण्याचं काम करत होते’ या शब्दांत सुधाबाईंनी त्यांच्या नव्याने सुरू झालेल्या लेखनाचे वर्णन केले आहे. त्यांना प्रकाश संतांबरोबर घालवलेल्या आयुष्याचे अप्रूप वाटते. त्या स्वत:ला त्यांच्या तुलनेत कमी जोखतात. बुद्धिमान, कर्तृत्ववान, कर्तव्यदक्ष, वृक्षवल्ली आणि पक्षी यांसबंधित जाणकारी असणारी, स्वत:च्या व्यवसायावर निष्ठा असणारी, माणसे जोडणारी अशी अनेक अंगांनी समृद्ध स्त्री असूनही त्या स्वत:चे मोठेपण मिरवत नाहीत.
इंदिरा संत, सुरेश गजेंद्रगडकर, श्रीनिवास विनायक कुलकर्णी, गं. ब. ग्रामोपाध्ये, श्री. पु. भागवत, वासंती मुझुमदार अशांसह अनेक साहित्यिकांची व्यक्तिमत्त्वेही त्या जाणतेपणाने उभी करतात. असे समृद्ध, विविध अनुभवांनी उजळून निघालेले जीवन प्रकाश संतांना झालेल्या अपघातानंतर झाकळून येते. दोन्ही मुले डॉक्टर म्हणून यशस्वी झालेली, प्रकाश संत त्यांच्या भूगर्भशास्त्र या विषयात पीएच.डी. मिळवून ख्यातनाम झालेले, स्वत:चे सुंदर घर उभे राहिलेले, आता एकमेकांसाठी जगण्याचा काळ सुरू झालेला, कथाकार म्हणून प्रकाश संतांवर कौतुकाचा, पुरस्कारांचा वर्षांव होत असल्याने एकीकडे हुरूप वाढलेला तर दुसरीकडे इंदिरा संत यांच्या मृत्यूनंतर प्रकाश संतांना या आघातातून सावरते होण्याची धडपड चाललेली, अशा जराशी उसंत लाभलेल्या जीवनावर एकाएकी आभाळच कोसळते. २९ जून ते १५ जुलै २००३ या काळात शुद्ध हरपून मृत्यूशी झगडणाऱ्या प्रकाश संतांचे अखेरचे दिवस सुधाबाई तपशीलवार एकएक क्षण मोजावा तसे टिपतात.
हे आत्मकथन म्हणजे जवळजवळ बासष्ट वर्षांचा मन:पूर्वक केलेला जीवनप्रवास पुन्हा अनुभवणे आहे. ‘वय वाढत जाताना मनात कुठलाही सल असू नये’ या आपल्या समंजस आईकडून एका शहाण्या मुलीने आत्मसात केलेल्या तत्त्वानुसार जगलेले जीवन पुन्हा न्याहाळणे आहे. ‘अमलताश’ हे प्रकाश संतांनी आपल्या घरासाठी सुचवलेले नाव आहेच, पण त्याचबरोबर, मंद पिवळ्या रंगाच्या घोसांनी लगडलेल्या वृक्षासारखे संपन्न, डौलदार आणि विनम्र व्यक्तिमत्त्व असणाऱ्या सुधाबाईंचेच जणू ते वर्णन वाटते. प्रकाश संतांनी (‘चांदण्याचा रस्ता’ या त्यांच्या ललित लेखांच्या संग्रहात समाविष्ट असलेला) ‘हिरवा प्रकाश’ सुधाबाईंच्या रूपाने तारुण्यात अनुभवला होता. त्याचेच आता उत्तरायुष्यातले हे मंद, स्निग्ध रूप आहे.
‘अमलताश’ – सुप्रिया दीक्षित,
मौज प्रकाशन गृह, मुंबई,
पृष्ठे -३४४, मूल्य – ३७५ रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2013 1:02 am

Web Title: book review of amlatash
Next Stories
1 नक्षत्रांचे देणे- पैल
2 क्रिकेट कसे पाहावे
3 आम्हास आम्ही पुन्हा पाहावे, काढुनी चष्मा डोळ्यांवरचा!
Just Now!
X